अण्णा गायले!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Dec 2007 - 7:54 pm

राम राम मंडळी,

काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली!

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली!

मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?

आज वयाच्या ८५ व्या वर्षी अण्णांनी मुलतानी हा राग सादर केला आणि नारायणराव बालगंधर्वांचा 'अवधाची संसार' हा अभंग सादर केला. मुलतानी हा तर किराणा घराण्याचा खास राग आणि त्यावर अण्णांची असामान्य हुकूमत! तर 'अवघाची संसार' मधून त्यांच्या गुरूस्थानी असलेल्या नारायणरावांचं त्यांच्या जागा घेत घेत, त्यांची आठवण करून देणारं गाणं!

आत्ताच ईटीव्हीवरील बातम्यांवर ही बातमी दाखवली, अण्णांना गातांना बघितलं आणि धन्य धन्य झालो.

आजच्या फाष्ट, इन्स्टंट आणि एस एम एस ची भीक मागण्याच्या काळात अण्णांचा सच्चा सूर ऐकला आणि समाधान वाटलं! तोच सच्चा सूर, तीच श्रद्धा, तोच प्रामाणिकपणा, तीच सगळी तपस्या!! तीन वर्षच काय, परंतु तीनशे वर्ष जरी खंड पडला तरी अस्स्ल सोनं कधी बदलत नाही, त्याचा कस, त्याचा बावनकशीपणा कधी कमी होत नाही!!

मी संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या स्वरभास्कराला वंदन करतो आणि परमेश्वर त्यांना उत्तम प्रकृतीस्वास्थ आणि उदंड आयुष्य देवो अशीच मनापासून प्रार्थना करतो! तमाम संगीतसाधकांवर, विद्यार्थ्यांवर, आणि आम्हा संगीत रसिकांवर त्यांची छत्रछाया आणि त्यांच्या आशीर्वादाचा वयोवृद्ध थरथरता हात असाच राहो हीच मनोकामना!

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

संगीतसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

नंदन's picture

9 Dec 2007 - 8:00 pm | नंदन

प्रसन्न करणारी बातमी. 'अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक', हे तर भीमसेनांच्या गाण्याचेच उद्दिष्ट म्हणता येईल असं त्यांचं गाणं ऐकून वाटत राहतं.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत's picture

9 Dec 2007 - 8:13 pm | धोंडोपंत

तात्या,

तुमचा हा लेख वाचून आमची अवस्था 'आनंद पोटात माझ्या माईना" अशी झाली आहे.

चित्तोपंतांनी ही बातमी देऊन अवध्या मिसळपावावर आनंद निर्माण केला आहे.

श्री. अण्णांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सुरांनी सर्व रसिक असेच मंत्रमुग्ध राहोत ही श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.

आपला,
(भाग्यवंत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राजे's picture

9 Dec 2007 - 8:34 pm | राजे (not verified)

"श्री. अण्णांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सुरांनी सर्व रसिक असेच मंत्रमुग्ध राहोत ही श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना."
हेच म्हणतो.

तात्या, एखादा चांगला दुवा येथे लिहा पाहू ज्यामध्ये अण्णा एकदम अवघड अशी एखादी बंदीश गात असतील असा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

आजानुकर्ण's picture

9 Dec 2007 - 8:38 pm | आजानुकर्ण

आनंदी व्हावे अशीच बातमी आहे ही.
आम्हाला शास्त्रीय काही कळत नाही पण "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे" किंवा "आरंभी वंदीन अयोध्येचा राजा" सारख्या अभंगांतून भीमसेनअण्णांच्या आवाजाचे ऋण आपल्या आयुष्यावर कायमचे झाले आहे.
आण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

-(ऋणी) आजानुकर्ण

सहज's picture

10 Dec 2007 - 7:06 am | सहज

आम्हाला शास्त्रीय काही कळत नाही पण..

तो जबरदस्त आवाज मात्र आमच्या सारख्या अनभिज्ञ लोकांना देखील भारावून टाकतो. अभंग गायन म्हणले की अण्णा (व लता मंगेशकर) यांच्या शिवाय इतर कुणी गायलेले आठवतच नाहीत.

आण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

प्रमोद देव's picture

9 Dec 2007 - 11:20 pm | प्रमोद देव

ही बातमी खूपच मस्त आहे. ह्या वर्षी सवाईला जाण्याचा योग होता पण काही कारणाने तो पुर्ण होऊ शकला नाही. आता भीमसेनअण्णा गायले हे ऐकून खूप आनंद झाला आणि हा योग मी साधु शकलो नाही त्याबद्दल मात्र खूप वाईटही वाटतेय.
ते असेच अखंड गात राहोत आणि आम्हा रसिकांना मनमुराद आनंद देवोत अशी प्रार्थना करतो.

मुक्तसुनीत's picture

9 Dec 2007 - 11:33 pm | मुक्तसुनीत

भीमसेन अण्णांचे गाणे सवाईला ऐकून एक दशकापेक्षा जास्त काळ आता उलटला. पण स्मृती अजून ताज्या आहेत. आजही जेव्हा काहीतरी अस्सल आणि अव्वल ऐकावेसे वाटते तेव्हा "सिद्धी"मधली एखादी सीडी लावतो.

ज्यांच्याबद्दलच्या नुसत्या विचाराने मनावरचा मलिन कचरा निघून जातो असे हे एक नाव. उनको हमारी उमर लग जाये :-)

नात्या's picture

10 Dec 2007 - 6:01 am | नात्या

याची छोटीशी झलक इथे बघा... http://www.esakal.com/features/bhimsen/index.html

विसोबा खेचर's picture

10 Dec 2007 - 7:12 am | विसोबा खेचर

झलक पाहिली. मनापासून धन्यवाद...

तात्या.

सर्किट's picture

11 Dec 2007 - 3:40 am | सर्किट (not verified)

भीमसेनजींचे गाणे सकाळच्या संकेतस्थळावर ऐकले. कानांनी निखळलेले चिरे भरून काढले, आणि त्या गडाची भक्कम तटबंदी आजही जाणवली.

- नतमस्तक सर्किट

आवडाबाई's picture

12 Dec 2007 - 3:55 pm | आवडाबाई

ह्या वर्षीदेखील सुदैवाने सवाईला हजेरी लावता आली आणि त्याचं चीज झालं !!
तीनेक वर्षांपूर्वी बुवा गायले होते आणि तेव्हापासून खरे तर आशाच सोडून दिली होती की ते पुन्हा गातील ! पण अनेक रसिकांच्या प्रेमाचाच परिणाम म्हणू, अण्णा गायले !

आनंद अभ्यंकरांनी ही सूचना देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला . मग मात्र मंडपात एसेमेस आणि फोन कॉल्स सुरू झाले, ओळखीच्यांना बोलवायला आणि ही बातमी ऐकवायला ! त्यानंतर अजय पोहनकर ह्यांचं गाणं होतं, परंतु तेही इतके उत्सुक होते की, एकदा त्यांनी गाणं मध्यावर थांबवून विचारलं देखिल की अण्णा कधी येणार आहेत !! आणि मग अण्णांचं आगमन झालं !! मला नाही वाटत तेव्हा मंडपात असा एकही जण असेल ज्याचे डोळे पाणावले नसतील !! आनंद अभ्यंकरांचा आवाजही भरून आला होता !

गाण्यानंतर अण्णांची ज्यांनी आजारपणात सेवा केली त्यांचा सत्कारही झाला !!

विसोबा खेचर's picture

12 Dec 2007 - 4:41 pm | विसोबा खेचर

विस्तृत बातमीबद्दल धन्यवाद आवडाबाई, परंतु एक सुधारणा.

माझ्या माहितीप्रमाणे निवेदकाचं नांव आनंद अभ्यंकर नसून आनंद देशमूख आहे. आज अनेक वर्ष तो सवाईचं सूत्रसंचालन करतो आहे..

तात्या.

आवडाबाई's picture

14 Dec 2007 - 4:17 pm | आवडाबाई

बरोबर तात्या, देशमुखच ते !!

ध्रुव's picture

12 Dec 2007 - 7:52 pm | ध्रुव

प्रत्यक्ष सवाईला न येण्याचे वाईट तर वाटले, पण आपण सांगताना खरच डोळ्यात पाणी आले.

--
ध्रुव

नाना फडणवीस's picture

14 Dec 2007 - 1:40 pm | नाना फडणवीस

होय,

अण्णांना पुन्हा ऐकण्याचे भाग्य आम्हाला त्या दिवशी लाभले. हा योग आमच्या जीवनात आला याचा आनंद आहे. यावर्षीचा सवाई कधीही विसरला जाणार नाही.

नाना फडणवीस