कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]
लेखनविषय (Tags)
( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे )
---------------------------------------------
१. अमावशेची रात ( मालवणी )
“मजा आली का नाही.”
“हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.”
“आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.”
“बरं बरं.”
“सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?”
“हडळीच्या माळावर”
“एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.”
“मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून. खयसून बुद्धी झाली अन त्या बावंजवळ गेलो.”
“मग रे?”
“बावितून एक हडळ इली अन मुका घेतला न माझा.”
“मेल्या तूच घेतला आसल तिचा मुका. खी:खी:”
“नायरे बाला खरंच.”
“मकापण एक गोष्ट आठवली. ते स्मशान दिसतंय का… थयच मी आग्यावेतालाचा नाच पाहिला होता.”
“येड्या, आग्यावेताल राहले तरी का आता. माणसानला भिऊन पळून गेली असतील.”
“तू फेकला मीपण फेकलं. खी:खी:”
चालत चालत ती दोगा बराच लांब आली.
“मी काय म्हणतो, बिडी ओढत वाइच आराम करू.”
“नो प्रॉब्लम बाला. उल्टं चालून डोकं दुखायला लागलं.”
अन ते दोन वेताळ झाडाक उल्टं लटकुन बिडीचे झुरके ओढू लागले.
-------------------------------------------
२. घे महा मुका ( कोल्हापुरी )
पळायचं काम आपल्याला लय भारी जमतं.
दिवसभर पाळत ठेवली अन जशी रंजी हिरीवर आली तसा पळत गेलो तिच्याजवळ. तिनं हाडतुड केलंच पण मीबी कमी न्हाई. गुलुगुलु बोलून आंगारा टाकलाच तिच्या हान्ड्यात. आता फकस्त उद्या सकाळची वाट पाहायची हुती.
“आयला सकाळ झाली तरी रंजी आली कशी न्हाई आजुन! म्हाराज म्हण्ले हुते की पोरगी सूर्याच्या पहिल्या किरणाबरूबर तुह्याकडं पळत यील अन गळ्यात पडून मुका घील. हरकत न्हाय मीच जातो तिच्याकडं.”
पायात खेटरं घात्ले अन ममताबुढ़ीच्या हाकेकडं दुर्लक्ष करत रंजीचं घर जवळ केलं.
“रंजेS… ये रंजेSS” म्या भायेरूनच हाळी दिली. घरात मुका घेणं बरं दिसत नाय.
“काय म्हण्तू र फुकनीच्या” ती आरडत भायेर आली.
“डार्लिंग आसं काय बोलतीस?”
हातातली फुकनीच फेकून मारली न भाऊ तिनं.
“पाणी पेलं न्हाई का त्वां?”
“कशाचं पाणी?”
“काल त्वा हान्डा भरून नेला नव्हता का, त्यातलं.”
“कहून विचारून राह्यला तू?”
“अवं सांग त आधी.”
“ती खेप मी ममताबुढ़ीच्या घरी रिचवली.”
“अरारा…” मी डोस्क्याले हात लाऊन बसलो.
ती मातर एकटक समोर पाहत हुती. म्याबी माग नदर वळवली... म्हाताऱ्या बायांची अख्खी फौज माझ्या दिशेनं येत हुती. त्यह्यचे हावभाव काही ठीक दिसत नव्हते.
“रंजे, काल ममताबुढीकडं कोणकोण आलं हुतं?”
“मले काय म्हाईत. हा पण दुपारी भजनी मंडळ जमलं हुतं तिच्याकडं?”
मग काय
.
.
.
.
.
तुमास्नी तर माहीतच हाये पळायचं काम आपल्याले लय भारी जमतं.
-------------------------------------------
३. अनुदान ( अहिराणी )
“रामराम”
“रामराम. कटायी गयथा?”
“बँकामां काम होतं अनुदानास्नं.”
“काय म्हंतस मग सायेब?”
“म्हणे तुम्ही अल्पभूधारक नै.”
“काब्रं?”
“कमून की आमच्यापाशी आठ एकर वावर शे.”
“एक आयडीया कर. बंड्याना नावावर तीन एकर वावर करून टाक. मी माझी अस्तुरी अन पोरांच्या नावावर पाचपाच एकर वावर केलं. झालं अनुदान मंजूर.”
“तसंच करणार होतो पर हे नवं सर्कार बोलतं तीन टक्के पैसे आमाला द्या. आंडेरना नावावर जमीन कराची म्हटलं म्हणजे लाखभर रुपये खर्च येतो. अठी इक खायले बी पैसा नै.”
“तू आथा तथा हिंडूच नको..संध्याकाळी मना घरी ये अन पैसे घेऊन जाय व्याजानं.” सावकार हसत बोलना.
“चाल येतो. रामराम.”
अन तो निघून गेला.
अल्पभूधारक शेतकरी कारीमां चालला व्हता अन सधन शेतकरी फाटक्या वहाणा घासत बसस्टॅण्डकडं.
----------------------------------------------
४. क्रांती ( वऱ्हाडी , घाटावरची )
पाह्यठं तीन वाजेपासूनच गडबड सुरू होती. चिल्ल्यापाल्ल्यायले उठवणं, आंघोळी, दशम्या बनवणं अन अजून कायकाय. हरेक जण खुशीत होता.
घंट्याभरात सगळे कामं आटपले. माणसायनं धोतर-फेटा घातला अन बायायनं लुगडे गुंडाळले. तव्हालोक गड्यानं दमणीत गवताच्या नरमचोपड्या पेन्ढ्या आथरून ठेवल्या होत्या. सगळं कुटुंब चाकावर चल्ढं अन हू… करताच पुरुषभर उंचीचे मंगळ्या-बुध्या दौडत निघले.
आजुन झाकट पडली नवती पण कंदील लटकवलेल्या दमण्या, बैलगाड्या अन छकडे पायवाटेनं छूमछूमत चालले होते. थंडगार वारं मनाले सुखावत होतं. सूर्य वीतभर वर आला अन खामगावच्या दगडी इमारती दिसायले लागल्या. आलिकडच एका वावरात बैलं सोडून लोकायनं न्याह्यऱ्या आटपून घेतल्या.
“बापूनं कमाल केली राजा.”
"न्याराच जलवा हाय म्हण्तेत.”
"क्रांती म्हण्तेत त याले."
अशाच आशयाच्या गप्पा होत्या सगळीकडं.
साहेबाच्या चौकीवर नोंद करून एकेक करत गाड्या गावात घुसल्या.चौकात आल्यावर लोकायनं आंबलेले आंगं मोकळे केले. इंग्रजायचा चहावाला प्रत्येकाले फुकट चहा पाजत होता. आर्ध्याहून जादा लोक ते गुळमट पाणी फेकून देत होते.
अन तेवढ्यात भोँग्यावर अनाउन्समेन्ट झाली-
“चला चला तिकीटं फाडा. अयोध्येचा राजा आलाय.”
--------------------------------------------
५. तलाक ( झाडी बोली)
तलाक तलाक तलाक
या तीन शब्दायनं मही सग्गी दुनिया बदलून गेली. बाप्पा आशी येर कोणावरबीन येऊ नी. जिंदगीभर संगासंग चालायचं ठरवलं होतं पण झालं काय शेवटी.
उस्मान अन मी कॉलेजात एकत्र भेटलो अन आमचं इश्क जूळलं अन आमी निकाह करायचं ठरवलं. शादीनंतरचे पह्यले काही साल ले सुखात गेले जन्नतमंधीच होतो आम्ही. घरच्यायनं जरा विरोध केला पण आयकलंच शेवटी. विश्वासबीन ले होता आमचा एकमेकायवर. उस्मान त मह्या मंगामंगाच राहायचा.
लेकिन हळूहळू सब बदलून जात राह्यलं. उस्मानच्या स्वभावात बदलाव आला, मपल्यावर त्यो संशय घेत राह्यला.
अयाज मह्या फूफाचा लडका. येतजाय आमनधपक्या घरी. दुपारी त उस्मान कामावर जायेल राहे. आमी बसायचो गप्पा मारत. मोहल्ल्यातल्यायनं काय सांगितलं काय मालूम उस्मानले. त्यो अयाजसोबत ले भांडलाय मलेबीन मारलं. तेच्यानंतर कोणीबीन मर्द मह्याशी बोलतांना त्याले सहनच होत नव्हतं.
अना व्हॅलेंटाईन डेले, चुकून महा मोबाईल उस्माननं घेतला. नेमका तव्हाच अयाजचा मॅसेज आला- I Love You.
तिथंच सगळं संपलं.
पण खुदा गवाह हाये की मी फक्त उस्मानवरच प्रेम करतो.
---------------------------------------------
--------------------------------------------
प्रतिक्रिया
मस्तं. चौथी कथा विशेष करून
मस्त जमल्यात कथा.
नाय जम्या बिल्कुल.
का? चांगली आहे की...
तसं नाही दादा, कथा चांगल्या
अशा चुका झाल्या असतील हे
हां...
बुडवतील मर्दा. बुडिवतील...
कथुकल्या मस्त
तुमच्या कथांचे विषय छान आहेत