लॉजिक-जिम-लॉजिक
प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग पॉट असल्याने सर्व जागतिक पदरात खाण हि आपली नैतिक जबाबदारी आहे असाच वाटून उलट सुलट खाण , बर पिणं म्हणजे एकदम तब्येतीने टकीला शॉट्स , सर्व प्रकारची कॉकटेल्स , बियर चे पिचर वर पिचर , वजन ७० kg वरून ८६ kg वर कस गेलं ते कळलंच नाही
पुढे भारतात परत आलो आणि झक मारत चालणं आल , ऑफिसला पहिलीच दिवशी मेन गेट पासून फक्त डेस्क पर्यन्त चालत गेलो आणि जबरदस्त दम लागला नंतर फार तर अर्धा km असेल , काही अति-उत्साही कार्य-कार्टे ऍम्ब्युलंस बोलवायला निघाले , त्यांना कस बस थांबवलं आणि डोक्याला जबरदस्त शॉट लागला , अनेक तरुण वयात हार्ट अटॅक ने गेलेल्या केसेस समोर यायला लागले , जवळपास बसण्याऱ्या मुलींची एकदम नजर बदलावी आपण एकदम बिचारे दिसावं कस तरीच वाटायला लागलं , ही शेवटीच काडी होती
दुसऱ्याच दिवशी सकाळी जुना मित्र नाक्यावर भेटला गडी तब्येतीने एकदम मजबूत बुलेट थांबून चौकशी गेली एक दमात सांगितलं अरे बाबा कुठली जिम सांगशील का ? त्याने मे अगदीच कसा अडाणी ह्या नजरेने एक मिनिट पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली , शिव -छत्रपती पुरस्कार मिळाला आहे मला आहेस कुठे बॉडी बिल्डिंग नॅशनल चॅम्प आहे , माझी स्वतःची जिम आहे उद्या पासून ये.
आता जिमला जाण आणि व्यायाम शाळेत जाण ह्यात बराच फरक असणार ह्याची जाणीव झाली , लहानपणी फक्त लंगोट आणि त्यावर हाफ पॅण्ट , मळलेला T-शर्ट ह्यावर आणि शेयर केलेला टॉवेल हैवर व्यायाम होऊन जयाचा , प्यायला माठाचं पाणी चालून जायचं , खरं तर अंग गरम झालं की पाणी प्यायलाच मनाई होती.. जोवर २०० जोर आणि ३०० बैठका मारता येत नाहीत तोवर कुठल्याही वजनाला हाथ लावायचा नाही असा सज्जड दम दिलेला असाच , व्यायामशाळेत गेल्या गेल्या बजरंगबलीच्या फोटोला नमस्कार करावा लागायचा आणि मग व्यायामाला सुरुवात मास्तर सांगायचे तसाच व्यायाम करायचा स्वतः डोकं अजिबात लावायचं नाही असा नियम , एकंदरीत खडतर प्रकार होता सगळा !!
दोन -तीन मित्रांना फोन करून विचारलं बाबा काय घेवाण जाव लागत , भरपूर लिस्ट मिळाली , चांगले shoes , ड्राय फिट जिम-वेयर , हेड बँड , पाण्याची स्वतंत्र बाटली , wrist बँड , आणि वजन उचलायला लागणारे हात मोजे वैगरे वैगरे एकंदरीत हे प्रकरण चांगलंच महागात पडणार ह्याची खात्री झाली पण शेवटची काडी आठवली आणि सगळे सोपस्कार लिलया पार पडले
सुरुवातीला अनेक कल्चरल शॉक बसले , आपली स्थूल शरीरयष्टी असून सुळसुळीत पोरींच्या बरोबरीने व्यायाम करायचा होता , मास्तरांचे सर झाले होते , स्वतः फक्त स्वतःच्याच बाटलीने पाणी प्यायचे , दुसरा कोणी सेट मारत असेल तर सरांनी सांगितल्या शिवाय मध्ये घुसायचा नाही , आल्या आल्या कार्ड काढायचं , स्वतः ची माप नियमित पणे घ्यायची कार्डावर लिहून घ्यायची सगळं लक्षात ठेवायला लागलो , बजरंगीबली - तसवीर हळू हळू कोपऱ्यात गेलीये , अचानक जिम्स ना कोस्मेपॉलिटिन लूक आलाय
ह्याच सगळ्या प्रवासात काही तऱ्हेवाईक व्यक्ति भेटल्या त्यातलेच खालील काही प्रकार
काडी - पैलवान - कीडकिडीत बांधा असलेले काही पोर दर सेट नंतर आपल्या बेंडकुळ्या आरश्यात बघतात , नसेल दिसतील तरी T-शर्ट चीक बाही वर करून पुन्हा पुन्हा पाहणार केवळ आपण जिम लावलीच आहे तर आपली बॉडी पण होतेच आहे असं समज , बाहेर पण दंड आणि छाती ह्यामध्ये एक काल्पनिक विटी (विटी दांडू वाली) आहे असं समजून नेहमी चालत आहे
मार्गदर्शक :- स्वतःची शरीरयष्टी कशी ही असली तर जन्मजात मार्गदर्शक , उगाच स्वतः हून पुढे होऊन अरे असा नाही असा सेट मारायचा असं तावातावानं सांगणं खूप महत्वाचं असत
गपिष्टखविस - व्यायाम हा जिम मध्ये करण्याचा दुय्यम प्रकार आहे असाच यांना वाटत , जो कोणी ओळखत असेल त्याला सतत गप्पा मध्ये खेचायचा प्रयत्न करतात , उगाच मोठे मोठे बॉडी बिल्डर आपल्याशी बोलतात , त्यांच्या बरोबर आपण पार्ट्या वैगरे करतो ह्याचाच समाधान असं त्यांना
जुनीखोड - आपलं वय झाला असेल तर आपण अजून तरुणच आहोत असं यांना वाटत , ह्याचा समोर एखादा पोरसवदा ज्या वजनाचे सेट मारत असेल त्याच ताकदीचे सेट मारायचा अयशस्वी प्रयत्न करणे , नाही जमलं तर वेगवेगळो कारण सांगायची , एक किस्सा आठवला जिम एक पासष्टी चे काका सेट मारत होते सेट काही केल्या जाईना , त्याच सुमारास आमच्या एरियात पाण्याची समस्या होती , एक टारगट पोराने काय काका पाणी येते का की बंद झालं काय असं जोरात विचारलं , काकांनी पण पण येत रे बाबा पण थोडं कमी दाबाने येत असं मिश्किल उत्तर दिल्या वर आख्खी जिम हास्यकल्लोळात बुडाली
हुचभ्रु - सर्व गोष्टी ब्रँडेड असल्याचं पाहिजे अगदी डोक्याच्या टोपी किंवा पायातले शूज सर्वच्या सर्व अगदी ब्रँडेड असलच पाहिजे , गुमान कानात नॉईस रद्द करणारे इअर फोन टाकून आपण बरे आणि आपला व्यायाम असं एकंदरीत धोरण , मैत्री पण अगदी ठराविक हुचभ्रु लोकांशी , क्रिकेट वर कोणी काय बोललं तर दुर्लक्ष पण युरो / कोप्पा अमेरिका म्हंटल की लगेच पुढं येऊन मत मांडणार , साधारण नेहमी फॉरेन ट्रीपच्या गप्पा , एकेक सेट मध्ये फूकेत , बाली , रिओ , वेगास वैगरे हाय-फाय गप्पा , बर हा वर्ग आता वाढत चालला आहे.
टवाळ कार्टी :- साधारण चांगलीशी मुलगी ज्या वेळेला येणार त्याच वेळा मॅच करून शक्य तितक्या वेळेस नेत्र पल्लवी करणं , काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करणं वैगरे नेहमीचे उद्योग . ह्यांना ही जिम ही सुपर मार्केट असल्यासारखं वाटत , आमच्या इथे अशी पोर सहज टार्गेट होत असत , जिमचे सर पण जरा जास्तीच वजन द्यायचे मारायला , न मारलं तर इज्जत जाणार मग काय झक्कत मारतात आणि पुढले दोन दिवस गायब
कर्कश्यसेन :- कितीही वजन उचललं तरी आपण एकदम भारी उचलतोय , प्रत्येक सेटला शेवटी जोरात ओरडणार , मग वजन फेकून द्यायचं आणि एकदम विजयी नजर इतरांवर तुच्छतेने टाकायची हा ह्यांचा स्वभावधर्म
असे एक ना अनेक प्रकार पण हल्ली एकंदरीतच लोक व्यायामाबद्दल जास्त सजग आहेत , नविन नवीं काय-अप्पा ग्रुप्स तयार होतात आहेत (तिथे इतर ही विषय जास्त होतात) पण आज काल सकाळी लहान मुलांना शाळेत सोडून नोकरीला निघण्या आधी जो काही वेळ मिळेल तो जिम मध्ये घालवून वेळेचं सार्थक करणाऱ्या आया पण पाहतोय ..
अजूनही बराच काही लिहिता येईल पण ते नंतर कधी तरी ... तुम्ही पण तुमचे अनुभव टाकले तर बहार येईल
तोपर्यंत __/\__ बजरंगीबलीकी जय
प्रतिक्रिया
26 Jun 2016 - 3:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
कार्य-कार्टे
लैच आवडलेला आहे हा शब्द आम्हाला :D
जिम मध्ये अजून एक भयानक प्रजाती येते ते म्हणजे 'फॅमिली पॅक' , खरेतर आईस्क्रीम सोडून कुठेच फॅमिली पॅक नसावे असा राष्ट्रीय नियम लागु करावा ह्या मतावर मी पोचलोय, पण आजकाल जिम मध्ये असली 'फॅमिली पॅकं' येतात, युनिसेक्स जिम असली तर काकू एक करतायत काका एक करतायत अन त्याचे कुमार पद्मनाभ टाईप कार्टे काहीतरी तिसरेच, लेडीज अन जेंट्स सेक्शन वेगळे असले की डोक्याला अजून ताप, पोरगे इकडून तिकडे हुंदडत असते अन असली कार्टी फार एडिसन असतात व कायम आपल्यापेक्षा तिप्पट जास्त वजनाची प्लेट उरावर मिरवायच्या मागं लागलेली असतात, स्टीम सौना मध्ये वडाप भरावे तसल्या फॅमिली भरलेल्या असतात तेव्हा स्टीम इंचार्ज म्हणतो उद्या या अन 'अहो ही काय आत्ता स्टीम रिकामी होते आहे' म्हणत अगोदर मालिशवाल्याने तुम्हाला दिवाळीचा पाडवा असल्याच्या थाटात तिळाच्या तेलात घुसळलेले असते आता दिवसभर तेलकट अंगाने फिरायला लागणार ह्या विचाराने चरफड होते ती वेगळीच!!
26 Jun 2016 - 5:01 pm | अभ्या..
आम्ही यांना 'अच्युत ॠषिकेश चिन्मय' म्हणतो. ;)
(कोणी मिपाकर असेल तर क्षमस्व. आहेत हे माहीतीच आहे ;) )
26 Jun 2016 - 5:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
महालोल!!!! अरे कुमार पद्मनाभ काणे म्हणजे पुलंच्या कथेत आलेला एक रेफेरेन्स आहे रे थोडक्यात एकदम गुटगुटीत वयाच्या 6व्या वर्षी सुगडाइतकी का होईना ढेरी असलेले पोर. =))
बाकी तू म्हणाला तो रेफेरेन्स सुद्धा आहेच =)), त्यात 'मंदार' ऍड कर एक नाव लिस्ट मधी!
26 Jun 2016 - 5:13 pm | अभ्या..
सध्याचे पद्मनाभ अगदी टिपीकल असतात. मस्त खातेपिते घर दिसत असते. चष्मा असतो. आत स्लीव्हलेस इनर आणि कंपल्सरी उघडा ठेवलेला चेक्सचा कॉटन शर्ट. खाली थ्री फोर्थ आणि पायात प्युमारिबॉकादीदास पैकी एक. एका हातात बापाचा मोबाइल आणी दुसर्या हातात लेज किंवा तत्सम पुडा.
27 Jun 2016 - 12:11 pm | महासंग्राम
आमचा नाव त्या लिस्टीत नेल्याबद्दल मास्तुरे तुमचा जाहीर णिषेध
27 Jun 2016 - 4:59 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही पोट्टेशाहीतले मंदार हात हो लेक! हे वाले मंदार नाही तुम्ही!! आता का 'तुमच्याच कागदावर'लिहून द्यावं काय!!फलफल करू नोका जास्तीची =)))
28 Jun 2016 - 1:25 pm | माझीही शॅम्पेन
हाहा अगदी बरोबर निरीक्षण आहे , कार्ट पण जरा आगाऊ असत आणि त्याला विंग्रजी मध्येच शाउटतात :)
28 Jun 2016 - 2:35 pm | कैलासवासी सोन्याबापु
आता पुलंचे रावसाहेब आठवले =)))
26 Jun 2016 - 4:00 pm | धनंजय माने
आम्ही पहिल्या परिच्छेदात संपतोय त्यामुळे काय लिहू?
26 Jun 2016 - 4:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुम ससुरे लिट्टी चोखा पर घी डाला करो तब खूब सारा!!
26 Jun 2016 - 4:32 pm | धनंजय माने
काहे पोल खोल रहा दद्दा... ससुरा भाग भी ना पाये अब. ;)
26 Jun 2016 - 4:14 pm | टवाळ कार्टा
़ खि खि खि....आम्ची कॅटेगरी आवडली ....
26 Jun 2016 - 4:19 pm | सतिश गावडे
लहान भावाच्या बोलण्याला भरीस पडून तो ज्या जिमला जातो ती जिम जॉईन केली. त्या सगळ्या बॉडी बिल्डर पोरांपुढे मी एक यत्किंचित क्षुद्र जीव वाटत असे. कसाबसा एक महीना काढला आणि जिमला राम राम ठोकला.
26 Jun 2016 - 4:41 pm | कंजूस
भारीय.सेट मारणे = उठाबशा काढणे / वजन उचलणे ?
आपण दोनदा भेटलो मागच्या वर्षी.गप्पांना वेळ कमी पडला आणि त्यावेळी वजन /तब्येत ठीक वाटली होती.
निरीक्षण आणि टिपण मजेदार तसेच वेगळ्या विषयाला ' हात ' घातलाय.
हेल्थ-फिटनेस बँड/अॅप्स च्यावरही थोडा गमतीदार प्रकाश टाकावा. सध्या आमच्याकडेही पाण्याची बोंब आहे. बुस्टर पप्प लावायला लागतोय.
पुन्हा भेटुच.
26 Jun 2016 - 5:45 pm | आनंदी गोपाळ
सेट मारणे = एका व्यायामप्रकाराची १०, २० इ. आवर्तने उदा. १० बायसेप कर्ल्स, किंवा २० स्क्वॅट्स इ.
29 Jun 2016 - 12:32 am | खटपट्या
आवरा
29 Jun 2016 - 12:53 am | धनंजय माने
कंजूस काका आगे बढ़ो.(फुल्ल स्टॉप)
29 Jun 2016 - 11:38 am | माझीही शॅम्पेन
हाहाहा बुस्टर पंप .... फुटलो आता (गडबडा लोळण्याची स्मायली) हल्ली बाजारात कुठले कुठले बुस्टर पंप मिळतात ?
नाही हा सर्व इतिहास झाला आता मी वारंवार हाफ मॅरथॉन पळतो बर , पण त्याबद्दल नंतर कधी तरी :)
26 Jun 2016 - 5:08 pm | अभ्या..
हेहेहेहेहे. त्याला काखंत लिंबं म्हणतात. ;)
बाकी क्लासिफिकेशन अल्टीमेट. आठवेल तशी भर घालण्यात येईल. खोपच्यात उभे राहून सप्लीमेंट आणी स्टीरॉइडचे सल्ले देणारी ग्यांग राह्यली. मोबाइलवर बघून सेट मारणारे, चेपुवर तसलेच स्नायूगिरी मिरवणारे फॉरीन फोटो अपलोड करणारे. जिममध्ये सगळे असताना हेच का नाही, मला त्याची सवय होती, तेच का नाही, त्याने चांगले लोड येते असे किर्किर पंथी, सगळे सोडून फक्त डायेट आणि जिमवेअर ह्याच विषयावर चर्चा करणारे. तासभराच्या वेळात ४८ मिनिटे आरशासमोर वेग्वेगळ्या अँगलमधून निरखणारे. हे पण राह्यले.
28 Jun 2016 - 1:29 pm | माझीही शॅम्पेन
हाहा अगदी बरोबर , ह्यावर तर अजुन एक लेख टाकता येईल , शक्यतो पावडर आणि त्यांचे ब्रँड तुम्ही आतल्या गोटात येई पर्यंत संगितल जात नाही :)
खिकक घाला घाला , इथून तिथून नमुने सारखेच
2 Jul 2016 - 8:50 pm | माझीही शॅम्पेन
अजून एक जण आठवला एक मराठी वाद्य वृंदांत गायक म्हणून हा मनुष्य स्वतः वर काय प्रेम करतो म्हणून सांगू , १ तास जिम मध्ये असेल तर फक्त २० मिन व्यायाम बाकी सतत स्वतः ला न्याहाळणं चालू असत , अगदी वेगवेगळ्या अँगल मध्ये स्वतःला बघतो , हसतो , सेल्फी काढतो काय विचारू नका , बॉलिवूड चे स्टार ह्यांना हेवा वाटेल इतकी (फालतू) बॉडी आहे :)
जिम मधले मास्तर जमाती बद्दल पण बराच लिहिता येईल (खरं तर पोरंच असतात ही पण अरे तुरे नाही करायचं 'सर'च म्हणायचं )
4 Jul 2016 - 5:14 pm | स्पा
बॉलिवूड चे स्टार ह्यांना हेवा वाटेल इतकी (फालतू) बॉडी आहे :)
बाकी मस्करी ठीक, कुणालाही शरीरयष्टी वरून वाईट म्हणू नये :)
26 Jun 2016 - 5:35 pm | पद्मावति
=)) मस्तं लेख.
26 Jun 2016 - 7:41 pm | मी-सौरभ
एक नंबर लेखन
आपण जिमला जाण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्याने पहिल्या ५ दिवसात जिम सोडली, आणि ६ महिन्याची फी देऊन टाकली, आत्ता परत नाही,
26 Jun 2016 - 8:18 pm | एस
'भारी' लेख. ;-)
26 Jun 2016 - 8:39 pm | जव्हेरगंज
मस्त लेख!
27 Jun 2016 - 12:55 pm | जगप्रवासी
काही नग तर असे असतात की हाताचे, छातीचे, पायाचे असे सर्व प्रकारचे व्यायाम प्रकार एका दिवसात करतात. खांद्याला साईड बॅग आणि त्यात असते काय तर एक पाण्याची बाटली आणि घरी जाताना स्वतःला अर्नोल्ड समजून चालायला लागतात.
27 Jun 2016 - 4:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
भारी लेख अन मस्त निरिक्षण. गेले काही महिने जीमच्या संध्याकाळच्या बॅचला जाणे झाल्याने ह्या सगळ्यांचा मस्त अनुभव. पण नंतर बॅच बदलली अन सकाळी ६ वाजता पोचायला लागल्याने सध्यातरी प्रचंड सिन्सिअरली काम करणारे लोक्स असतात.
आपली स्थूल शरीरयष्टी असून सुळसुळीत पोरींच्या बरोबरीने व्यायाम करायचा होता
>>
ह्या पोरींना जीमवाले फु़कट व्यायाम करु देत असावेत ह्या निष्कर्षापर्यंट आलोय!
27 Jun 2016 - 4:42 pm | सूड
यासारखेच हास्यास्पद प्रकार हल्ली स्विमिंग पूलात पाह्यलेत.
थंडीच्या दिवसात स्विमिंग पूलात येणारे एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ स्विमिंग पूलाच्या बाजूच्या बाकावर वर्तमानपत्र वाचीत बसत. ४५ मिनिटाच्या बॅचमध्ये सुरुवातीची वीसेक मिनीटे गेली की त्यांच्या कंपूकडून त्यांना पूलात उतरण्याचा आग्रह होई. कधी तो इतका असे की लग्नकार्यात उखाणे घ्यायला बायकादेखील एवढं फूटेज खात नसतील.
हल्लीच दोनेक महिन्यांपूर्वी दाखल झालेले असेच एक गृहस्थ, स्विमिंग पूलात पाणी कमरेइतपत खोल असेल तिथे सरळ आणि उलट चालत जातात. मध्येच जिम मध्ये लंजेस करताना ज्या प्रमाणे पण गुडघे वाकवतात त्याप्रमाणे वाकवत दुडक्या उड्या मारत फिरतात. त्यांच्यामते हा व्यायाम आहे.
साठी ओलांडलेल्या एक काकू अशाच कंबरभर पाण्यात चालतात आणि मध्येच मंगळागौरीत चालणारे तिखट-मीठ-मसाऽऽला, पिंगा इत्यादी खेळप्रकार तितक्या पाण्यात करतात. कोणी पोहत येत असताना ह्या मध्ये असतील तर "काय मेल्यान लाथ मारलीन!!" असे भाव आणत खट लूक देतात.
सात्त्विक काकवा आणि 'सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी' टाईप पब्लिक आलं की, "सर, प्लीज हात धरा", "सर नक्की उडी मारु का?" किंवा "अगं बाई भ्या लई वाट्टंय डोळं मिटा" असं चालतं. त्यातली एखादीच "आगं डोळं काय मिटतांय" म्हणून खुशाल उडी मारणारी असते.
आणखी एक समवयस्क प्रकरण मी जानेवारीत नव्या स्विमिंग पूलात जॉईन झालो तेव्हा पासून आता पर्यंत फ्रीस्टाईल शिकत होतं ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत!! नंतर अचानक एके दिवशी मला म्हणे सरांनी मला बटरफ्लाय स्ट्रोक शिकवायला सुरुवात केली. आयला दोन मिनीटासाठी माझा माझ्या गुरुवरचा विश्वास उडाला, म्हटलं मी काय घोडं मारलं होतं!! नंतर म्हणलं बघून काय करतोयेस? तर लक्षात आलं त्याला ब्रेस्ट स्ट्रोक शिकवायला सुरुवात केली होती.
28 Jun 2016 - 2:27 pm | बेकार तरुण
सूडजी, तरणतलावा वरील अनुभवाबद्दल सहमत
असेच अनेक नमुने अनेक वर्ष टिळक तलावावर पाहिले आहेत. गंमतशीर असतात.
फक्त मला वाटतं साठी नंतर पाण्यात चालणारे गुडघेदुखी ने (वा ईतर ओर्थो रोगाने) त्रस्त रूग्ण असतात आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामासाठी येत असतात.
28 Jun 2016 - 2:33 pm | सूड
ओक्के, हे माहीत नव्हतं. पण आपण कोणाच्या वाटेत उभे नाही आहोत एवढं तरी बघता येतं ना!!
28 Jun 2016 - 2:43 pm | बेकार तरुण
फक्त वाटेत उभे राहणं जाउद्या हो.. ते एक वेळ ठीक आहे
हे लोक जनरली ४ फूट खोलीत व्यायाम करत असतात ...
स्वतःला पोहता येत नाही हे विसरुन ते नवशिक्यांना सल्लेही देत असतात :) उदा. अरे तुझे पाय जोरात मार ना म्हणजे नीट पुढे जाशील वगैरे :)
टिळक तलावाला अजुन एक प्रकार म्हणजे असा ३-४ जणांचा ग्रुप यायचा, ते लोक एकत्र गप्पा मारत साखळी टाईप्स करुन चालायचे, म्हणजे ज्यांना पूर्ण लॅप पोहायचा आहे, त्यांची पंचाईत
28 Jun 2016 - 2:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
ठ्ठो प्रतिसाद !! अख्खी स्वीमिन्गपूल जत्रा आठवली
2 Jul 2016 - 8:40 pm | माझीही शॅम्पेन
हहा भारी आहे हे सर्व स्विमिंग पूल मध्ये अगदी भारी भारी नमुने असतात , आमच्या स्विमिंग पूल गुरुजींचे सिक्स पॅक बघून आम्ही त्या सायटीला फिरकतच नाही
एकदा वाईच्या पवने मास्तुरेला सांगा की तुमचे लिवा अनुभव हिकडं :)
4 Jul 2016 - 4:58 pm | सूड
कोण पवने मास्तर? =))
11 Jul 2016 - 9:51 am | माझीही शॅम्पेन
तुला माहीत नाही व्हय , असू दे असू दे आमचे वाईचे पवणे मास्तर १० km पवतात :)
27 Jun 2016 - 5:19 pm | अजया
नमुने आवडले!
जिम अशा नमुन्यांची खाण असते अगदी!
28 Jun 2016 - 7:09 pm | Jack_Bauer
आणखी एक नमुना म्हणजे सेट मारून झाला की ती गोष्ट (डंबेल्स , वेट्स ) दाणकन आपटायचे आणि त्या आवाजाने सगळ्या जिमचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे.
28 Jun 2016 - 7:52 pm | सूड
आणि एक म्हणजे, प्रत्येक सेट ला वेगवेगळी वजनं वापरणार आणि ती घेतली असतील तिथेच ठेवणार. नंतर ज्याला सेट मारायचा असेल त्याने सबंध जीमभर फिरायचं डंबेल्स्/प्लेट्स शोधत.
28 Jun 2016 - 8:45 pm | विंजिनेर
हा.. हा... हवशे-नवशे-गवशे सगळीकडेच दिसतात. जिम सुद्धा त्याला अपवाद नाही.
29 Jun 2016 - 1:52 pm | बाळ सप्रे
जिममधले असे तर्हेवाइक नमुने पहाताना तुमच्या ८६ किलोतले काही कमी झाले की नाही ;-)
11 Jul 2016 - 9:56 am | माझीही शॅम्पेन
होय बराच फरक पडला रोज जिम मध्ये घासण्यापेक्षा पळायची आवड निर्माता झाली आहे , अंग काठी बरी आहे आता :)
1 Jul 2016 - 2:35 am | गामा पैलवान
माझीही शाम्पेन,
सुळसुळीत पोरींच्या बरोबरीने व्यायाम म्हणजे काय? पोरी सुळसुळीत होत्या हे कसं कळलं? पोरींचा सुळसुळीतपणा हाताने चाचपून बघता येतो का? म्हंजे मला म्हणायचंय की, आपलं स्थौल्य जसं ढेरीवरून हात फिरवताच कळतं तसं काही? कुठलं जिम आहे हे?
आ.न.,
-गा.पै.
1 Jul 2016 - 6:09 am | नमकिन
नजरेतला असावा, म्हणजे घसरणारी चक्षु कमलं व त्यातून कलमकार होण्याची धघपड.
व्यायामशाळेतला श्रावण संकल्प आठवला.
जय श्रीराम!
2 Jul 2016 - 8:33 pm | माझीही शॅम्पेन
हा हा .. ह्या शब्दाचा भलताच अर्थ लक्षात आला
सूळसुळीत = सूटसुटीत + चुनचुणीत + किडकिडीत
असा पहा :)
1 Jul 2016 - 10:20 am | वटवट
सगळंच मजेदार आहे... मी पण आमच्या जिम मध्ये असे काही नमुने पाहतो.... एक नमुना आहे सोन्या म्हणतात, काडीमुडी पहिलवान. एकजात सर्वांना सांगत असतो "जिम कशी मारायची ते"... आणि सांगून झाल्यावर ट्रायसेप्स कसे झालेत ते शर्ट काढून बघतो.... कोपर्यात जाऊन...
1 Jul 2016 - 11:00 pm | खटपट्या
Must watch
3 Jul 2016 - 9:59 am | टवाळ कार्टा
=))
11 Jul 2016 - 9:54 am | माझीही शॅम्पेन
हा हा हसून हसून पुरेवाट नशीब भारतात असे लोक जास्त नाहीत ते :)
2 Jul 2016 - 9:35 pm | अभ्या..
एक डॉक्टर आलेला जिममध्ये. प्रचंड मोठी ढेरी. ती तेवढी कमी करायचीय म्हणाला. ट्रेनरने भरपूर एक्सरसाईज सांगिटले. हा ऍबशेपर त्याला भारी वाटला. ट्रेनर त्याला शिकवण्यासाठी एकदा त्यावर पडून परत उठला. आता कर म्हणाला. डॉक्टरसाहेब त्यावर मस्त आडवे पडले. परत उठायाचे नावच घेईंनात. 15 मिनिटाने अहो उठा कि म्हणल्यावर उठून बाजूला झाले. त्यांच्या मते ऍबशेपर (जे जिममध्ये ऍक्चुअली उगी ठेवलेले)वर झोपल्याने ढेरी कमी होते बहुधा.
३-४ दिवसाच्या कौतुकानंतर जिम सोडली बिचाऱ्यानी.
4 Jul 2016 - 10:51 am | रातराणी
भारीये हे !
4 Jul 2016 - 6:07 pm | अजया
=))))
5 Jul 2016 - 12:51 pm | मुक्त विहारि
मस्त