कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 1:19 pm

cold drinks
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.

मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.

कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.

शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते. ) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्शुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो असे निष्कर्ष काढले आहेत.

या शीतपेयांच्या बाबतीत केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला असे आदेश दिले की शीतपेयांचे सेवन हे प्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे या कार्बोनेटेड शीतपेयांची वेळोवेळी योग्य ती तपासणी करण्यात यावी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे जे दुर्दैवाने केले गेलेले नाही.

याबाबतीतील सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे.

कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे आणि शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मेक्सिकोमध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१६ ते २०२०) इतकी, ब्राझील मध्ये ७.६ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०१६), भारतामध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०२०) तर चीनमध्ये ५ अब्ज डॉलर्स (२०१४ ते २०१७) इतकी प्रचंड गुंतवणूक या कंपन्यांची आहे. याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढते आहे. ‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे. भारतातील ५१ दशलक्ष जनता आधीच मधुमेहग्रस्त आहे आणि डायबेटिक फाऊंडेशनने अशी भीती व्यक्त केली आहे की ही परिस्थिती अशीच राहिली तर २०२५ सालापर्यंत मधुमेहींची संख्या ८० दशलक्षावर पोहोचेल.

मेक्सिकोसारख्या देशातील २०१३ सालातील शीतपेयाचे दरडोई सेवन १३५ लिटर इतके प्रचंड होते. स्थूलत्वामध्ये जगात मेक्सिको सर्वात वर आहे तर Diabets-2 मधुमेहामध्ये पहिल्या नंबरवर तर लहान मुलांच्या स्थूलतेमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी शोचनीय स्थिती असलेल्या देशातच आपली पाळेमुळे खोलवर रुजविणा-या या अमेरिकाबेस शीतपेयांचे त्यांच्या देशातील दरडोई सेवन १९९८ ते २०१४ या काळात २५ टक्क्यांनी घटले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी या विकसनशील देशात मोर्चा वळवला आहे. या कंपन्यांनी जरी असे जाहीर केले असले की लहान मुलांना लक्ष्य केले जाणार नाही तरीसुद्धा या शीतपेयांच्या जाहिराती प्रामुख्याने मुलांवरच चित्रित केलेल्या दिसतात. भारतामध्ये तर कोकाकोलातर्फे १२ ते १६ वयोगटाच्या मुलांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जाते.

सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटेरेस्ट (CSPI) ने अतिशय चांगल्या शिफारशी केल्या आहेत. शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत आणि त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या या शीतपेयांवर काही कर आकारायला हवेत आणि या करापोटी मिळणा-या उत्पन्नातून आरोग्यविषयक आणि संतुलित आहार विषय उपक्रम राबवायला हवेत. (मेक्सिको देशाने या पेयावर २०१४ मध्ये पहिल्यांदा कर आकारला.) तसेच या साखरमिश्रित शीतपेयांवर धोक्याची जाणीव करून देणारे लेबल लावणे बंधनकारक करणे तसेच शाळांमधून शीतपेयांच्या विक्रीस बंदी असणे अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणांना तांत्रिक मदत द्यावी जेणेकरून शीतपेयांचे सेवन कमी करण्याविषयी धोरणे प्रभावीपणे आखणे व लोकांना शीतपेयांचे सेवन करण्यापासून परावृत्त करणे देशांना शक्य होईल.

भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडते.

देशातील ही सद्य परिस्थिती बदलण्यासाठी या लोकप्रिय कलाकारांच्या तोंडूनच आरोग्यास हानिकारक शीतपेयांची योग्य माहिती लोकांसमोर आणावयास हवी. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसर्गिक पेयांचे महत्त्व वारंवार त्यांच्यासमोर आणले गेले पाहिजे. एकंदरीतच लोकांच्या हिताचे आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आणि सातत्याने जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

ज्योती मोडक, मुंबई ग्राहक पंचायत

दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

हे ठिकाणशिक्षणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शीतपेयात नक्की कायकाय आणि कोणत्या प्रमाणात आहे हे त्या कॅनवर पष्ट लिहिलेलं असतं.

एखाद्या वस्तूच्या अतिसेवनाने / सातत्याने सेवन करण्याने अलाणेफलाणे आजार होत असतील तर त्याला कंपनी कशी काय जबाबदार असू शकेल? समजा, मी रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ काका हलवाईच्या दुकानी जाऊन एक एक किलो खरवस खाल्ला, आणि आजारी पडलो, तर मी काका हलवाईला जबाबदार धरावं की माझ्या हरभकेपणाला?

ग्राहक पंचायतीने ग्राहकशिक्षणही केलं पाहिजे. अमुकमध्ये तमुक घातक - ठोका उत्पादकाला - हे योग्य नाही.

बाळ सप्रे's picture

6 Jun 2016 - 2:12 pm | बाळ सप्रे

ग्राहक पंचायतीने ग्राहकशिक्षणही केलं पाहिजे. अमुकमध्ये तमुक घातक - ठोका उत्पादकाला - हे योग्य नाही

+१११

+१. फक्त

शीतपेयात नक्की कायकाय आणि कोणत्या प्रमाणात आहे हे त्या कॅनवर पष्ट लिहिलेलं असतं.

हे सोडून.

बाकी साखर तर सगळ्याच पेयांमध्ये असते.

x

इथे बघा. इमेज हाय रेझोल्यूशन नाही, पण :

Nutrition facts (typical values per 100ml)
Energy: 44 kcal
Carbohydrates: 11g
Sugar: 11 g
Protein: 0 g
Fat: 0 g

हे चौकटीत लिहिलेलं वाचता आलं.

आनन्दा's picture

6 Jun 2016 - 4:16 pm | आनन्दा

ते तर माहितेय हो.. पण आपल्याकडेहे सगळे कोण वाचते का?
सिगारेटवर केव्हढा वैधानिक इशारा असतो, तरी खप कमी झालाय का?

आदूबाळ's picture

6 Jun 2016 - 4:27 pm | आदूबाळ

तेच तर म्हणतोय ना मी.

ग्राहक वाचत नाहीत यात कंपनीची काय चूक? ग्राहकांनी वाचावं म्हणून ग्राहकशिक्षण गरजेचं आहे.

सगळ्या कंपन्या धुतल्या तांदळासारख्या आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही. कोकपेप्सी वगैरे वॉटर टेबलवर काय परिणाम करतात, बॉटलर्सना कसं दाबतात वगैरे वाचून / ऐकून आहे.

पण काय आहे - कंपनी म्हटली की ती "बिग बॅड कॉर्पोरेशन" आहे असं गृहित धरून त्यांना जबाबदार धरणं सोपं असतं. त्या अर्थी कंपन्या सॉफ्ट टार्गेट आहेत.

पण काय आहे - कंपनी म्हटली की ती "बिग बॅड कॉर्पोरेशन" आहे असं गृहित धरून त्यांना जबाबदार धरणं सोपं असतं. त्या अर्थी कंपन्या सॉफ्ट टार्गेट आहेत.

ह्म्म. हे बाकी खरे.
अवांतर - मला तर पेप्सी वगैरेला टोयलेट क्लीनर वगैरे म्हणणार्‍यांचा भयंकर राग येतो. कंपनीपेक्षा जास्त दिशाभूल हे लोक करतात. कार्बोनेटेड ड्रिंकमधला सोडा थोडीशी सफाई करणारच, नाही का?

धनंजय's picture

8 Jun 2016 - 3:26 am | धनंजय

अमेरिकेतील कोकाकोल्याच्या लेबलावरती दिसते की एका कॅनमध्ये ३९ ग्रॅम साखर असते. साधारणपणे लोक एका बैठकीत पूर्ण कॅन संपतात.

भारतीय कॅनवरती ११ ग्रॅम/१०० मिलि, म्हणजे ३०० मिलिमध्ये ३३ ग्रॅम -- साधारण अमेरिकेतील कॅनइतकेच येतात. परंतु वाचताना सहज लक्षात येत नाही.

Coke can

माहिती देताना वाचकाच्या सोयीचेही थोडे बघितले पाहिजे. "सामान्यपणे वापरले जाईल, इतक्या पदार्थात घटकांचे प्रमाण" हे मलातरी सोयीचे वाटते.

($४.९९ वगैरे दृष्टिभ्रामक किंमतींच्या अमेरिका देशात, या खाद्यघटक बाबीत मात्र ग्राहकाची थोडीशी सोय बघतात.)

अभ्या..'s picture

6 Jun 2016 - 2:10 pm | अभ्या..

देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.

ह्यातील देशी शीतपेये हा शब्द जरा डिफाइन करा राव. गावोगावी कोक आणी पेप्सीसारखे लोकल बॉटल्ड ड्रिंक्स पण मिळतात. गाड्यावर लिंबू सरबत, सोडा वा अन्य सरबते मिळतात. कोल्ड्रिंक हाउसात मस्तानी, मिल्क शेक्स, सोडा आदी गोष्टी मिळतात. हि सर्व पेये पेप्सी अथवा कोक टाळून पिण्याइतकी फायदेशीर असतात काय?
अगदी नॅचरल ड्रिंक्स म्हणले तर ट्रोपिकाना किंवा गेलाबाजार स्लाइस, माझा, फ्रुटी, मिनटमेड वगैरे चालेल काय? की फक्त कार्बोनेटेड ड्रिंक्सवर बंदी घालावी?

ब़जरबट्टू's picture

6 Jun 2016 - 2:32 pm | ब़जरबट्टू

लवकरच बाबा रामदेव ची आयुर्वेदिक पेप्सी येणार बाजारात.. :)
साखरेचा आणि देशी शीतपेये यांचा संबंध काही पटला नाही. भारतात गल्लोगल्ली मिळणा-या लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, लस्सी, मस्तानी, फालुदा यामध्ये असलेल्या साखरेबद्दल तर न बोललेलेच बरे. वर त्यांची गुणवत्ता तर सोडुनच द्या.

राजा मनाचा's picture

6 Jun 2016 - 3:08 pm | राजा मनाचा

कोकंब सरबत पिताना (आणि पाजताना) आम्ही सारे आयुर्वेद कोळुन पील्याचा आव आणत असतो.

पद्मावति's picture

6 Jun 2016 - 3:25 pm | पद्मावति

भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडते.

..सहमत.

आनन्दा's picture

6 Jun 2016 - 4:37 pm | आनन्दा

असे हो, हे तर विसरलोच. कधी झाले ते कललेच नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

6 Jun 2016 - 4:39 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

जरा wait करा,
पतंजलीची(देशी ब्रँड) शीतपेयी येतीलच

बाळ सप्रे's picture

6 Jun 2016 - 6:51 pm | बाळ सप्रे

ग्राहक संरक्षण सोडून राजीव दिक्षितांच काम हाती घेतल्यासारखं वाटतय या लेखामुळे..

कसं आहे की शेवटी काय प्यायचं आणि काय नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं...उठसूट या शीतपेय कंपन्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?? कंपन्या काय विष पण विकतील पण ते विष पैसे देऊन घेऊन किंवा कोणी फुकट दिलं तरी प्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..आता दारू आणि सिगारेट चं घ्या...कितीही सांगितलं कितीही वेळा असले लोक मरणाच्या दारातून परत आले असले तरी दारू पिणे ही लोक सोडणार नाहीतच...आणि देशी काय विदेशी काय..दारू ही वाईटच...पण सरकारला यातून प्रचंड पैसा, कर रुपाने मिळतो... म्हणूनच सरकार काहीही करेल असं वाटत नाही...दुसरं असं की या शीतपेय वाल्या कंपन्या तुमच्या डोक्याला बंदूक लावून, चल हे पी असे सांगत नाहीतच... एकदा व्यसन लागलं की ते लागलंच...आपल्या आरोग्याला काय चांगलं काय वाईट हे सर्वांना माहिती असतं... कोणी इतका अडाणी पण नाही की त्याला समजू नये कि आपण ही असली शीतपेये पिऊ नयेत, ती आरोग्याला अपायकारक असतात...दुर्गम खेड्यापाड्यात सुद्धा ही असली शीतपेये वाले कंटेनर्स पोहोचलेले आहेतच... दवाखाना किंवा औषध दुकान नसेल पण हे असले शीतपेये वाली ढीगभर दुकाने नक्की सापडतील...आणि कसली जन जागृती वगैरे घेऊन बसलाय?? काही होणार नाहीये त्याने...सगळ्यांना सगळं माहिती असतं की काय वाईट आणि काय चांगलं ते...मला नाही वाटत की कोणी आरोग्याला उपयोग होईल या समजुतीतून, पोषण मूल्य भरपूर आहेत या समजुतीने शीतपेय वगैरे पीत असेल..आणि हो, ग्राहक शिक्षण म्हणजे??? आणखी काय सांगणार तुम्ही ?? सगळं तर लिहिलेलं असतं त्या बाटल्यांवर....फॅट..साखर..contains no fruit ई...सर्व काही असतं...पिणारे हे पिणारच...कोणीही काहीही म्हणू दे किंवा करु दे....

सुबोध खरे's picture

7 Jun 2016 - 8:33 pm | सुबोध खरे

हा लेख एका विशिष्ट मनोवृत्तीने लिहिला गेला आहे असे स्पष्टपणे वाटते आणि ती म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विरोध. पण तसे करताना टोकाची भूमिका घेतली गेली आहे आणि वाईट गोष्ट म्हणजे त्याला हवा असलेला शास्त्राधार मात्र दिलेला नाही. शीतपेये "शक्यतो" आणि सारखी सारखी( रोज) पिऊ नये अशाच मताचा मी आहे. परंतु ज्या आकसाने हा लेख लिहिला आहे तो चुकीचा वाटतो.
पहिली गोष्ट म्हणजे शीतपेयाच्या ऐवजी फळांचा रस प्या हे सांगितले आहे कारण शीतपेयांमध्ये अतिप्रमाणात साखर असते. दुर्दैवाने फळांच्या रसातही तितकीच साखर असते.वरून साखर घातली नाही तरीही
हवे तितके दुवे उपलब्ध आहेत. काही दुवे टिचकी मारून पहा
https://authoritynutrition.com/fruit-juice-is-just-as-bad-as-soda/
http://www.hookedonjuice.com/
http://www.theguardian.com/society/2016/mar/23/fruit-juices-smoothies-co...
Phosphoric acid also slows the growth of molds and bacteria, which would otherwise multiply rapidly in the sugary solution.
The phosphoric acid is corrosive, but actually the acid concentration in soda pop is lower than that in orange juice or lemonade. Try submerging identical strips of magnesium (or iron staples) in each of these beverages overnight. Which beverage dissolves more metal? Which dissolves the metal fastest?
http://antoine.frostburg.edu/chem/senese/101/consumer/faq/why-phosphoric...
आता प्रश्न राहतो कि आपण लिंबू सरबत किंवा कोकम सरबत कसे आणि कुठे प्यायचे. बाहेर मिळणाऱ्या बर्फाची आज परिस्थिती गंभीर आहे. चाचणी घेतलेल्या ९२ टक्के बर्फामध्ये घातक जंतू आढळलेले आहेत. हि ५ दिव्सापुर्विचीच बातमी आहे.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Cold-shock-E-coli-bacteri...
मग बाहेर मिळणारे सरबत किंवा उसाचा रस तुम्ही प्यावा का हा मोठाच प्रश्न आहे. या पेक्षा बाटलीबंद शीतपेय परवडले अशी परीस्थिती आहे.
म्हणजे आपण सुरक्षितपणे काय पिऊ शकू तर ते म्हणजे नारळाचे पाणी किंवा घरी तयार केलेली कोकम किंवा लिंबू सरबते. यात सुद्धा साखर शीतपेयाइतकीच असते. म्हणजे मग उरले ते फक्त नारळाचे पाणी किंवा अमुलचे पाश्चरीकरण केलेले ताक.
जनजागृती आणि ग्राहकांचे प्रबोधन करणे हे महत्त्वाचे आहेच परंतु ते सुदृढ अशा पायावर उभे असणे आवश्यक आहे. एकांगी मत प्रदर्शन किंवा पुर्वग्रह दुषित वृत्तीने प्रबोधन करायला गेले असता ग्राहक पंचायत आपली विश्वासार्हता मात्र गमावून बसेल यासाठी हा प्रपंच.
राहिली गोष्ट -- एखादे वेळेस शीतपेय पिण्याने फारसा काहीही अपाय होत नाही असे माझे डॉक्टर म्हणून मत आहे. यात १० वर्ष पेक्षा लहान मुलांना रात्री कोला स्वादाचे पेय देऊ नये कारण त्यात असलेल्या कॅफिनने मुलाचा मेंदू उत्तेजित होतो आणि मुल रात्री झोपत नाही आणि चीड्चीडे होते. लहान मुलांना माझा फ्रुटी सारखे पेय किंवा फळांचा रस असलेली पेये द्यावीत कारण आई बाप शीतपेये( आणि/किंवा दारू) पीत असताना मुलांना पेयापासून वंचित ठेवणे किती बरोबर चूक हे ज्याने त्याने ठरवावे.

किचेन's picture

8 Jun 2016 - 6:23 pm | किचेन

फ्रूटी ,अप्पी ,नाचाराल किंवा ह्यांसारख्या इतर अनेक पेयांबद्दल काय ?
डोळे झाकून हि पेय लहान मुलांना दिली जातात. किंबहुना ती त्यांच्यासाठीच विकत घेतली जातात.

पुमुं ग्राहक पंचायतीने या धाग्यावर पायधूळ झाडावी आणि समस्त मिपाकरांस उपकृत करावे ही नम्र विनंती.

नाखु's picture

9 Jun 2016 - 9:01 am | नाखु

तुम्ही पायपुसणे देशी देणार आहात का विदेशी त्यावर ते अवलंबून आहे.

पिटातला प्रेक्षक नाखु

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 10:49 pm | जव्हेरगंज

पुमुं ग्राहक पंचायत?
ही सरकारी संस्था आहे काय?
की स्वेच्छेने केलेली समाजसेवा?

आपली थोडक्यात ओळखतरी द्या!

लेख दिशाभूल करणारा आहे! कैच्याकै तारे तोडलेत!

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 10:49 pm | जव्हेरगंज

पुमुं ग्राहक पंचायत?
ही सरकारी संस्था आहे काय?
की स्वेच्छेने केलेली समाजसेवा?

आपली थोडक्यात ओळखतरी द्या!

लेख दिशाभूल करणारा आहे! कैच्याकै तारे तोडलेत!

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 10:50 pm | जव्हेरगंज

पुमुं ग्राहक पंचायत?
ही सरकारी संस्था आहे काय?
की स्वेच्छेने केलेली समाजसेवा?

आपली थोडक्यात ओळखतरी द्या!

लेख दिशाभूल करणारा आहे! कैच्याकै तारे तोडलेत!

कलंत्री's picture

9 Jun 2016 - 2:01 pm | कलंत्री

कोठलाही युक्तिवाद विचारसरणीच्या माध्यमातून दिला तर त्याचे काय होऊ शकते याचा हा लेख एक उदाहरण आहे.

शितपेये ( सॉफ्टद्रिंक) पीऊ नये असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.

मी वर्षातून क्वचित २ / ३ वेळेसच ही पेये पीतो.

पुणे मुंग्रापं's picture

16 Jun 2016 - 8:52 am | पुणे मुंग्रापं

नमस्कार,
सर्व प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे धन्यवाद.
आपल्या आलेल्या सर्व प्रतिक्रीया या लेख लिहिणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांकडे ई-मेल द्वारे पोहोचविलेल्या आहेत. त्यांच्या उत्तरादाखल प्रतिक्रीया आल्यानंतर त्या येथे पोस्ट करु. तसेच हा लेख लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या संकेतस्थळाचे संकेतनाम व परवलीचा शब्द पाठविण्यात आलेला आहे जेणेकरुन लेखिकेला परस्पर या संकेतस्थळावर उत्तर द्यायचे असेल तर देता यावे.
या संकेतस्थळावरील तसेच इतर संकेत स्थळावरील मुबई ग्राहक पंचायातीचे हे लेख पुणे विभागाच्या अनुदिनी गटाकडून (Blog Team) कडून त्या त्या संकेत स्थळावर दिले जात असल्याने वेगवेगळ्या संकेतस्थळाकरीता वेगवेगळे स्वयंसेवी कार्यकर्ते काम करतात. सबब या कार्यकर्त्यांना अशा प्रतिक्रीया येथे देणे शक्य होणार नाही. परंतू आपणांस pune.mgp@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल

"‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय ..... " या वर आपले काय म्हणणे आहे ?
इतक्या मूर्खासारख्या चुका असतील तर बाकीची तरी विधाने खरी खाशावरून ?

जेणेकरुन लेखिकेला परस्पर या संकेतस्थळावर उत्तर द्यायचे असेल तर देता यावे.

हम्म. राईट.