आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर.
मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली.
कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर.
परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप.
शाळेत जायची सकाळीच. सायकलीवर. कराटे शिकायला. लाथा झोडायची. पोरं पुन्हा चिडीचूप.
तिच्या मैत्रीणी उच्च. तिचं अक्षर सुंदर. पायातले बूट गुलाबी. दिसायला मात्र काळुंद्री. हे तेव्हा कळलंच नाही. बहुतेक तिलाही.
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची.
एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.
आक्कीचं लगीन झालं. आक्कीचा नवरा टकला.
मग आक्की आली फटफटीवर बसून. लांबून निघून गेली. आम्हाला दिसलीपण नाही.
आक्की यायची. आक्की जायची. आम्हाला कधीच नाही दिसायची. मग आक्कीच्या आठवणींचा ऊन्हाळा आम्ही बर्फाच्या गोळ्यात भिजवला. जो पुन्हा कधीच आला नाही.
मग आक्की आली. मागं पिलावळ घेऊन.
राहिली आमच्या घरी. आयशीनं तिला कधी नाही ती साडी चोळी दिली. गालावर हात फिरवून बोटं मुडपली. पोराबाळांना खायला बिस्कीटाचा पुडा दिला. मोठ्ठा पारले.
मग आक्की येतच राहिली. आमच्या घरी येऊन गप्पाटप्पा. मग आमरस पोळी. मग आयशीला प्रणाम करुन माघारी जातच राहिली.
मग पुन्हा काहितरी बिनसलं. मग आक्कीनं घरी येणं पुन्हा बंद केलं. आली गेली आक्की आम्हाला कधी दिसली नाही. मग तिच्या आठवणींचा ऊन्हाळा आम्ही पुन्हा बर्फाच्या गोळ्यात भिजवला.
मग पुन्हा एकदा पाऊस भुरभुरभुरभूर. गाडीला क्रेट बांधले. मग पुन्हा त्यात पेप्सी मिरींडा. परत घरी आल्यावर आक्की दिसली. मागं लटांबर. त्यांचा शेंबूड फुरफुरफुरफूर. मग आयशीनं त्यांना बिस्कीटाचा पुडा दिला. आयशीला प्रणाम करुन आक्की निघाली. फटफटीवर बसून दूर गेली. मागं नुसता धूरच धूर.
प्रतिक्रिया
23 Mar 2016 - 11:46 pm | पैसा
नीटसं कळलं नाही.
24 Mar 2016 - 12:30 am | किसन शिंदे
मलाही कळाली नाही.
24 Mar 2016 - 1:27 am | उगा काहितरीच
मला वाटलं मलाच कळालं नाही , म्हणुन गुपचूप वाचून निघून गेलो होतो.
23 Mar 2016 - 11:50 pm | स्पा
खिक्क
24 Mar 2016 - 12:25 am | अन्नू
ओह! चुकून अक्की वाचलं! :P
24 Mar 2016 - 9:01 am | खेडूत
आवडली कथा..
वेगळा अर्थ कांही शोधला नाही.
व्यक्तिचित्र म्हणून आवडलं.
24 Mar 2016 - 10:50 am | कविता१९७८
माझ्यामतेही व्यक्तिचित्रणच आहे पण नाही आवडली. वाचताना काही खास असे वाटले नाही.
24 Mar 2016 - 11:10 am | अन्नू
आली आली आली, अँबॅशिडर आली.. अॅंबॅशिडर आली..
धरा धरा धरा..
उचला उचल उचला..
भरा भरा भरा
कोंबा कोंबा कोंबा
आली आली आली, अँबॅशिडर आली.. अॅंबॅशिडर आली.. :P
24 Mar 2016 - 7:55 pm | भाऊंचे भाऊ
उतरवला विचार.... डायरिया ?
24 Mar 2016 - 8:01 pm | जव्हेरगंज
खातोस का?
24 Mar 2016 - 9:14 pm | अभ्या..
जव्हेरभाऊ
आपण नाही सोडायची पातळी. शांतीने घ्या प्लीज.
24 Mar 2016 - 9:54 pm | चांदणे संदीप
पर्तिसाद 'वाईच' कॉमीक झालाय! ;) =))
जव्हेरभाऊ... चिल माडी!
हा कायप्पाछाप पर्तिसाद खास तुम्हारे वास्ते...
.
.
.
चिते की चाल
.
.
बाज की नजर
.
.
और जव्हेरभौ की कथा पर कभी संदेह नही करते..
.
.
सभी तेज चलती है!
Sandy
24 Mar 2016 - 10:15 pm | मितभाषी
उध्दटाशी व्हावे उध्दट.
जव्हेरभौ लगे रहो. लिहित रहा. प्रत्येक बॉलला बाउन्ड्री पार होइलच असे नाही.
24 Mar 2016 - 11:21 pm | जव्हेरगंज
25 Mar 2016 - 12:21 am | रातराणी
व्यक्तीचित्र म्हणून आवडले. पण खूप लहान वाटले लेखन, लहान मुलाच्या दृष्टीकोनातून लिहली असेल तर आठवणीचा उन्हाळा ही वाक्य त्या पात्राकडून येण थोडस कृत्रिम वाटल. माफ करा मला जे वाटल ते सांगत आहे. तुम्ही चांगल लिहू शकता हे माहित आहे म्हणून :)
25 Mar 2016 - 12:36 am | जव्हेरगंज
सहमत आहे. अजून जास्त खुलवायला जमलच नाही. किंबहुना मला कथेतल्या भावनाच पोहोचवता आल्या नाहीत. एक वेगळा प्रयोग ट्राय करावा वाटला. पण तो तीतकासा जमला नाही हे आता उघड आहे.
खूप धन्यवाद !
25 Mar 2016 - 10:19 am | इरसाल
अक्की काळी, मे बी ती बहिण असावी,(कायतरी झेंगाट होवुन) कारण बाळ्याची आई येताजात लुगड चोळी पोरांना बिस्कीट , आमरसाचं जेवण ?????
25 Mar 2016 - 11:39 am | कविता१९७८
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची.
एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.
25 Mar 2016 - 11:38 am | कविता१९७८
मला म्हणायची मेंगळ्या. किस्नाला म्हणायची दादा कोंडके. रघूलातर हिरोच समजायची. रघू तिचा भाऊ. त्याच्याशी कधीच नाही भांडायची.
एकदा आली आमच्या घरी. आमरस खाऊन निघून गेली. मग पुन्हा कधी आलीच नाही.