ती उत्तर मागत नाही...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
29 Jun 2017 - 4:00 pm

निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा
मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा!

मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी
ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!

ती जाता सहजच म्हणते,'स्वप्नात आज मी येते'
हलकेच झोपही माझ्या,डोळ्यावर येते तेंव्हा!

सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी
निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा!

हे आता उमगत आहे,माझीच गझल आहे 'ती'
ती उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

29 Jun 2017 - 9:45 pm | जेनी...

सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी
निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा.....

अफलातुन :)

मोहक सुगंधित हसणे
हलकेच दवाने सजणे
ते रुप कळीचे खुलते
थेंबांनी भिजते तेव्हा.....

सत्यजित...'s picture

2 Jul 2017 - 12:25 am | सत्यजित...

प्रतिसादांच्या रखरखीत आपला हा काव्यमय प्रतिसाद,एखाद्या कळीने अलवार फुलून येण्याइतकाच अल्हाददायक अााहे!
खूप-खूप धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2017 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! मजा आ गया.

सत्यजित...'s picture

2 Jul 2017 - 12:31 am | सत्यजित...

आपले सतत मिळणारे प्रतिसाद लेखनाचा मानस जागता ठेवतात!खूप खूप धन्यवाद!

सत्यजित...'s picture

2 Jul 2017 - 12:30 am | सत्यजित...

आपले सतत मिळणारे प्रतिसाद लेखनाचा मानस जागता ठेवतात!खूप खूप धन्यवाद!

अनन्त्_यात्री's picture

2 Jul 2017 - 7:16 pm | अनन्त्_यात्री

जरी उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा!
तो प्रश्नही असतो गहिरा, जो काळिज वि॑धत जाई!

सत्यजित...'s picture

3 Jul 2017 - 5:04 am | सत्यजित...

उसवून काळजाला,छिद्रे हजार झाली...
ल्यालो नवीन जखमा..कळ आर-पार झाली!

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!