एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.
निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच. आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे बघू. दिल्ली देशाची राजधानी. इथे देशातील सर्वात चांगली चिकित्सा सुविधा जनतेला उपलब्ध आहे, असा भ्रम देशातील अन्य राज्यांच्या लोकांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पण इथली परिस्थिती हि देशातील इतर शहरांसारखीच आहे.
मी उत्तम नगर इथे राहतो. या भागात राहणारे अधिकांश लोक छोटा-मोटा रोजगार करतात किंवा फेक्ट्रीत काम करून महिन्याचे ८-१० हजार रुपये किंवा दिवसाचे २००-३०० रुपये कमवितात. आता कल्पना करा हा सामान्य माणूस आजारी पडला. जवळपास असलेल्या सरकारी स्वास्थ्य केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये गेला. काय होईल. हॉस्पिटलमध्ये लोकांची भारी भीड. ३-४ तासांनी डॉक्टर त्याला पाहणार. नंतर औषधांच्या लाईनीत १-२ तास त्याला उभे राहावे लागणार. काही औषधी मिळतील. काही मिळणार नाही. औषधींचा दर्ज्याबाबत काही सांगण्यात अर्थ नाही. आजार बरा हो न हो, पण त्याचे त्या दिवसाच्या दिहाडीचे नुकसान होणार हे निश्चित.
उत्तम नगरमध्ये प्रशिक्षित MBBS डॉक्टर हि आहेत. त्यांची किमान फी ३०० रुपये आहे. (माझा फेमिली डॉक्टर हि ३०० रुपये घेतो. चांगल्या कॉलोनीत अर्थात जनकपुरी येथे डॉक्टर ५००-७०० रुपये फी घेतात). एवढी फी घेतल्यावर डॉक्टर किमान ३०० रुपयांची औषधी लिहिणारच. सामान्य जनतेला MBBS डॉक्टरकडे जाणे परवडणे शक्य नाही. आता उरले, स्वयंभू झोला छाप डॉक्टर. दिल्लीत किमान पन्नास हजाराहून जास्त झोला छाप डॉक्टर असावेत, असा अंदाज आहे. हे डॉक्टर ५० रुपयांत तीन दिवसांची औषधी देतात. स्वस्त असल्यामुळे सामान्य गरीब जनता अश्याच डॉक्टरांकडे जाते. आता ८-१० दिवस औषध घेऊन आजार बरा नाही झाला तर हा गरीब माणूस काय करणार. शेवटचा उपाय म्हणून तो ‘नीमवाल्या बाबाकडे जाऊन झाडा लाऊन घेणार’. नीमवाला बाबा काही मागत नाही. तुमची श्रद्धा हीच त्याची बरकत (कमाई).
आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे अधिकांश आजारातून आपण बरे होतोच. पीलिया, डेंगू इत्यादी आजारांपासून हि लोक बरे होतात. अर्थात शरीराला त्याची किंमत हि मोजावी लागतेच. सतत आजारांमुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. पण झाडा लावल्यामुळे आजारी व्यक्ती रोगमुक्त झाला, याचे श्रेय नीमवाल्या बाबाला मिळणारच. हळू हळू त्याची लोकप्रियता वाढत जाणार. चांगले श्रीमंत लोक पण हि त्याचा कडे जाऊन ‘झाडा’ लाऊन घेणार. नीमवाला बाबा किंवा बंगाली बाबा कुणाचे रोग दूर करीत नाही, तरी हि लोक रोगांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कडे जातात.
बाबालोकांचा विरोध करून अंधविश्वासाविरुद्ध लढा जिंकणे शक्य नाही. नीमवाल्या बाबा/ बंगाली बाबांकडे जाण्यापासून लोकांना थांबवायचे असेल तर चांगली, विश्वसनीय आणि सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडणारी चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचवावी लागेल.
काही महिन्यांपूर्वी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा जीवनावर आधारित सिनेमा बघितला होता. भामरागडसारख्या दुर्गम भागात, जादूटोणा करणारऱ्या तांत्रिकांकडे जाणे लोकांची मजबुरी होती. उत्तम डॉक्टर, उत्तम चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचली. लोकांचे तांत्रिकांकडे जाणे आपसूक बंद झाले.
जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे.
क्रमश:
प्रतिक्रिया
30 Jul 2016 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा
@जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे. ››› +++१११
30 Jul 2016 - 10:13 am | यशोधरा
प्रकाश आमटे म्हणायचेय का काका तुम्हांला? लोक बिरादरी प्रकल्प?
हे मान्य.
30 Jul 2016 - 10:33 am | विवेकपटाईत
लिहिताना चूक झाली. प्रकाश आमटे लिहायचे होते. कृपया सम्पादकानी चूक ठीक करावी. (काल रात्रि बाबासाहेबांवर एक लेख वाचीत होतो. त्याचा परिणाम झाला असावा).
31 Jul 2016 - 10:52 am | मितभाषी
या लेखातील संतुलीत विचार आवडले.
1 Aug 2016 - 11:27 am | पैसा
पटतंय. आता साधे सर्दीतापासाठी डॉक्टरकडे गेलात तर कमीत कमी हजार रुपये लागतातच. आमचे फॅमिली डॉक्टर सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यावर समाजसेवा म्हणून ४० रुपयात तपासून रोगनिदान करतात पण त्यासोबत ५ ७ शे रुपयांची औषधे लिहून देतात. त्यांच्याकडेही सिव्हिल हॉस्पिटलसारखी गर्दी असते. होमिओपाथ तर ३०० घेतात; हे पाहिले आहे. मग तेही परवडत नाही ते लोक तसेच आजारी घरात बसून रहाणार आणि काही करता येत नाही म्हणून त्यांच्या जवळचे मंत्र तंत्रच्या नादी लागणार. हे अगदी सत्य आहे.
चांगली आरोग्यसेवा स्वस्तात आणि सहज उपलब्ध झाली तर झाडफूकवाल्या बाबांकडची गर्दी नक्कीच कमी होईल.