अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे.
या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.
४
शेवटी छातीवर ओघळलेल्या तिच्या अश्रूंच्या स्पर्षांनी भानावर आल्यावर ले. शिंजीने मोठ्या कष्टाने तिला बाजूला सारले. थोडावेळ दोघेही आपल्या पाठीवर छताकडे पहात पडले. त्यांची बोटे एकमेकांच्या बोटात गुंतली होती.
बाहेर रस्त्यावरचे आवाज आता शांत झाले होते व योत्सुया रेल्वे स्टेशनवरील गाड्यांचा आवाजही अस्पष्ट झाला होता. त्या पहाटेच्या शांततेत त्या भागात दोन सैन्यांमधे तणाव आहे हे सांगूनही कोणाला खरे वाटले नसते.
त्या चटईवर त्या दोघांच्या मनात एकत्र काढलेल्या अनेक रात्रीच्या आठवणी आल्या. त्यातील प्रत्येक क्षण त्यांना आठवत होता. पण वर त्या गडद रंगाच्या छतातून आता मृत्युचा आक्राळविक्राळ चेहरा त्यांच्याकडे पहात होता. हे सुख शेवटचे आहे या कल्पनेनेच त्याची तीव्रता वाढली होती. ते जगले असते तरीही उरलेल्या आयुष्यात त्यांना हे असे सुख मिळण्याची शक्यता नव्हती.
गुंतलेल्या बोटाच्या संवेदनाही काही काळात संपणार होत्या. मृत्यु त्यांच्या जवळजवळ येत चाललाय याची आता त्यांना जाणीव होऊ लागली. आता माघार नाही. मृत्युने त्यांना गाठण्याआधीच त्यांनी मृत्युला कवटाळले पाहिजे.
‘‘चल ! रिको, आता तयारीला लागले पाहिजे.’’ ले. शिंजी म्हणाला. त्याच्या स्वरातील ठामपणा काही नवीन नव्हता पण आज रिकोला त्याच्या ठामपणात एक प्रकारचा मृदुपणा जाणवला.
त्यांना अजून बरेच काम करायचे होते.
५
ले. शिंजीने आजवर कधीही अंथरुणाची घडी घातली नव्हती पण आज त्याने त्यासाठी रिकोची मदत केली. चटई आणि बिछाना उचलून त्याने खोलीच्या दुसऱ्या टोकास नेऊन ठेवला.
रिकोने गॅसवर चालणारी शेगडी बंद केली व दिवा त्याच्या जागेवर ठेवून दिला. ले. शिंजीच्या अनुपस्थितीत तिने ती खोली चांगली आवरुन ठेवली होती. सगळ्या खुर्च्या व टेबले भिंतीला टेकून ठेवल्यामुळे ती खोली आता मस्त दिवाणखान्यासारखी मोठी भासत होती.
‘‘कानो आणि नोगुची बरोबर येथेच आपण एकदा मद्याची मेजवानी केली होती नाही ?’’
‘‘हो ना ! अट्टल मद्य पिणारे ! पण मजा आली होती !’’
‘‘वर आता भेटतीलच सगळे ! तुला माझ्याबरोबर आणल्याने ते आधी माझी चेष्टा करतील.’’
जिन्याच्या पायऱ्या उतरताना त्याला तो जेवणाचा कार्यक्रम व मद्य पिणारे, खिदळणारे त्याचे मित्र स्पष्ट आठवले. त्याच खोलीत तो स्वत:चे पोट फाडून आत्महत्या करणार आहे असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
खालच्या खोलीत दोघे नवराबायको आता शांतपणे आपापल्या तयारीला लागले. ले. शिंजी स्नानगृहात गेला तर रिकोने नवऱ्याच्या कपड्यांच्या घड्या केल्या. गणवेषाची विजार, कोट व नवीनच आणलेले कमरेला गुंडाळायचे कापड स्नानगृहात ठेवले व मेजावर कागद पसरले. यावर ते दोघेही आपला शेवटचा निरोप लिहिणार होते. मग तिने लिखाणाची पेटी उघडली व शाईच्या दौतीतील शाई जरा ढवळली. काय लिहायचे ते तिने अगोदरच ठरविले होते.
चकाचक गणवेष धारण करुन ले. शिंजी स्नानगृहातून बाहेर आला व सरळ त्या मेजापाशी गेला. सरळ ताठ बसून राहून त्याने त्या पेटीतील ब्रश हातात घेतला व काय लिहावे असा विचार करुन तो त्या कागदासमोर जरासा थबकला.
रिकोने पांढराशुभ्र रेशमाचा किमोनो घेतला आणि ती स्नानगृहात शिरली. थोड्याच वेळात ती तो परिधान करुन त्या खोलीत आली तोपर्यंत ले. शिंजीचे लिहून झाले होते. त्यावर फक्त एकच वाक्य होते, ‘‘सम्राटांच्या सैन्याचा विजय असो ! – ले. टाकेयामा शिंजी’’
रिकोने त्या मेजावर बसून आपला निरोप लिहिण्यास सुरुवात केली. ले. शिंजी चुपचापपणे तिच्या बोटांकडे एकटक नजरेने पहात होता. ती बोटे झरझर, पण ठामपणे त्या कागदावर फिरत होती.
ले. शिंजीने आपल्या तलवारीचा पट्टा कमरेभोवती गुंडाळला व रिकोने तिचा छोटा खंजीर किमोनोच्या जाड पट्ट्यात खोचला. आपापली मृत्युपत्रे हातात घेऊन त्यांनी देवघरात देवापुढे ठेवली व स्तब्ध राहून प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी खालच्या मजल्यावरील सर्व दिवे घालविले. जिना चढताना ले. शिंजीने मागे वळून त्याच्या पत्नीकडे पाहिले. खालच्या अंधारातून एखादी देवता अवतीर्ण व्हावी तशी ती दिसत होती.
दोन्ही मृत्युपत्रे वरच्या खोलीत, शेजारी शेजारी एका कोनाड्यात ठेवण्यात आली. प्रथम ते भिंतीवर लटकणारे कापडावर काढलेले तैलचित्र काढणार होते पण नंतर त्यांनी तो विचार रद्द केला कारण एकतर ते जनरल ओझेकीने त्यांना भेट म्हणून दिले होते. याच जनरलने त्यांच्या लग्नात मध्यस्थी केली होती. शिवाय त्यावर चिनी चित्रलिपीत "आत्मनिष्ठा’’ या अर्थाचे चिन्ह रेखाटले होते. ते नंतर त्यांच्या रक्तात माखणार होते पण त्यांना खात्री होती की जनरल ओझेकी त्यांना समजून घेतील.
६
ले. शिंजी त्या कोनाड्याला पाठ टेकवून ताठ बसला व त्याने तलवार त्याच्यासमोर ठेवली. रिको त्याच्यासमोर थोड्या अंतरावर बसली. तिच्या कपड्याच्या शुभ्रपणापुढे तिचे गुलाबी ओठ खूपच मादक वाटत होते. तेवढ्यात ले. शिंजी घोगऱ्या आवाजात म्हणाला,
"रिको, मला मदतनीस नसल्यामुळे मी पोट जरा जास्तच खोलवर कापेन. दिसायला ते भयंकर दिसेल पण घाबरु नकोस. गडबडून जाऊ नकोस. जमेल ना तुला? कुठलाही मृत्यु हा बघण्यास भयंकरच असतो. पण तू जे बघणार आहेस त्याने तू धीर सोडू नकोस !’’
‘‘हो !’’ रिकोने मान डोलावली.
तिच्या नाजूक पांढऱ्याशुभ्र आकृतीकडे पाहताना त्याच्या मनात आदर व आभिमान दाटून आला. सेपुकूच्या कल्पनेने तो उत्तेजित झाला. तो आता जे करणार होता ते एक सैनिक म्हणून. त्याने आजवर रिकोला असले काही दाखविले नव्हते. प्रत्यक्षात युद्धात येणाऱ्या मृत्युपेक्षाही जास्त ताकद त्याला या मृत्युसाठी लावावी लागणार होती. युद्धभूमीवर तो जे शौर्य गाजवणार होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याला त्याच्या आठ खणी खोलीत दाखवायचे होते.
हा विचार मनात येताच त्याच्या मनास एक विचित्र आभास होऊ लागला. युद्धभूमिवरील एकाकी मृत्यु व पत्नीच्या नजरेसमोर होणारा मृत्यु या दोन्हीच्या मधे कुठेतरी त्याला आता मरायचे होते. या दोन्ही प्रकारच्या मृत्युंचे मिलन होणे अशक्य आहे याची त्याला जाणीव होत होती पण त्याला मनात काहीतरी खटकत होते. रिकोच्या सुंदर डोळ्यांसमोर त्याला मृत्यु यावा हे त्याला त्याचे भाग्यच वाटत होते. एखाद्या मंद वाहणाऱ्या हवेच्या झुळकेवरील मृत्यु ! या मृत्युत काहीतरी वेगळे होते हे निश्चित. पण काय वेगळे होते हे त्याच्या लक्षात येत नव्हते. पण ते इतरांनाही समजणारे नव्हते किंबहुना हा एका वेगळ्याच विश्र्वातील मृत्यु होता. तो मरणार होता त्याच्या सम्राटासाठी, त्याच्या देशासाठी, त्याच्या रेजिमेंटच्या सन्मानासाठी, पण पाहणार होती त्याची पत्नी....कदाचित हेच वेगळेपण असावे...
रिकोही तिच्या नवऱ्याकडे एकटक पहात होती. तिच्या नजरेत एक प्रकारचा तणाव दिसत होता. साहजिकच होते ते. तिचा नवरा लवकरच मरणार होता. तसा तो त्या लष्करी गणवेषात नेहमीच रुबाबदार दिसायचा!. एवढे मर्दानी सौंदर्य तिने आजवर पाहिलेच नव्हते. पण आता त्याच्या चेहऱ्यावरील कोमल भाव लोप पावले होते व चेहरा करारी झाला होता. ओठ घट्ट मिटले होते.
‘‘रिको निघण्याची वेळ झाली... !’’ ले. शिंजी कोठेही न अडखळता म्हणाला.
डबडबत्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या नवऱ्याने त्याच्या तलवारीच्या पात्याला खालून पाच सहा इंचांवर एक पांढरे कापड गुंडाळले होते. ती तलवार त्याने खाली चटईवर ठेवली तो मांडी घालून बसला व त्याने त्याच्या गणवेषाच्या कॉलरच्या गुंड्या सोडल्या व नंतर पोटावरच्या. मग त्याने त्याचा पट्टा काढला व पँटची बटने काढली. त्याच्या कमरेचे आवळलेले पांढरे वस्त्र त्याने पोटावरील ताण सैल करण्यासाठी थोडे खाली ढकलले. त्यानंतर त्याने त्याची तलवार हातात घेतली. खाली बघत, डाव्या हाताने त्याने पोटाचे स्नायू सैल होण्यासाठी थोडेसे मालिश केले.
तलवारीची धार योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने विजारीची डावी बाजू बाजूला सारली. उघड्या पडलेल्या मांडीवर त्याने त्या तलवारीचे टोक फिरविले. त्याबरोबर त्या चिरेतून रक्ताची चिळकांडी उडाली व थोड्याच क्षणात त्याची धार लागली.
आज प्रथमच रिको तिच्या नवऱ्याचे रक्त पहात होती. तिचे ह्रदय थडथड उडत होते. तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिले. तो शांतपणे त्या रक्ताकडे पहात होता. त्या क्षणी तिला जाणवले की तिचे अवसान उसने आहे पण दुसऱ्याच क्षणी तिला एकदम मोकळे वाटू लागले.
ले. शिंजीची ससाण्याची नजर आता रिकोकडे भेदकपणे रोखली होती. त्याने त्याची तलवार त्याच्या हातात उभी केली व थोडेसे उठून पोटाचा डाव्या भागाचा भार त्या तलवारीच्या टोकावर टाकला व त्याच वेळी हाताने त्याचे टोक आत खुपसले. त्याचे स्नायु टरारले व गणवेषांना त्या ताणामुळे चुण्या पडल्या. त्याची एक अस्फुट किंकाळी त्या खोलीची शांतता भेदून गेली.
ले. शिंजीला मात्र असे वाटत होते की कोणीतरी दुसऱ्यानेच त्याच्या डाव्या बरगड्यात तलवार खुपसली आहे. दुसऱ्याच क्षणी त्याच्या मानेने आचके दिले. त्याला काय होतंय ते समजेना. तलवारीचे ते सहा इंच पाते त्याच्या पोटात अदृष्य झाले होते व ते पांढरे कापड त्याच्या कातडीला टेकले होते. दुसऱ्याच क्षणी तो वेदनेने भानावर आला. ‘पाते आतड्याच्या पार गेलेले दिसते’’ तो मनाशी म्हणाला. त्याला श्र्वास घेणे कठीण जात होते. त्याची छाती प्राणवायूसाठी थडथड उडत होती. कुठूनतरी खोल भागातून तप्त लाव्हा वहावा तशा एका वेदनेने त्याचे ह्रद्य पिळवटून टाकले. ती वेदना त्याने ओठ घट्ट मिटून गिळून टाकली.
‘ही सेपकू म्हणायची का ?’ त्याने स्वत:ला विचारले. त्याच्या जाणिवांचा भयानक गोंधळ उडाला. जणू काही त्याच्या डोक्यावर आकाश कोसळते आहे आणि जग स्वत:भोवती गिरक्या घेते आहे असे त्याला वाटू लागले. त्याने जेव्हा मांडीवर जखम केली होती तेव्हापेक्षा त्याचा आत्मविश्र्वास थोडासा डळमळीत झाला. त्या पात्याच्या धारेवरुन त्याचाच आधार घेत त्याला पुढे जायचे आहे या विचाराने त्याचे मन व्यापून गेले.
त्याची आवळलेली मूठ आता घामेजली. खाली पाहिल्यावर त्याला दिसले की त्या तलवारीला बांधलेले ते कापड व त्याचे हात दोन्ही रक्ताने माखले आहेत. त्याच्या कमरेचे वस्त्रही लालभडक रक्ताने माखले होते. त्याला आश्चर्य वाटले की या भयंकर वेदनेतसुद्धा ज्या गोष्टी दिसायला पाहिजे होत्या त्या दिसत होत्या आणि त्या अजून तेथेच होत्या. ज्याक्षणी त्याने त्याच्या पोटात तलवार खुपसली त्याच क्षणी त्याचा चेहरा पांढराफटक पडलेला तिला दिसला होता. एखादा पडदा पडतो तसा. तिने मोठ्या कष्टाने त्याच्या मदतीस जाण्याची उर्मी दाबून टाकली. तिला फक्त बघायचे होते ! बस्स फक्त बघायचे ! तिच्या नवऱ्याने तिला फक्त त्या घटनेची साक्षीदार होण्याची परवानगी दिली होती. इतर काहीही नाही. त्या सतरंजीच्या दुसऱ्या काठावर तिला तिचा नवरा ओठ घट्ट मिटून वेदनेशी सामना करीत होता. त्याच्या ओठातूनही आत रक्त ठिबकू लागले होते पण त्याच्याच आज्ञेनुसार ती त्या वेदनेतून त्याची सुटका करु शकत नव्हती.
ले. शिंजीचे कपाळ आता आलेल्या घामामुळे चमकू लागले. त्याने त्याचे डोळे घट्ट मिटले व परत उघडले. जणूकाही तो कसलातरी प्रयोग करीत होता. त्याच्या डोळ्यातील तेज आता लोपले होते. एखाद्या खारीच्या लुकलुकणाऱ्या निरागस डोळ्यांसारखे ते आता भासत होते.
रिकोच्या समोर वेदना सूर्यासारख्या जळत होत्या.
रिकोला वाटले तिचा नवरा दुसऱ्या जगात पोहोचला आहे. त्याचे अस्तित्व हे वेदनेपासून ओळखता येणे अशक्य होते. एखाद्या वेदनेच्या पिंजऱ्यात असल्यासारखे..... पण आश्चर्य म्हणजे ती आता भावनाशून्य झाली जणूकाही तिच्या आणि तिच्या नवऱ्यामधे नियंत्याने क्रूरपणे एक काच उभी केली होती. तिला काहीच ऐकू येईना.
लग्नानंतर तिचे आणि ले. शिंजीचे अस्तित्व एकमेकात विलीन झाल्यातच जमा होते. दोन माणसे नव्हतीच ती... पण आता मात्र त्याच्या वेदना हे सत्य असले तरीही तिला मात्र स्वत:चे अस्तित्व जाणवेना..
ले. शिंजीने त्याच्या उजव्या हाताने ती तलवार आतड्यातून उजवीकडे ओढण्यास सुरुवात केली...
पण कातड्याच्या विरोधाने त्या तलवारीचे टोक सारखे वर उचलले जात होते. त्याला आता जाणवले की हे काम एका हाताने होणार नाही. त्याने दोन्ही हाताने ती तलवार धरली व अधिक जोर लावला. त्याला वाटले तेवढे सोपे नव्हते ते. तलवार त्याच्या आकुंचन पावलेल्या स्नायूमधे अडकत होती. त्याने लक्ष केंद्रीत करुन सर्व शक्तीनिशी ती तलवार खाली दाबून ओढली. त्याने मात्र तीन चार इंच आतडी कापली गेली.
वेदनेने त्याचे शरीर आता थरथर कापू लागले. एखादी मोठी घंटा वाजल्यावर जशी थरथरते तसेच. त्याला आता स्वत:चे ठोके ऐकू येऊ लागले. त्याने आपले विव्हळणे दाबून टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. तेवढ्यात त्याची नजर तलवारीकडे गेली ती आता जवळजवळ बेंबीपर्यंत पोहोचली होती. ते पाहताच त्याचा आत्मविश्र्वास अजूनच वाढला.
आता रक्तस्त्राव वाढला होता. ह्र्दयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर एखाद्या पंपाने बाहेर फेकले जावे तसे रक्त बाहेर पडत होते. समोरची सतरंजी रक्ताने माखली होती आणि त्याच्या गणवेषात साठलेले रक्त भरुन वाहणाऱ्या तलावातील पाण्यासारखे त्या सतरंजीवर वाहत होते. त्या रक्ताच्या चिळकांड्यातून एक थेंब एखाद्या पक्षाप्रमाणे अलगद रिकोच्या पांढऱ्याशुभ्र किमोनोवर येऊन विराजमान झाला.
शेवटी ले. शिंजीने ती तलवार आपली आतडी कापत उजव्या बाजूपर्यंत आणली होती. त्या प्रयत्नात त्या चरबीने व रक्ताने माखलेले तलवारीचे टोक आता वरवर येत, डोळ्याला दिसू लागले होते. तेवढ्यात ले. शिंजीला उलटीची अनावर भावना झाली. झालेल्या ओकारीने त्याचे सगळे शरीर गदगदा हलले व त्याच्या पोटातून त्याची आतडी बाहेर पडली व त्याच्या मांडीवर पसरली. ले. शिंजीची हनुवटी छातीला टेकली व त्याचे डोळे किलकिले झाले. त्याच्या ओठातून लाळ ठिपकू लागली. त्याच्या खांद्यावरील पितळी चांदण्यांना याचे काही सोयरसुतक नव्हते. त्या आपल्या चमकत प्रकाश फेकत होत्या...
आता मात्र रक्त सगळीकडे पसरले. त्याचे गुडघेही त्यात बुडाले. त्याने एक हात जमिनीवर टेकवून बसण्यासाठी आधार घेतला. रक्तामासाचा एक दर्प त्या खोलीत पसरला होता. त्याच्या आचक्यांनी त्याच्या खांद्यांची मंद हालचाल होत होता पण त्याचा उजवा हात मात्र अजूनही तलवारीवर होता.
दुसऱ्या क्षणी ले. शिंजीने जे काही केले ते अवाक् करणारे होते. सर्व शक्ती गोळा करुन त्याने त्याचे मस्तक मागे फेकले. ज्या झटक्यात त्याने ते केले त्याने ते मागच्या भिंतीवर आदळले. रिको खाली मान घालून तिच्याकडे वहात येणाऱ्या रक्ताच्या ओघळाकडे पहात होती. तो आवाज ऐकून ती दचकली व तिने वर पाहिले.
ले. शिंजीचा चेहेरा त्याचा राहिला नव्हता. त्याचे डोळे भकास व खोल गेले होते. त्याची कातडी सुरकुतली होती. एकेकाळी रसरशीत असणारे ओठ आणि गालांचा रंग बदलला होता. त्यांचा रंग वाळलेल्या चिखलासारखा दिसत होता. उजव्या हातात ती तलवार धरुन त्याने ती उपसून बाहेर काढली. एखाद्या धाग्यांनी हलण्याऱ्या कळसुत्री बाहुलीप्रमाणे तो हात वर गेला. त्याने तलवारीचे टोक त्याच्या गळ्यात खुपसण्याचा प्रयत्न केला. रिको हताशपणे आपल्या नवऱ्याचा हा शेवटचा प्रयत्न पहात होती. थरथरणाऱ्या हाताने केलेले वार चुकत होते. हात स्थिर करण्याचीही ताकद आता त्याच्या राहिली नव्हती. एक घाव त्याच्या खांद्यावर घसरला. कॉलरची बटणे काढलेली असली तरी त्या कॉलरच्या बटणांनी ती कॉलर परत जवळ आणली होती. रिकोला आता मात्र हे बघवेना. तिने उठून नवऱ्याच्या मदतीस जाण्याचा प्रयत्न केला खरा पण तिला उठताच येईना. ती तशी गुडघ्यावर रांगत त्याच्यापाशी गेली. त्याच्या मागे जाऊन तिने त्याची कॉलर सैल केली. ते थरथरणारे पाते शेवटी त्याच्या गळ्यात घुसले. त्याच क्षणी ले. शिंजीने सर्व बळ एकवटून त्या पात्यावर आपला भार टाकला. तलवारीचे पाते आत घुसले व मागून बाहेर आले. रक्ताची मोठी चिळकांडी उडाली. ले. शिंजीचे कलेवर आता स्तब्ध होते. त्या प्रकाशात मानेमागून बाहेर आलेले तलवारीचे निळसर पाते चमकत होते.
७
रक्ताने माखलेले पाय घेऊन रिको हळुवारपणे पायऱ्या उतरली. वरच्या आठखणी खोलीत आता निरव शांतता पसरली होती.
खालचे दिवे लावून तिने शेगडी विझविली व आरशासमोर उभी राहिली. तिने तिचा किमोनो हाताने वर केला. त्यावर खालच्या बाजूला रक्ताची नक्षी उमटली होती. आरशासमोर बसून सरसे करताना तिच्या मांडीवर ओघळलेल्या रक्ताचा स्पर्ष जाणवताच ती शहारली. मग तिने बराच वेळ त्या आरशासमोर व्यतीत केला. खरे तर तिला आता या नटण्यामुरडण्याची गरज नव्हती पण सोडून चाललेल्या जगाला ती या बाबतीत किती काटेकोर होती हे तिला बहुधा दाखवून द्यायचे होते. ती जेव्हा उठली तेव्हा आरशासमोरची चटई रक्ताने माखली होती पण तिने त्याचा विचार केला नाही.
स्नानगृहातून परत आल्यावर ती मुख्य दरवाजासमोर थोडी थबकली. तिच्या नवऱ्याने दाराची कडी लावली होती. ती उघडून ठेवावी की नाही याबाबतीत तिच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला पण शेवटी तिने ती उघडून ठेवली व काचेचा दरवाजाही थोडासा उघडला...त्याबरोबर थंडगार वाऱ्याने आत शिरकाव केला. बाहेर कोणाचीच चाहूल नव्हती फक्त दूरवर झाडातून गारठलेले तारे लुकलुकताना तिला दिसले. दरवाजा तसाच उघडा ठेवून रिकोने इकडे तिकडे थोडे चालून पायाला लागलेले रक्त पुसले व परत तो जिना चढला.
ले. शिंजी त्याच्या तोंडावर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मानेतून बाहेर आलेले तलवारीचे ते टोक आता जास्त उठून दिसत होते. रक्ताचे पाट ओलांडून रिको ले. शिंजीच्या प्रेताजवळ बसली. तिने त्याच्या चेहेऱ्याकडे पाहिले. कोणीतरी अचानक हाक मारल्यासारखे त्याचे डोळे सताड उघडे व विस्फारलेले होते. तिने हळुवारपणे त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या ओठावर आपले ओठ हलकेच टेकले. मग तिने कपाटातून एक नवीन पांढरी चादर व कमरपट्टा काढला. तिने ती चादर कमरेभोवती गुंडाळली व त्या कमरपट्ट्याने घट्ट आवळली. ले. शिंजीच्या प्रेतापासून साधारणत: एक फूट अंतरावर ती खाली बसली. कमरेचा खंजीर काढून तिने त्याचे टोक जिभेवर टेकवले. त्या पात्याची चव तिला थोडीशी गोडसर लागली...
८
मग मात्र रिकोने वेळ घालविला नाही. आत्तापर्यंत पाहिलेल्या वेदना आता तिला स्वत:ला अनुभवायाच्या होत्या पण तिच्या पतीच्या जगात प्रवेश करण्यासाठी तिचे कुठलेही दिव्य करण्याची तयारी होती. तिच्या पतीच्या चेहेऱ्यावर तिला जे काही दिसले होते ते तिला समजले नव्हते पण आता ते समजेल का याची तिला उत्सुकता लागली. तिला वाटले आता तरी तिला सेपुकूच्या मागच्या भावना काय असतात हे उमगेल कदाचित !
रिकोने त्या खंजिराचे टोक तिच्या हनुवटीखाली लावले व जोराने आत ढकलले. तिचे हात आपोआप झाडले गेले व शरीर थरथरु लागले. तिने मग वेळ न दवडता ते पाते बाजूला ओढले. रक्ताची चिळकांडी उडतानाच तिने सर्वशक्तीनिशी ते पाते तिच्या गळ्यात खोलवर खुपसले......
समाप्त.
मूळ लेखक : मिशिमा युकिओ उर्फ किमिटाके हिराओका.
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
12 Feb 2016 - 3:56 pm | प्रीत-मोहर
बापरे
12 Feb 2016 - 5:54 pm | कपिलमुनी
गोष्ट वाचून वाईट वाटले.
वेदना प्रत्यक्षात उतरली आहे
12 Feb 2016 - 5:55 pm | जव्हेरगंज
बापरे
भयानक
:-(
अवांतर: कथा इथेच संपलीय असे दिसतयं. मात्र यात कथेपेक्षा सेपकू कसा करतात याचेच विस्तृत 'वर्णन' आले आहे. शेवटी काहीच ट्विस्ट नसल्याने कथापुर्तीचे समाधान भेटले नाही.
स्वैर अनुवाद मात्र ऊत्तम जमला आहे!
आगामी कथेच्या प्रतिक्षेत!!
12 Feb 2016 - 8:10 pm | जयंत कुलकर्णी
जव्हेरगंजसाहेब,
कथेला ट्विस्ट पाहिजेच यावर माझा विश्वास नाही. आम्ही पडलो फ्रँझ काफ्काच्या काळातले. कथा ही मानवी मन, त्यातील गुढरम्य भावना, त्याचे बाह्यजगातील प्रकटीकरण, त्या होताना त्यातील भेसळ, त्याचा होणारा परिणाम, (त्या मनावर आणि इतरांवर ), त्यामुळे घडणार्या घटना आणि अशा अनेक बाबी यावर मला लिहायला आवडते... तुम्हीही उभरते लेखक आहात, ट्विस्ट इ.इ. या फार वरवरच्या बाबी. हल्लीच्या गाण्यासारखे... आपणही चांगले लिहिता... आणि ते इतरांना आवडतेही... पण आता माझी वैचारिक बैठक बदलणे कठीण आहे, नव्हे अशक्यच आहे म्हणाना... आता ती आमच्याबरोबरच वरती जायची.... उदा. वरील कथेत त्या नवर्याबायकोंच्या भावना किती तरल व प्रामाणिक आहेत हा आमचा विषय... अर्थात त्यामुळे बर्याच लोकांना माझ्या कथा आवडत नाहीत...पण ते ठीक आहे.. जे आहे ते आनंदाने स्वीकारले आहे....
:-) :-)
12 Feb 2016 - 8:15 pm | जयंत कुलकर्णी
* फ्रँझ काफ्काच्या काळातील म्हणजे त्याचे लेखन जेव्हा अभ्यासले जायचे त्या काळातील... नाहीतर तो फार पूर्वीच स्वर्गवासी झालाय... :-)
13 Feb 2016 - 11:56 am | अभ्या..
जव्हेरभाऊ आवेगात लिहून मोकळे होतात. त्यांच बाज अलग. ट्विस्ट, डिनुमेंट वगैरे सोडून सुध्दा जयंतराव तुमचे लेखन आवडते. एकेक शब्द मोजून मापून, जोखून केलेली अप्रतिम रचना असते ती.
हि कथा वाचताना त्रास झाला हो. कसंतरीच होत होतं. :(
14 Feb 2016 - 11:17 am | जव्हेरगंज
प्रथमत: लहान तोंडी मोठ्या घासाबद्दल माफीच मागतो. तुमच्या बऱ्याच कथा/लेखन वाचले होते. त्या जबरदस्त होत्या यात वादच नाही. तुमचे नाव पाहून ही कथा मोठ्या अपेक्षेने वाचायला घेतली होती. कथा म्हणून आवडलीच पण थोडेफार जे काही खटकलं ते मांडलं.
तुमच्या कथेत पण जबरा ट्विस्ट असतात हो मालक, उदा. दुलई, अमान . ( अजून बरंच काही राहीलयं ते वाचतोय :) )
12 Feb 2016 - 9:29 pm | प्रचेतस
कथा आवडली. अनुवाद तर उत्कृष्टच.
जपान्यांच्या आत्मघातांची प्रकरणे बरीच निष्ठुर असतात.
सेपकू आणि हाराकिरी एकच का काही फरक आहे?
12 Feb 2016 - 9:34 pm | टवाळ कार्टा
.
12 Feb 2016 - 11:03 pm | आसिफ
सेपकु चे वर्णन वाचून 47 Ronin ह्या चित्रपटाची आठवण आली.
![47ronin](http://www.easternfilmfans.co.uk/wp-content/uploads/2014/05/47-ronititl2.jpg)
7 Apr 2016 - 2:40 am | साहना
फार खराब मूवी आहे (माझ्या मते) . Last Samurai त्या पेक्षा आहे आणि कुरुसोवा ह्यांचा ७ सामुराई सर्वांत चांगला आहे. Twilight सामुराई मध्ये सामुराई ह्या संकल्पनेचे सर्वांत छान चित्रण झाले आहे.
12 Feb 2016 - 11:11 pm | यशोधरा
अनुवाद सुरेख! प्रत्यक्ष घडत आहे असे वाटले! मलाही रोनिन सिनेमा आठवला.
12 Feb 2016 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी
दोन्ही भाग वाचले. अंगावर शहारा आला.
ले. शिंजी व रिको यांच्या आत्मबळाला सलाम.
13 Feb 2016 - 11:13 am | आनन्दा
बापरे.
13 Feb 2016 - 11:55 am | रातराणी
सगळ नाही वाचवल गेल. पण अनुवाद शैली अप्रतिम.
13 Feb 2016 - 6:20 pm | अनन्न्या
...
13 Feb 2016 - 11:54 pm | इशा१२३
वाचले. भयंकर धाडस.
शहाराच आला.
14 Feb 2016 - 9:59 pm | विवेक ठाकूर
मला तुमच्या मानसिकतेबद्दल आश्चर्य वाटतं. माझ्या केवळ दोन शब्दांनी, जे इथे सर्रास वापरले जातात, तुम्ही संवेदनाशिल होऊन निषेध नोंदवला आहे. आणि इथे मात्र वाचवणार देखिल नाही इतकं मृत्यूचं बिभित्स वर्णन, अनावश्यक डिटेल्समधे जाऊन केलं आहे. माझ्या मते संवेदनाशिलता दोन्ही बाजूंनी हवी. जर दुसर्याच्या शब्दांप्रती आपण इतके संवेदनाशिल असू तर इतकं बिभित्स लेखन करुन आपण स्वतः काय आनंद मिळवतो आणि ते पब्लिक डोमेनवर टाकून, वाचकांच्या मानसिकतेला कशापायी निष्कारण गर्तेत नेतो याचा ही विचार व्हायला हवा. कितीही डिस्क्लेमर दिला तरी वाचकांचे प्रतिसाद पाहून आपल्या संवेदनाशिलतेला किमान जाग यायला हवी. मग अशा लेखनासाठी निवडलेला कथाविषय कितीही थोर असो. अशी विचारणा करून तुमचाच प्रतिसाद तुम्हाला परत करतो.
अर्थात याचा उपयोग होणार नाही याची कल्पना आहे पण सगळ्यांनीच हे चालवून घेतले असे उद्या कोणी म्हणायला नको म्हणून हा प्रतिसाद.
14 Feb 2016 - 10:09 pm | टवाळ कार्टा
काही प्रमाणात सहमत...
14 Feb 2016 - 11:54 pm | जयंत कुलकर्णी
जपानी सेपकू आणि त्यामागील मानसिकता या बद्दल अगोदर तुम्हाला माहिती हवी. ही कथा अगोदरच प्ब्लिक डोमेनमधे आहे हेही लक्षात घ्या. एक तर मी ते भाषांतर केलेले आहे आणि या लेखकाची नोबेलसाठी शिफारस झाली होती. दुसरे म्हणजे यात मी कुठल्याही सदस्याला भिकार, इ. इ. म्हटलेले नाही. मी परत तेच म्हणतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे अनेक दृष्टीकोन असतात. म्हणून तुमच्या दृष्टीकोनाला मी भिकार म्हणू शकत नाही ना भुक्कड. आणि तुम्ही ओढूण ताणून माझा प्रतिसाद परत केला आहे त्याबद्दल धन्यवाद ! मी तुमच्या भाषेबद्दल निषेध नोंदवला होता. मताबद्दल नाही हे तरी तुम्हाला समजायला हवे होते... अर्थात हा शेवटचा प्रतिसाद...माझीच चूक झाली.... मला वाटते मिपावर फक्त आपणच लिहावे हे योग्य. मालकांनी तसे एकदा जाहीर करावे म्हणजे बरे... ! आम्ही आपले संशोधनपर लिखाण मोठ्या आवडीने वाचू आणि त्याला निश्चितच भुक्कड म्हणणार नाही...
:-)
15 Feb 2016 - 11:48 am | विवेक ठाकूर
याबद्दल अगोदर तुम्हाला माहिती हवी?
तो प्रश्नच नाही. विषय कितीही थोर असो, संवेदनाशिल व्यक्तीची संवेदना सर्व ठिकाणी सम हवी. पब्लिक डोमेनवरच्या प्रत्येक गोष्टीची दखल आपण घेत नाही आणि मृत्यूसारख्या नावडत्या गोष्टीचं इतकं बिभित्स आणि ओंगळ वर्णन असेल तर संवेदनाशिल व्यक्ती तरी निदान त्याकडे दुर्लक्ष करेल. तुमच्यासारख्या, साध्या शब्दांनी व्यथित होणार्या, सेंसिटीव माणसानं अशा प्रकारचं विदारक आणि वाचवलं न जाणारं वर्णन केलं याचं आश्चर्य आहे. अर्थात, लेखनावर आलेले बहुसंख्य प्रतिसाद वाचून ते लक्षात यायला हरकत नाही. त्यामुळे दुसरा प्रश्न असा पडतो की इतक्या विदारक वर्णनातून ते करणार्याला काय आनंद मिळतो ? आणि वाचकांना असला अघोरी नजराणा देऊन संवेदनाशिल व्यक्ती काय साधते?
15 Feb 2016 - 4:30 pm | पैसा
कुणा एकाने लिहिले म्हणून लक्ष देऊ नका. पुढच्या भागाची आणि वहाबीबद्दलच्या लेखाचीही वाट बघत आहे.
15 Feb 2016 - 5:55 pm | विवेक ठाकूर
वरचे सगळे प्रतिसाद मी दिलेत का? की काहीही न वाचता उगीच प्रतिसाद देतायं?
१) बापरे
२)बापरे भयानक
३) सगळ नाही वाचवल गेल
४)पूर्ण वाचू शकले नाही
15 Feb 2016 - 6:26 pm | पैसा
15 Feb 2016 - 8:21 pm | जयंत कुलकर्णी
:-)
अनेक प्रतिसादात " काय बेक्कार लिहिलय '' असे वाचक सर्रास लिहितात त्याचा अर्थ तो नसतो...
15 Feb 2016 - 8:27 pm | विवेक ठाकूर
प्रशंसात्मक आहेत असं वाटतंय की काय तुम्हाला?
15 Feb 2016 - 8:37 pm | जयंत कुलकर्णी
ज्या रसात लिहिलेय त्याबद्द्ल असे प्रतिसाद येणे हे त्याचे यशच मानायला हवे.
पण जाऊ देत तुम्ही नका फार लक्ष देऊ आम्हा पामरांकडे तुमचे आपले चालू द्याता तिकडे ऑरगॅजम इ. इ. इ. आणि तुमच्या प्रतिसादातील उद्धटपणा जरा कमी करावा ही विनंती..... विनंती हो साहेब... ही विनंती आहे नाहीतर परत चालू व्हाल....
15 Feb 2016 - 8:45 pm | विवेक ठाकूर
एक संवेदनाशील व्यक्ती इतकं बिभीत्स कसं लिहू शकते आणि अशा ' वाचवलं नाही ' वगैरे यशस्वी प्रतिसादातून नक्की काय आनंद मिळतो ?
15 Feb 2016 - 8:56 pm | प्रचेतस
क्या बात है संक्षी.
आपण तर फ्यान झालो तुमच्या वाक्चातुर्याचे. आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण द्या ना प्लीज.
16 Feb 2016 - 6:13 pm | मी-सौरभ
तुम्हि लिहीत रहा. या लिखाणाच्या सुरवातीला तुम्हि दिलेला ईशारा पुरेसा आहे.
ऊगाच या प्रतिसादांच्या भानगडीत तुमचा वेळ घालवू नका ही विनंती.
16 Feb 2016 - 6:18 pm | सौंदाळा
सगळे आपल्या डोळ्यासमोर घडतय असे वाटत होते.
अंगावर शहारा आला वाचुन.
16 Feb 2016 - 6:22 pm | पिलीयन रायडर
काका.. आधी डिस्क्लेमर वाचला.. मग डायरेक्ट प्रतिसाद.. मग बहुदा आपल्याला सहन होणार नाही ह्या विचाराने लेख वाचला नाही.
पण जर गोष्ट बीभित्स रसात असेल आणि त्यावर प्रतिक्रिया "वाचवलं नाही" अशा असतील तर त्या तक्रारीच्या नसुन निश्चितच तुमच्या लिखाणाला दाद देणार्याच वाटल्या. कुणी लेखन आवडलं तरी "वाह क्या बात है!" अशी प्रतिक्रिया देऊ शकणार नाही कारण उत्स्फुर्त प्रतिसाद लेखनाला असतो.. अनुवाद किती जमलाय इ डिटेल्सना नंतर.. अंगावर येणारे लेखन असेल तर ते तुमच्या लेखनाचे यश असावे..
16 Feb 2016 - 6:44 pm | विवेक ठाकूर
यातच सगळं आलं! `अंगावर येणारे लेखन' वाचवलंच नाही तर त्यातून काय आनंद मिळाला?
पण तरीही लोक लिहीतात आणि मोजकेच का होईना, प्रोत्साहन देतात. त्यामुळे बिभित्सरसातून मिळणार्या आनंदाला `आसुरी आनंद' म्हणत असावेत असं वाटतं.
16 Feb 2016 - 7:00 pm | पिलीयन रायडर
बीभित्सरसातुन "आनंद" मिळतो? सगळं वाचणं "आनंद" मिळवायलाच असतं? करुण रसातुन "आनंद" मिळतो? आनंदवनात काम करणार्या विलास मनोहरांनी "एका नक्षलवाद्याची गोष्ट" असे एक पुस्तक लिहीले आहे. त्यातही अशी वर्णने आहेत की संताप, राग, दु:ख आणि वाचवत नाही आता... सगळ्याच भावना दाटुन येतात. ह्यातुन कोणता आनंद मिळतो? पण ते लिहीले जाणे आवश्यक नाही का?
जे आपल्याला वाचवतं.. सहन होतं.. असेच लेखन लिहीले जावे आणि वाचले जावे असे असते का? तुम्हाला आवडत नाही (आवडत कुणालाच नसतं..) म्हणुन लिहील्या जाऊच नये असा अट्टाहास का असतो तुमचा? की जयंत काकांशी स्कोअर सेटलिंग चालु आहे (तेच ते खटकलेले दोन शब्द..)?
तुम्हाला नाही आवडलं.. तुम्ही निषेध नोंदवलात.. आम्हाला समजलं.. आता नक्की काय सिद्ध करण्याचा आटापिटा आहे हा?
हे सगळं तुमचं "खाजगी लॉजिक" आहे (शब्दप्रेरणा - एक्का काका).. तुमच्या मनाच्या आवडी - निवडी, तर्क कुतर्क आहेत. तशच इतरांच्याही आवडी निवडी असु शकतात. आपापली कारणं असु शकतात. ती तुम्ही अमान्य करु शकत नाही.
मला तुम्हाला माझा मुद्दा कळेल अशी अजिबात आशा नाही. पण तरीही प्रयत्न केलाय.
16 Feb 2016 - 6:42 pm | जेपी
..
16 Feb 2016 - 6:52 pm | अजया
इतक्या सुंदर कथेच्या धाग्यावर पण लोक घाण करुन कसे जाऊ शकतात?
खेद वाटला.
कुलकर्णी काका, तुमच्या नेहमीच दर्जेदार असणाऱ्या लेखांच्या प्रतीक्षेत आम्ही कायम असतो.
16 Feb 2016 - 7:16 pm | प्रीत-मोहर
अरे लोकही मह्त्वाच्या गोष्टींना महत्व द्या. दुर्ल्क्ष करायला शिका रे आता मिपाकरांनो.
7 Apr 2016 - 2:05 am | गामा पैलवान
विवेक ठाकूर,
आजंच ही कथा वाचली. त्यानंतरचे तुमचे प्रतिसाद वाचले. मी जरा उशीरा लिहितोय. पण लिहील्यावाचून राहवलं नाही.
तुम्ही म्हणालात ते मृत्यूचं बीभत्स वर्णन हे खरंतर शरीराचं वर्णन आहे. तसं बघायला गेलं तर मानवी शरीर मुळातून ओंगळवाणंच आहे. त्याला जगातल्या छानछान गोष्टींचा आस्वाद घ्यायला आवडतो. मात्र ते सतत घाणघाण गोष्टी उत्पन्न करीत असतं. त्याने जर तशा गोष्टी उत्पन्न केल्या नाहीत तर ते मरेल. म्हणजे शरीराची गलिच्छ अवस्था नैसर्गिक आहे.
तर मग या चामड्याच्या पिशवीला हवंहवंसं कोण बनवतो? तोच खरा सौंदर्याचा निर्माता नव्हे काय? गंमत अशी की ही चामड्याची पिशवी जिवंत भासते ती पिशवीतल्या सूक्ष्म मृत्यूमुळेच. शरीराचा अत्यल्पसा भाग दररोज विनाश पावतो. दर सकाळी विष्ठेमार्गे त्याचा त्याग होतो. ही झीज भरून काढण्यासाठी आपल्याला पुढे भूक लागते. आणि भुकेतून मग देहाची धारणा होते. हा सगळा चयापचय चालवणारा नियंता पद्धतशीरपाने काही पेशींचा ऱ्हास घडवून आणतो. म्हणजे तो सूक्ष्म पातळीवरचा मृत्यूच नव्हे काय?
सांगायचा मुद्दा काय आहे की, मृत्यूस एक सौंदर्यशाली अंगही आहे. प्रस्तुत कथेत ते कितपत उघड झालंय हा कदाचित वादग्रस्त मुद्दा असू शकतो.
आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2016 - 2:36 am | साहना
सेप्पुकू ला हाराकिरी असे सुद्धा म्हणतात. जाणकारांच्या मते हाराकिरी हा थोडा broad शब्द आहे.
सेपुक्कू म्हणजे साधारण आत्महत्या नाही. जपानी संस्कृतीत अब्रू (honor) ह्या संकल्पनेला फार महत्व आहे. एखाद्या माणसाच्या हातून त्याच्या घराण्याला/ कर्तव्याला शोभेल असे वर्तन झाले नाही तर त्या माणसाचे आणि परिवाराचे समाजातील स्थान जाते. समाज त्यांना वाळीत टाकू शकतो पण त्या माणसाने जर सेप्पुकू केले तर त्याला क्षमा मिळते. सेप्पुकू केलेल्या माणसाचे समाजातील स्थान अढळ राहते.
समुराय लोक युद्धांत हरले कि लाज वाटून सेप्पुकू करत आणि विजेता सामुराई सेप्पुकू करणार्याचे धड एका वारांत उडवत जेणेकरून त्यांचा मृत्यू कमी वेदानामयी होईल.
5 Sep 2017 - 9:42 am | गुल्लू दादा
अवघड आहे हे सगळं. छान लिहिलंय.