गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय. हे स्मारक १८६९ मधे [दुसर्या महायुद्धाच्या बरेच आधी] आजवर जपानमधे घडलेल्या [विशेषता मेजी रेव्होल्युशन] युद्धातील सर्व सैनिकांना मानवंदना देण्यासाठी बनवले गेले होते. विजयी तसेच पराभुत जपानी सैनिकांच्या आत्म्यांना मान देण्यासाठी. पण सध्या दुसर्या महायुद्धातील संबधीत घटनांमुळे जास्त चर्चेत.
चीन व जपान यांच्यातील युद्ध जे आपण दुसरे महायुद्धाचा भाग म्हणुन जाणतो, दोन्ही देशातील संबधातील एक मोठा भाग आहे. दुसर्या महायुद्धात जपानने आशीयायी देशात आक्रमण करुन बरेच अत्याचार केले होते. ज्याला आपण दुसरे महायुद्ध म्हणतो त्याला जपानी "ग्रेटर इस्ट एशियन वॉर" म्हणतात. ह्या स्मारकात मला अश्या काही गोष्टी आढळल्या ज्या जरा खटकतात. खटकल्या याकरता म्हणत आहे की जर्मनीमधे दुसर्या महायुद्धाच्या बर्याच कटू आठवणी जाणीवपुर्वक नष्ट करण्यात आल्या आहेत व ज्या आहेत तिथे व तसेच एकंदर जर्मन समाजात आपल्या देशाने काहीतरी भयंकर केले आहे अशी एक अपराधी भावना आढळली. [अर्थात तिथे देखील निओनात्सी चळवळ आहे पण एकंदर त्यांना जनसामान्यांचा पाठींबा नाही.]
गेल्या महिन्यात टोकीयोला गेलो असता यासुकुनी स्मारकाला भेट दिली. तेथील काही चित्रे.
यासुकुनी श्राईन प्रवेशकमान
यासुकुनी श्राईन
जपानच्या अधिपत्याखालील भुभाग. इतिहासाचा हा भाग पुस्तकात, एखाद्या संग्रहालयात असणे समजु शकते पण अशी दृश्य आठवण जी त्या अधिपत्याखालील देशातील लोकांना एक वेगळी भावना दुखवु शकते असे काहीसे सार्वजनीक जागी असावे का?
डॉ. राधाबिनोद पाल. हे चित्र विकीपिडियाहुन साभार
हे दुसर्या महायुद्धात जपानी युद्धकैद्यांवर चालवल्या गेलेल्या खटल्यात भारतातर्फे एक ज्युरी होते. पाहील्यावर आधी जरा आश्चर्य, कुतुहल तसेच एका भारतीयाचा फोटो पाहून बरे वाटले पण तिथे उपलब्ध असलेली माहीती वाचता, जरा विचीत्र वाटले. एक परिच्छेद जसाच्या तसा उतरवत आहे.
Dr. Pal detected that the tribunal, commonly known as the Tokyo Trial, was none other than formalized vengeance sought with arrogance by the victorious Allied Powers upon a defeated Japan. He attested that the prosecution instigated by the Allies was replete with misconceptions of the facts, being therefore groundless. Consequently, he submitted a voluminous separate opinion recommending that each and every one of the accused be found not guilty of each and every one of the charges in the indictment.
युद्धास जबाबदार जपानी लष्करी अधिकार्यांना सोडणे तितके पटत नाही. :-) असो. जपानी लोकांना त्यांच्याबद्दल आदर असणे समजु शकतो.
तिथे एक संग्रहालय देखील आहे परंतु वेळेअभावी बघु शकलो नाही. तरी तळमजल्यावर असलेले हे काही फोटो.
एक विमान, दोन तोफा, एक रेल्वे इंजीन आहे. युद्धात कसे अतुलनीय शौर्य दाखवले असा सुर आहे परंतु खरे तर हे सरळ सरळ आक्रमण होते. जे इंजीन इथे दिमाखात उभे आहे त्या थाई-बर्मा रेलरोड मधे वापरले होते [ब्रीज ऑन रिव्हर क्वॉय आठवा] तो रेलरोड बांधताना जवळजवळ लाख युद्धकैदी व दोन लाख स्थानीक लोकं गुलाम म्हणुन वापरली होती व त्यातील बहुसंख्य [९० हजार स्थानीक व १६ हजार युद्धकैदी] तेथेच मरण पावली होती. तरी एकंदर उल्लेख महान युद्ध व अतुलनीय पराक्रम असा आहे. जणु फार वाईट असे काही घडले नाही. इतक्या मोठ्या अत्याचाराचे वर्णन तिथे नसल्याचे आश्चर्य वाटले.
असो त्याच बरोबर हे देखील नमुद करु इच्छीतो की मला जपान अतिशय आवडला. सामान्य जपानी माणुस अतिशय चांगल्या मनाचा, कष्टाळू, मदतीला तयार, हसतमुख आहे. यासुकुनी श्राईन प्रकरणावरुन जपानला नावे ठेवण्यासाठी लेख लिहला नाही तर जर जर्मनीमधे दुसर्या महायुद्धाच्या आठवणींबद्दल आढळलेला एक सुर इथे जरा वेगळाच वाटला असे वाटले म्हणुन लिहले आहे.
जे काही दुवे दिले आहेत त्यात यासुकुनी श्राईन बद्दल, तिथल्या वादासंबधी चांगली माहीती दिली आहे त्यामुळे इतिहासाच्या जाणकारांनी तिथे वाचावे. मी इथे माझे मत, अनुभव मांडला आहे. मराठी मधुन यासुकूनी श्राईनची सखोल माहीती वाचायला आलेल्या वाचकांची निराशा झाल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो. ते दुवे वाचुन कळेल ते सगळे मराठीत टंकायला बराच कालावधी लागेल. :-)
प्रतिक्रिया
3 Oct 2008 - 5:03 pm | प्रियाली
चित्रदर्शी लेख चांगला झाला आहे. माहिती तुमच्या शब्दांत अधिक टाकत जा बॉ! जमण्यासारखे आहे.
यासुकुनी श्राईनबद्दल मला काहीच माहिती नव्हती. ती या लेखाने कळली. अधिक माहिती दुव्यांवरून वाचेनच.
3 Oct 2008 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठीत टंकायला त्रास घेतला असतात तर माझा विंग्रजी वाचण्याचा त्रास टळला असता!
अदिती
3 Oct 2008 - 10:17 pm | प्रमोद देव
निदान माझ्यासाठी तरी मराठीत टंकायचे होते.
इंग्रजी वाचण्याचा मला मनस्वी कंटाळा येतो.
छायाचित्र आवडली.
3 Oct 2008 - 5:13 pm | अवलिया
लेख आवडला.
3 Oct 2008 - 5:48 pm | नंदन
कमानीचा आणि इतर फोटो मस्त आहेत, मात्र आत जे गौरवीकरण केले आहे ते भयानक. या युद्धस्मारकाबद्दल आधी ओझरते ऐकले होते, आता तुमच्या लेखातून माहिती मिळाली, फोटो पाहता आले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Oct 2008 - 9:12 pm | चित्रा
छोटासा पण माहिती देणारा लेख.
तत्कालिन जपानी साम्राज्यवादाची छोटीशी झलक मिळाली पहायला.
कुठेतरी ती भावना जागृत असेल का?
जसे आपण आपल्या संस्कृतीला नावाजतो, तसेच तेही काही असेच करतात का?
3 Oct 2008 - 5:57 pm | आनंदयात्री
लेख माहितीपुर्ण आहे. धन्यवाद.
3 Oct 2008 - 8:36 pm | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते. अजून विस्तारानं लिहिलं असतंत तर आवडलं असतं.
4 Oct 2008 - 12:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख,लेखातले फोट्टो, माहितीपुर्ण आहे. अजून विस्तारानं लिहिलं असतंत तर आवडलं असतं. :)
3 Oct 2008 - 8:33 pm | बिपिन कार्यकर्ते
सहजराव...
शाळेत असताना दुसर्या महायुध्दाचा ज्वर चढला होता तेव्हा जर्मनी / जपान बद्दल बरंच काही वाचलं होतं, त्यात या यासुकुनी श्राईन बद्दल पण वाचलं होतं. नंतर काही तरी कारणांनी माहिती मिळत गेली पण इतकी छान छायाचित्रं आजच बघितली.
हे शिंटो धर्माचे समाधी स्थळ आज पर्यंत जे जपानी सैनिक सम्राटाच्या सेवेत धारातिर्थी पडले आहेत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले गेले आहे. इथे खरं लफडं हे आहे की ज्या जपानी अधिकार्यांना वॉरक्रिमिनल ठरवले गेले आहे त्यांच्या स्मृति पण इथे अधिकृत पणे जतन केल्या आहेत आणि त्या मुळेच जेव्हा जेव्हा एखादा जपानी पंतप्रधान तिथे भेट देतो तेव्हा तेव्हा संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया (विशेषतः चीन आणि कोरिया) ढवळून निघतो. अगदी राजनैतिक संबंध तोडले जाण्याची भाषा होईपर्यंत. जपानी लोकांनी दुसर्या महायुध्दाच्या अलिकडे आणि युध्दात अनन्वित अत्याचर केले आहेत या सर्व देशांवर. तरीही बरेच जपानी पंतप्रधान आणि इतर राजकिय अधिकारी 'यासुकुनी' ला वैयक्तिक भेटी देतात.
सहज नी लिहिल्या प्रमाणे जर्मनी मधे जश्या खुणा पुसून टाकायचे प्रयत्न झाले तसे जपान मधे फारसे झाले नसावेत. ज्या सम्राट हिरोहिटो च्या अधिपत्याखाली हे सगळे झाले त्याची अजूनही पूजा होते. पण मला असेही वाटते की जर्मनी मधे जे 'अपोलोजेटीक' वातावरण आहे ते ही खूप अति झाले आहे आणि बर्याच जर्मन लोकांना असे वाटते की 'ठीक आहे, जे झाले ते झाले, आम्ही किती दिवस ते ओझे घेउन चालायचे?' असो. हे अवांतर आहे.
राधाबिनोद पाल वरुन आठवले, २००६ मधे जपानी पंतप्रधान शिंझो आबे भारतात आले होते तेव्हा ते पाल यांच्या परिवाराला भेटले होते की भेटणार होते. आबे यांच्या वडिलांची (बहुतेक) सुटका होण्यात पाल यांचा हात होता.
बिपिन.
4 Oct 2008 - 8:57 am | सहज
तुमची निरिक्षणे, मते अगदी बरोबर आहेत बिपिनराव.
मला एक विलक्षण आश्चर्य वाटते की दुसर्या महायुद्धात बेचिराख झालेले दोन देश जर्मनी व जपान अल्पावधीत परत विकसीत झाले ह्यात त्या समाजाचे कर्तृत्व आहेच तरी देखील जेत्या राष्ट्रांनी पराभुत राष्ट्राला अल्पावधीत इतके वर आणायला मदत केली हे देखील इतिहासात वैशिष्टपूर्ण आहे.
7 Oct 2008 - 1:09 am | बिपिन कार्यकर्ते
नक्कीच. सहमत. जेत्यांनी जीतांना मदत करून वर आणण्याचे हे माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव उदाहरण आहे. मला असे वाटते की याच्या मागे काहितरी कारण मिमांसा आहे.
०१. पहिल्या महायुध्दानंतर जर्मनी आणि तिच्या इतर मित्रराष्ट्रांना ज्या प्रकारे वागवले गेले, लचके तोडले गेले ते खरोखर भयानक होते. किंबहुना नाझी भस्मासुराच्या उदया मागे हा अपमान हे एकमेव नसले तरी प्रमुख कारणां पैकी एक होतेच होते. हिटलरला त्या मुळे खूप मदत झाली. आणि म्हणूनच दुसर्या महायुध्दात जेव्हा मार्शल पेताँच्या सरकारने गुडघे टेकले तेव्हा हिटलरने काय केले.... त्याने त्याच कोंप्येन्येच्या जंगलात, त्याच आगगाडीच्या डब्यात फ्रांसची शरणागती व्यक्तिशः स्वीकारली, ज्या जंगलात ज्या आगगाडीच्या डब्यात १९१८ साली जर्मनीने दोस्तांपुढे गुडघे टेकले होते. मला वाटतं या सगळ्या प्रकारामुळे दुसर्या महायुध्दानंतर दोस्त राष्ट्रांनी असे वर्तन केले असावे.
०२. अजून एक म्हणजे, जरी रशिया दोस्त राष्ट्रांपैकी असला तरी ते फक्त बळजबरीने होते. मॅरेज ऑफ कन्विनियंस. युध्दाच्या शेवटी शेवटी तर कोण किती भूभाग जर्मनीच्या ताब्यातून हस्तगत करतो याची शर्यतच लागली होती. आणि युध्दानंतर जवळ जवळ लगेचच स्टालिनने त्याचा लोखंडी पडदा पाडला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे जेत्यांना जीतांना मदत करावीच लागली.
०३. वरील कारणे युरोपात होती, बहुतांश. जपान मधे ज. मॅक-आर्थर सारख्या मुत्सद्दी सेनानीच्या हातात सत्ता गेली. युध्दाआधी आणि दरम्यान, जपानी लोकांनी एवढी आश्चर्यकारक प्रगति केली होती त्यामुळे त्यांचा राष्ट्रिय आत्मविश्वास खूपच जोरावर होता. जपान मधे आजही असं म्हणतात की त्या वेळी सम्राटाने सांगितले शस्त्र टाका म्हणून टाकली, मरे पर्यंत लढत रहा असं सांगितलं असतं तर तसं केलं असतं. अशी राष्ट्रं मोडून काढणं फार कठिण असतं. मग उपाय काय? त्याना भागीदार करुन घ्या. इफ यू कान्ट बीट देम, टेक देम विथ यू.
अर्थात ही माझी वैयक्तिक मतं आहेत.
बिपिन.
3 Oct 2008 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर
आपल्याकडेही पाकिस्तानी युद्धात जिंकलेला पाकिस्तानचा रणगाडा सार्वजनिक ठिकाणी ठेवलेला आहे. (संभाजी पार्कात?)
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
4 Oct 2008 - 9:15 am | सहज
हे उदाहरण व जर्मनी-जपान मधील दुसरे महायुद्धातील आठवणी जरा वेगळ्या आहेत. कुठल्याही प्रकारे गौरवीकरण होउ नये असे जितके प्रयत्न जर्मनी मधे झाले आहेत त्यावरुन असे वाटले की जे इथे यासुकुनीमधे दिसले ते जरा वेगळे वाटले. रेल्वे इंजीन, विमान असण्याबद्दल आक्षेप नाही [मी कोण घेणारा :-) ] थाई-बर्मा रेलरोड ही घटना एक भीषण घटना होती पण एखाद्या नवख्याला "तो फोटो, ती माहीती" वाचुन त्या भीषणतेची काही कल्पना येणार नाही. त्याचा थोडा उल्लेख योग्य ठरला असता असो हे माझे मत. भारतावर कोणाची सत्ता नाही. पण अजुनही जर्मनी व जपान मधे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत व कित्येक वर्षे अमेरिकेच्या परवानगीशिवाय महत्वाचे निर्णय होत नव्हते.
जरी मुळात हे जपान सरकारने केलेले स्मारक असुन दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर यासुकुनी श्राईनला अधिकृतरित्या जपानी सरकारकडून काही मदत नाही ते खाजगी संस्थेने चालवलेले स्थळ आहे पण एकंदर जरा संवेदनाशील प्रकार आहे.
4 Oct 2008 - 12:21 am | विसोबा खेचर
लेख आणि चित्रे, दोन्ही सह्हीच..
नवीन माहिती मिळाली..
सहजराव, तुमच्या पोतडीतनं येऊ द्या असंच काही...
तात्या.
4 Oct 2008 - 12:22 am | प्राजु
अतिशय माहितीपूर्ण लेख.
फोटोही छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Oct 2008 - 1:04 am | धनंजय
दोन्ही माहितीपूर्ण.
अजून अधूनमधून ब्रिटिश साम्राज्यवादाचे समर्थन करणारा एखादा ग्रंथ वर्षा-दोन वर्षांत प्रसिद्ध होतो. तशीच काही भावना बहुधा जपानमध्ये असावी.
स्वतःच्या पूर्वीच्या युद्धातल्या चुका मान्य करून समोर प्रदर्शित करण्यात बहुधा जर्मनी हे एकुलते एक राष्ट्र असावे. अमेरिकेतही (यू. एस. मध्येही) पूर्वीच्या गुलाम ठेवणार्या राज्यांत तेथील योद्ध्यांची वीरस्मारके दिसतात. मी अधूनमधून फिरायला जातो त्या उद्यानाचे नाव "रॉबर्ट ई. ली पार्क" असे आहे. हा मुत्सद्दी सेनापती "गुलामगिरी चालू ठेवावी" या बाजूने अमेरिकेच्या गृहयुद्धात मोठ्या कौशल्याने लढला होता, गुलामगिरी बंद करणार्या सैन्याला जवळजवळ पराभूत केले होते.
जपानबद्दल आणखी वर्णन येऊ द्या, सहज.
स्मारकाच्या समोर जो कापडी पडदा आहे त्याच्यावर धर्मचक्रे आहेत का? (फक्त १६ आर्या आहेत, २४ नाहीत...) शिवाय शिंतो आहे, बौद्ध नाही...
6 Oct 2008 - 2:25 am | मृदुला
ज्या त्या देशातल्या योद्ध्यांच्या आठवणी तिथल्या जनतेला प्रिय असणे स्वाभाविक आहे असे मला वाटते.
बर्याच गोर्या ब्रिटिश लोकांना नाही म्हटले तरी असंस्कृत काळ्या, तपकिरी लोकांना आपण वसाहतींच्या माध्यमातून थोडे वर आणले असे बारीकसे वाटत असते. त्यांच्या इतिहासात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराची गंधवार्ताही नसते.
6 Oct 2008 - 7:40 pm | बिपिन कार्यकर्ते
मृदुला, तुम्ही म्हणता ते बरंचसं खरं आहे, रुडयार्ड किपलिंग ने, व्हाईट मॅन्'स बर्डन, ही संज्ञा मांडलेलीच आहे. पण यासुकुनी श्राईन च्या बाबतीत तरी ते पूर्ण ग्राह्य नाहिये. यासुकुनी श्राईन वर आक्षेप घेणारे हे पाश्चात्य नाहीत तर जपान्यांचे सख्खे शेजारी आहेत, जे वांशिक दृष्ट्या त्यांच्या पेक्षा फार वेगळे नाहीत. इथे खरे आक्षेप दोन आहेतः
०१. जपानच्या दुसर्या महायुध्दाआधीच्या उद्धखोरीचे (मिलिटरिझ्म) उदात्तीकरण
०२. युध्दा दरम्यान ज्यांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले अश्या लोकांचे दैवतीकरण
मला वाटते, हे दोन आक्षेप नसते तर, कोणीही यासुकुनी श्राईनचे नाव पण ऐकले नसते फारसे (अर्थात जपानच्या बाहेर).
बिपिन.
6 Oct 2008 - 3:31 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि माहिती छानच.. अजून थोडे सविस्तर चालले असते की..
स्वगत- स्वाती,भ्रमणमंडळाच्या नादात तुझी जपानकी दुनिया मागे पडलीय की..लवकर लिही..
स्वाती