"सारख्या तुझ्या मुलांच्या परीक्षा!" आजोबा आईकडे तक्रार करत होते.
झालं असं होतं, की मेच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मामेबहिणीचं लग्न होतं. आईच्या लग्नानंतर तिच्या माहेरी पहिलंच लग्न. ती सगळ्या भावंडांत लहान त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी! त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, साहजिकच तिने लग्नाच्या बरेच दिवस आधीपासून माहेरी यावे अशी आजी-आजोबांची इच्छा होती. पण माझ्या चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचं कारण आलं. आईच्या माहेरी तेव्हा तरी असल्या(!) बाहेरच्या परीक्षेंचे कुणाला महत्त्व नव्हते - खरे तर फारसे अभ्यासाचेच महत्त्व नव्हते. आजोबांसाठी तर ते अगदीच फुटकळ कारण. शाळेला सुट्टी सुरु झाली तरी ही येईना म्हणून ते थोडे हिरमुसलेच असणार. एकदाची परीक्षा झाली आणि आजी-आजोबा आम्हाला घ्यायला आले. त्यानंतर दर उन्हाळ्याच्या सुट्टीत हा नियमच झाला. कुठल्या न कुठल्या परीक्षेला मी बसलेली असायचेच आणि या परीक्षा अशा सुट्टीत, किंवा एखाद्या रविवारीच असायच्या. त्यामुळे कंटाळून कधीतरी त्यांनी तक्रार केलीच. अर्थात त्याचा माझ्यावर फार काही परिणाम झाला नाहीच आणि हे परीक्षासत्र सुरुच राहिले.
असे असले तरी कसे ते नेमके आठवत नाही, पण पाचवीतली गणित प्राविण्य परीक्षा माझ्याकडून द्यायची राहून गेली. गणित तसे मला आधीपासूनच खूप आवडायचे. हळूहळू त्यातला आत्मविश्वासही वाढत गेला. मग आठवीत मात्र या परीक्षेला नक्कीच बसायचं ठरवलं, कारण गणिताची ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठीच असे. आमच्या शाळेत एकूणच अशा स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करुन घेत असत. एखादे शिक्षक शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जास्तीचा वेळ काढून वर्ग घेत आणि मुलांना परीक्षांसाठी मार्गदर्शन करत. त्यासाठी आम्हां विद्यार्थ्यांना कधीही जास्त शुल्क भरावे लागले नाही. तर या गणित प्रावीण्यसाठी आम्हाला बोराडे सर शिकवायला आले. तोपर्यंत सरांचा फार असा परिचय नव्हता. ते आम्हाला वर्गावर कुठल्या विषयाला शिकवायला नव्हते. उंचपुरे, मध्यम बांध्याचे असे होते. शिवाय कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले "बोरुडे" सर यांच्याशी आडनाव मिळतेजुळते असल्यामुळे सुरुवातीला सरांचा दरारा वाटायचा. पण हळूहळू त्यांच्याशी बोलायला, प्रश्न विचारायला मोकळेपणा वाटायला लागला. तरीही बाकीच्या गोष्टीत व्यस्त असल्यामुळे फार दिवस काही या वर्गांना जाता आले नाही. परीक्षा दिली आणि निकाल लागला तेव्हा पुढच्या प्रज्ञा पातळीसाठी किमान आवश्यक तेवढे(च) गुण मला मिळाले. आणि शाळेतून निवड झालेल्या चारपैकी एक टाळके माझेही निघाले.
आता संधी मिळालीच आहे तर तिचा सदुपयोग करावा म्हणून मी पुढची तयारी मात्र चांगली करायचे ठरवले. मला आठवते त्याप्रमाणे गणित प्रज्ञेचे स्वरुप म्हणजे ५-६ गुणांचे असे १७ प्रश्न असायचे. तयारी करताना जरा तारांबळच उडाली. अचानक द्विमान, दशमान पद्धत वगैरेचे प्रश्न बघून सराव करतानाच आता इतक्या कमी दिवसांत नवीन काय काय शिकणार असे वाटायला लागले. सरांनी मात्र संयमाने सर्व नीट समजावून सांगितले. परीक्षा दिली, आणि त्याबद्दल पूर्ण विसरुन गेले. कारण ते परीक्षेचे स्वरुप, प्रश्न आणि त्याखाली उत्तरे सोडवायला जागा कुठे अपेक्षेपेक्षा खूपच कमी तर कुठे जास्त दिलेली. शिवाय मला सतरापैकी सहाच प्रश्न अचूक सोडवल्याची खात्री. पूर्ण नाही जमले तरी जेवढे जमेल तेवढ्या पायर्या लिहून वेळ संपल्यावर बाहेर आले आणि आपली पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागले!
बरेच दिवस निघून गेले. एकदा शेवटचा तास चालू असताना शाळेतल्या शिपायाने तासावरच्या शिक्षकांना निरोप दिला की मला गोरे सरांनी बोलावले आहे. गोरे सर म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक. ते तसे मृदू स्वभावाचे असले तरी मुख्याध्यापकांनी बोलावले म्हणून आधीच धडकी भरली होती. बाहेरुन त्यांच्या ऑफिसमध्ये जायची परवानगी मागितली. गेल्यागेल्या ते म्हणाले "अगं, तुझं अभिनंदन!" माझा स्वभाव तेव्हा फारच भीडस्त होता. सर अभिनंदन म्हणाले की कारण वगैरे न विचारता मी आधी त्यांच्या पायाच पडले. आशीर्वाद देऊन त्यांनी मला त्यांच्यासमोरच्या वर्तमानपत्रातली बातमी दाखवली. त्यात गणित प्रद्याचा निकाल होता, आणि मी जिल्ह्यात पहिली आणि महाराष्ट्रात पाचवी आले होते. पर्सेन्टाईल पद्धतीमुळे आणि कदाचित सर्वांनाच परीक्षा अवघड गेल्यामुळे तसे झाले असावे! शाळेत माझे बरेच कौतुक वगैरे झाले आणि "विशेष अभिनंदनीय" म्हणून दुसर्या दिवशी सूचनांमध्येही उल्लेख झाला.
शाळेत वाटायला मी पेढे घेउन गेले. वर्गावर येणार्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना तर दिले, पण बोराडे सरांची भेट काही होईना. एक तर शाळा मोठी, म्हणून शिक्षकही खूप होते. शिवाय सरांच्या स्टाफ-रूम मध्ये मुली कसे जाणार? बाहेर कुणी सर दिसले तर त्यांना आतून सरांना बोलवायला सांगायचो. पण सर तेव्हा एक-दोन दिवस नेमके भेटले नाहीत. तश्यातच शाळेच्या परीक्षा सुरु झाल्या. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक सगळेच नेहमीपेक्षा वेगळ्या वर्गांमध्ये. त्यात पेपरच्या आधी आणि नंतर सगळेच घाईत. तरी सरांच्या नावाचे पेढे मी घेउन जात होते आणि रोज पुन्हा घरी नेत होते. शेवटी पेढेही खराब झाले. नंतर केव्हातरी सर भेटल्यावर त्यांनी मोकळेपणाने मी पेढे नाही दिले म्हणून नाराजी व्यक्त केली. मीही मुळातच कमी बोलत असल्याने फार काही स्पष्टीकरण दिले नाही. पुढे केव्हातरी मात्र मी त्यांना आवर्जून पेढे दिले. "या वेळी मिळाले तुझे पेढे" असे म्हणत त्यांनी ते स्वीकारलेही. पण मनातले न संकोचता त्यांनी बोलून दाखवले हा त्यांचा साधेपणाच. पुढे काही दिवसांनी सर आजारी पडले. त्यानंतर शाळेत पुन्हा आले तेव्हा बरेच बारीक दिसत होते, डोळ्यांभोवती काळी वर्तुळेही दिसत होती. नंतर काही कालावधीतच ते कालवश झाले. खरे तर त्यांचे वय फार नव्हते - चाळीशीत असावे. त्यानंतर पुढे काही परीक्षा दिल्या, कधी नंबरही मिळवले, पण आपण ही मजल गाठू शकतो असा विश्वास आला तो या गणित प्रज्ञा परीक्षा आणि सरांच्या मार्गदर्शनामुळेच.
बोराडे सर असोत किंवा शाळेतले दुसरे शिक्षक असोत, किती साधेपणाने राहत असत. बरेचजण सायकलवर येत असत. पण विद्यार्थ्यांचे यश यातच आनंद आणि समाधान मानत. कधी अभ्यासातले लक्ष कमी झाले तर आई-वडिलांच्या, भावंडांच्या आणि आपल्याला घडवणार्या तमाम गुरुंच्या नजरा आपल्याकडे आहेत ही जाणिव पुन्हा गाडी रुळावर आणत असे. रस्त्यात दिसल्यावर "सर" किंवा "बाई" म्हणून मारलेली हाक, कधी शाळेत जाऊन अचानक दिलेली भेट, सणासुदीला घरी जाऊन त्यांना केलेला नमस्कारही त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर किती आनंद आणि नजरेत किती अभिमान आणतो! मध्ये असाच एका सरांचा नंबर मिळवून त्यांना एकदा फोन केला होता, विशेष म्हणजे माझ्या बाबांनाही त्यांनी शिकवले होते आणि त्यांनीही सरांना त्याच दिवशी फोन केला - त्यांच्या बोलण्यातला आनंद फोनवरच्या संभाषणातूनसुद्धा कळत होता.
गावडे सरांचा लेख वाचता वाचता अनेक शिक्षकांच्या अशा आठवणी जाग्या झाल्या आणि डोळ्यांत पाणी आलं, त्यामुळे त्या लेखावर प्रतिसादही अगदीच मोजक्या शब्दांत दिला. पण ही आठवण बरेच दिवस मनात होती. शिवाय गुरुपौर्णिमा आहे तर मिपावरचं हे रुढार्थाने पहिले लिखाण समयोचित होईल म्हणून इथे लिहावीशी वाटली.
प्रतिक्रिया
20 Jul 2016 - 5:38 am | रेवती
समयोचित लेख.
20 Jul 2016 - 5:39 am | पद्मावति
रूपी, खूप सुंदर लिहिलंय. लेख फार आवडला.
20 Jul 2016 - 6:44 am | स्रुजा
सुंदर लेख. बादवे, तुम्ही ज्या बोर्हाडे सरांबद्दल बोलताय ते बहुधा आम्हाला पण होते , तुम्ही शाळेचा उल्लेख केलेला नाहीत पण बाकी सगळ्या खुणा, प्रिन्सिपल सरांचं नाव जुळतंय. त्यांची छान आठवण सांगितलीत. आज सकाळपासून मनात शाळेतल्या शिक्षकांचा विचार राहुन राहुन येतोय.
त्यांनी निर्माण केलेली आवड : त्याचं आज कसं का होईना झाड बहरलंय. त्यांना हवं तसं बहरलं की नाही कोण जाणे पण पेरलेलं बियाणं वाया गेलं नाही एवढं खरं.
20 Jul 2016 - 6:49 am | डॉ सुहास म्हात्रे
समयोचित लेख ! हृद्य आठवण !
20 Jul 2016 - 7:02 am | प्रचेतस
सुंदर लेखन.
20 Jul 2016 - 7:06 am | मनो
गोरे मुख्याध्यापक आणि बोरुडे सर म्हणजे आमची शाळा. गोपाळे सरांवरचा लेख जरूर वाचा
http://www.misalpav.com/node/11394
20 Jul 2016 - 7:43 am | स्रुजा
येस्स, हीच ती शाळा!
20 Jul 2016 - 10:25 pm | रुपी
हो बरोबर :) हीच शाळा.
स्रुजा, मी अंदाज केला होता की तू त्याच संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतीस, आणि तरीही मराठी इतकं छान लिहितेस म्हणून कौतुक वाटलं होतं. माझा अंदाज चुकला असला तरी तुझं लिखाणातलं कौशल्य छानच आहे - ब्रोकोली ग्रातिनमधली लेखनशैली मला फारच आवडली.
मनो, धन्यवाद. खरं तर तो लेख मी कालच वाचला होता, आणि प्रतिसाद लिहितच होते, फक्त प्रकाशित करायचा राहिला.
21 Jul 2016 - 3:32 am | स्रुजा
हाहा, नाही नाही मी शुद्ध मराठी माध्यमातली आहे. पण एस डी सर, खेर सर आणि वैद्य बाई __/\__ त्यांच्यामुळे ईंग्रजी मध्ये ही कुठे अडलं नाही. एखाद्या विषयाची आवड निर्माण करण्याची हातोटी होती या शिक्षकांमध्ये. व्हि पी सर, जी डी सर गणिताला तसेच. इतिहासाची पण तीच मजा. गंमत म्हणजे लायब्ररीअन दसरे सर पण मुलांची आवड बघुन पुस्तकं वाचायला सुचवायचे. शाळेत असताना जितकं वाचलं तितकं नंतर कधीच नाही ! शुक्रवारी आवर्जुन त्या लायाब्ररीच्या लायनीत उभी असायचे मी. लायब्ररीचं कार्ड सदा हरवलेलं ! पण सर नवीन कार्ड बनवुन नवीन पुस्तकांच्या कपाटाकडे बोट दाखवायचे. आणि मी बागडत त्या पुस्तकांच्या कपाटाकडे, बरोबरच्या मैत्रिणींकडे कार्डं असायची त्यामुळे त्या आधीच पोहोचलेल्या असायच्या लायनीतुन. मजा होती सगळी.
20 Jul 2016 - 7:14 am | अजया
छान लिहिलंय रुपी.आवडला लेख.
20 Jul 2016 - 9:42 am | प्रीत-मोहर
सुरेख लिहिलय रुपी!!
20 Jul 2016 - 9:58 am | श्रीरंग_जोशी
हे मनोगत खूप भावले. तुमच्या या लेखनामुळे पाचवी व आठवीतल्या गणित प्राविण्य परीक्षांच्या आठवणी ताज्या झाल्या.
बोराडे सरांच्या अकाली जाण्याचे वाईट वाटले.
20 Jul 2016 - 11:03 am | मुक्त विहारि
आवडला..
20 Jul 2016 - 11:32 am | रातराणी
लेख आवडला.
20 Jul 2016 - 5:58 pm | बोका-ए-आझम
लिहित राहा.
20 Jul 2016 - 10:04 pm | पैसा
सुरेख लेख! अगदी मनापासून आलंय हे लिखाण.
20 Jul 2016 - 10:21 pm | यशोधरा
लेख अतिशय आवडला! सुरुवातीला गणित प्रज्ञा वगैरे वाचून घाबरुनच लेख उघडला नव्हता! ;)
20 Jul 2016 - 10:57 pm | इशा१२३
छान लेख!
20 Jul 2016 - 11:00 pm | इशा१२३
छान लेख!
21 Jul 2016 - 5:03 am | बहुगुणी
आणि सुंदर लेख!
एका लेखातील गुरुजनांचा उल्लेख वाचून तिघा मिपाकरांची शाळा एकच निघाली हा संयोग उल्लेखनीय! It's a small world!
21 Jul 2016 - 8:33 am | मराठमोळा
शिक्षणाची आवड निर्माण करणारे गुरू दुर्मिळच. प्रत्येक विषयाला असे गुरु मिळाले असते तर शिष्य म्हणून प्रवास आनंददायी झाला असता. शिक्षणाच्या बाजारात आजकाल मिळतात ते मास्तर मग ते केवळ जास्त मार्क मिळवण्याची प्रवृत्ती असलेली मेंढरं तयार करतात. तुमच्या या लेखामुळे आमचे काही आवडते गुरू आठवले. धन्यवाद.
21 Jul 2016 - 10:47 pm | भाग्यश्री कुलकर्णी
छान लेख. आवडला.
21 Jul 2016 - 10:55 pm | रुपी
प्रतिसाद देणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद!
21 Jul 2016 - 11:59 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
22 Jul 2016 - 9:44 am | सतिश गावडे
सुरेख लिहिलय. आवडलं.
या धाग्यावर प्रतिसाद देणाऱ्यांपैकी चार जण तरी एकाच शाळेत शिकले आहेत असं वाटतं. :)