गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करुन प्रथम घरच्या देवांची पुजा केली. मग आवरुन शोभायात्रेसाठी निघाले . यावर्षी चित्ररथात सहभाग नव्हता .. पण यात्रा पहायला जाणार होते...
यंदा खूप कमी रथ सहभागी झाल्याने मिरवणुकीचा रुट कमी टप्प्याचा होता . मी तेथे पोचेतो मिरवणुक खूप पुढे आली होती म्हणुन मी तशीच पुढे जाउन सुरवातीच्या रथापाशी थांबले. ज्यायोगे सर्व यात्रा पाहाता येईल ... दर्वर्षीप्रमाणेच लोक नवनवीन पारंपारीक पोषाख घालुन आले होते सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे जल्लोषाचे वातावरण होते लोकांचा हा उत्साह रस्ताभर आणि वातावरणातही ओसंडुन वहात होता .
आठच वाजत होते तरीही उन्हाळा चांगलाच जाणवत होता .. पण त्याची तमा न बाळगता सगळे हा सण खुपच जल्लोषात साजरा करीत होते . विशेष उल्लेखनिय रथ म्हणजे सर्जिकल स्ट्रॉइक विषयावरिल मुलानी दाखवलेले युध्दाचे प्रात्यक्षिक. त्याशिवाय मुलींची तलवारबाजी, लेझीम , भजनी गृपचे भजनाच्या तालावर झांज वाजवित केलेले नृत्य, मुलींची पारंपारिक नौवारी साडी, फेटा घालुन केलेली बुलेट राईड ,सायकल राईड .असे विविध विषयांवरील रथ पाहुन डोळ्याचे पारणे फिटत होते . या सर्व आनंदोत्सवाची उर्जा वातावरण भाराउन टाकित होती त्यातील काही उर्जा घेउन अतीषय समाधानाने मी घरी परतले ...
परतताना मात्र अंतर्मुख करायला लावणारे नेहमिचेच दृश्य दिसले ... एरविही स्वछ दिसणारे रस्ते विदृप झाले होते रस्त्यावर काढलेल्या सुरेख रांगोळ्या रहदारी,वारा, माणसांची येजा यामुळे पार उस्कटुन गेल्या होत्या . बरे रांगोळ्या तर उस्कटतातच पण इतर कचरा ...
यात्रेतल्या सहभागिंसाठी संस्थांकडुन तसेच वैयक्तीकही पुरवले जाणारे नाष्टा, पाणी आणि सरबत यांचे प्लॅस्टीकचे ग्लॉस ,डिशेस रस्ताभर इतस्ततः विखुरले होते .. रस्त्याला अवकळा आली होती हे पाहुन मन विषण्ण झाले ...
संध्याकाळी तलावाच्याकाठी फिरायला गेले होते तीथेही हिच अवस्था होती. आदल्या संध्याकाळी दरवर्षी प्रमाणे बसण्यासाठी तलावा भोवती बांधलेल्या कट्ट्यावर ओळीने एकालाएक लागुन पणत्या लावल्या होत्या .. रांगोळीही काढली होती पण आता तेथे दिसत होता तेलाने आणी मेणाने तेलकट चिकट झालेला कट्टा . ऱांगोळी वाऱ्यामुळे तलावात जाउन पडत होती आणी तलाव आणखी खराब होत होता.. लोकाना बसायला केलेला कट्टा खराब झालेला. लोक कागद वैगरे टाकुन तरीही कडेला बसायचा प्रयत्न करीत होते.. शहराच्या गर्दीतली संध्याकाळी विसाव्याची ही एकच तर जागा होती ...
खुप विषाद वाटला हे सारे पाहुन ....
यासाठी काय करता येइल ?
काळाप्रमाणे बदल स्वीकारुन जुन्यानव्याचा समन्वय साधला पाहिजे ..
तलावावर पणत्यांएवजी विद्युत रोषणाई करता येइल. परंपरा म्हणुन एके ठिकाणी पाच पणत्या लावाव्यात त्यांच्याखाली तेल सांडु नये म्हणुन ताटल्या ठेवाव्यात. रस्त्यांवर रॅपर्स गोळा करायला कंटेनर ठेवावेत... कचरा त्यातच टाकला जाईल हे बघायला स्वयंसेवक ठेवावेत ..
खरोखर असे झाले तर अतिशय देखण्या समारंभाला अशाप्रकारे गालबोट तर नाही लागणार ...
बघा तुम्हाला पटतेय का ते ....
प्रतिक्रिया
30 Mar 2017 - 10:39 am | एस
मला हा शोभायात्रा नामक प्रकारच पटत नाही. नंतर तुम्ही म्हणता तशी शहराची असलेली शोभा जाते आणि वेगळीच शोभा होते.
2 Apr 2017 - 4:18 pm | नमिता श्रीकांत दामले
सजावट शहर विद्रुप करणार नाही याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आयोजकांनी या बाबींचा विचार अवश्य करावा
30 Mar 2017 - 11:02 am | पैसा
असंच असतं सगळीकडे. बादवे महाराष्ट्रात या शोभायात्रा नेमक्या कधी आणि का सुरू झाल्या याबद्दल कोणी काही सांगेल का? गोव्यात तरी शिगमो आणि कार्निव्हाल या दोन असतात त्या अगदी जुन्या काळापासून. त्याशिवाय अनेक नित्य आणि नैमित्तिक मिरवणुका तर सगळीकडे असतातच.
30 Mar 2017 - 11:41 am | कुंदन
आमच्या डोंबिवलीत फार पुर्वी पासुन झाली बहुधा अन
हळु हळु ते लोण सगळी कडे पसरले.
बाकी माहिती जाणकार देतीलच
30 Mar 2017 - 11:28 am | वेल्लाभट
डोंबिवलीच्या यात्रेत शेवटचा चित्ररथ एका संस्थेचा होता जिचे स्वयंसेवक फक्त झालेला कचरा उचलण्याचं काम करत होते. त्यामुळे मार्गावर घाण झाली तरी शेवटच्या ट्रकसरशी ती साफ व्हायची. सर्वात भारी काम होतं ते.
बाकी कचरा होण्याला कारण लोकं आहेत, भिकारी मानसिकता आहे. तुम्ही लाख नियम करा, लाख स्वयंसेवक नेमा इत्यादी सगळं. पण शिकल्या सवरलेल्या माणसांना इतकी अक्कल नको? बहुतेकवेळा उद्दामपणा असतो. स्वयंसेवक नेमायची गरजच नाही. दहातले पाच जे सूज्ञ आहेत त्यांनी बाकी पाचांना अडवायला सुरुवात केली, प्रेमाने, रागाने जसं जमेल तसं सांगितलं तरी साखळी प्रक्रियेप्रमाणे आपोआप स्वयंसेवक तयार होतील.
शोभायात्रा वाईट नव्हेत, किंवा घाण होते म्हणून केवळ त्यांना वाईट म्हणणं मल पटत नाही.
यात्रेतला नाही पण मला नित्याचा येणारा अनुभव सांगतो. मी अनेकदा येता जाता, रस्त्यावर, ट्रेनमधे लोकांनी कचरा केला तर त्यांना अडवतो, किंवा मी उचलून टाकतो (त्यांच्यादेखत), चार शब्द सांगतो; जे काय सुचेल त्या वेळी ते करतो. कित्येक जण सॉरी सॉरी म्हणतात चारचौघात ओशाळल्यासारखं झालं की; पण लेकांनो मी म्हणतो, सॉरी म्हणण्याचं कळतं, म्हणजे चुकताय हेही कळतं ना? मग टाकता कशाला कचरा रस्त्यावर, बसमधे, ट्रेनमधे? ..... असं विचारलं की तोंडाला कुलुप लागतं. 'तू कोण आलास?' विचारणारेही असतात. असायचेच. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर. गेली दोन एक वर्ष हे अंगवळणीच पडलंय आता. नुसती खळखळ न करता प्रयत्न केल्याचं समाधान मिळतं.
पुढील वर्षी तुम्ही शोभायात्रेत सहभागी व्हा. एक गट पुढे, एक गट मागे. पुढच्यांनी फलक घ्या सुसंस्कृत वागण्याबद्दल भाष्य करणारे, त्यात फोटो टाका रस्त्यावरच्या कचर्याचे. आणि मागच्या गटाने होणारा कचरा उचलण्याचं काम करा. खरं सांगतो, वाहवा मिळेल, आणि समाधान ते वेगळंच.
30 Mar 2017 - 7:02 pm | सुमीत
तुमच्या अथक प्रय्त्नांना
30 Mar 2017 - 12:20 pm | किसन शिंदे
हे वर्णन ठाण्याचे दिसतेय.
30 Mar 2017 - 3:42 pm | भटकीभिंगरी
होय ..ठाण्याचेच ..
30 Mar 2017 - 12:52 pm | हेमंत८२
भिकारी मानसिकता आहे. तुम्ही लाख नियम करा, लाख स्वयंसेवक नेमा इत्यादी सगळं. पण शिकल्या सवरलेल्या माणसांना इतकी अक्कल नको? बहुतेकवेळा उद्दामपणा असतो. स्वयंसेवक नेमायची गरजच नाही. दहातले पाच जे सूज्ञ आहेत त्यांनी बाकी पाचांना अडवायला सुरुवात केली, प्रेमाने, रागाने जसं जमेल तसं सांगितलं तरी साखळी प्रक्रियेप्रमाणे आपोआप स्वयंसेवक तयार होतील.>>>> मराठा मुक्ती मोर्च्याच्या वेळी सर्व कचरा स्वयंसेवकांनी स्वच्छ केला. तसे इथे पण केले असते..
पण बहुतेक शोभायात्रेवेळी ज्याला त्याला फुडें पुढे करायचे असते तो छान ड्रेस घालून कचरा साफ करणार हे शक्य नाही. मला वाटते इथे प्रॉब्लेम आहे.
आणि ज्यावेळी याची परवानगी घेतली असते त्याच वेळी साफ सफाईची पण फी घेतली तर बरे होईल जेणेकरून असे झाले तर त्याच पैश्यातून हे पण करता येईल, जर कचरा केला नाही तर refund करता येईल.
30 Mar 2017 - 1:02 pm | वेल्लाभट
चांगली कल्पना
हे फार सापेक्ष आहे. कसं ठरवणार? कोणते निकष लावणार? मोजमाप कसं? हे कठीण आहे होणं.
आणि भिकार मानसिकतेची अजून एक शक्यता. एकदा तुम्ही असा अधिभार घेतलात सफाईसाठी, की करा लेको कचरा, पैसे दिलेतच उचलायला... असं म्हणून मुद्दाम करतील काही लोकं कचरा.
30 Mar 2017 - 1:49 pm | हेमंत८२
जर साधारणतः एक km साठी जर ५०००० घेतले तर करुदे ना कचरा जेणेकरून या सारख्या फी मध्ये सगळं रस्ता स्वच्छ करता येईल..
ती फी KM साठी क्ष या प्रमाणे असावी.. व तो मोजमाप करताना सरासरी त्या रस्त्याचे एक फडोन फोटो काढून घ्यावेत. ५० रुपये हे फोटो फी म्हणून घ्यावी.
भिकार मानसिकतेची अजून एक शक्यता>>> ते काही तुमच्या किंवा माझ्या कोणाच्याच हातात नाही.. या मुळेच अतुल्य भारत ची आणि शौचालयाची सुद्धा advertise करायला लागते.
30 Mar 2017 - 12:53 pm | चौथा कोनाडा
अगदी योग्य मुद्दा पकडलाय !
स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून असले इव्हेंट्स त्रासदायक होत चालले आहेत !
शोभायात्रा म्हटलं की वाहतुक खोळांबे, लोकांची गैरसोय, ध्वनीप्रदुषण, नंतरची घाण !
शोभायात्रा म्हटलं की अंगावर काटा यायला सुरूवात होते.
आधीच (स्वच्छतेचा) उल्हास अन त्यात हा (इव्हेंट्सचा) फाल्गुन मास !
या कोलाहलातूनही जे लोक, चमू सोहळोत्तर साफ सफाई करतात त्यांना मानायला पाहिजे ! सलाम त्यांना !
एकंदरित मी कुणीतरी केलेली घाण साफ केली पाहिजे अथवा कुणीतरी मी केलेली घाण साफ केली पाहिजे.
आपल्याला तर बुवा यातले काहीच करायचे नाही, मग कश्याला पाहिजे शोभायात्रा अन कश्याला पाहिजे इव्हेंट ?
30 Mar 2017 - 3:15 pm | राही
भल्या मोठ्या रांगोळ्यासुद्धा चौकात किवा रस्त्यावर घालू नयेत असे वाटते. हजार दोन हजार किलोची रंग रांगोळी म्हणजे सफेद दगडाचा जड असा पंधरावीस क्विंटल चुरा. एकदा आमच्या इथे साईबाबांची भली थोरली रांगोळी काढली होती. दुसर्या दिवशी एक पाय पुसला गेला, मग एक हात, असे करीत एके दिवशी शिरच गेले. तरीही ती तुटकी फुटकी रांगोळी आठवडा दीड आठवडा वार्याबरोबर आणि वर्दळीबरोबर स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये जाऊन पडत होती. धार्मिक कृत्यासाठी काढलेल्या रांगोळ्या लगेचच पुसून टाकायला सफाईकामगारही तयार नसतात. पर्जन्यवाहिन्यांमध्ये ढकलली गेली तर त्यांचेही एव्हढा अवजड कचरा उचलण्याचे श्रम वाचले.
दादर पश्चिमेला स्टेशनला काटकोनात जाणार्या एका गल्लीत नवरात्रात गल्लीच्या तोंडापासून थेट न.चि. केळकर रस्त्याला गल्ली मिळते तिथपर्यंत महाकाय रांगोळी काढलेली असते. कमीत कमी पन्नाससाठ क्विंटल दगडाचा चुरा रस्त्यावर पसरला जात असेल. हा वजनाला खूप जड असतो त्यामुळे आकारमान कमी दिसते.
30 Mar 2017 - 3:33 pm | मंजूताई
ला रामनवमीच्या दिवशी भली मोठी भली लांब शोभा यात्रा निघते दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जायचं टाळतो ...