पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss?
दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल?
वाटते लिहून-लिहून हात मोडेल!
अन पेनही बहुदा झिजेल!
फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास,
उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास!
पहिला: -हाय! तास केंव्हा सरे?
दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला!
शिजून-शिजून बटाटा झाला!
तरी का न ये दया सरांना?
फूटे न पाझर तयांच्या हृदयाला?
(पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.)
पहिला: युक्ति सुचली मजला खाशी
वाचत बसतो आता मी सु. शि.^
(पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते. सर त्याच्या दिशेने येवू लागतात. दुसरा ते पाहतो. तो घाबरतो.)
दुसरा (घाईघाईने): दडिव! दडिव! पुस्तक ते!
(पहीला पुस्तकाऐवजी वहीच सॅकमध्ये सरकवतो.)
सर (भयंकर चेहरा करून):
ही काय 'असली' पुस्तके वाचण्याची जागा आहे?
कॉलेज आहे की धर्मशाळा आहे?
पहिला (दबक्या आवाजात): कुणा ठावे?
सर (रागातच): चल निघ इथून झणी
तासाला नको बसू कधी!
(पहिला वर्गाबाहेर जातो. सर पुन्हा शिकवू लागतात. दुसरा हळूच पुस्तक उचलतो.)
दुसरा (पुतपुटत): बरे झाले! एकटाच पुस्तक वाचतो काय?
*पहा- एक काव्यप्रकार (झेंडूची फुले-केशवकुमार)
^ सुहास शिरवळकर