रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली
उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली!
फांदीवरुन कानी येतात सूर काही
मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली!
गेला चुकून ताफा येथून राजशाही
इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!
आता नव्या युगाची कविता नवी लिहूया
भरपूर आजवर नुसती काटछाट झाली!
फिरतोय स्वप्नवेडा..किरणे धरुन हाती
निद्रिस्तश्या जगाची,झाली..पहाट झाली!
—सत्यजित