आता तसं बघीतलं तर माझे आयुष्यातला सेकंड लाईफ हा भाग एखाद्या हिंदी थ्रीलर पे़क्षा मुळीच कमी नाही. पण चित्रपटात २.३०-३.०० तासांत वेगवान घडामोडी घडतात त्याच वेगाने खरोखरीच्या आयुष्यात घडत नाहित.
सेकंड लाईफच्या विश्वात जाण्याअगोदर मी तुम्हाला माझ्या फर्स्ट लाईफच्या फ्लॅशबॅकमधे घेऊन जाणार आहे.
मी पहिल्यापासूनच थोडासा अबोल, सहजासहजी माणसांत न मिसळणारा आहे. थोडासा रिझर्वच म्हणाना ! कायम पुस्तकात डोकं खुपसलेला, मैदानी खेळांची आवड नसलेला, त्यापे़क्षा कुवत नसलेला असा एक मुखदुर्बळ आणि किडकिडीत शरीरयष्टीचा एक सर्वसाधारण मुलगा. आपल्या आजुबाजूला अशी अनेक मुलं , माणसं असतात ज्यांची क्वचितच दखल घेतली जाते. तस्साच होतो मी ! अर्थात कधी कधी अशा गोष्टीदेखील पथ्यावरच पडतात म्हणा ! अभ्यासात बर्यापैकी गती होती. अगदीच हुशार नसलो तरी पहिल्या १०-१५ मधे स्थान राखून होतो. शाळेच्या शेवटच्या वर्षांत म्हणजे साधारण ८वी ते १० वी या काळात आपल्या आजुबाजुला वावरणार्या पोरींचे अस्तित्व ध्यानात यायला लागले होते. म्हणजे या ही आधी त्या आजुबाजूला होत्याच पण त्यांच्याशी बोलावे, त्यांची दखल घ्यावी असे वाटत नसे किंवा त्याकाळी तशी प्रथाही नव्हती. मात्र नंतर नंतर त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं. हे काहितरी वेगळं प्रकरण आहे हे जाणवू लागलं. जी मुलं-मुली धीट होते (आमच्या तेव्हाच्या भाषेत 'चालू:) ते मात्र बिनधास्त एकमेकांशी बोलत, एकमेकांना चोरटे स्पर्श करीत. अशा मुलामुलींना जरी चालू म्हटल गेलं तरी मनातल्या मनात ते मला हिंदी सिनेमाच्या हिरो-हिरॉईनपे़क्षा कमी वाटत नसत. मात्र असे वागणे आपल्याला कधीच जमणार नाही हे देखील पक्के ठाऊक होते.
एकतर मी पडलो ध्यान. कोणाशी तोंड उघडून बोलायची ताकत नाही. एवढे करुनही गाडी पुढे सरकलीच तरी जनाची आणि मनाची लाज, भीड प्रचंड. एकवेळ मनाला समजावता येईल पण जनाला कोण समजविणार ? त्यात चाळीतले घर म्हणजे नो प्रायव्हसी. घरातल्या गोष्टी घरात माहित व्हायच्या अगोदर शेजार्यांना माहित व्हायच्या.
मात्र मनातल्या मनात मांडे खायला काय हरकत होती ? (खयाली पुलाव मी तेव्हाही खात नव्हतो कारण तो स्वप्नात देखील परवडेल की नाही याची शंकाच होती.) आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की माझ्या सेकंड लाईफची बीजे याच काळात मनात नकळत पेरली गेली असण्याची शक्यता आहे.
यथावकाश १० वी उत्तीर्ण होऊन कॉलेजमधे प्रवेश घेतला. तिथे तर अजूनच बावचळलेपणा अजूनच वाढला. ते जगचं वेगळं होतं. माझ्यासारख्या चाळ सिस्टीम मधून आलेल्या, मराठी माध्यमातल्या मुलांची गाठ आता हाय क्लास, इंग्रजी माध्यमातून शि़कून आलेल्या स्मार्ट मुलामुलींशी होती. जेव्हा कॉलेजने इंग्रजी माध्यमातून आलेल्या मुलांना "अ" तुकडी व मराठी व इतर माध्यमातून "ब" तुकडीत अशी विभागणी केली तेव्हा कुठे जीवात जीव आला. "अ" वाले "नेहमीच ब" वाल्यांना पाल, झुरळ बघीतल्यासारखे लूक द्यायचे.
एक मात्र खरे की शाळा आणि ज्युनियर कॉलेजसाठी गणवेश असावा असा नियम ज्या कोणी केला असेल त्याला मानलेच पाहिजे. त्याने अनेक मुलांना अगदी लहान वयात "देवदास" होण्यापासून वाचविले आहे हे नक्की. अर्थात बियाँड द युनिफॉर्म बघू शकणार्यांची संख्या अगदीच कमी नव्हती. अशा थोर व्यक्ती दिसण्यावर (कपडयांच्या) जायच्या नाहित.
गणवेशात असलेल्या पोरींना गणवेशात नसल्यावर बघीतल्यावर मला तर त्या पटकन ओळखायलाच यायच्या नाहित. शाळेत अगदीच "ही" दिसणार्या पोरी साध्या कपडयांत एकदम "वॉव" दिसायच्या.
तर अगदी हे ही दिवस संपले आणि नोकरी, लग्न आणि मुलं अशी ठराविक आणि क्रमबद्ध स्टेशनं घेत आमची गाडी मार्गस्थ झाली. बरोबरीच्या मुलामुलींची देखील काही फारशी वेगळी अवस्था नव्हती. हा ! काहीजणांची स्टेशन क्रमवार नव्हती मात्र हे फार थोडया जणांच्या बाबतीत. हा सगळा जीवनप्रवास करतांना तो सेकंड लाईफ चा किडा मात्र वळवळतच होता. जेव्हा आयुष्याला स्थैर्य आलं तेव्हा मी ह्यावर जरा कल्पनेवर जरा जास्तच विचार करु लागलो. मला ही कल्पना ह्याच जन्मात प्रत्यक्षात उतरवयाची होती. जरी मी एक हिंदू आहे आणि माझा पुर्नःजन्मावर विश्वास आहे तरी आजचे काम उदयावर ढकलण्याची माझी तयारी नव्हती. तुमची सेकंड लाईफची काय कल्पना आहे ते मला माहित नाही मात्र मला काय हवे आहे ते मला संपूर्णपणे माहित होते. आता मी जसं जगतोय त्यापेक्षा वेगळे, रोमांचकारक किंवा अदभूत जीवन मला नको होते. म्हणजे मी आता पोलीस आहे तर सेकंड लाईफमधे मला चोर व्हायचे नव्ह्ते. पण मला अजून एक व्यक्ती व्हायचे होते. अर्थात तुम्ही याला पॅरलल लाईफ देखील म्हणू शकता पण मी ही दोन्ही आयुष्ये एकदम जगू शकणार नव्हतो. हिंदी चित्रपटात जसा पुर्वी डबल रोल असायचा (म्हणजे राम आला की शाम गायब आणि शाम आला की राम गायब) तसेच काहितरी करणे भाग होते.
जवळजवळ वर्षभर विचार केल्यावर, विविध पर्यायांचा विचार केल्यावर मला शेवटी ही कल्पना सुचली. अनेक वेळा विचार केल्यावर, तिच्यातील अडचणींवर विचार केल्यावर मी ती अंमलात आणायचे ठरविले. या नव्या आयुष्यासाठी आता मला सर्वप्रथम ह्वे होते एक नाव. एक आयडेंटीटी. त्यावरही मी खुप विचार केला आणि नवे नाव घेतले
"भाऊसाहेब दत्तू पाटील"
आता हेच नाव का घेतले ? सांगतो. मला माझी नवीन आयडेंटिटी हवी होती. मी हिंदू आणि मराठी भाषक असल्यामुळे मुसलमान, ख्रिश्चन बनने शक्य नव्हते. थोडया वेळासाठी सोंग वठवायचे असेल तर गोष्ट वेगळी पण मला आयुष्यातली काही वर्षे या रुपात काढायची होती. मला हे माहित होते की कदाचित माझे सेकंड लाईफ थरारक नसेल मात्र त्या रस्त्यावर चालतांनाचा प्रवास नक्कीच थरारक असणार होता.
क्रमशः
-------------------------------------------
सेकंड लाईफ - भाग पहिला
प्रतिक्रिया
16 May 2013 - 1:50 pm | चाणक्य
उत्कंठा वाढवु रहायले भाऊ तुम्ही
16 May 2013 - 1:58 pm | कपिलमुनी
स्प्लिट पर्सनॅलिटीची कथा वाटतेय ..
वर्णन छान आलय
16 May 2013 - 1:59 pm | मन१
पण मूळ ष्टोरी सुरु होउ द्यात की लवकर.
16 May 2013 - 2:00 pm | सुधीर
पुढील भागची प्रतिक्षा.
16 May 2013 - 4:25 pm | चित्रगुप्त
प्रतिक्षा पुढल्या भागाची.
16 May 2013 - 4:39 pm | मनराव
वाचतो आहे.......
16 May 2013 - 4:52 pm | स्पंदना
भाऊसाहेब दत्तु पाटिल, तो मी नव्हेच बिव्हेच नव्हे ना?
सेकंड लाएफ मध्ये तुम्ही काय करणार या विचाराने अगदी हैराण केलय मला.
16 May 2013 - 5:38 pm | आदूबाळ
हरून अल रशीद टैप :)
16 May 2013 - 7:43 pm | चित्रगुप्त
जीएंचा बळवंत मास्तर ?
16 May 2013 - 7:58 pm | आतिवास
उत्कंठा वाढली आहे.
16 May 2013 - 8:06 pm | लाल टोपी
चांगली आहे. उत्कंठाही वाढली आहे. पु.भा.प्र.
17 May 2013 - 1:54 am | खटपट्या
प्रत्येक भागामध्ये पूर्वीच्या भागाची लिन्क द्या !
17 May 2013 - 10:17 am | पैसा
येऊ द्या अजून!
17 May 2013 - 10:36 am | कोमल
पुभाप्र
18 May 2013 - 11:30 am | पिवळा डांबिस
पहिला भाग वाचनीय झाला होता.
पण दुसर्या भागात उगाच कैच्या कै मजकूर टाकून नमनाला घडाभर तेल घातल्यासारखं वाटतंय...
दुसरा भाग बकवास वाटला.
ते असो.
तिसरा भाग वाचनीय असेल अशी अपेक्षा!!!