सेकंड लाईफ

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
15 May 2013 - 8:20 pm

नमस्कार ! मी योगेश.
ही कथा आहे माझ्या सेकंड लाईफ ची. लहानपणापासूनच मला वाचनाची फार आवड. इतकी मी ठरवूनच टाकले की मोठे झाल्यावर आपण पेपरस्टॉलच टाकायचा. का ? तर धंद्यापरीस धंदा होईल आणि सगळे पेपर, मासिके, दिवाळी अंक फुकटात वाचता येतील. मराठी लेखक वाचता वाचता नंतर कंटाळा येऊ लागला. पुढे पुढे तर मला इंग्रजीतुन मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्‍याच आवडू लागल्या. त्यातल्या त्यात गुप्तहेरांच्या रहस्यमय कथांनी तर माझ्या मानाची पुरतीच पकड घेतली. त्यातील हेरांचे दुहेरी जगणे मला हळुहळू आवडू लागले. नाहितरी प्रत्येकजण काही प्रमाणात दुहेरी आयुष्य जगतच असतो नाही का ?

तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला कधी ना कधी नक्कीच असे वाटते की आपण आहोत त्यापेक्षा कुणीतरी वेगळे असतो तर मजा आली असती. निदानपक्षी बरे तरी वाटले असते. जसजसे माझे वाचन वाढू लागले तसतशी मला दुहेरी जगण्याची प्रबळ इच्छा निर्माण होऊ लागली. बर्‍याच विचाराअंती मी हा निर्णय प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले.
मात्र मला माझ्या सेकंड लाईफबद्दल सांगण्याअगोदर माझ्या फर्स्ट लाईफबद्दल सांगीतलेच पाहिजे तरच तुम्हाला अंदाज येईल की या दोन्ही लाईफ्स मधला थरार किती रोमांचक असेल.

मी जन्मलो, वाढलो आणी शिकलो मुंबईतच. मुंबईत आता बेदखलपात्र असलेल्या चाळ सिस्टम (संस्कृती नाही बरं !) मधे एका १२ बाय २० च्या खोलीत आई, बाप, आणि आम्ही ३ भावंडे लहानाची मोठी झालो. चाळीत राहण्याचा मला फार त्रास झाला नाही मात्र जे मित्र फ्लॅट्मधे राहायचे त्यांना घरी आणायची लाज वाटायची आणी चाळीतच आजुबाजुला राहणार्‍या पोरींसमोर संडासचे डबडे घेऊन लायनीत उभे राहणे नकोसे वाटायचे. त्या पोरी जर माझ्याच शाळेतल्याच असतील तर जास्तच. अर्थात आपल्यासारखा विचार करणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला असतातच. पोरींना देखील असेच काहितरी वाटत असणार त्यामुळे त्या शक्यतो रात्रीच्या अंधारातच हा कार्यक्रम उरकायच्या.

तुम्ही जर चाळीत राहिले असाल तर तुम्हाल मी काय म्हणतोय ते नक्कीच कळेल. संडास, मोरी, डबडे, टमरेल, गटार, उसनं-पासनं, चांभारचौकशा हे खास चाळीतले शब्द आहेत नव्हे चाळीचे व्ययछेदक लक्षण आहे.
तुम्हाला ठराविक लोकलला ठराविक डब्ब्यात ठराविक वेळेला जशी ठराविक मंडळी दिसतात तस्साच माहोल इथे असायचा. रो़ज लायनीत ठराविक मंडळी ठराविक वेळेला दिसायचीच. जर चुकून एखादा नवा मेंबर दिसला की आश्चर्य देखील वाटायचे. आपल्याआधी आत जाऊन आलेल्या व्यक्तीने रात्री काय खाल्ले असले पाहिजे रादर काय पिले असले पाहिजे याचा अंदाज आत गेल्या गेल्याच लागायचा. ( वासाने हो ! ) मग अशा सुवासिक मंडळींना टाळण्यासाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न करावा लागे मात्र ते सहजासहजी शक्य नसे. असो.

तर शिक्षण पूर्ण केल्यावर मी नाना धंदे (ज्यात नीट कमाई नाही आणी कष्ट जास्त ते धंदे : इति आमच्या माताजी) करुन पाहिले. पेपर टाकले, गाडया पुसल्या, टाईपिंग केली, प्रिंटींगची कामे केली आणि शेवटी आय.टी. हार्डवेअर मधे येऊन बुड टेकलय. आता ते इथे किती दिवस टिकतयं ते पाहायचं !

आता समाज्याच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न झालयं, बायको आहे, एक गोड मुलगा आहे. मुझको भी तो लिफ्ट करा दे अशी आरती दररोज देवाकडे केल्यामुळे चाळीतून फ्लॅट्मधे शिफ्ट झालोय. मात्र हा सेकंड लाईफ चा किडा अजुनही मनात वळवळतोय. तर अशा चारचौघांसारख्या लाईफ मधून मी एन्ट्री घेतोय सेकंड लाईफ मधे. मात्र हिंदी चित्रपटात हिरो जसा एकाचवेळी डब्बल रोल करतो तसाच.............

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

15 May 2013 - 9:19 pm | अर्धवटराव

पु.भा.प्र.

अवांतरः
>>आई, बाप, आणि आम्ही ३ भावंडे लहानाची मोठी झालो.
-- आई, बाप आपल्या हिरोच्या सोबतच लहानाचे मोठे झाले... सेकण्ड लाईफमागची हिच मुख्य प्रेरणा काय ??

अर्धवटराव

खटपट्या's picture

16 May 2013 - 3:29 am | खटपट्या

सर्वप्रथम नवीन फ्लॅट मध्ये शीफ्ट झाल्याबद्द्ल मनापासून अभिनन्द्न ! माझाही प्रवास असाच काहीसा झाला आहे. मला सेकन्ड लाईफ असे काही वाटत नाही. जीवनशैली बदलली असे बोलू शकतो. जीवनशैली प्रमाणे खर्चही वाढला असणारच. शक्यतो आई वडीलाना बरोबर घेवुन जा. आपल्या कमाईने घेतलेल्या घरात आईवडीलाना घेवुन जाण्याचा आनन्द काही औरच. काहीही झाले तरी जूने दीवस वीसरू नका. जुन्या मीत्रान्च्या शेजारान्च्या सम्पर्कात रहा. शक्यतो जुन्या ठीकाणी राहात असताना जेवढा खर्च होत होता तेवढ्याच खर्चात घर चालवण्याचा प्रयत्न करा.(हे थोडे कठीण आहे पण असे केल्याने बचत करू शकाल - स्वानुभव)
पु.भा.प्र.

अस्वस्थामा's picture

16 May 2013 - 4:24 am | अस्वस्थामा

आधी आमाला वाटले तुम्ही या सेकन्ड लाईफ गेम बद्दल बोलताय की काय..
बाकी अभिनन्दन आणि शुभेछा..!

शिल्पा ब's picture

16 May 2013 - 5:22 am | शिल्पा ब

छोटासा भाग छान झालाय.

चाणक्य's picture

16 May 2013 - 7:18 am | चाणक्य

काय असावं बर तुमचं हे सेकंड लाईफ...? लवकर टाका पुढचा भाग

सुनील's picture

16 May 2013 - 8:31 am | सुनील

चुकून "सेकंड वाईफ" असे वाचले आणि मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला.

असो, लेख आवडला.

स्पंदना's picture

16 May 2013 - 9:07 am | स्पंदना

मस्त सुरुवात.
मिपावर स्वागत. लिहीत रहा, मिपा आपलच आहे.

काहीही झाले तरी जुने दिवस विसरू नका. जुन्या मित्रान्च्या शेजारान्च्या सम्पर्कात रहा. शक्यतो जुन्या ठीकाणी राहात असताना जेवढा खर्च होत होता तेवढ्याच खर्चात घर चालवण्याचा प्रयत्न करा.(हे थोडे कठीण आहे पण असे केल्याने बचत करू शकाल - स्वानुभव)>>>>+१

तुमचा अभिषेक's picture

16 May 2013 - 10:26 am | तुमचा अभिषेक

येऊद्य पुढचाही भाग... वाचतोय.. माझे ही बालपण चाळीतीलच..

इनिगोय's picture

16 May 2013 - 10:34 am | इनिगोय

वाचतेय.

ही काल्पनिक कथा आहे ना? वरचे काही प्रतिसाद वाचून गोंधळ होतोय.

येक्जॅक्ट्ली हाच्च प्रश्न मला पडला.

मला वाटतंय की ही कथा आहे. चाळीची वर्णनं अर्थातच स्वानुभवातून आली असावीत. आता पुढच्या भागात "हार्डवेअरच्या व्यवसायात असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात थरार कसा उत्पन्न झाला" अशी कथा असावी.

ते असो. मस्त लिहिलंय. पुभाप्र!

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 10:47 am | प्रभाकर पेठकर

हा भाग छोटा आणि प्रातर्विधीच्या अनावश्यक तपशिलाने भरलेला वाटला.
चाळीतल्या जीवनाचे सर्वांगी वर्णन यायला हवे होते. अर्थात, पुढील भागात कथानक/अनुभवकथन कसे पुढे सरकते ह्यावर त्याचे महत्त्व अवलंबून असेल.

पुढील भाग लवकर येऊ द्यात.

मन१'s picture

16 May 2013 - 11:21 am | मन१

मस्त एन्ट्री मारताय.
वेल्कम.

महेश नामजोशि's picture

16 May 2013 - 11:32 am | महेश नामजोशि

मीही जवळजवळ अर्धे आयुष्य चाळीतच काढले. मी तेव्हा खोपोलीला राहात होतो. सार्वजनिक संडासची आठवण आहे. तेच दादा कोंडकेंनी सिनेमात मस्त दाखवले होते. घाई लागली असतांना नेमके कोणीतरी पटकन जाते. तेथेच गप्पाही रंगत. मला आठवते लहान मुलांच्या पण अशाच गटारीवर गप्पा रंगत. असो, पण या आठवणी सोडल्या तरी बर्याच चांगल्या आठवणीही कायम घर करून आहेत. सर्व सण चाळीत मिळून साजरे होत. अगदी गणपती पासून ते होळी, रंगपंचमी, संक्रांत, त्याआधी भोगीची खिचडी व्हायची. सगळयाकरिता मिटिंग व्हायची, दरवेळी कुणा एकाकडे, मग चहापाणी, गप्पा . इतकी खूप मजा यायची. आता सर्व लोक बहुतेक इकडे तिकडे पांगले. कुणी ब्लॉकमध्ये, कुणी बंगल्यामध्येही राहायला गेले. पण एकत्र भेटले कि सगळ्यांचे हेच म्हणणे असते कि जी मजा चाळीत यायची ती आता यॆत नाहि. तो खरोखर सुवर्णकाळ होता. एकमेकांच्या सुखादुख्खात सर्व सामील होत. कठीण प्रसंगातही सर्व मिळून एकजुटीने राहात. माझ्या मुलीही कुणाहीकडे जेवत होत्या. कोणी नसले तरी चिंता नव्हती.

bharti chandanshive१'s picture

16 May 2013 - 3:26 pm | bharti chandanshive१

लेख आवडला.

पैसा's picture

17 May 2013 - 10:09 am | पैसा

कथा रंगणार असे वाटत आहे! आणखी येऊ द्या!