लोकलपंची.

अलका सुहास जोशी's picture
अलका सुहास जोशी in जनातलं, मनातलं
3 Sep 2016 - 1:33 pm

मुंबई लोकल……..हिच्याबद्दल प्रेम वाटणारं कोणी असेल असं हिलाही वाटत नसावं. पण ती माझी फार आव़डती सखी आहे. सोळाव्या धोक्याच्या वर्षातल्या अतरंगी करामती वयापासून ते आजच्या ठाय लयीतल्या कुटुंबवत्सल आयुष्यापर्यंत हिने मला फार सुंदर साथ दिली आहे. लोकलचं बदलतं बाह्यरूप तो सब जाने है. पण तिची अंतरंग सुखदु:ख एखाद्यालाच सांगते ती. नीट ऐकणारा मात्र पाहिजे.

तिचं टेचात येणं पहात रहावसं. व्ही.टी. ला संध्याकाळी पाचनंतर फलाटाच्या दुतर्फा तुफान गर्दीची खडी ताजिम स्वीकारत ती राणीसारखी येते. रूळांवरून मोहक नागमो़डी लचके घेत. जणू रँपवर कॅटवॉक करणारी सेक्सी शुश्मिता सेन. बाईपणाचा सारा नखरा तिच्यात असतो. तिच्या ध़डधडण्याने गर्दीचीही ध़डकन वा़ढत जाते. हजारो प्रवासी जागा पकडायला धडपडतात. पडतात. जखमी होतात. कितीदा जीव गमावतात.

तिची रोजची चाल वेगळंच सांगते. दररोज प्लॅ़टफार्मवर उभं राहून तिला बघताना मनात येतं, आज काय बये घेऊन आलीस? कधी तिचं येणं म्हणजे सुखद धक्का. अगदी वेळेवर आणि कदम बरकदम. सगळ्याच लोकलसुंदर्या वेळेत आल्या, की मग गर्दीही नसते फारशी. चढताच मिळणारी जागा, हिंदकळत्या हँडल्सच्या तालावर रंगत जाणार्या गप्पा, वार्याची मस्त झुळूक आणि हातासरशी केलेलं शॉपिंगही. भाजीपासून ते ज्वेलरीपर्यंत. हा गर्दीमुक्तीयोग मात्र अतिदुर्मिळ…….उंबराच्या फुलासारखा. कधी फलाटावर दाखल होताना कर्कश्श न थांबणारा कर्णा वाजवत सखू येते. ही म्हणजे झालेल्या अपघाताची भयसूचना. पाठोपाठ स्टेशनवर अनाउन्समेंट! ऍम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर्ड हमाल यांच्यासाठी. जीव गोळा होतो त्या अनामिकांसाठी. कोणाचे काय झाले असेल? मनावर सकाळीच मळभ येतं अशाने. पण तिच्या खडखडाटात हळूहळू सारं काही विसरायला होतं. अगदी सक्काळीच घरात झालेला वाद , न आलेली कामवाली , किंचित दुखणारं डोकं यासारखं सगळं सगळं लोकलगर्दिर्पणमस्तु होउन जातं.

गर्दीच्या वाढता वाढता वाढे भस्मासुरात मुर्दाडमठ्ठ राजकारणी आणि प्रशासकांनी लाखोंचे बळी घेतले आहेत. कित्यकजण कायमचे अधूअपंग होउन बसले आहेत. लोकलच्या चौतीस वर्षे अखंडीत चाललेल्या अशा प्रवासयोगात पुष्कळ स्थित्यंतरं मला अनुभवायला मिळांल्येत. माझ्या सखीचा बाह्यरंग पूर्ण बदललाय. कित्येक वर्षे चॉकलेटी – क्रीम अशा दोरंगाचे कपडे घालणारी लोकल आज फुल्टू कमर्शियल अॅडक्वीन झाल्ये. तिच्यावर झंडू बाम पासून रिलायन्स जियोपर्यंत काहीही चिताडकाम रंगवलेलं असतं. जो पैसा देगा , उसका कपडा. पूर्वीची लोकल - ती जाणार कुठे हे तर सांगेच, पण मी कुठून आले आहे, हेसुध्दा प्रेमाने सांगत धावत असे. लोकल बदलली, रोज दिसणारी - भेटणारी माणसेही बदलत गेली. पण तिचा स्वभाव मात्र तसाच राहिला आहे. सगळ्यांना पोटात सामावून घेणारा. चार टोले देत घेत रफ-टफ जगायला शिकवणारा. आडवेतिडवे धावत , अडथळयांची शर्यत पार करत लोकल पकडताना जगण्याचा आत्मविश्वास देणारा. भोवतीचे अचाट विश्वरूप लोकलच्या एका डब्यात अनुभवायला देणारा. बाहेरच्या माणसांना पहाताक्षणी धडकी भरेल असं तिचं विक्राळ रूप आणि भयंकर प्रवासकथा सर्वश्रुत आहेत. पण, मला मात्र या मैत्रीणीबद्दल यापेक्षा काही वेगळं जाणवत गेलं, जे जे आवडलं-नावडलं ते शेअर करावसं वाटलं कोणाशीतरी, म्हणून मिपावर हा लेखनप्रपंच. पाचेक लेख सहज लिहू शकू असं आत्ता तरी वाटतंय. या अर्थाची हि लोकलपंची.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

3 Sep 2016 - 1:44 pm | संजय पाटिल

छानच आहे.लिहा अजुन..

औरंगजेब's picture

3 Sep 2016 - 2:16 pm | औरंगजेब

नेहामीप्रमाणेच उत्तम

रुस्तम's picture

3 Sep 2016 - 4:16 pm | रुस्तम

अजून काही लेख आहेत का? हा पहिलाच ना?

महासंग्राम's picture

3 Sep 2016 - 5:37 pm | महासंग्राम

पहिलाच लेख आणि नेहमीप्रमाणे उत्तम. कॉपी पेस्ट चुकला काय

औरंगजेब यांनी त्या संदर्भात म्हटलं असेल. लेख छान आहे. मुंबई लोकलने गेली २७ वर्षे प्रवास करतो आहे पण प्रश्न काही बदललेले नाहीत. उलट वाढलेले आहेत.

औरंगजेब's picture

3 Sep 2016 - 8:27 pm | औरंगजेब

नाही ही माझी आई आहे. म्हणुन म्हणल नेहमीप्रमाणे उत्तम

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2016 - 9:40 am | बोका-ए-आझम

पण हे आम्हाला कसं माहित असणार?

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 2:13 pm | अभ्या..

शाळेचे दिवस आठवले.
"हाक मार बघू, ओ देतेय का" ;)

अलका सुहास जोशी's picture

4 Sep 2016 - 10:54 pm | अलका सुहास जोशी

हाका नका मारू, असं सांगितलंय त्याला जपानीत

सिरुसेरि's picture

3 Sep 2016 - 2:43 pm | सिरुसेरि

+१०० . काहि अप काहि डाउन .

कविता१९७८'s picture

3 Sep 2016 - 3:59 pm | कविता१९७८

खुपच छान लेखन

एस's picture

3 Sep 2016 - 4:29 pm | एस

लेखन आवडलं.

अलका सुहास जोशी's picture

3 Sep 2016 - 8:19 pm | अलका सुहास जोशी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना.

मिपावर हा माझा पहिलाच लेख आहे . आधी आकाशवाणीसाठी लिहायचे . कुठेकुठे छापूनही आलेत काही लेख फार पूर्वी . पण लिखाणात नियमितपणे अनियमितपणा असल्याने त्याचे पुढे जे काही व्हावयाचे तेच होत गेले. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे. सिरुसेरी , पी .एल ची याद करून दिलीत . काही अप काही डाऊन ! आता लगेच वाचून घेते परत .

एकदोन दिवसाआड टोटल पाच पोस्ट्सची लोकलपंची लिहीन म्हणते.

नमकिन's picture

3 Sep 2016 - 8:19 pm | नमकिन

पडू देऊ नका
पुलेशु

अलका सुहास जोशी's picture

4 Sep 2016 - 10:53 pm | अलका सुहास जोशी

वेल सेड !

पगला गजोधर's picture

3 Sep 2016 - 8:24 pm | पगला गजोधर

लोकलगर्दिर्पणमस्तु

शब्द आवडल्या गेल्या आहे ....

रातराणी's picture

4 Sep 2016 - 1:11 pm | रातराणी

लेख आवडला! पुभाप्र!

मुंबई लोकलबद्दल चांगलं वाचायला आवडतंच! छान लेख.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

सविता००१'s picture

5 Sep 2016 - 6:15 pm | सविता००१

फारच छान लेख. आवडला.पुभाप्र

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 9:38 pm | यशोधरा

मस्त लेख!

पैसा's picture

6 Sep 2016 - 3:37 pm | पैसा

सुरेख लिहिलंय! आवडलं!

सुमीत भातखंडे's picture

6 Sep 2016 - 3:49 pm | सुमीत भातखंडे

छान लिहिलंय!