सेपकू :
अस्वीकरण : या कथेमधे पुढे जे सेपकूचे वर्णन आले आहे ते सर्वांनाच भावेल असे नाही. किंबहुना कमकुवत मनाच्या वाचकांनी ते वाचू नये अथवा वाचल्यास आपल्या जबाबदारीवर वाचावे.
या कथेच्या मूळ लेखकाने जपानमधील मला माहीत असलेली शेवटची सेपकू केली. त्याने हे वर्णन केलेले असल्यामुळे ते वास्तववादी असण्याची शक्यता जास्त आहे. या लेखकाच्या तीन कथा मी लिहिणार आहे. त्यातील दुसरी त्याचीच कथा असेल.
लेखक : मिशिमा युकियो : सेपकू
१
१९३६ सालातील गोष्ट आहे.
स्थळ : ६, आओबा-चो, योत्सुया वॉर्ड.
२८ फेब्रुवारी रोजी कोनो ट्रान्सपोर्ट रेजिमेंटच्या ले. शिंजी टाकेयामा या अधिकाऱ्याने त्याच्या सहाखणी माडीवर आपली लष्करी तलवार आपल्या पोटात खुपसून स्वत:ची आतडी बाहेर काढली. अर्थात यावेळी त्याने जी काही परंपरा पाळायची असते ती पाळली होतीच. गेले काही दिवस त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते कारण त्याला अशी कुणकुण लागली होती की त्याचे काही जवळचे सहकारी बंडखोरांना आतून सामील झाले होते व त्यामुळे जपानच्या राजाच्या सैन्यावर राजाचेच सैनिक हल्ला करणार अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आजवरच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. बहुधा सहकाऱ्यांचा विश्र्वासघात का राजाचा या मानसिक द्वंद्वात त्याने हा निर्णय घेतला असावा. त्याच्या पत्नीनेही त्याच्या मागोमाग स्वत:च्या नरड्यावर खंजिराने वार करुन मृत्युला कवटाळले. ज्याप्रमाणे इतर सामुराई सेपकू करण्याआधी आपली शेवटची कविता एका कागदावर लिहून ठेवतात त्याप्रमाणे त्यानेही एका कागदावर आपली शेवटची कविता लिहून ठेवली होती पण त्यात फक्त एकच वाक्य होते ‘राजाच्या सैन्याचा विजय असो.’ त्याच्या पत्नीच्या शेवटच्या पत्रात, स्वत:च्या मातापित्यांच्या आधीच या जगातून निघून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची सेवा न करु शकल्याबद्दल तिने क्षमा मागितली होती व लिहिले होते, ‘कुठल्याही सैनिकाच्या पत्नीच्या आयुष्यात येऊ शकणारा दिवस आज शेवटी माझ्या आयुष्यात आला आहे....’ या जोडप्याचे शेवटचे दिवस, क्षण बघून परमेश्र्वराच्या डोळ्यातूनही अश्रू आले असावेत. या सेपकूच्या वेळी त्याचे वय होते ३१ तर तिचे होते फक्त २३ व त्यांच्या लग्नाला अजून वर्षही झाले नव्हते....
२
नवरामुलगा व नवऱ्यामुलीच्या विवाहाचे छायाचित्र जर कोणी पाहिले असते, विशेषत: जे लग्नाला उपस्थित नव्हते त्यांना ते एकमेकांना किती अनुरुप आहेत असे निश्चितच वाटले असते. डाव्या बाजूला ले. शिंजी टाकेयामा त्याच्या लष्करी गणवेषात जणू त्याच्या पत्नीचे संरक्षणासाठी उभा असल्यासारखा भासत होता. त्याच्या डाव्या हातात त्याची गणवेषाची टोपी त्याने मोठ्या अभिमानाने धरली होती तर छातीवर त्याची दोन शौर्यपदके विराजमान झाली होती. त्याचा चेहरा गंभीर पण त्याच्या भुवया व भेदक दृष्टी त्याच्या तारुण्याची ग्वाही देत होती. नवऱ्यामुलीच्या सौंदर्याबद्दल तर बोलायलाच नको. त्याची कोणाशीच तुलना होत नव्हती. तिच्या रेखीव भुवयांच्या खाली असणारे तिचे सुंदर डोळे, सरळ पण छोटेसे अपरे नाक व लुसलुशीत ओठ तिच्या सुबक चेहऱ्यात भरच टाकत होते. पण तिच्या डोळ्यात पाहिल्यावर तिच्या बांध्याऐवजी तिचा घरंदाजपणा व बुद्धिमत्ता डोळ्यात भरत होती. किमोनोवरील कोटातून बाहेर येणाऱ्या लाजऱ्या हातात तिने एक घडी होणारा पंखा हलकेच धरला होता. तो धरताना एकत्र आलेली तिची गुलाबी नखे एखाद्या कळ्यांचा गुच्छ असल्यासारखी भासत होती.
त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे मित्र, नातेवाईक हे छायाचित्राकडे पाहून उसासे टाकत व म्हणत, ‘‘या असल्या स्वर्गीय सौंदर्याला व अनुरुप प्रमिकांना दैवी शापच असतो हेच खरे !’’ त्या छायाचित्राकडे पाहताना असे वाटत असे की ते त्या सोनेरी, नक्षीदार चौकटीतून आपल्या मृत्युकडेच पहात आहेत की काय....
ले. जनरल ओझेकीच्या मदतीने त्यांनी आपले नवे घर आओबा-चो येथे थाटले होते. अर्थात नवे घर म्हणण्याला तसा अर्थ नव्हता कारण ते होते जुनेच! तीन खोल्यांचे, ज्यांच्यामागे एक छोटीशी बाग होती. खालच्या खोल्यांमधे पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे त्यांनी आपले शयनगृह व बैठकीची खोली वरच्या मजल्यावरील आठखणी खोलीत हलविली होती. घरात मोलकरीण नव्हती त्यामुळे नवरा कामाला गेल्यावर रिको एकटीच घरी असे.
धामधुमीचा काळ असल्यामुळे त्यांनी त्यांचा मधुचंद्र त्याच खोलीत साजरा केला होता. तो साजरा करण्याआधी ले. शिंजी टाकेयामाने गुडघ्यावर बसून त्याच्या कमरेची सरळ तलवार काढून त्याच्या पुढ्यात ठेवली होती. मग त्याने त्याच्या पत्नीला एक लांबलचक सैनिकी भाषण ठोकले.
‘‘जी स्त्री एखाद्या सैनिकीपेशा असलेल्या माणसाशी लग्न करते तेव्हा तिला एका गोष्टीची कायम तयारी ठेवावी लागते आणि ती म्हणजे आपल्या नवऱ्याच्या युद्धातील मृत्युची. कदाचित उद्याही ! किंवा परवा, किंवा आठवड्याने.. पण हे स्वीकारण्याची तिची तयारी आहे का ?’’
रिको हळूच उठली. डौलदार पण खंबीर पावले टाकत तिच्या कपाटापाशी गेली आणि तिने ते उघडले व तिने आतून तिच्या आईने तिला दिलेला, रेशमी वस्त्रात गुंडाळलेला एक खंजीर हातात घेतला. आपल्या जागेवर येऊन तिने तो तिच्या नवऱ्याच्या तलवारीशेजारी ठेवला. काही क्षण तेथे शांतता पसरली. त्या शांततेतच त्यांची व त्यांच्या शस्त्रांची मने जुळली असावीत कारण त्यानंतर ले. शिंजी टाकेयामाने परत कधीही आपल्या पत्नीच्या खंबीरपणाची परीक्षा घेतली नाही. लग्नानंतर काही महिन्यातच रिकोचे सौंदर्य चंद्राच्या कलेसारखे चमकू लागले. दोघेही तारुण्याने बहरुन आल्यामुळे त्यांच्या प्रणयाला वेगळाच रंग चढे. यासाठी त्यांना काळवेळाचे भान रहात नसे. अनेकदा ले. शिंजी टाकेयामा त्याच्या रेजिमेंटच्या सरावावरुन घरी परतला की आल्याआल्या बायकोला खाली गालिच्यावर लोटे. अर्थात रिकोचा प्रतिसादही तोडीसतोड असे. आयुष्यात सुख म्हणजे अजून काय असते ? रिको आनंदी, सुखी होती आणि तिला आनंदित पाहून ले. शिंजी टाकेयामही आनंदी होई.
रिको गोरीपान होती. प्रणयात तिच्या उरोजांच्या उबेत शिंजी स्वत:ला हरवून जाई. प्रणयशय्येवर त्या अत्युच्च क्षणीही ते त्यांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावनेबाबत गंभीर व प्रामाणिक असत.
दिवसा, कामातही ले. शिंजी टाकेयामा मधल्या विश्रांतीच्या काळात रिकोचा विचार करीत बसे तर घरी रिकोच्या डोळ्यासमोर सारखा तोच दिसे. अगदीच वाटले तर ती त्यांच्या लग्नातील छायाचित्रे बघत बसे. काही दिवसांपूर्वीच या अनोळखी माणसाशी लग्न झाल्यावर तिचे विश्र्व त्याच्याभोवती एखाद्या सूर्याभोवती फिरावे तसे फिरत होते, या गोष्टीचे तिला राहून राहून आश्र्चर्य वाटत होते.
हे सगळे त्या काळातील परंपरेला अनुसरुन चालले होते असे म्हणण्यास हरकत नाही. पतीपत्नी ही रथाची दोन चाके आहेत व त्यांच्यात ताळमेळ असला तरच संसाराचा रथ नीट चालतो इ.इ... रिकोने कधीही आपल्या पतीची अवज्ञा केली नाही तसेच ले. शिंजीलाही त्याच्या पत्नीवर रागविण्याचा कधी प्रसंग आला नाही. जिन्याच्या खाली असलेल्या देवघरात ‘इसे’च्या मठातून आणलेल्या पुजेच्या साहित्यात जपानच्या राजाचेही छायाचित्र मोठ्या दिमाखाने विराजमान झाले होते. रोज सकाळी कामाला निघण्याआधी ले. शिंजी आपल्या सुविद्य पत्नीबरोबर त्या छायाचित्रासमोर वाकून वंदन करीत असे. रोज सकाळी ताज्या फुलांनी व 'सासाकी'च्या हिरव्या डहाळ्यांनी ती जागा सजविली जाई. परमेश्वराच्या व राजाच्या कृपाछत्राखाली त्यांचे आयुष्य आनंदात चालले होते.
३
राजमुद्रेचा अधिकारी साईटोचे घर त्यांच्या शेजारीच होते. त्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला पहाटेच्या शांततेत त्याला बिगुलाचा आवाज अस्पष्टसा ऐकू आला. त्यानंतर दूरवरुन फटाक्याचा आवाज त्याला ऐकू आला. त्याला प्रथम वाटले की बंदुकीचा आवाज आहे की काय पण नंतर त्याने मनाची समजूत घातली की तो आवाज बंदुकींचा नव्हता. त्याने घाईघाईने आपले पांघरुण बाजूला फेकले व गणवेष चढवला. शेजारीच उभ्या असलेल्या रिकोच्या हातातून तलवार घेत त्याने बाहेर अंधारात धाव घेतली. बाहेर बर्फात पहाटेचा अंधार वितळत होता. तो घरी परत आला तोच मुळी २८ तारखेला संध्याकाळी.
ले. शिंजी बाहेर धाव घेताना रिकोला त्याच्या चेहऱ्यावरील दृढ निर्विकार भाव लक्षात आला. तिचा नवरा परत आला नाही तर आपणही त्याच्या मागोमाग मृत्युला कवटाळायचे हे तिने ठरवून टाकले. तिने शांतपणे आपल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरु केली. तिने तिचे महागडे किमोनो आठवण म्हणून तिच्या शाळेपासून असणाऱ्या मैत्रिणींना द्यायचे ठरविले. तिने एकएक किमोनोची घडी करुन कागदात गुंडाळला व त्यावर मैत्रिणींची नावे व पत्ते लिहिले. नवऱ्याने सतत अनिश्चित भविष्याची जाणीव करुन दिल्यामुळे बिचारीने रोजनिशी लिहिण्याचेही केव्हाच सोडून दिले होते. जी पाने उरली होती तीही तिने एकएक करुन शेकोटीत टाकून दिली.
रेडिओच्या वरच्या खणात चिनी मातीच्या कुत्रा, खार, अस्वल आणि कोल्ह्याच्या प्रतिकृती होत्या. रिकोच्या म्हणाव्यात अशा या एवढ्याच वस्तू होत्या. या वस्तू आठवणी म्हणून वाटण्याची कल्पना तिला विशेष रुचली नाही. शिवाय जसे तिच्या मनात मरणाचे विचार येऊ लागले तसे त्या प्राण्यांच्या चेहऱ्यावरही खिन्न व उदास भाव उमटलेले तिला दिसू लागले. तिच्या शवपेटीत ते ठेवावेत असे सांगणे तिला प्रशस्त वाटले नाही. तिने ती चिनीमातीची खार हातात घेतली. तिच्याकडे पाहताना ती तिच्या बालपणीच्या निरागस आठवणीत हरवून गेली. थोड्याच क्षणात तिने आपली दृष्टी दूरवर लावली जेथे तिला तिच्या नवऱ्याने सांगितलेली तत्वे सूर्यासारखी तळपत असलेली दिसली. त्या तेजात आत्मसमर्पण करण्याची तिची मानसिक तयारी झाली होती पण बालपणीच्या आठवणींचे हे क्षण खास तिचे होते. तिने स्वत:ला त्यात हरवून जाण्याची थोडीशी मुभा दिली. ‘या खेळण्यांत हरवून जाण्याचे दिवस आता भूतकाळात जमा झाले होते हेच खरे’ तिने मनाशी विचार केला. एकेकाळी ती त्या खेळण्यांवर प्रेम करायची या कल्पनेनेच ती मनाशी खुदकन हसली. त्या प्रेमाची जागा आता नवऱ्यावरील प्रेमाने घेतली होती. ज्या प्रेमभावनेने तिला बालपणी त्या खेळण्यांनी आनंद दिला होता तेवढाच आनंद ती आता प्रणयात उपभोगत होती कारण प्रणय म्हणजे फक्त शारीरिक सुख या गोष्टीवर त्या दोघांचाही विश्र्वास नव्हता. बाहेर बर्फ पडत होता व त्या थंडगार खारीच्या स्पर्षाने तिची बोटे गारठली. पण तिच्या किमोनोच्या घड्याखाली असलेल्या तिच्या शरीरावर तिच्या नवऱ्याच्या आठवणींने शहारा आला. त्यातही तिला त्याच्या प्रेमाची थोडीशी ऊब जाणवली.
तिच्या मनात घिरट्या घालणाऱ्या मृत्युला ती जराशीही घाबरत नव्हती. तिच्या नवऱ्याच्या मनातील प्रचंड खळबळीचा शेवट मृत्युत आहे याचा अंदाज तिला आला होता. त्याच्या मागोमाग तिलाही मृत्युचे स्वागत करावे लागणार याचाही तिला अंदाज आला होता. ती अर्थातच आनंदाने त्याला सामोरे जाण्यास तयार होती. क्षणभर ती तिच्या नवऱ्याच्या विचारांशी इतकी एकरुप झाली की तिला वाटले ती त्या विचारांचाच एक भाग आहे.
रेडिओवर तिने बातम्यात तिच्या शिंजीच्या अनेक सहकाऱ्यांची नावे ऐकली. ते म्हणे बंडखोरांना सामिल होते. त्या बातम्या म्हणजे त्यांची मृत्युघंटाच होती म्हणाना. ती सर्व घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेऊन होती. तिला आश्चर्य वाटत होते की अजूनही याबाबतीत राजदरबारातून कसलेच स्पष्टीकरण कसे नाही आले याचे. जी चळवळ सुरवातीला जपानचा मानसन्मान परत मिळविण्यासाठी सुरु झाली ती आता बंड म्हणून कशी काय ओळखली जाऊ लागली त्याचेही तिला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. कुठल्याही क्षणी शहरात चकमकी उडतील अशी लक्षणे तिला दिसू लागली.
२८ तारखेला संध्याकाळी कोणीतरी दरवाजावर मोठमोठ्याने ठोठावले. तो आवाज ऐकून रिको दचकली. दरवाजाची खिट्टी काढताना तिला काचेतून उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्याची आकृती ओळखू आली. तिला ती खिट्टी उघडेना. तिने नेटाने प्रयत्न केल्यावर एकदाची ती उघडली. बाहेर शिंजी त्याच्या खाकी गणवेषात उभा होता. त्याचे बूट रस्त्यावरील बर्फाने माखले होते. आत येऊन त्याने दरवाजाची कडी परत लावली. त्याने असे आजपर्यंत कधी केले नव्हते.
‘‘या ! या !’’ तिने त्याचे स्वागत केले. तिने त्याला लवून वंदन केले पण आज त्याच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. तो कमरेची तलवार व अंगातील कोट काढायला लागल्यावर रिको त्याला मदत करण्यासाठी पुढे गेली. तो दमट झालेला कोट हाताळताना तिची तारांबळ उडाली पण तिने तो एका खुंटीला अडकवला. तो बूट काढेपर्यंत तलवार व चामडी पट्टा हातात पकडून ती तेथेच उभी राहिली. दिव्याच्या प्रकाशात तिला शिंजीचा भकास चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील तेज पूर्णपणे लोपले होते. नेहमी तो आल्याआल्या कपडे बदलून खाण्यासाठी रिकोच्या मागे लागला असता पण आज त्याने तसे काहीच केले नाही. गणवेष न काढता तो तसाच खाली मान घालून बसून राहिला. रिकोने त्याला जेवणाबद्दल विचारण्याचे टाळले व
तिही तेथे तशीच उभी राहिली.
शेवटी बऱ्याच वेळानंतर ले. शिंजीने त्याचे तोंड उघडले.
‘‘मला काहीच माहीत नव्हते. त्यांनी काही मला त्यांच्यात सामील होण्याचा आग्रह केला नव्हता. बहुदा आपले नुकतेच लग्न झाले असल्यामुळे असावे कदाचित. कानो, होम्मा आणि यामागुची !’’
रिकोच्या नजरेसमोर त्या तिघांचेही चेहेरे चमकून गेले. ते ले. शिंजीचे सहकारी व जवळचे मित्र होते व अनेकदा त्यांच्या घरी येऊन गेले होते.
‘‘उद्याच राजाज्ञा जारी होईल. त्यात या तिघांची नावे बंडखोर म्हणून जाहीर होतील बहुतेक. मलाच सैनिकांची एक तुकडी घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याची आज्ञा मिळेल असे वाटते....मी नाही ते करु शकत. शक्यच नाही रिको !’’
‘‘त्यांनी मला आजची रात्र घरी काढण्यास फर्मावले आहे. उद्या मला त्या मोहिमेवर जावे लागेल. ते करणे मला शक्यच नाही...’’
ते ऐकताना रिको ताठ उभी राहिली. तिचे डोळे जमिनीवर खिळले होते. तिच्या अंगावर काटा आला. या सगळ्याचा अर्थ तिला चांगलाच माहीत होता.
ले. शिंजीच्या डोळ्यात कसलातरी निश्चय दिसत होता. त्याच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द जणू अटळ मृत्युच्या जबड्यातून उमटत होता. त्या अंधाऱ्या पार्श्र्वभूमीवर ते शब्द अधिकच जड वाटत होते. ले. शिंजी त्याच्या द्विधा मनस्थितीबद्दल बोलत असला तरी अंतिम निर्णयाबद्दल त्याच्या मनात कसलीही शंका नव्हती. बर्फाच्या स्वच्छ पाण्यासारखा त्याचा निर्णय स्वच्छ होता. दोन दिवसाच्या धावपळीनंतर आज स्वत:च्या घरात त्याच्या सुंदर पत्नीकडे पहात असताना त्याचे मन एकदम शांत झाले कारण ती काही बोलली नसली तरी तिच्या डोळ्यात शब्दांच्या पलिकडे कठोर भाव उमटला होता.
‘‘ठीक आहे मग !....’’ ले. शिंजीचे डोळे विस्फारले. त्याच्या डोळ्याच्या बाहूल्या मोठ्या झाल्या. दोन दिवसातील धावपळीच्या कष्टाने व झोप न मिळाल्यामुळे मलूल झालेल्या त्याच्या डोळ्यात आता चैतन्य पसरले. त्याने प्रथमच रिकोच्या डोळ्यात रोखून पाहिले.
‘‘आज रात्री मी सेपकू करेन’’ तो म्हणाला.
रिकोची पापणीही लवली नाही. तिच्या मासोळीसारख्या डोळ्यातील ताण आता स्पष्ट दिसू लागला होता.
‘‘मी तयार आहे. तुमच्याबरोबर येण्याची मला फक्त तुमची परवानगी हवी आहे.’’
तिच्या डोळ्यातील निश्चयाने तो मंत्रमुग्ध झाला. या एवढ्या महत्वाच्या गोष्टीवर एवढ्या सहज बोलता येते हे पाहून त्याचा त्यालाच विस्मय वाटला.
‘‘ठीक आहे रिको आपण दोघेही हे जग सोडून जाऊ. माझी परवानगी आहे तुला. पण माझ्या आत्महत्येची साक्षीदार म्हणून मला तू पाहिजे आहेस. चालेल तुला ?’’
त्याने हे म्हटल्यावर दोघांच्याही ह्रदयात भावना उचंबळून आल्या. त्याने तिच्यावर एवढा विश्र्वास दाखविल्यामुळे आपल्या नवऱ्याबद्दल रिकोला जास्तच आदर वाटू लागला. त्याच्या मृत्युचा साक्षीदार हा एक सेपकूचा महत्वाचा घटक होता. सेपकू दरम्यान काही वावगे घडायला नको म्हणून कोणीतरी ती संपूर्ण प्रक्रिया बघणे अत्यंत आवश्यक असे. हा विश्वास त्याने त्याच्या बायकोवर टाकला होता व त्याहुनही महत्वाचे म्हणजे त्याला स्वत:च्या आधी त्याच्या पत्नीला मारायचे नव्हते. जर ले. शिंजीचा त्याच्या पत्नीवर विश्वास नसता तर त्याने अर्थातच तिला अगोदर ठार केले असते व मग त्याने आत्महत्या केली असती. पण त्याचा तिच्यावर प्रचंड विश्वास होता हेच खरं.
जेव्हा रिकोने त्याची परवानगी मागितली तेव्हा ले. शिंजीला मोठे समाधान वाटले. पहिल्या रात्री व त्या नंतर अनेक वेळा त्याने तिला बुशिडोचा धर्म शिकवला होता व जेव्हा तिच्यावर अशी वेळ येईल तेव्हा तिला काय वाटते ते स्पष्टपणे बोलण्याचे तिच्या मनावर ठसवले होते. ते सर्व आठवून ले. शिंजीला स्वत:च्या बायकोचा अभिमान वाटला. थोडक्यात त्याच्या पत्नीने जी परवानगी मागितली होती ती केवळ त्याच्यावरील प्रेमापोटी नसून उत्स्फूर्तपणे मागितली होती. दोघांच्याही मनात बहुधा हेच विचार चालले होते म्हणूनच त्यांनी एकमेकांकडे बघत स्मितहास्य केले. रिकोला तर तिच्या लग्नाच्या संध्याकाळची आठवण झाली. तिच्या डोळ्यात आता मृत्युची ना भीती होती ना वेदना. तिच्या नजरेसमोर एक निर्विकार अथांग पोकळी पसरले होती जी तिला हवीहवीशी वाटत होती.
‘‘पाणी गरम आहे. तुम्ही आत्ता आंघोळ करणार आहात का ?’’
‘‘हो ! करणार तर !’’
‘‘आणि जेवण....?’’
हे संभाषण इतके सहजपणे चालले होते की ले. शिंजीला जे झाले तो सगळा भ्रम होता की काय असे वाटू लागले.
‘‘मला नाही वाटत आपल्याला जेवणाची गरज भासेल. पण थोडीशी साके गरम करशील का ?’’
‘‘तुम्ही म्हणाल तसं !’’
रिको उठली व कपाटातून स्नानाचे वस्त्र काढताना तिने त्याचे लक्ष कपाटाकडे वेधले. ले. शिंजीने उठून त्याने कपाटात पाहिले तर त्या कप्प्यात अनेक पुडकी व्यवस्थित नावे लिहून ठेवली होती. या तिच्या धैर्याचा त्याला मुळीच विषाद वाटला नाही. त्याचे ह्रदय तिच्यावरील प्रेमाने उचंबळून आले. एखादी नवविवाहिता जशी तिची खरेदी तिच्या नवऱ्याला दाखविते व नवऱ्याला तिचे कौतुक वाटतं तसेच ले. शिंजीला वाटले व त्याने मागून आपल्या पत्नीला मिठी मारली व तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकले.
रिकोला त्याच्या खरखरीत गालाचा स्पर्ष तिच्या मानेवर जाणवला. हा स्पर्ष म्हणजे तिचे जगच होते. दुर्दैवाने तो स्पर्षच आता या जगातून जाणार होता. त्या स्पर्षाने तिच्या अनेक आठवणी परत एकदा जाग्या झाल्या आणि ती जराशी हळवी झाली. अशा प्रत्येक क्षणांमधे एक विलक्षण ताकद होती व त्या आठवणी तिच्या शरीरातील भावभावना चेतावत होत्या. ले. शिंजी तिला मागून कुरवाळत असतानाच तिने आपल्या टाचा उंच केल्या व शरीराला एक सुंदर बाक देऊन तो आनंद आपल्या शरीरात शोषून घेतला.
‘‘पहिल्यांदा आंघोळ करतो मग थोडीशी साके.....वरच्या खोलीत गादी अंथरशील का ? त्याने तिच्या कानात कुजबुजत विचारले. रिकोने काही न बोलता मान हलविली.
आपला गणवेष भिरकावून ले. शिंजी स्नानगृहात गेला. आतून पाण्याचा आवाज येऊ लागल्यावर तिने शेगडीतील कोळसे साके गरम करण्यासाठी जरा फुलविले. त्याचे कपडे घेऊन रिकोने स्नानगृहाचा दरवाजा उघडला. आत वाफेच्या धुरकट वातावरणात ले. शिंजी खाली बसून दाढी करत होता. त्याच्या हाताच्या हालचालींना त्याच्या पाठीचे कणखर स्नायू प्रतिसाद देत होते ते पाहून तिला हसू आले.
आज काहीतरी विशेष घडणार आहे असे कोणाला सांगितले असते तर त्यांना ते खरे वाटले नसते इतके सगळे नेहमीप्रमाणे चालले होते. काम करताना ना तिच्या हाताला कंप सुटला होता ना तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते. अर्थात हे वरवर. त्यांच्या मनात काय चालले असेल हे कोणी सांगू शकत नाही. तिच्या ह्रदयाची धडधड मात्र वाढली होती. तिला त्याची लय नेहमीपेक्षा विचित्र वाटत होती हे खरे. ते एकदम जोरात धडधडू लागे तर दुसऱ्याच क्षणी एकदम बंद पडल्यासारखे शांत होई. हे एवढे सोडल्यास सगळे नेहमीप्रमाणेच चालले होते.
दोन दिवसांच्या ताणामुळे दुखत असलेले ले. शिंजीचे अंग त्या गरम पाण्याने शेकून निघत होते. ज्याने त्याच्या मनातील खळबळही शांत झाली. त्याचे मन निर्विकार झाले व पुढे येणाऱ्या रतिसुखाच्या कल्पनेने परत ताळ्यावर आले. बाहेर रिको काम करीत होती आणि त्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. तो थोडासा बेचैन झाला खरा पण त्याने लगेचच स्वत:ला सावरले. मृत्यु डोळ्यासमोर दिसत असताना ले. शिंजीला आजवरच्या सुखात काही कमी पडले नव्हते याची खात्री वाटत होती. त्या दोघांच्याही मनात हे सगळे परमेश्र्वराच्याच कृपेने साध्य झाले होते याबद्दल तिळमात्र शंका नव्हती. आता मृत्युसमोर त्यांना एकमेकांच्या आधाराने अत्यंत सुरक्षित वाटत होते. त्यांच्या नजरेतच दिसत होते ते. मृत्युवर विजय मिळविण्यासाठी त्यांच्याकडे त्यांची नैतिकता, धर्म, प्रामाणिकपणा, एकमेकांबद्दल वाटणारी आसक्ती व स्वामीनिष्ठा अशा अनेक कवचांची मदत होत होती हे नाकारण्यात अर्थ नव्हता. तिच्याबद्दल वाटणारी अनावर आसक्ती आणि स्वामीनिष्ठा यामधे मनामधे चालणाऱ्या द्वंद्वाबद्दल त्याने शेवटी असे अनुमान काढले होते की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
त्याने तडकलेल्या व वाफेने धुरकटलेल्या आरशात त्याचे तोंड खुपसले व मोठ्या काळजीपूर्वक त्याने दाढी घोटण्यास सुरुवात केली. कुठेही डाग दिसायला नको. शेवटी त्याचा चेहरा चमकायला लागल्यावर अधिकच तरुण दिसायला लागला. त्या काळवंडलेल्या आरशालाच जणू त्याच्या चेहऱ्याने चमक आणली.
आत्ता दिसत होता तोच चेहरा त्याच्या मृत्युला दिसणार होता. खरे सांगायचे तर तो चेहरा त्याच्या शरीरावरुन केव्हाच अंतर्धान पावून त्याच्या पुतळ्यावर बसला होता. हो त्याच्या स्मारकाच्या पुतळ्यावर. त्याने प्रयोग म्हणून त्याचे डोळे घट्ट मिटले. सगळीकडे काळोख पसरला होता आणि तो जिवंत नव्हता....
स्नानगृहातून त्याने शेगडीजवळ बैठक जमविली. त्याने पाहिले तर तेवढ्या कामाच्या घाईगर्दीतही रिकोने वेळ काढून तिच्या मुखकमलावर प्रसाधनाचा माफक वापर केला होता. तिचे गाल टवटवीत दिसत होते तर ओठ ओलसर. आपल्या सुंदर प्रेमळ पत्नीकडे पाहताना अशी स्त्री आपण पत्नी म्हणून निवडल्याबद्दल त्याला अभिमान वाटला.
हातातील भांड्यातील साके संपत आल्यावर त्याने ते रिकोच्या हातात दिले. रिकोने आजवर साकेची चव घेतली नव्हती पण यावेळी मात्र तिने त्यातील एक घोट घेतला.
‘‘ इकडे ये !’’ ले. शिंजी म्हणाला.
रिको शिंजीच्या बाजूला आल्यावर त्याने तिला मिठीत ओढले व मांडीवर ओणवे केले. तिचा ऊर भीती, दु:ख, समाधान, आवेग अशा अनेक भावनांनी धडधडत होता व त्याची स्पंदने शिंजीला जाणवत होती. त्याने प्रेमार्द्र नजरेने रिकोच्या चेहऱ्याकडे पाहिले. या जगात नजरेस पडणारा हा आता शेवटचाच चेहरा. तिने तिचे ओठ घट्ट मिटले होते व तिची नजर खाली झुकली होती. शिंजीने अलगद तिच्या ओठावर आपले ओठ टेकवून तिचे चुंबन घेतले. तेवढ्यात तिच्या लांबसडक पापण्यातून हुंदके अश्रूंच्या रुपात गालावर ओघळले. क्षणभर तेथे स्तब्धता पसरली. थोड्यावेळाने जेव्हा ले. शिंजीने ‘वर जाऊया’ असे सुचविले तेव्हा तिने जरा आवरुन व स्नान करुन येते असे सांगितले. ले. शिंजीने मग एकट्यानेच वरची खोली गाठली. तेथे वातावरण ऊबदार होते. त्याने स्वत:ला त्या सतरंजीवर लोटले व तंगड्या ताणल्या. हाही दिनक्रम इतर दिवसांसारखाच पार पडला. हाताची घडी करुन त्याने त्याची उशी केली व त्या अंधुक प्रकाशात गडद छताकडे आपली नजर लावली. तो मृत्युची वाट पहात होता का विचार करत होता? का गात्रागात्रातून पसरलेल्या समाधानाने तो तृप्त झाला होता? ती तॄप्ती आणि मृत्यु यात त्याला फरक करता येईना. ते काही असले तरीही एक मात्र त्याने मान्य केले. ‘एवढे मोकळे त्याला आजपर्यंत कधीच वाटले नव्हते.’’
बाहेर एका गाडीचा आवाज आला. बर्फात त्या गाडीच्या घसरत जाणाऱ्या चाकांचा आवाज त्याने ओळखला. केव्हा हा बर्फ वितळणार आहे कोणास ठाऊक ? तो मनाशी म्हणाला खरे पण त्यातील फोलपणा त्याच्या लक्षात आला. त्या खोलीच्या बाहेरील आवाज ऐकत त्याच्या मनात आले, ‘एखाद्या तलावात मधेच उगविलेल्या बेटासारखी ही खोली त्या गजबजलेल्या जगात उभी आहे. त्या जगात सगळे काही नेहमीप्रमाणे चालले आहे पण या बेटावर मात्र शांतता आहे.’’ अवतीभोवती त्याचा देश पसरला होता ज्यासाठी त्याच्या ह्रदयात वेदना होत होत्या. त्याच्यासाठी तो मृत्युला कवटाळणार होता. पण ज्या देशासाठी तो आपले जीवन संपविणार होता त्याला त्याच्या त्यागाची जाणीव असेल का ? त्याला त्याचे उत्तर माहीत नव्हते. त्यालाच काय कोणालाच माहीत नव्हते. अर्थात त्याने आता काहीच फरक पडणार नव्हता म्हणा. त्याच्या या युद्धभूमीवर ना पराक्रमाला जागा होती ना शौर्याला. ना पराभव ना विजय !
पायऱ्यांवर रिकोच्या पावलांचा आवाज झाला. त्या जुन्या घरातील उंच पायऱ्याही कुरकुरत होत्या. त्या कुरकुरणाऱ्या पायऱ्यांच्या आवाजाशी त्याच्या कित्येक रात्रीच्या आठवणी जोडलेल्या होत्या. बिछान्यावर असेच वाट पाहताना तो आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न तो करे व तिच्या पायरवाचा व त्या पायऱ्यांच्या कुरकुरण्याचा आवाज वेगळा करण्याचा मनातल्या मनात प्रयत्न करीत असे. त्या क्षणांच्या रत्नातील अंतर्भाग येणाऱ्या क्षणांच्या प्रकाशाने उजळून निघे.
रिकोने आज कमरेभोवती युकाटावर नोगोया ओबी परिधान केला होता. शिंजी त्याला हात घालणार तेवढ्यात रिकोनेच ते कापड सोडून टाकले. ते सुळ्ळकन जमिनीवर जाऊन पडले. ती त्याच्या समोर उभी असतानाच शिंजीने तिच्या किमोनोच्या बाह्यांच्या खाली असलेल्या फटीतून त्याचे दोन्ही हात घातले व तिला जवळ ओढले. त्याच्या हाताला तिच्या शरीराचा स्पर्ष झाल्याझाल्या त्याची गात्रे पेटून उठली.
काहीच क्षणात ते दोघेही खाली सतरंजीवर नग्नावस्थेत कोसळले. शेजारीच शेकोटीत अंगारे फुलले होते तर इकडे...
कोणीच बोलत नव्हते पण त्यांची शरीरं, धडधड करणारी ह्रदयं, बोलत होती. ही शेवटची वेळ आहे हे त्या दोघानांही चांगलेच माहीत होते. त्याने भावना अनावर होऊन तिला जवळ ओढले व तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. प्रणयसुखामुळे मृत्युचा विचार मागे पडला...
‘‘मला जरा तुझ्याकडे शेवटचे नीट पाहू दे’’ ले. शिंजी म्हणाला. त्याने शेजारचा दिवा तिच्यावर ओढला आणि तिचे बांधेसूद नग्न शरीर तो मोठ्या प्रेमाने न्याहाळू लागला. रिको डोळे मिटून स्तब्ध पडली होती. त्या दिव्याच्या प्रकाशात तिच्या गोऱ्यापान शरीराची वळणं मोठी सुबक दिसत होती. त्या सौंदर्याला स्पर्षही न करता ले. शिंजी काहीतरी अदभूत पाहिल्यासारखे एकटक तिच्याकडे पहात राहिला. त्याच्या मनात आले, ‘‘या सौंदर्याचा मृत्यु तो पाहू शकलाच नसता.’
ते दृष्य डोळ्यात साठविण्यासाठी ले. शिंजीने बराच वेळ घेतला. एका हाताने त्याने तिचे केस कुरवाळले तर दुस़ऱ्या हाताने त्याने तिचा चेहरा कुरवाळला. मधून मधून तो तिची आवेगाने चुंबनेही घेत होता. तिचे कपाळ, मिटलेले डोळे, लांबसडक झुकलेल्या पापण्या, कोरलेल्या भुवया, इवलेसे पण पांढरेशुभ्र दात, मोहक हास्य, दमट ओठ, साईसारखे मऊ गाल, छोटीशी हनुवटी व त्यावरील खळी या सर्व गोष्टी एखाद्या जादूप्रमाणे त्याच्या मनात वारंवार प्रकट होत होत्या व उत्तेजित होत तो तिच्या गळ्यावर त्याचे ओठ टेकत होता. थोड्याच क्षणात त्याला उमगले की याच गळ्यात ती तिचा खंजीर खुपसणार होती. तो विचार मनात आल्यावर त्याचा आवेग थोडा कमी झाला खरा पण त्याच विचाराने त्याने तिच्या गळ्यावर परत एकद हळुवारपणे ओठ टेकले. जेथे त्याची दृष्टी जाई तेथे त्याचे ओठ पोहोचू लागले. डोळे मिटल्यावर त्याला जग एखाद्या हिंदोळ्यावर झोके घेत आहे असा भास होऊ लागला. त्याने मोठ्या कष्टाने त्याचे डोळे उघडे ठेवले.
तेवढ्यात रिकोच्या शब्दांनी तो भानावर आला. ‘‘आता मला एकदा तुम्हाला डोळे भरुन पाहुदेत. शेवटचे !’’ ले. शिंजीला रिको एवढ्या ठामपणे बोललेली आठवत नव्हते. आजवरच्या संस्कारात दबलेले तिचे मन आता बंड करुन उठले. ले. शिंजीनेही तिची आज्ञा पाळली व आपले शरीर तिच्या स्वाधीन केले....
क्रमशः
मूळ लेखक : मिशिमा युकिओ उर्फ किमिटाके हिराओका.
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
11 Feb 2016 - 11:50 pm | मयुरMK
ह्या बद्दल नँशनल जोग्राफीक वरच्या टॅबू सिरीज मध्ये पहिले आहे बहुतेक
11 Feb 2016 - 11:51 pm | मयुरMK
अनुवाद +1
12 Feb 2016 - 12:00 am | एस
वाचतोय. पुभाप्र.
12 Feb 2016 - 1:48 am | यशोधरा
वाचते आहे..
12 Feb 2016 - 7:03 am | प्रचेतस
कालच तुमची आठवण काढली होती आणि लगेच हा लेख आला.
उत्कृष्ट कथा. पुभाप्र.
12 Feb 2016 - 8:26 am | जयंत कुलकर्णी
धन्यवाद वल्ली...
आठवण चांगली असेल असे गृहीत धरतो.... :-) :-)
12 Feb 2016 - 9:10 am | बोका-ए-आझम
जयंतकाका, त्या इस्लामवरच्या लेखमालेचं काय झालं? त्याचा एकच लेख वाचायला मिळाला.
12 Feb 2016 - 9:16 am | कंजूस
इकडे मराठीत आणल्याबद्दल धन्यवाद.
अनुवाद चांगलाय.
12 Feb 2016 - 11:16 am | जव्हेरगंज
अरे वा!!!
फार सुंदर!!
मेजवाणीच की!!
वाट बघतोय!!!!
12 Feb 2016 - 11:35 am | प्रीत-मोहर
वाचतेय
पुभाप्र
12 Feb 2016 - 12:15 pm | जेपी
वाचतोय..
पुभाप्र.
12 Feb 2016 - 12:15 pm | जेपी
वाचतोय..
पुभाप्र.
13 Feb 2016 - 11:27 pm | इशा१२३
वाचतेय पुभाप्र.
15 Feb 2016 - 4:25 pm | पैसा
वाचते आहे. वाचून पचवणे कठीण आहे तरीही...