जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब
मराठी भाषा दिवसाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर बरेच काही लेखन होत असते. सगळेच ज्ञानकोशीय परिघात बसणारे नसते. असाच एक अनुभव उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील लमाण तांडा, बेळंब येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक ) यांनी शेअर केला आहे. खरेतर तो त्यांच्याच शब्दात वाचणे उत्तम राहीले असते, पण विकिपीडियावरील माहिती स्थानांतराबाबत झालेल्या नाराजीमुळे माझ्या स्वतःच्या शब्दात अंशतः तरी रुपांतरीत करण्या शिवाय पर्याय नाही.
शिक्षक उमेश खोसे यांना 15 जून २००७ रोजी जि.पं.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथे रुजू होण्यास सांगितले गेले. जेंव्हा ते शाळा पाहायला गेले होते तेंव्हा त्यांना त्या तांड्यातील लोकांनी लमाणी व कन्नड भाषेतच त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना केवळ मराठी, हिंदी आणि इंग्लिश याच भाषा येत होत्या. शाळा बदलून मिळेल का यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता पण त्यांना अपयश येऊन शेवटी त्याच शाळेत रुजू झाल्याची ते प्रांजळपणे कबुली देतात.
न आवडणारी जबाबदारी घेऊ नये आणि जबाबदारी बदलून नाही मिळाली तर आहे त्यात मन रमवावे असा सर्वसाधारणपणे उपदेश केला जात असलातरी त्यात फार कमी जणांना यश येते; उमेश खोसे यांनी मात्र परिस्थितीशी जुळवूनच घेतले असे नाही तर आले अंगावर तर घे शिंगावर म्हणून त्यांच्या सहशिक्षकांसह लमाणी भाषा आत्मसात करुन विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या लमाणी मातृभाषेतून संवाद साधला, पहिलीपेक्षा लहानगी मुले पहिलीच्या विद्यार्थ्यांसोबत बसवून घेऊन त्यांना मराठी आत्मसात होण्यासाठी अधिक वेळ मिळेल हे पाहीले, विद्यार्थ्यांचे पालक मुख्यत्वे स्थलांतरीत रोजंदारी कामगार असूनही त्यांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना गावात आणि शाळेतील उपस्थिती सुनिश्चित केली. विद्यार्थ्यांचे गट बनवून मधल्यावेळेत ज्या विद्यार्थ्याला विषय घटक समजला त्याने लमाणीतून इतर विद्यार्थ्यांना समजावावयाचा असाही प्रयोग केला. फलस्वरूपी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून २००८-०९ मध्य शाळेचा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आला व २००९-१० मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.
लोकांनी लोकवाटा जमवून सन २०१४-15 मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होती. सध्या शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुळे मुलांना शाळेत अजून रुची निर्माण झाली व विद्यार्थ्यांचे पालक उसतोडणीच्या काळात रोजंदारीसाठी स्थलांतर करणारे असून सुद्धा शाळेने १००% विद्यार्थी उपस्थिती निश्चीत करण्यात यश मिळवले आहे.
प्रतिक्रिया
27 Feb 2017 - 9:11 pm | शलभ
मस्त..धन्यवाद इथे सांगितल्याबद्दल..
27 Feb 2017 - 9:21 pm | Nitin Palkar
अशा व्यक्ती आजच्या जमान्यात विरळाच. स्वतःपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे ब्रीद असणारी ही माणसे नक्की वंदनीय आहेत.
28 Feb 2017 - 12:16 am | एस
कौतुकास्पद.
4 Mar 2017 - 8:38 am | पिलीयन रायडर
खरंच!
28 Feb 2017 - 12:38 am | डॉ सुहास म्हात्रे
श्री. खोसे उमेश रघुनाथ यांनी अत्यंत स्पृहणिय काम केले आहे आणि करत आहेत. त्यांचे उदाहरण इतरांना प्रेरणादायक आहे.
धन्यवाद माहितगार, ही माहिती इथे लिहिल्याबद्दल.
28 Feb 2017 - 12:55 am | अभ्या..
माहीती कौतुकास्पद आहे पण आपण ही माहीती कशी व्हेरीफाय करता?
मी स्वतः त्या भागात राहिलेलो आहे. तेथील जि.प. शाळांचा अन शिक्षकांचा कारभार कशा पध्दतीने चालतो ह्याची चांगलीच माहीती आहे.
वेल्लाभटाने मध्ये एक शाळेच्या संदर्भात लिहिले होते ते इतरांनी पाहून व्हेरीफाय केलेले होते. तसे इथे दिसत नाही.
आपण लिहिल्याप्रमाणे घडत असल्यास निश्चित चांगली गोष्ट आहे पण सेल्फ रिपोर्टिंग टाईप न्युज नसावी म्हणजे अधिक चांगले.