या अगोदरचे भाग :
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
-----------------------------------------------
आज लवकरच उठलो. उठलो म्हणावं तर झोप तरी नीट लागली होती का ? नाहीच म्हणायला पाहिजे.
लवकर लवकर आवरुन घराबाहेर पडलो. आई बाबांना रात्रीच सांगीतलं होतं की सकाळी लवकर जाणार आहे आणि २-३ दिवस बाहेरच रहावे लागेल म्हणून.
रिक्शा पकडून एसटी स्टँडवर पोहोचलो. कँटीनमधे एक चहा मागवून निवांत गाडीची वाट बघत बसायचं ठरवलं तोच गाडी फलाटाला लागली देखील. घाईघाई चहा संपवून एसटीत शिरलो आणि मागचे सीट पकडले. मागच्या सीटवर कसं निवांत वाटतं. हा आता अधून मधून 'उचलून आपाटलं" गाण्याची याद येते हा भाग अलहिदा ! आता मस्त झोप काढायची. माझं हे एक बरं आहे. घरी झोप लागली नाही तरी अगदी रिक्षा, एस्टी ते विमान, कोणत्याही वाहनात झोपू शकण्याचे वरदानच लाभले आहे मला. मस्त ताणून दिली ते डायरेक्ट वडगावंचा स्टँड आल्यावरच उठलो. आळस झटकून खाली उतरलो तर आजचं वडगांव एकदम औरच भासलं मला. नेहमी वर्दीत बघत असलेल्या पोलीसाला किंवा सैनिकाला लग्नाच्या पोशाखात बघीतलं तर कसं वाटेल ? अगदी तस्सचं ! आज यात्रेच्या निमित्तानं गावानं कात टाकली होती. जो तो नव्या कपड्यांत दिसत होता. बायका-पोरींच्या कपड्यांच्या रंगात विविधता मात्र पुरुष एकजात सफेद नाहीतर आकाशी निळ्या कपड्यांत. सफेद, पांढरा, शुभ्र सगळ्या प्रकारचे रंग ! कोणी धोतरात, कोणी झब्बा लेंगा तर कोणी शर्ट पॅन्ट घालून असलेले. तर काही जण निळा शर्ट आणि खाकी पॅन्ट. बहुतेक बीपीटी वाले. (बीपीटी म्हणजे बेवडा पिऊन टाईट की बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, कोणता अर्थ जास्त जवळचा कोणास ठाऊक).
तर पहिलं काम होत ते आण्णासाहेबांना जाऊन भेटायचं. त्याप्रमाणे पहिलं ग्रामपंचायतीत गेलो. मागच्या वेळेस भेटलेलं टोळकं काही आज दिसलं नाही आणि सरपंच देखील दिसले नाहित. मग वाटेत एक दोघांना विचारलं तर कळालं की सगळी मंडळी सकाळीच खंडोबाच्या मंदिराकडे गेलेली. मंदिराकडे पोहोचलो तर ही गर्दी. मात्र अण्णासाहेबांना शोधायला फार कष्ट पडले नाहीत. जाऊन वाकून नमस्कार केला तसे अण्णा खुश झाले. पाठीवर थाप मारली आणी म्हणाले , " पाहुण्यानी दिलेला शबुद पाळला म्हणायचा ! चला, काम करता करताच बोलू". तास दोन तास त्यांच्या मागून हिंडत राहिलो पण अण्णा याला त्याला सुचना देण्यातच मग्न. मग मीच म्हणालो अण्णा, तुम्ही जास्त कामात आहात. मी तुम्हाला नंतरच भेटतो तर कसलं काय ? ते मला त्यांच्या मागून यायचा इशारा करतच राहिले. कोणी माझ्याबद्द्ल विचारले तर आपल्याच गावचा आहे असे सांगत होते.
दुपारी अण्णांच्या हस्ते मल्हारीची साग्रसंगीत पुजा झाली. चहुदिशांना भंडारा उधळून माहोल पिवळाजर्द झाला होता. पुरणपोळीचा नैवेद्य झाला. बाहेर लोकांनी बकरे पाडले होते त्याचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर पाच - दहा मुसलमान मंडळी आली आणी पाया पडून गेली. मला मोठे आश्चर्य वाटले तेव्हा अण्णा म्हणाले की यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हे लोक खंडोबाला मल्लू पीर नावाने पुजतात.
दिवसभराचा कार्यक्रम झाल्यावर रात्री एका घरी नवदांपत्याच्या लग्नानिमित्त जागरण गोंधळ होता तिकडे ही अण्णांबरोबर जावेच लागले. पहाटे पहाटे लंगर तुटल्यावर आम्ही परत फिरलो. मी अण्णांना म्हणालो की मला ग्रामपंचायतीच्या ऑफीसात थोडा वेळ झोपू द्या तर ते रागावले. आम्ही मेलोय का म्हणाले. मग मी माघार घेत त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेलो. दिवस आणि रात्र सतत जागरणामुळे लगेच डोळा लागला तर थेट दुपारीच जाग आली. ओशाळून उठून बसलो तर अण्णा दिसेनात. घरात चौकशी केली तर अण्णा सकाळीच उठून मंदिराकडे बाकीचे राहिलेले कार्य आटोपण्यासाठी निघून गेलेले. मी उठून प्रातर्विधी आणि जेवण खावण उरकून मोकळा होतो न होतो तोच अण्णा आणि सोबत पाच-दहा मंडळी मोठमोठयाने बोलत , गप्पा मारत परत घरात आले. आल्याआल्याच अण्णांनी माझी चौकशी केली. मी ओशाळून माफी मागीतली पण त्यांनी त्याची काही गरज नाही असे सांगून मला गप्प केले.
मंडळींच्या बरोबर परत एकदा चहा पाणी झाला. काही मंडळी वर्गणीपुस्तकाचा हिशेब करत होते. मी अण्ण्णांना म्हणालो की प्रत्येक उंबर्यामागे काय रक्कम काढली ? तर अण्णा म्हणाले २५१ रुपये. मी खिशात हात घालून ५००० च्या नोटा आणि १ रुपया बाहेर काढून अण्णांच्या हाती सोपविल्या. अण्णा एकदम आश्चर्यचकीत झाले. बाकीही बर्याच मंडळींनी आ वासला. तसे मी म्हणालो की मी बरेच वर्ष कोणत्याही देवस्थानात कधीही पावती फाडलेली नाही. आता मी इथे राहत असतो तर १०-१५ वर्षात एवढी रक्कम नक्कीच खर्च केली असती. त्यामुळे तुम्ही संकोच न बाळगता याचा स्वीकार करा.
अण्णा काही बोलायच्या आतच बाकीच्या मंडळींनी रक्कम स्वीकारण्यासाठी होकार दिला. अण्णांनी जराशा संकोचानेच ती रक्कम स्वीकारली.
थोड्या वेळाने हिशेब ठिशेब करुन बरीचशी मंडळी परत गेली. मात्र एक दोघांना अण्णांनी थांबवून घेतले. ती माणसे नक्कीच अण्णांच्या विश्वासातील दिसत होती. अण्णांनी मला सांगीतले की आम्ही जुने बाड तपासले पण नक्की कोणती जन्म नोंद तुमची ह्ये काही कळलं न्हायी. इथं गावात पायलीच्या पन्नास दत्तू पंढरी आणी सतराशे साठ लक्ष्म्या हायेत. ज्याच्या घरी खायचं फाकं हायेत त्यांच्या घरात बी लक्ष्म्या हायेत. तव्हा तुमचा प्रश्न जरा औघडंज झालाय. तुम्ही तुमच्या पणज्याचे / पणजीचे नाव सांगीतले असतं तर काम थोडं सोप्प झालं आस्तं. मी मनातुन थोडा दु:खी झालो मात्र माघार घेतली नाही. असे होणार हे मला अगोदरच माहिती होते. कारण ज्या गावात मी जन्मलोच नाही तिथे माझी नोंद कशी काय मिळणार होती ? मात्र ज्या देशात पंतप्रधानाचे नाव गरीबांच्या रेशनकार्डावर असु शकते तिथे काहीच चमत्कार अशक्य नव्हते.
मी कसनुसं हसलो आणि म्हणालो, "आईला पहिलाच सगळा कुलवृत्तांत विचारायला पाहिजे होता पण पोटामागे धावतांना ते राहूनच गेलं बघा. काही हरकत नाही. कागदांवर नोंद नसली तरी माझं मन मला सांगतय की हेच माझ गावं आहे. त्याशिवाय मला इथं सारखं सारखं यावसं वाटल नसतं"
यावर अण्णा थोडे विचारमग्न झाले, त्यांनी त्या दोघांना बाजूला कोपर्यात घेऊन थोडी चर्चा केली. मला थांबायला सांगून एकाला ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पिटाळले. येताना त्यातला एकजण एक कागद घेऊन आला होता. अण्णांनी तो मला दिला. तो बघून माझ्या डोळ्यात अश्रूच उभे राहिले. तो चक्क वडगांव गावच्या वास्तव्याचा दाखला होता.
मी गलबलून गेलो आणी अण्णांच्या पायाशी वाकलो. का ? माझे फासे बरोबर पडले म्हणून की मी एका भल्या माणसाला फसविले आणि त्यांच्या डोळ्यात बघायची हिंमत नाही म्हणून ?? कोणास ठाऊक ?
रविवारी संध्याकाळी परत येणारी एस्टी नव्हती म्हणून मी पुन्हा एकदा रात्री मुक्काम केला आणि सकाळची गाडी पकडून परत आलो. आता माझ्याकडे माझी नवी ओळख होती. भाऊसाहेब दत्तू पाटील.
-----------------------------------------------
टीप : वाचकांना प्रश्न पडेल की ही कोणत्या काळातली गोष्ट आहे ? संगणक युगात अशा गोष्टी शक्य आहेत टीकाय ? तर याचे उत्तर आहे होय. ही घटना वायटुकेच्या म्हणजे सन १९९५-२००० च्या काळातली आहे. तेव्हा भारतात संगणक तर होते मात्र सरकारी सेवांच पुर्णत: संगणकीकरण झालेले नव्हते.
प्रतिक्रिया
16 Aug 2016 - 2:25 pm | अभ्या..
ये कुछ तो चीझ है यार.
लागतीय संगती आता.
मस्त आहे प्लान. आने दो.
16 Aug 2016 - 7:25 pm | राजाभाउ
काय कळला ब्वा प्लान तुला.
17 Aug 2016 - 4:33 pm | अभ्या..
सिक्रेट आहे तो प्लान. लिहितील की त्यांचे ते.
मी तरी स्वतः कुठे खरा अभ्या आहे? ;)
16 Aug 2016 - 3:33 pm | एस
वाचतोय.
16 Aug 2016 - 3:57 pm | nanaba
u mean, this is a true story? :O
16 Aug 2016 - 6:48 pm | जगप्रवासी
सगळे भाग एकत्र वाचून काढले मज्जा आली वाचताना
16 Aug 2016 - 6:52 pm | किंबहुना
चांगले चाल्लेय.. वाचतोय.
16 Aug 2016 - 7:24 pm | राजाभाउ
मस्त !!! ३ वर्षांनी आले परत, पण आता जोरात पुढचे भाग टाकताय , आता परत गायब हु नका. भाउसोचा काय प्लान आहे ते वाचण्यास उच्छुक
पभाप्र.
17 Aug 2016 - 4:10 pm | gogglya