लोकलपंची २.

अलका सुहास जोशी's picture
अलका सुहास जोशी in जनातलं, मनातलं
4 Sep 2016 - 10:50 pm

लोकलपंचीच्या पहिल्या भागासाठी लिंक http://www.misalpav.com/node/37209

लोकलपंची २.

पारसिक डोंगराचा कभिन्न अंधार कापत हिरव्यागार प्रदेशात लोकलसखू एकेकाळी शिरायची . ते नॉस्टेल्जीक दिवस आजही आठवतात . ठाणं एकदाचं उलथलं की "नवी पहा या ही दुनिया " असं निसर्गचित्रं रुळांच्या दुतर्फा उलगडत जायचं .गर्द हिरवा आसमंत लोकलसखीसाठी रुजामे अंथरायचा . डोंगरातल्या मुंब्रादेवीला टाटा करत सखू एक कुर्रेबाज वळण घ्यायची आणि गारव्यात डोंबीला शिरायची . फार नाही हो , फकस्त तीसेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट . ठाणं सोडलं की पाऊण गाडी रिकामीच असायची .
रुईयाला सकाळचा कट्टा यथासांग आटोपून आमचा धन्य कंपू रीडिंग रूमला दाखल व्हायचा . तिथे आमच्यासारखी अती अभ्यासू मंडळी फारवेळ चालायची नाहीत . मामालोक लगेच वरात काढायचे . तशीच वरात उरकून अतिशय नाईलाजाने दुपारच्याला मी डोंबिवलीला घरी निघाले होते एक दिवस . माटुंग्याला स्लो कर्जत मिळाली . भरलेली . दिवस पावसाचे. हाडाचा लोकलप्रेमी, सीट भिजली असली तरी ती पुसून घेतो . मला चक्क भिजकी विंडोसीट मिळाली . ती शिस्तीत पुसून उभ्या जनतेला ठेंगा देत मी खिडकी धरली आणि तातडीने पेंगायला लागले. अचानक एक बारकं पोर माझ्या मांडीवर येऊन आदळलं . मी दचकून उठले. बघते तर एक हेंगाडी बाई बडबडायली . "जरा ले लू ना उसकू ,मेरा हात दुखता जी ." आता काय ? " आलिया भोगासी " म्हणत मी पोराला मांडीवर दत्तक घेतलं . बाहेर अजून गोदरेजची झाडी दिसत होती. 'वेळ आहे डोंबीला' , मी पुटपुटले , आणि पहाते तर काय ,पोरगं सगोत्र लागल्यासारखं लग्गेच डाराडूर झालेलं . गाडी अगदी मस्तमजेत ठेक्यात पळत होती.
थंडगार वारं केसात एकदम घुसलं आणि मी जागी झाले . पोरग मांडीत शांत झोपलेलं . बाहेर हलका पाऊस . खाडीचा खारा ओला वास नाकात शिरला आणि मी पुरती भानावर आले. मुंब्रा आलं ? खाडीत खारफुटी आपलीच सावली बघत होती . रोज मी आसुसून ते पहायची . पण आज हे पोर मांडीवर , आई कुठाय याची ? मी सुधुर्बुधूर . काही सुचेना. झोपेच्या उत्तम अमलाखाली मी हेंगाडीचं रूप डोळ्यात साठवायला विसरले होते . आता ? पोरगं कसंबसं कमरेवर लोम्बकळत मी तिन्ही दरवाजे हिंडून आले . माझ्या दिव्य babyseating मुळे ते बिचारं कोकलायला लागलं . ओ sss बाई ,ओ sss बाई अशा करुण हाका मारत मीही प्रशस्त भोकाड पसरलं . या रडक्या जुगलबंदीस दाद म्हणून तिसऱ्या दारात दमून लवंडलेली एक लाकूडफाटावाली बाई उठली . एका मिन्टात तिला सिच्युएशन समजली . माझं बकोट पोरासकट धरून ती तरातरा निघाली . आडव्या बाकांवर सुख झालेल्या सगळ्या बायांना रट्टे घालत तिने उठवलं . त्यातच एक या बेंबट्याची हेंगाडी आऊस निघाली . आपले दात दाखवत ती हसताच फाटीवाल्या मावशीने तिला xxxx xxxx xxxx असे अनेकोत्तम आशीर्वाद घालायला सुरुवात केली , तोवर लोकलसखू डोम्बी स्टेशनात शिरायला लागली होती . मी घाईघाई करत उतरले . दरदरून फुटलेला घाम पुसत. मला बिन्धास सटकताना पाहून फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही .
--------------------------------------------------------------------------------------

कट टू ........

एक ऑक्टोबर १९९१. मला आठवा महिना लागलेला. दोन दिवस सी एल टाकून फर्माईशी खादाडी करावी आणि आरामही , या उत्कृष्ट हेतूने मी डोंबीला आईकडे आले होते . सासर ठाण्याला . डॉक्टर ठाण्याला .डिलिव्हरी ठाण्याला . हे नक्की होत. पण एकदम पोटात दुखायला लागलं . सोसायटीतच डॉक्टर काकू . अनुभवी . त्या म्हणाल्या , या डिलिव्हरीपेन्स आहेत सुरु झालेल्या . पहिली वेळ आहे,हिला वेळ लागेल . तो परवलीचा शब्द मी ऐकला आणि फट्कन उठले . आत्ताच्या आत्ता मी ठाण्याला जाणार . दोघी हबकल्या . त्यांना अजिबात न जुमानता मी दार लावून कपडे बदलले. पर्स खांद्याला अडकवली . गर्जना केली, "इथे पाणी नाही , माझी डॉक्टर नाही, सो , इथे डिलिव्हरी नाही. मी ठाण्याला निघाले"' . आता मी कोणाच्या तीर्थरुपांना ऐकणार नाही हा जगद्विख्यात हट्टी स्वभाव . मी फुल्ल कॉन्फिडन्ट होते. लोकलने फारतर पाऊण तासात आपण ठाणा स्टेशनवर पोचणार. पहिली डिलिव्हरी निदान तीनेक तास काय होत नाही,सो बिन्धास! उतरले, आई आणि काकू मागे धावल्या. आई बिचारी हातात मावेल तितकी कॅश घेऊन माझ्या मागे पळत सुटली काकूंसह . ऑटो मिळाली. डोंबीचा खडा रेल्वेपूल एका दमात चढले , फास्ट लोकलची वेळ नव्हती, स्लो फलाट गाठला . आई- काकू उतरल्याचे पाहिले . लगेच माझी प्रिय सखी आलीच फलाटावर मला घ्यायला. उडी मारून जागा पकडली. दोघी भयंकर घाबरल्या होत्या. अज्ञानातल्या सुखात मी मश्गुल होते, गाडीत बायकांनी शिव्यांची लाखोली घालायला सुरुवात केली. आई अगदी बापुडवाणी होऊन गेली. गाडी वेगात लयीत पळत होती. वेळेत ठाणा आलं . बायकांनी एका दाराची खिंड लढवली. कोणालाही तिथून चढू उतरू दिले नाही. अस्मादिक आई - काकूसह उतरले. सखीला आनंदाने टाटा केला. वेळेवर ऍडमिट झाले आणि तासाभरात आई झालेसुद्धा.
हे वेडं धाडस किती आचरटपणाच हे समजलं तेंव्हा पायाखालची जमीन सरकली होती . माझ्या इम्पल्सिव्ह वेडेपणाला सांभाळून घेणारी, कानकोंडी झालेली माझी आई आता नाही. लोकल आहे. अजून. आणि ती राहिलंही . मी आहे तोवर ती असणारच माझ्यासाठी, नक्की.
----------------------------------------------------------------------------------------

साहित्यिक

प्रतिक्रिया

सुंदर आठवण आणि ते वेडं धाडस

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 2:53 am | संदीप डांगे

ओह! काय प्रतिक्रिया देऊ? खूप सुंदर लिहिलंय. आवडलं. पुलेशु.

हुप्प्या's picture

5 Sep 2016 - 10:09 am | हुप्प्या

खरे आहे. ३० वर्षापूर्वी मुंबईहून कल्याणकडे जाताना ठाणे ओलांडले की मुंब्र्याचे डोंगर फारच सुंदर दिसत. पावसाळ्यात तर एखाद्या हिलस्टेशनच्या तोडीची दृष्ये दिसत. मुंब्रा, दिवा ही सगळी स्टेशने निवांत असत. खाडीला भरती असली की दिवा डोंबिवली प्रवास समुद्राच्या काठाने होतो आहे की काय असे वाटायचे. आता सगळे गेले. मुंब्र्याच्या आसपासचा भाग सगळा झोपडपट्ट्यांनी बरबटला आहे. डोंगर, झाडे हरवली. कित्येक वर्षात लोकलमधे पाऊल टाकलेले नाही (तशीही पाऊल टाकण्याइतपत जागा लोकलमधे मिळणे कठिण होत चालले आहे असे ऐकले आहे!)
बाकी तुमच्या आठवणी फारच आवडल्या. अनेक वर्षे ह्याच स्टेशनांत लोकलपंची केलेली असल्यामुळे जरा जास्तच!

जेपी's picture

5 Sep 2016 - 7:32 pm | जेपी

मस्त लिहीलय..
आवडल.

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 7:46 pm | यशोधरा

काय सुरेख लिहिलंय!

प्रचेतस's picture

5 Sep 2016 - 7:49 pm | प्रचेतस

सुंदर लेख.

एस's picture

5 Sep 2016 - 9:30 pm | एस

अप्रतिम!

Rahul D's picture

6 Sep 2016 - 12:49 am | Rahul D

धन्यवाद लहानपणीचे दिवस आठवले.

रातराणी's picture

6 Sep 2016 - 10:14 am | रातराणी

=)) खूप सुंदर लिहिताय! पुभाप्र!

प्रमोद देर्देकर's picture

6 Sep 2016 - 10:29 am | प्रमोद देर्देकर

मस्त आवडले.

बघ बघ यशोतै ( नि.गो.) खाडी अलिकडचे जग किती सुंदर असते ते. आणि तु दु दु चिडवतेस.

यशोधरा's picture

6 Sep 2016 - 1:22 pm | यशोधरा

=))

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 10:53 am | बोका-ए-आझम

लोकलचा लेडीज डबा म्हणजे अनेक ष्टो-यांची खाण. त्यातले काही gems आमच्यासमोर मांडल्याबद्दल धन्यवाद. बाकी मुंब्रा रेतीबंदराच्या कडेने रेल्वे जेव्हा जायची तेव्हा खाडी, रस्ता आणि धावणारी रेल्वे बघून ' मेरे सपनों की रानी कब आयेगी तू ' हे गाणं आठवल्याशिवाय राहायचं नाही.

नाखु's picture

6 Sep 2016 - 1:53 pm | नाखु

मनापासून दाद...

रच्याकाने, बोकोबा त्या गाण्याचा परिणाम स्वरूप शेवट काही झाला की नाही? राणी आली का नाही?..

पळा अता ...पळालेला नाखु

अलका सुहास जोशी's picture

7 Sep 2016 - 11:46 am | अलका सुहास जोशी

मलापण,मलापण!!

स्वीट टॉकर's picture

6 Sep 2016 - 1:21 pm | स्वीट टॉकर

कसलं खल्लास लिहिलं आहेत!

मिपावर स्वागत! तुमच्या चिरंजीवांनी 'नेहमीप्रमाणेच छान' असं लिहिलं आहे त्या अर्थी तुमच्याकडे बरंच लिखाण तयार असणार. आम्हाला मेजवानी आहे.

पुढच्या लेखांची वाट बघतो.

मुक्त विहारि's picture

6 Sep 2016 - 2:05 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

चिनार's picture

6 Sep 2016 - 2:17 pm | चिनार

मस्त !

नाखु's picture

6 Sep 2016 - 2:26 pm | नाखु

आठवणी..

पुलेशु

पद्मावति's picture

6 Sep 2016 - 2:29 pm | पद्मावति

किती सुरेख लिहिलंय. मस्तं.

पैसा's picture

6 Sep 2016 - 3:41 pm | पैसा

जबरदस्त! दोन्ही प्रसंग अगदी कायमचे लक्षात रहाण्यासारखेच! म्हणून तुमचे चिरंजीव औरंगझेब का! =))

वेल्लाभट's picture

6 Sep 2016 - 3:59 pm | वेल्लाभट

एक्सलंट ! एक्सलंट !

चंपाबाई's picture

6 Sep 2016 - 10:35 pm | चंपाबाई

छान

अमितसांगली's picture

7 Sep 2016 - 12:19 pm | अमितसांगली

मस्त.......

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Sep 2016 - 12:33 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लय भारी

अलका सुहास जोशी's picture

7 Sep 2016 - 12:38 pm | अलका सुहास जोशी

अनेक आभार सर्वांचे! पुलेलौटा (पुढील लेख लौकर टाकते.)

सुमेधा पिट्कर's picture

7 Sep 2016 - 3:02 pm | सुमेधा पिट्कर

रोजचाच लोकल प्रवास असल्याने तर फारच मनापासुन पटल, दोन्ही प्रसंग अगदी कायमचे लक्षात रहाण्यासारखेच!
पुलेलौटा(टाका)

प्रसाद_१९८२'s picture

7 Sep 2016 - 3:31 pm | प्रसाद_१९८२

आवडले,
एकदम क्लास लिहिलेय.

फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही .

याकरता आमच्याकडून एक विशेष दंडवत _/\_

काय क ह र लिहीलंय!!

मजा आ गया!

बहुगुणी's picture

8 Sep 2016 - 1:08 am | बहुगुणी

लोकल चा हा डोंबिवली प्रवास काही वर्षे चाकाखालचा होता, त्यामुळे ओळखीच्या खुणा जाणवल्या. पाचच भागांत संपवणार का? आणखीही भरपूर लिहिण्यासारखं असणार तुमच्याकडे, आधिक भाग झाले तरी वाचक वाचतीलच. येऊ द्यात.