‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’
- मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला.
मित्रांनो,
ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन. अर्थात तुम्ही त्या वाचल्या असतील पण मी हे माझ्या समाधनासाठी लिहितोय असे समजुयात.....
आदरांजली - २ खोल दो !
मूळ लेखक : स़ादत हसन मन्टो.
१९१२-१९५५
अमृतसरच्या स्टेशनवरुन गाडी अंदाजे दुपारी दोन वाजता सुटली आणि आठ तासांने मुगलपूऱ्याला पोहोचली. फाळणीच्या वेळची गोष्ट आहे...वाटेत अनेक माणसांचे मुडदे पडले..काही जखमी झाले तर काही बेपत्ता झाले.
सकाळी दहा वाजले. कँपच्या थंडगार जमिनीवर जेव्हा सिराजुद्दीनने आपले डोळे उघडले तेव्हा त्याला प्रथम दिसला तो एक प्रचंड उसळलेला जनसागर. माणसे, वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुले यांचा उसळलेला जनसागर ! ते दृष्य पाहून बिचारा सिराजुद्दीन खचलाच. ते सगळे त्याच्या कल्पनाशक्तिच्या बाहेरचे होते. त्याची बुद्धीच चालेना. बऱ्याच वेळ तो त्या मळभ दाटलेल्या आकाशाकडे एकटक नजर लाऊन बसला. आजुबाजुला इतका गोंधळ होता पण त्याच्या कानावर काही पडत नव्हते. आत्ता कोणी त्याला पाहिले असते तर त्याला वाटले असते की सिराजुद्दीन कुठल्यातरी गहन विचारात डुबला आहे...........पण खरे तर त्याच्या संवेदनाच बधिर झाल्या होत्या. जाणीव व नेणिवांच्या मधे कुठेतरी त्याच्या संवेदना लोंबकळत होत्या.
त्या आकाशाकडे पाहता पाहता त्याची नजर बाहेर आलेल्या सूर्यावर पडली. तो तीव्र प्रकाश त्याच्या डोळ्यातून शिराशिरात पसरला व त्याला जाग आली. त्याच्या मनपटलावर अनेक चित्रांची गर्दी झाली... आग...गोंधळ...स्टेशन, बंदुकीतून उडणाऱ्या गोळ्या... रात्रीचा अंधार आणि सकीना. तिची आठवण झाल्यावर सिराजुद्दीन ताडकन उठला व वेड्यासारखा त्या गर्दीत इकडे तिकडे धावू लागला. त्याने तो जनसागर उपसण्याचा प्रयत्न सुरु केला. तीन तास सिराजुद्दीनने सकीनाच्या नावाने आक्रोश करीत तो कँप पालथा घातला पण बिचाऱ्याला त्याची तरुण, एकुलतीएक मुलगी काही दिसली नाही. आणि विचारायचे तरी कोणाला ? प्रत्येकजणच कोणान् कोणाला तरी शोधत होता. कोणी आपल्या मुलाला शोधत होते तर कोणी आपल्या बापाला. कोणी आपल्या बायकोला तर कोणी लेकिला. शेवटी सिराजुद्दीन थकला, हरला. खचून जात त्याने बाजुलाच बसकण मारली. हताश होत त्याने आपल्या आठवणींना जरा ताण द्यायचा प्रयत्न केला... कुठपर्यंत होती सकीना आपल्या बरोबर ...? केव्हा तिचा हात सुटला.. ? पण त्याला काही आठवेना कारण प्रयत्न केला की त्याच्या समोर सकीनाच्या आईचे रक्तबंबाळ पोट व त्यातून बाहेर येणारी आतडीच उभी रहात. ते आठवले की त्याला इतर काहीच आठवणे शक्यच नव्हते. त्याचा चेहरा कावराबावरा झाला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि प्रयत्न यांची विचित्र सरमिसळ दिसू लागली.
सकीनाच्या आईने त्याच्या समोरच आपला शेवटचा श्र्वास घेतला पण मरताना तिने सिराजुद्दीनला तिला सोडून सकीनाला घेऊन पळून जा असे ओरडून सांगितल्यावर त्याने सकीनाचा हात पकडला व ते तेथून पळाले. दोघेही अनवाणी पळत सुटले. सकीनाचा दुपट्टा पडला तेव्हा तो उचलण्यासाठी तो क्षणभर थबकला. ‘‘ अब्बा जाऊ देत पडू देत’’ सकीना म्हणाली. पण शेवटी त्याने तो उचलून त्याच्या कोटाच्या खिशात कोंबलेला त्याला आठवत होते. दुपट्याशिवाय जवान मुलगी कशी राहिली असती? त्याने कोटाच्या खिशात हात घातला व एक चुरगाळलेली चिंधी बाहेर काढली. सकीनाचा दुपट्टाच होता तो...पण सकीना कुठे होती... ? कुठे होती...
सिराजुद्दीनने आपल्या थकलेल्या मेंदूला अजुन ताण दिला. त्याने तिला स्टेशनवर आणले होते का ? गाडीत बसविले होते का ? मधे जेव्हा गाडी जमावाने रोखली तेव्हा तर तिला कोणी पळविले नाहीना ? शक्य होते कारण तो तेव्हा जवळजवळ बेधुद्धच पडला होता. त्याच्या मनात अशा अनेक प्रश्र्नांनी गर्दी केली. एका प्रश्र्नातून दुसरा प्रश्र्न उभा रहात होता आणि एकाचेही उत्तर त्याला गवसत नव्हते. त्याने हताशपणे आपल्या गालावर थपडा मारुन घेतल्या पण छे ! त्याला काही आठवतच नव्हते. त्याला आता कोणाच्या तरी आधाराची गरज होती. खरे तर त्याला जोरात ह्ंबरडा फोडायचा होता, रडायचे होते पण त्याचे अश्रू कुठे गायब झाले होते कोणास ठाऊक..
चार पाच दिवसांनी जरा सावरल्यावर सिराजुद्दीन कँपमधे काही युवकांना भेटला. ही रझाकार मंडळी तेथे निर्वासितांना मदत करण्यासाठी जमा झाली होती. त्यांच्याकडे गाड्या होत्या, बंदुका होत्या व ते रोज कोणान् कोणालातरी कँपमधे घेऊन येत होते. सिराजुद्दीनला त्यांना भेटल्यावर त्यांचा आधार वाटला. त्यांना भेटल्यावर त्यांना दुवा देत त्याने सकीनाचे वर्णन त्यांच्यापाशी केले,
‘‘गोरीपान आहे व खुपच सुंदर आहे. माझ्यावर नाही आपल्या आईवर गेली आहे ती....सोळा सतरा वर्षांची असेल..मोठे मोठे डोळे, कुरळे केस व उजव्या गालावर एक तीळ आहे....सकीना नाव.. माझी एकुलती एक मुलगी आहे... तिला शोधून आणा मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.... खुदा तुमचे भले करेल तुम्हाला दुवा देईल...
ते ऐकून त्या रझाकार तरुणांनी मोठा आत्मविश्र्वासाने म्हाताऱ्या सिराजुद्दीनला सांगितले,
‘‘ ती जर जिवंत असेल तर चाचा, आम्ही तिला निश्चितच शोधून आणू. फिक्र मत करो !’’
त्यांनी प्रयत्न केला. मोठ्या धाडसाने जिवावर उदार होत ते अंबरसरीयाला गेले. कित्येक स्त्रियांना, मुलांना शोधून त्यांनी कँपवर पोहोचवले. दहा दिवस झाले पण त्यांना सकीना काही सापडली नाही. एक दिवस ते याच कामासाठी त्यांची लॉरी घेऊन चालले असताना त्यांना एक मुलगी दिसली. गाडीचा आवाज ऐकताच ती दचकली व घाबरुन पळू लागली. रझाकारांनी गाडीतून उड्या मारल्या व तिला पकडण्यासाठी ते तिच्या मागे धावले. एका शेतात शेवटी त्यांनी तिला गाठले. खरोखरच एखादी अप्सरा असावी तशी सुंदर होती ती. उजव्या गालावर एक मोठा तिळही होता.
‘‘ घाबरु नकोस ! तुझे नाव सकीना आहे ना ?’’
ते ऐकल्यावर ती चूप झाली. पण सगळ्यांनी तिची समजूत काढल्यावर तिने ती सकीना असल्याचे मान्य केले. त्यांनी तिला खाण्यास, जेवायला दिले, दुध दिले व आपल्या लॉरीत बसवले. बिचारी आपल्या कुडत्याच्या बाह्यांनी आपली लाज झाकताना एका रझाकाराने पाहिले आणि त्याने तिला आपला कोटही पांघरला.
बरेच दिवस झाले,..... सिराजुद्दीनला सकीनाची काहीच बातमी कळत नव्हती. दिवसभर तो कँपमधे व कँपच्या कार्यालयात खेपा घालत असे व खिन्नपणे कुठेतरी बसत असे. नमाजाच्या वेळी रजाकारांना त्यांच्या कामात यश मिळू दे ही प्रार्थना करण्यास बिचारा कधीही विसरला नाही. त्यांनीच सांगितले होते ना ‘की ती जर जिवंत असेल तर निश्चितच मिळेल...’
असेच कँपमधे फिरत असताना एकदा सिराजुद्दीनला ते आठ रझाकर दिसले. त्यांच्या गाडीत बसले होते. हातात बंदुका होत्या. सिराजुद्दीन धावत लॉरीपाशी गेला. लॉरी सुरु होणार तेवढ्यात त्याने केविलवाण्या आवाजात विचारले,
‘‘ बेटे, सकीनाची काही खबरबात ?’’
सगळ्यांनी एका सुरात ग्वाही दिली, ‘‘मिळेल ! मिळेल ! कुठे जाते ती?’’
सिराजुद्दीनने परत एकदा अल्लाकडे त्या रझाकारांसाठी दुवा मागितला. त्यांच्या बोलण्याने त्याच्याही मनावरचे सावट थोडे दूर झाले. त्याचे मन जरा हलके झाले.
एक दिवस संध्याकाळी सिराजुद्दीन असाच उदास बसलेला असताना एकदम गोंधळ उडाला. चार माणसे काहीतरी उचलून आणत होते. चौकशी केल्यावर त्याला कळले की त्यांनी एका मुलीला उचलून आणले आहे. ती रेल्वेच्या रुळांजवळ बेशुद्ध पडलेली सापडली होती म्हणे. सिराजुद्दीन त्या लोकांच्या मागे धावला पण तोपर्यंत त्यांनी तिला कँपमधील दवाखान्यात दाखल केले. गर्दी ओसरेपर्यंत सिराजुद्दीन त्या दवाखान्याबाहेर एका खांबाला टेकून उभा राहिला. मग हळूहळू आत गेला. खोलीत कोणी नव्हते. खाली एका स्ट्रेचरवर एक प्रेत पडले होते. खोलीत तसा अंधारच होता. त्याने त्या स्ट्रेचरच्या दिशेन पावले टाकली आणि त्याच्या नजरेस तिच्या मळलेल्या चेहऱ्यावरचा तिळ पडला. एक ह्रदयद्रावक हाक त्यांच्या तोंडातून निघून गेली,
‘‘ सकीनाऽऽऽ मेरी सकीनाऽऽऽ’’.
तेवढ्यात डॉक्टर आतून बाहेर आले व त्यानी तेथील मिणमिणता दिवा लावला. त्या प्रकाशात तेथील वातावरण अधिकच भेसूर वाटू लागले.
‘‘क्या है ?’’ डॉक्टरने विचारले.
‘‘जीऽऽ जी मी हिचा बाप आहे साहेब’’
डॉक्टरने त्या स्ट्रेचरवर पडलेल्या मुडद्यावर एक नजर टाकली. सिराजुद्दीनची नजर टाळत त्याने खिडकीकडे बोट दाखवून सिराजुद्दीनला सांगितले,
‘‘खोल दो !’’
हे शब्द ऐकताच खाली पडलेल्या स्ट्रेचरवर हालचाल झाली.. प्रेतवत सकीनाने तिच्या निर्जीव हातांनी, यांत्रिकपणे आपल्या सलवारची नाडी सोडली व सलवार खाली सरकवली....
ते पाहताच सिराजुद्दीन आनंदाने किंचाळला, ‘‘ सकीनाऽऽऽऽ सकीना ! माझी बेटी जिवंत आहे..’’
इकडे त्या डॉक्टरच्या मात्र सर्वांगाला घाम फुटला....
क्रमश:
आता तिसरी लिहून ही मालिका संपवेन.
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
25 Aug 2016 - 1:38 pm | यशोधरा
अतिशय अंगावर येणारी, अस्वस्थ करणारी कथा आहे ही...
अनुवादही जबराट जमला आहे!
25 Aug 2016 - 1:45 pm | एस
काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही. फाळणी ही अंगावर काटा आणणारी घटना होती. त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा अंगावर सरसरून काटा उभा राहतो. आपल्यावर अशी वेळ आली तर काय! ह्या प्रश्नाचं मोहोळ घोंगावू लागतं. मन सुन्न होतं...
25 Aug 2016 - 2:04 pm | राजाभाउ
पुर्वी ही कथा वाचली होती, तेंव्हाही असच आत काहीतरी तुटल होत, आणि आत्ता ही तेच झाल, अनुवाद छान जमला आहे.
25 Aug 2016 - 2:09 pm | नाखु
आणि क्लेषदायक वाटते तर ज्यांनी भोगले त्यांना कसे मरणप्राय अनुभवले याचा विचारही करवत नाही.
फाळणी खरेच नक्की कुणासाठी लाभदायी/हितकारक झाली,मला कधीच कळाले नाही.
सुन्न वाचक नाखु
25 Aug 2016 - 5:35 pm | गिड्डे
असे म्हणतात मंटो लवकर मेला ते बरेच झाले खुप वाईट लिहायचा. त्यांच्या भाषेत नागड करुन सोडायचा. त्याच वागणच वेगळ होत म्हणतात लिहीण वेगळ त्याची भाषाही वेगळीच
मिळमिळीत का काय म्हणतात ती नाहीच ....
मंटोच लिखाणच काही वेगळ आहे
मनाला लागुन राहत त्याच लिहिलेल
अस्वस्थ करत
विचार करायला लावणार
इंग्रजी लेखक मोपासाँला आदर्श मानणारा हा अवलिया कधी अमर झाला कळलेच नाही
मी मंटो वाचला जास्त नाही थोडाफार का होइना पण वाचला किती सुंदर लिहितो हा मनुष्य
त्याला सलाम
त्याच्या लेखणीला सलाम
त्याच्या खोल दे ला सलाम
त्याच्या थंडा गोश्त ला सलाम
25 Aug 2016 - 5:40 pm | बोका-ए-आझम
अंगावर काटा येतो. खूपच संयत पण दाहक अनुभव देणारा अनुवाद केला आहे जयंतकाका!
25 Aug 2016 - 5:49 pm | गिड्डे
असे म्हणतात मंटो लवकर मेला ते बरेच झाले खुप वाईट लिहायचा. त्यांच्या भाषेत नागड करुन सोडायचा. त्याच वागणच वेगळ होत म्हणतात लिहीण वेगळ त्याची भाषाही वेगळीच
मिळमिळीत का काय म्हणतात ती नाहीच ....
मंटोच लिखाणच काही वेगळ आहे
मनाला लागुन राहत त्याच लिहिलेल
अस्वस्थ करत
विचार करायला लावणार
इंग्रजी लेखक मोपासाँला आदर्श मानणारा हा अवलिया कधी अमर झाला कळलेच नाही
मी मंटो वाचला जास्त नाही थोडाफार का होइना पण वाचला किती सुंदर लिहितो हा मनुष्य
त्याला सलाम
त्याच्या लेखणीला सलाम
त्याच्या खोल दे ला सलाम
त्याच्या थंडा गोश्त ला सलाम
25 Aug 2016 - 5:49 pm | गिड्डे
असे म्हणतात मंटो लवकर मेला ते बरेच झाले खुप वाईट लिहायचा. त्यांच्या भाषेत नागड करुन सोडायचा. त्याच वागणच वेगळ होत म्हणतात लिहीण वेगळ त्याची भाषाही वेगळीच
मिळमिळीत का काय म्हणतात ती नाहीच ....
मंटोच लिखाणच काही वेगळ आहे
मनाला लागुन राहत त्याच लिहिलेल
अस्वस्थ करत
विचार करायला लावणार
इंग्रजी लेखक मोपासाँला आदर्श मानणारा हा अवलिया कधी अमर झाला कळलेच नाही
मी मंटो वाचला जास्त नाही थोडाफार का होइना पण वाचला किती सुंदर लिहितो हा मनुष्य
त्याला सलाम
त्याच्या लेखणीला सलाम
त्याच्या खोल दे ला सलाम
त्याच्या थंडा गोश्त ला सलाम
25 Aug 2016 - 6:27 pm | सुबोध खरे
भयानक.
अंगावर सरसरून काटा उभा राहतो.
हेच लेखकाचे आणि अनुवादकाचे सामर्थ्य
25 Aug 2016 - 7:22 pm | मी-सौरभ
असेच म्हणतो
25 Aug 2016 - 7:53 pm | मार्मिक गोडसे
अरे बापरे ! गिधाडे
26 Aug 2016 - 11:42 am | अनिरुद्ध.वैद्य
गिधाडेच होती :(
25 Aug 2016 - 7:53 pm | भ ट क्या खे ड वा ला
खरच भयानक.
अनुवाद छान झालाय
25 Aug 2016 - 8:21 pm | पिलीयन रायडर
अनुवाद उत्तमच जमलाय.. अंगावर काटा आलाय.. नक्की काय वाटतंय ते सांगता येत नाही..
25 Aug 2016 - 8:51 pm | जव्हेरगंज
बापरे!!
बेक्कार!
25 Aug 2016 - 9:16 pm | शिवोऽहम्
अनुवाद मस्त जमलाय. मंटोच्या कथेतील ताणतणाव आणि मनाला ओरखडे काढणारी हिंसा अनुवादित करणे हे एक आव्हानच आहे.
'सियाह हासिए' मधल्या अनेक छोट्याशश्या वाटणार्या कथांमधून मंटोची उत्तुंग प्रतिभा दिसून येते. 'आराम की जरूरत', 'बेखबरी का फायदा', 'आखों पर चर्बी', 'ठंडा गोश्त' यांचेही भाषांतर वाचायला आवडेल.
25 Aug 2016 - 9:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी मंटो वाचायला घाबरतो, किंबहुना मी मंटो वाचतच नाही, आयुष्यायात एकदाच खोल दो वाचली होती, नंतर दिवसभर भडभडून येत राहिलं, अगदी खाल्लेलं पोटात टिकेना असली स्थिती आली होती, तरीही मी मस्ती करत राहिलो, मंटो पासून तोंड लपवून बाहेर पडलो अन पुढे हेन्री रेने गाय द मोपासां वाचायला घेतला, त्याची बुल दे सुफ अनुवादित केली कॅसेट तीच लय तीच अन अंगभर काटा तोच असली गत झाली, परत एकदा अस्वस्थ रात्री, दचकून उठणे , उदासवाणं वाटणे सुरु झाले, तेव्हा पासून मी मंटो वाचत नाही अन मोपासां सुद्धा वाचत नाही :'(
26 Aug 2016 - 11:11 am | गणामास्तर
असंच काहीसं मला वाटतं जेव्हा मी मंटो वाचतो किंवा काही ठराविक गाणी ऐकतो. आज सकाळ सकाळी कुठून तरी गुलाल
मधले 'ओ री दुनिया' कानावर पडले आणि नेहमीप्रमाणेचं रुतून बसले. साला ब्येक्कार जाणार दिवस आजचा.
26 Aug 2016 - 12:07 am | मृत्युन्जय
मंटो तर गिफ्टेड होताच पण जयंत कुल्कर्णी काकां नी केलेला अनुवाद देखील भन्नाट. अन्गावर काटा आला
28 Aug 2016 - 11:00 am | संदीप डांगे
+१०००
9 Sep 2016 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंटोच्या कथा अनेकदा वाचल्या आहेत. जयंत कुलकर्णी यांचाही अनुवादही भन्नाट.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 12:27 am | अ.वि
+११११
26 Aug 2016 - 10:53 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
26 Aug 2016 - 11:07 am | अनिरुद्ध.वैद्य
ह्याचा अंदाज येत होताच. कथा अन वर्णन बोचकारणारं. कसे लोकं जगले अन ह्यातुन निभाउन नेले अंदाज लावणेही कठीण.
सुन्न करणारे कथानक अन अनुवाद!
26 Aug 2016 - 11:35 am | अभ्या..
बेकार हाय हे. झेपत नाही वाचायला. :(
26 Aug 2016 - 3:57 pm | स्मिता चौगुले
बापरे!!
28 Aug 2016 - 10:43 am | रातराणी
:(
29 Aug 2016 - 3:25 pm | वरुण मोहिते
आता पुढची कथा हि लवकर येऊ द्यात
7 Sep 2016 - 12:09 pm | पैसा
:( का वाचलं मी हे!
7 Sep 2016 - 1:53 pm | रघुनाथ.केरकर
झेपत नाही वाचायला. भाग मिल्खा भाग मधल्या रेफुजी कँप ची आठवण आली.
9 Sep 2016 - 10:05 am | पथिक
आधी वाचलेली आहे पण अनुवाद फार सुंदर केलाय. कुणीतरी म्हंटल तसंच 'आत काहीतरी तुटलं' परत...
फाळणी, तो आणि त्याच्या आसपासचा काळ, ते लोक, हिंदू मुसलमान सगळे.. त्यांची राहणी, सुखदुःख, ई बद्दल वाचायला फार आवडतं मला. इतका काळ मध्ये जाऊनही फार जवळचे वाटतात ते सगळे लोक.
27 Sep 2016 - 4:15 pm | नरेश माने
एकदम सुन्न करणारे लिखाण. मोजकेच शब्द पण त्या प्रसंगाची दाहकता आणि वास्तव थेट आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. फाळणीच्या त्या कटू प्र॑संगी कित्येक अभागी लोकांना या प्रसंगातून जावे लागले असेल आणि त्यांची काय अवस्था झाली असेल हा विचार जरी केला तरी अंगावर काटे उभे राहतात.
28 Sep 2016 - 7:34 am | कानडाऊ योगेशु
सुन्न करणारी कथा आणि अनुवादही उत्तम झाला आहे.
29 Sep 2016 - 2:55 am | साहना
मनाला फार मोठी जखम करून जाणारी कथा आहे.