कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
27 May 2017 - 9:24 pm

( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे )

---------------------------------------------

१. अमावशेची रात ( मालवणी )

“मजा आली का नाही.”

“हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.”

“आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.”

“बरं बरं.”

“सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?”

“हडळीच्या माळावर”

“एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.”

“मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून. खयसून बुद्धी झाली अन त्या बावंजवळ गेलो.”

“मग रे?”

“बावितून एक हडळ इली अन मुका घेतला न माझा.”

“मेल्या तूच घेतला आसल तिचा मुका. खी:खी:”

“नायरे बाला खरंच.”

“मकापण एक गोष्ट आठवली. ते स्मशान दिसतंय का… थयच मी आग्यावेतालाचा नाच पाहिला होता.”

“येड्या, आग्यावेताल राहले तरी का आता. माणसानला भिऊन पळून गेली असतील.”

“तू फेकला मीपण फेकलं. खी:खी:”

चालत चालत ती दोगा बराच लांब आली.
“मी काय म्हणतो, बिडी ओढत वाइच आराम करू.”

“नो प्रॉब्लम बाला. उल्टं चालून डोकं दुखायला लागलं.”

अन ते दोन वेताळ झाडाक उल्टं लटकुन बिडीचे झुरके ओढू लागले.

-------------------------------------------

२. घे महा मुका ( कोल्हापुरी )

पळायचं काम आपल्याला लय भारी जमतं.
दिवसभर पाळत ठेवली अन जशी रंजी हिरीवर आली तसा पळत गेलो तिच्याजवळ. तिनं हाडतुड केलंच पण मीबी कमी न्हाई. गुलुगुलु बोलून आंगारा टाकलाच तिच्या हान्ड्यात. आता फकस्त उद्या सकाळची वाट पाहायची हुती.

“आयला सकाळ झाली तरी रंजी आली कशी न्हाई आजुन! म्हाराज म्हण्ले हुते की पोरगी सूर्याच्या पहिल्या किरणाबरूबर तुह्याकडं पळत यील अन गळ्यात पडून मुका घील. हरकत न्हाय मीच जातो तिच्याकडं.”
पायात खेटरं घात्ले अन ममताबुढ़ीच्या हाकेकडं दुर्लक्ष करत रंजीचं घर जवळ केलं.

“रंजेS… ये रंजेSS” म्या भायेरूनच हाळी दिली. घरात मुका घेणं बरं दिसत नाय.

“काय म्हण्तू र फुकनीच्या” ती आरडत भायेर आली.

“डार्लिंग आसं काय बोलतीस?”

हातातली फुकनीच फेकून मारली न भाऊ तिनं.

“पाणी पेलं न्हाई का त्वां?”

“कशाचं पाणी?”

“काल त्वा हान्डा भरून नेला नव्हता का, त्यातलं.”

“कहून विचारून राह्यला तू?”

“अवं सांग त आधी.”

“ती खेप मी ममताबुढ़ीच्या घरी रिचवली.”

“अरारा…” मी डोस्क्याले हात लाऊन बसलो.
ती मातर एकटक समोर पाहत हुती. म्याबी माग नदर वळवली... म्हाताऱ्या बायांची अख्खी फौज माझ्या दिशेनं येत हुती. त्यह्यचे हावभाव काही ठीक दिसत नव्हते.

“रंजे, काल ममताबुढीकडं कोणकोण आलं हुतं?”

“मले काय म्हाईत. हा पण दुपारी भजनी मंडळ जमलं हुतं तिच्याकडं?”

मग काय
.
.
.
.
.

तुमास्नी तर माहीतच हाये पळायचं काम आपल्याले लय भारी जमतं.

-------------------------------------------

३. अनुदान ( अहिराणी )

“रामराम”

“रामराम. कटायी गयथा?”

“बँकामां काम होतं अनुदानास्नं.”

“काय म्हंतस मग सायेब?”

“म्हणे तुम्ही अल्पभूधारक नै.”

“काब्रं?”

“कमून की आमच्यापाशी आठ एकर वावर शे.”

“एक आयडीया कर. बंड्याना नावावर तीन एकर वावर करून टाक. मी माझी अस्तुरी अन पोरांच्या नावावर पाचपाच एकर वावर केलं. झालं अनुदान मंजूर.”

“तसंच करणार होतो पर हे नवं सर्कार बोलतं तीन टक्के पैसे आमाला द्या. आंडेरना नावावर जमीन कराची म्हटलं म्हणजे लाखभर रुपये खर्च येतो. अठी इक खायले बी पैसा नै.”

“तू आथा तथा हिंडूच नको..संध्याकाळी मना घरी ये अन पैसे घेऊन जाय व्याजानं.” सावकार हसत बोलना.

“चाल येतो. रामराम.”
अन तो निघून गेला.

अल्पभूधारक शेतकरी कारीमां चालला व्हता अन सधन शेतकरी फाटक्या वहाणा घासत बसस्टॅण्डकडं.

----------------------------------------------

४. क्रांती ( वऱ्हाडी , घाटावरची )

पाह्यठं तीन वाजेपासूनच गडबड सुरू होती. चिल्ल्यापाल्ल्यायले उठवणं, आंघोळी, दशम्या बनवणं अन अजून कायकाय. हरेक जण खुशीत होता.
घंट्याभरात सगळे कामं आटपले. माणसायनं धोतर-फेटा घातला अन बायायनं लुगडे गुंडाळले. तव्हालोक गड्यानं दमणीत गवताच्या नरमचोपड्या पेन्ढ्या आथरून ठेवल्या होत्या. सगळं कुटुंब चाकावर चल्ढं अन हू… करताच पुरुषभर उंचीचे मंगळ्या-बुध्या दौडत निघले.

आजुन झाकट पडली नवती पण कंदील लटकवलेल्या दमण्या, बैलगाड्या अन छकडे पायवाटेनं छूमछूमत चालले होते. थंडगार वारं मनाले सुखावत होतं. सूर्य वीतभर वर आला अन खामगावच्या दगडी इमारती दिसायले लागल्या. आलिकडच एका वावरात बैलं सोडून लोकायनं न्याह्यऱ्या आटपून घेतल्या.

“बापूनं कमाल केली राजा.”

"न्याराच जलवा हाय म्हण्तेत.”

"क्रांती म्हण्तेत त याले."

अशाच आशयाच्या गप्पा होत्या सगळीकडं.

साहेबाच्या चौकीवर नोंद करून एकेक करत गाड्या गावात घुसल्या.चौकात आल्यावर लोकायनं आंबलेले आंगं मोकळे केले. इंग्रजायचा चहावाला प्रत्येकाले फुकट चहा पाजत होता. आर्ध्याहून जादा लोक ते गुळमट पाणी फेकून देत होते.

अन तेवढ्यात भोँग्यावर अनाउन्समेन्ट झाली-

“चला चला तिकीटं फाडा. अयोध्येचा राजा आलाय.”

--------------------------------------------

५. तलाक ( झाडी बोली)

तलाक तलाक तलाक

या तीन शब्दायनं मही सग्गी दुनिया बदलून गेली. बाप्पा आशी येर कोणावरबीन येऊ नी. जिंदगीभर संगासंग चालायचं ठरवलं होतं पण झालं काय शेवटी.

उस्मान अन मी कॉलेजात एकत्र भेटलो अन आमचं इश्क जूळलं अन आमी निकाह करायचं ठरवलं. शादीनंतरचे पह्यले काही साल ले सुखात गेले जन्नतमंधीच होतो आम्ही. घरच्यायनं जरा विरोध केला पण आयकलंच शेवटी. विश्वासबीन ले होता आमचा एकमेकायवर. उस्मान त मह्या मंगामंगाच राहायचा.
लेकिन हळूहळू सब बदलून जात राह्यलं. उस्मानच्या स्वभावात बदलाव आला, मपल्यावर त्यो संशय घेत राह्यला.

अयाज मह्या फूफाचा लडका. येतजाय आमनधपक्या घरी. दुपारी त उस्मान कामावर जायेल राहे. आमी बसायचो गप्पा मारत. मोहल्ल्यातल्यायनं काय सांगितलं काय मालूम उस्मानले. त्यो अयाजसोबत ले भांडलाय मलेबीन मारलं. तेच्यानंतर कोणीबीन मर्द मह्याशी बोलतांना त्याले सहनच होत नव्हतं.

अना व्हॅलेंटाईन डेले, चुकून महा मोबाईल उस्माननं घेतला. नेमका तव्हाच अयाजचा मॅसेज आला- I Love You.

तिथंच सगळं संपलं.

पण खुदा गवाह हाये की मी फक्त उस्मानवरच प्रेम करतो.

---------------------------------------------
--------------------------------------------

कथाभाषाशब्दक्रीडाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

27 May 2017 - 10:42 pm | पद्मावति

मस्तं. चौथी कथा विशेष करून आवडली. कथेचा कालखंड खूप छान अगदी सटल पण नेमका वाचकांसमोर येतो.

गामा पैलवान's picture

27 May 2017 - 11:35 pm | गामा पैलवान

अॅस्ट्रोनाट विनय, कलाकार आहात हां तुम्ही.
आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

27 May 2017 - 11:49 pm | अभ्या..

नाय जम्या बिल्कुल.

संजय पाटिल's picture

28 May 2017 - 7:25 am | संजय पाटिल

का? चांगली आहे की...

तसं नाही दादा, कथा चांगल्या असतील की पण बोलीभाषा विशेष म्हणल्यावर असा गहाळपणा चालत नाही.
अहिराणी, झाडी, वर्‍हाडी आम्हाला कळत नाही पण दोनेक शब्द मालवणी किंवा कोल्हापुरी टाकून ती भाषा होत नाही. कोल्हापुरी तर पार गंडलेय.
असले 'कहून करुन राह्यला, बुढी बिडी' कोल्लापुरात म्हणलासा तर पंचगंगेत नेउन बुडवतील मर्दा.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

28 May 2017 - 11:31 am | अॅस्ट्रोनाट विनय

अशा चुका झाल्या असतील हे मान्य आहे. आपल्या बोलीव्यतिरिक्त दुसऱ्या बोलीत लिखाण करणे खूप अवघड आहे. बाकीच्या बोली (मला) ऐकायला मिळत नाहीत, वाचन करायचं म्हटलं तर पुरेसं साहित्य आणि resources उपलब्ध नाहीत. नवीन शब्द आणि
व्याकरणाचे व्यवच्छेदक लक्षणं याबाबत कुठेच माहिती नाही.

जे काही तुटकमुटक मिळालं त्या आधारावर हा पहिला प्रयत्न केला. कृपया गोड मानून घ्यावा.

चुका जरूर काढाव्यात. सल्ला आणि मार्गदर्शन मिळालं तर ऊत्तमच आहे. किंबहुना याचसाठी केला हा अट्टाहास.

रच्याकने,वर्हाडी माणसाच्या डोक्यातून काही शब्द काढून टाकणे फारच अवघड. जसं की बुढी

संजय पाटिल's picture

28 May 2017 - 12:38 pm | संजय पाटिल

हे बरोबर...

संजय पाटिल's picture

28 May 2017 - 12:40 pm | संजय पाटिल

बुडवतील मर्दा.

बुडिवतील...

सुखीमाणूस's picture

28 May 2017 - 7:48 am | सुखीमाणूस

तुमचे भाषा प्रभुत्व अफाट आणि कल्पक आहात!!!
मजा येते कथुकल्या वाचताना

जगप्रवासी's picture

29 May 2017 - 5:20 pm | जगप्रवासी

पण बोलीभाषा जमल्या नाहीत आणि त्यामुळेच नेहमीचा तुमचा खास टच आला नाही. मालवणी एखादा शब्द सोडला तर शुद्ध मराठी झाली आहे