“सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा !”
पाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आवडली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली.
खरंच किती सुंदर कल्पना आहे. गाणं म्हणत जगायचं ….प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन गाणं.. आणि त्या गाण्याला जिवंत करतो आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपले अनुभव! जेष्ठ कवियित्री शांता शेळके यांनीही म्हणून ठेवलंच आहे , “जीवनगाणे गातच राहावे …”
आयुष्यात असे कितीतरी दिवस येतात, जे आपल्यासाठी सुंदर अनुभव घेऊन येतात, त्या दिवशी आपण एक सुंदर गाणं गायलेलं असतं, स्वतःच्याच धुंदीत, स्वतःच्याच तालात, आजूबाजूचे सर्व काही विसरून !! हे असे क्षण साठवून ठेवता आले तर ..पुन्हा जगण्यासाठी… ?
असाच एकदा वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता. तसे लेख काय बरेच येत असतात. आपण ते वाचतो आणि छान आहे किंवा काही खास नाही म्हणून बाजूला ठेवतो. पण हा लेख विशेष होता. एकतर, माझी खूप आवडती लेखिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर हिचा तो लेख होता. का, कुणास ठाऊक, पण त्या लेखातल्या शेवटच्या काही ओळी मनात रेंगाळत राहिल्या …
“पायवाट खाचखळग्यांची…
आपण चालत राहायचं….
आणि हळूच मागे वळून पहायचं…
प्रत्येक पाउलवाटेवर रेंगाळतो तो, तो क्षण…
कित्येक खुणांवर मिळतात ते, ते संदर्भ …
हे सगळं मनात साठवायचं …आणि मग पुढची दिशा ठरवायची ….”
प्रत्येक पाउलवाटेवर रेंगाळतो तो, तो क्षण….
किती सुंदर विचार आहे..अरेच्चा ! आपण असा विचार केलाच नाही कधी.
मागच्याच वळणावर पारिजातकाचा सडा पडला होता. आपण ती फुलं ओंजळीत घेतली..दोन क्षण थांबलो तेथे…फुलांचा घमघमाट होताच पण आजूबाजूच्या वेलींवर आणि झाडांवरही नजर टाकली आणि मग पुढे निघालो ….
हा सुंदर क्षण रेंगाळत असेल का अजूनही त्या वळणावर …??
मागे पडलेल्या क्षणांची मुद्दामहून आठवण येण्याचा प्रश्नच नाही. आपल्याकडे वेळच कुठे असतो तेवढा ? आपल्याला सदा पुढे पळायची घाई . स्पर्धेत मागे पडू ही भीती. मग असे हे छान क्षण फक्त मनात साठवून ठेवतो आपण पण वेळेअभावी ते कधी आठवूनही बघत नाही. मग हळूहळू अशाच अनेक क्षणांची साठवण होत राहते आणि जुन्या आठवणी धूसर होत जातात. इतके की आपण आठवायला जातो पण ते आठवणींच्या पडद्यावरही उमटत नाहीत. मग आपण सहज बोलून जातो, “माझी मेमरी फार वीक आहे हो !”
माझंही काही वेगळं नाही. शहरातील ‘फास्ट लाईफ’ मध्ये रुळलेल्या मलाही स्वतःकरता वेळ काढणं कुठे शक्य होतं ? पण तसं पाहायला गेलं तर खरं तर स्वतःकरताच करतो आपण….स्वतःच्याच कुटुंबासाठी करतो….स्वतःसाठी नोकरी करतो, स्वतःसाठी स्वयंपाक करतो.. स्वतःसाठीच ब्यूटीपार्लर मध्ये जातो ….बाहेरची स्पर्धा आणि जगाच्या मागे पडण्याची आपली भीती आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी आपण निर्माण केलेलं आपलं ‘बिझी रुटीन’ !
नाही, चुकीचं काहीच नाही त्यात…कारण शेवटी जगायचं आहे आपल्याला या जगात ! पण स्वतः साठी इतकं सगळं करताना दिवसातून एकदातरी पारिजातकाच्या फुलांचा तो क्षण आपण स्वतःसाठी आठवून बघतो का? आजूबाजूचं सगळं विसरून पुन्हा एकदा तो क्षण जगतो का? ‘गाणं म्हणत’ आयुष्य जगणं म्हणजे तरी आणखी काय असतं?
आज हे लिहिण्याच्या निमित्ताने असेच पारिजातकाच्या सुगंधाचे माझ्या आयुष्यातले क्षण जागे झाले आहेत…काही इतके कोमल की अगदी जपूनच उलगडावेत…तर काही इतके अवखळ की वाहत्या पाण्यासारखे फक्त हाताचा तळवा ओला करणारे ..आणि काही डोळ्यांत हसू आणि आसू दोन्हीही आणणारे..काही फक्त हसणारे आणि हसवणारे ….काही पुन्हा नवे स्वप्न पहायला लावणारे …आणि काही अगदी पारिजातकाचा सुगंध आणि स्पर्शही बरोबर घेऊन येणारे….प्रेमळ, हळुवार…माझ्या आजीसारखे …!
आजीबरोबर घालविलेले क्षण खरंच सुगंधी होते..त्या क्षणांनीच आमचं आणि आजीचं नातं समृद्ध केलं. आजीने सांगितलेल्या गोष्टी…..आम्ही तिची केलेली मस्करी …आई ओरडल्यावर “असू देत गं, मला चालतं.” अशी आजीने आमची घेतलेली बाजू….रात्री जेवल्यावर तिच्या पदराला पुसलेले हात….तिचा खरखरीत हात आणि तिचं तोंडभर हसू …ह्या सुंदर क्षणांनी आमच्याभोवती तितक्याच मजबूत पण तलम अशा रेशीमगाठी कधी बांधल्या हे आमचं आम्हालाही कळलं नाही…आजी आम्हा सगळ्या नातवंडांची मैत्रीणच होऊन गेली. …आज आजी नाही …पण तिच्याबरोबर घालविलेल्या ह्या क्षणांच्या रूपाने ती आम्हाला आयुष्यभराचं देणं देऊन गेली आहे…
असेच काही अवखळ क्षणही होते..ते जगच वेगळं असतं…फुलपाखरासारखं स्वच्छंदी….मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, बहिणींबरोबर केलेल्या खोड्या, भांडणं, चिडवणं, गप्पा मारत एकत्र जागवलेल्या रात्री…एकत्र फिरायला जाणं आणि ‘सिक्रेट्स’ शेअर करणं, पावसात भिजून घरी येणं आणि मग आईचं रागावणं, गावाला गेल्यावर सतत मस्ती करून आजोबांचा ओरडा खाणं..नदीच्या पाण्यात डुंबत राहणं…. आगरातल्या नारळांच्या वाळलेल्या झावळ्या गोळा करून नदीच्या काठी स्वतःची झोपडी बांधणं….मग पुन्हा आजोबांचा ओरडा …
आता आजोबा नाहीत आणि आता मैत्रिणी आणि बहिणींबरोबर बोलताना त्यांची फक्त चौकशी करण्यापुरताच वेळ असतो …तोही काढावा लागतो…….मग एखाद्या आळसावलेल्या क्षणी असेच पूर्वीचे क्षण जागे होतात, जिवंत होतात…आणि पुन्हा आजोबांचा आवाज ऐकू येतो, मैत्रिणींशी हितगुज होते आणि बहिणींबरोबर ती लुटूपुटुची (पण तेव्हा खरी वाटलेली ) भांडणं होतात….
काही कोमल क्षणही आले आयुष्यात ! प्रत्येकाच्याच आयुष्यात ते येतात आणि प्रत्येकालाच ते ‘स्पेशल’ वाटतात. अगदी त्याच्याच साठी निर्माण केलेले…एका अनोळखी व्यक्तीची आपल्या आयुष्यात अचानक लागलेली चाहूल..अशाच कुठल्यातरी क्षणी आपण त्याला भेटतो, बघतो..त्याचं बोलणं, त्याचं हसणं कुठेतरी भूल घालतंच आपल्याला… मग तशाच कुठल्यातरी क्षणी आपणही त्याला भूल घालतो …त्यानंतरचे अनेक क्षण..एकमेकांबरोबर घालविलेले …एकमेकांपासून दूर असतानासुद्द्धा एकत्र स्वप्न बघितलेले… एकमेकांच्या भेटीची आणि पुसटत्या तरी स्पर्शाची आशा लागून राहिलेले…काही क्षण…एकमेकांवर रागावलेले आणि त्यापुढचे काही क्षण एकमेकांची समजूत काढताना हळूच डोळ्यांतील पाणी लपविलेले …असेच अनेक, असंख्य क्षण एकमेकांची वाट बघितलेले…आणि असेच काही क्षण एक सुंदर, नाजूक नातं फुलताना त्याचे साक्षीदार झालेले …काही क्षण…आयुष्य बदलून टाकणारे..
हे असे क्षण मनाच्या कप्प्यात कधी दडून बसतात कळतच नाही…
बरेचदा मला असं वाटतं की आपलं एखाद्याशी नातं जितकं गहिरं असतं ना, तितकेच त्या नात्याशी जोडले गेलेले क्षण अधिक उत्कट असतात, भावूक असतात…ते नेहेमीच असतात आपल्या मनात पण ज्या क्षणी ते पुन्हा जिवंत होऊन मनाच्या पटलावर उमटतात, त्याक्षणी आपल्या नात्यांचा गहिरेपणा अश्रू बनून आपल्या डोळ्यांवाटे बाहेर येतो…
कदाचित म्हणूनच आपण आपले आई-वडील आणि आपली मुले ह्यांच्याबरोबरच्या आपल्या आठवणी नेहेमीच भावूक असतात, आपल्याला हळवं करून जातात. त्यांच्याबरोबर घालविलेले क्षण आनंदी, उत्साही, खट्याळ, मजेत हसलेले असतीलच पण नात्याच्या गहीरेपणामुळे मनाचा एक कोपरा इतर भावनांचाही आधार घेऊ पाहतो. त्यामुळे त्या आनंदी क्षणांनाही हळवेपणाची किनार असते. आई-वडिलांबरोबर व्यतीत केलेले क्षण काय देत नाहीत आपल्याला? प्रेम, आनंद हे शब्द अपुरेच आहेत त्यासाठी. ते क्षण कायम सोबत करतात आपली …अगदी आयुष्यभर. आयुष्यात ज्या वेळी आपल्याला आधाराची गरज भासते, त्या वेळी आई-वडिलांबरोबर घालविलेले क्षण आणावेत डोळ्यांसमोर. डोळे मिटून ते क्षण नुसते पुन्हा जगले तरीही आपल्याला बळ मिळतं परिस्थितीला सामोरं जाण्याचं. कारण त्या क्षणांच्या रूपाने ते आपल्याला खरंच भेटलेले असतात. जगाच्या पाठीवर कुठेही असतील तरीही त्या क्षणांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवून गेलेले असतात. आई-वडिलांसोबतचे क्षण ही आपली आयुष्यभराची कमाई असते, ठेव असते.
आपल्याला जन्म देणारे आई-वडील आणि आपण जन्म दिलेले मूल…खरं तर एकाच समान धाग्याने बांधले गेलेले. तरीही त्यांच्यासोबतचे क्षण किती वेगवेगळे रंग घेऊन येणारे. मुलांसोबतचे क्षण हे त्यांच्यासारखेच निरागस, खट्याळ, भविष्याची सुंदर स्वप्ने पाहायला लावणारे, काळजी करायला लावणारे, त्यांची प्रगती पाहून हळूच डोळ्यांच्या कडा ओलावणारे आणि त्यांच्या जन्मामुळे आपला जन्म सार्थकी लागल्याची जाणीव करून देणारे…
खरंच आयुष्य किती वेगवेगळ्या रंगाच्या आणि ढंगाच्या क्षणांनी सजलेलं असतं. या कडू-गोड क्षणांच्याच आठवणी बनतात आणि आपल्याला कायम साथ देतात. गरज असते ती फक्त आपल्या मेंदूतला आठवणींचा कप्पा घासून-पुसून लख्ख ठेवण्याची. आरशासारखा स्वच्छ असेल तर आठवणीतील क्षण आपल्याला हवे तेव्हा त्या आरशावर आपण उमटवू शकतो पण स्वच्छ नसेल तर मात्र त्यावर काळाची कोळीष्टके बसतात आणि त्या क्षणांना तिथेच जखडून ठेवतात.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सुखाची आशा करत असतो. “आता पुढील आयुष्यात सुखाचे क्षण येतील” असं म्हणून आपले हातात असलेले क्षण पुढे ढकलत असतो. भविष्यातील क्षणांना सुंदर करण्यासाठी आपले वर्तमानातील क्षण खर्ची घालत असतो. पण हे सगळं असं असणं म्हणजेच आयुष्य असतं हे कुठे कळतं आपल्याला ? म्हणून तर आज समोर आलेले क्षण जगण्यापेक्षा आपण ते भविष्यातील सुखाची काळजी करण्यात घालवतो. ही इनव्हेस्टमेंट असली तरीही त्याचे रिटर्न्स मिळतील तेव्हा आपण असूच ह्याची हमी कोण देऊ शकणार ? ह्या वरच एक सुंदर चारोळी मागे एकदा वाचनात आली होती.
“मरताना वाटलं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं..
मला जगायचंय , मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं …”
का आपण ऊर फुटेस्तोवर धावत असतो ? का नाही मधेच थोडं थांबून मागे वळून पहात ? आपण मागे सोडून आलेले रंगीबेरंगी क्षण आपल्या आठवणींच्या रुपात तिथेच थांबलेले असतात आपल्यासाठी. का नाही आपण कधीच ते निवांत बसून पुन्हा एकदा जगून घेत?
रिकामा वेळ मिळाला की लगेच ऑफिसचं काम सुरु. कारण वीकेंड फ्री ठेवायचा असतो फॅमिलीसाठी. पण बायकोबरोबर गप्पा मारत शेवटची कॉफी कधी घेतलेली असते हे लक्षात राहतं कधी? मुलांबरोबर लपाछपीचा डाव रंगल्याचं कधी आठवतंय? पावसाळ्यानंतर घराला रंग देण्याचं प्लॅनिंग परफेक्ट असतं. पण मित्रांबरोबर पावसात चिंब भिजून त्यावर गरम वाफाळता चहा प्यायला होता, त्याला खूप काळ लोटलाय, तेव्हा आता याही पावसात पुन्हा ते सगळं जमवून आणायला हवं, हे प्लॅनिंग मात्र मागेच पडतं दरवेळी. काळे ढग बरसून गेल्यावर आपल्या कामासाठी आपण बाहेर पडतो आणि त्या घाईत आकाशात अवतरलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य बघायचं मात्र राहूनच जातं आपलं. कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलो होतो, आठवतंय? कधी बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडली होती ? लहानपणीची भांडणं आठवून कधी ओठावर हसू फुललंय ?नदीच्या पाण्यात डुंबण्यातली मजा, गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढण्याचा पराक्रम, गावाला भावंडांबरोबर एकत्र जागवलेल्या रात्री, अंगणात घातलेल्या अंथरुणावर झोपून रात्रीच्या अंधारात आकाशात लुकलुकणारे तारे बघताना अनुभवलेली शांतता, या आणि अशाच अनेक गोष्टींमुळे समृद्ध झालेलं आपलं बालपण….. आपला बँक बॅलेन्स कमी झाल्यावर चिंताग्रस्त होवून बसणारे आपण, आपल्यासारखं समृद्ध बालपण आपल्या मुलांना देता येईल का या विचाराने कधी कासावीस होतो? मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या महागड्या शिबीर आणि कॅम्प्स मध्ये पाठवताना त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मनसोक्त धमाल करण्यासाठी न्यायला गावच उरलेलं नाही, हे किती जणांच्या मनाला लागतं ?
आपल्या हातातल्या क्षणांना अर्थ देणं हे केवळ आपल्याच हातात असतं.
पहाट ही एक सुंदर, अनुभवण्याची गोष्ट ! पु. लं नी पहाटेबद्दल एक खूप सुंदर विचार लिहून ठेवलाय. ते माझ्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करते. ते म्हणतात, ” बरेच लोक पहाट बघायची म्हणून गजर लावून लवकर उठतात. पहाट ही अशी आयती बघायची गोष्टच नाही. पहाट म्हणजे, एक सुंदर मैफील रंगलेली असावी, गायकाच्या सुरांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले असावेत. वेळेचं भान हरपलेलं असावं, अशीच रात्र सरत जावी आणि अचानक समोर पहाट फुलताना दिसावी. ही खरी पहाट. ” खरंच आपण आपल्या हातात असलेल्या क्षणांमध्ये अर्थ ओतला तर आपणच किती नवनवीन अविष्कार घडवू शकू.
आयुष्यावर बोलण्याएवढी मी मोठी नाही. तरीही, माझ्या मते आयुष्य म्हणजे नुसतंच पुढे चालत राहणं आणि त्यासाठी आला दिवस ढकलणं नव्हे. स्पर्धेत गुदमरून जाणं नव्हे. ऊर फुटेस्तोवर धावणं नव्हे. फक्त पैसे कमावणं नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या टप्प्यावर, वळणावर होतच असतात, नव्हे त्या जगण्यासाठी आवश्यकच असतात. पण त्या आपल्या जगण्याचं कारण कधीही होऊ नयेत. कारण त्यामुळे आयुष्य एकांगी होतं, एकसुरी होतं. आयुष्य प्रवाही असावं, वाहत्या पाण्यासारखं. किनाऱ्यावरचे सगळे दगड-धोंडे आपल्या प्रवाहात सामावून ते पुढे वाहत नेणारं आणि प्रवाहात अडथळा आला तर आपली आपण वाट काढणारं. खळखळणारं, पारदर्शी…..जिवंत.
आणि त्यामुळेच जगण्यासाठी अजून बरीच कारणं असावीत आपल्याकडे. आपल्या वाट्याला आलेल्या क्षणांना पुढे ढकलण्यापेक्षा ते साजरे करावेत, जिवंत करावेत. कुठल्या ना कुठल्या भावनेचा ओलावा त्यात नक्कीच असावा. मग ते कोणतेही क्षण असतील, आनंदी, दु:खी, खट्याळ, लाजरे, स्वच्छंदी, महत्वाकांक्षी, हळुवार, प्रेमळ, निश्चयी ….अशा रंगीबेरंगी क्षणांची साठवण म्हणजेच आयुष्य असतं.
काही वर्षांपूर्वी आलेला एक हिंदी मूव्ही- ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’. त्यातील एक गाजलेली कविता / विचार . प्रसिद्द्ध जेष्ठ कवी श्री जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेली आणि खूप भावून गेलेली….
“दिलो में तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम !.
नजर में ख्वाबो की बिजलीया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम !
हवा के झोको के जैसे आझाद रहना सिखो
तुम एक दरीया के जैसे लेहेरो में बेहना सिखो
हर एक लम्हे से मिलो तुम खोले अपनी बाहे
हर एक पल एक नया समा दिखाये
जो अपनी आंखोमे हैरानिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम !
दिलो में तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम !.”
प्रतिक्रिया
29 Sep 2015 - 6:05 am | एस
छान लिहिलंय.
बदल हाच जीवनाचा स्थायीभाव असल्यामुळे तुमच्याआमच्या बालपणी जे होतं ते आत्ताच्या पिढीलाही मिळालं असतं तर, हा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? बालपणीच्या काही आठवणी रम्य होत्या. आता ती परिस्थिती आपल्या मुलांना अनुभवण्यास मिळू शकणार नाही हे जरी खरं असलं तरी त्याबरोबर्च त्या काळातले मुख्यत्वे आर्थिक व सामाजिक प्रश्नही आता तितके तीव्र राहिलेले नाहीत हेही समजून घ्यायला हवे ना. पूर्वी तुटकी स्लीपर पुनःपुन्हा शिवून दोनदोन वर्षं वापरली जायची. आज मुलाचे कपाट महागड्या शूजने भरून गेलेलं असतं. ही झळतर त्यांना बसू देत नाही आपण. सो तेव्हाचंही चांगलंच होतं, आत्ताही आहे हेही चांगलंच आहे असं मानून पुढे चालत राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
29 Sep 2015 - 6:11 am | चाणक्य
अगदी खरंय स्वॅप्स. मला तर 'आमच्या वेळी.....' असा सूर कोणी लावला की त्याला ओरडून सांगावंस वाटतं की बाबा 'आत्ताची' वेळ पण चांगलीच आहे. गाडी रिअर व्ह्यू मिरर मधे बघत नाही तर पुढे बघत चालवायची असते.
29 Sep 2015 - 6:11 am | चाणक्य
अगदी खरंय स्वॅप्स. मला तर 'आमच्या वेळी.....' असा सूर कोणी लावला की त्याला ओरडून सांगावंस वाटतं की बाबा 'आत्ताची' वेळ पण चांगलीच आहे. गाडी रिअर व्ह्यू मिरर मधे बघत नाही तर पुढे बघत चालवायची असते.
29 Sep 2015 - 9:30 pm | rutusara
चाणक्य,
तुमचा अभिप्राय वाचून तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचलाय की नाही, किवा मला जे मांडायचं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय की नाही अशी शंका येते. मी तुम्हाला विनंती करेन की मी स्वॅप्स ना दिलेला reply वाचावा. तुम्ही दिलेल्या उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर त्यामुळे मला माझा मुद्दा अजून ठळकपणे मांडायची संधी मिळाली आहे, असं वाटतं. त्याबद्दल Thanks ...मी स्वतः उत्तम गाडी चालवते त्यामुळे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर driving चा अगदी साधा नियम आहे, गाडी पुढे बघत चालवायची असली तरीही काही ठराविक वेळानंतर rear view mirror सुद्धा पाहत राहावा लागतो नाहीतर अपघात होण्याचा संभव असतो...मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या उदाहरणातून अगदी सोप्या पद्धतीने मांडता आलं, त्याबद्दल धन्यवाद....:)
30 Sep 2015 - 3:43 pm | चाणक्य
अहो लेख वाचला मी आणि पटला देखील शब्द न शब्द. माझा वरचा प्रतिसाद कायम भूतकाळ किती चांगला होता आणि आत्ता कसा कशातच अर्थ नाहीये असं रडगाणं गाणा-या लोकांबद्दल होता. खर तर तुमच्या लेखात तुम्ही 'आत्ताचा' क्षण जगावा हे जे लिहीलय त्याला अनुमोदन करत होतो. पण जरा अर्धवट आणि घाईघाईत लिहिला गेला. 'आत्ताचा' क्षण जगणं आणि आयुष्यात व्यतित केलेल्या सुंदर क्षणांची सोबत ठेवणं या तुमच्या विचारांशी बाडीस आहे.
आणि हो....वरच्या प्रतिसादात लिहायला हवं होतं पण आत्ता लिहितो....लेख आवडलाच.
1 Oct 2015 - 3:10 am | rutusara
धन्यवाद ....खरं म्हणजे एकमेकांची मतं पटलीच पाहिजेत असं नाही.....मात्र तुमचा प्रतिसाद वाचून तुम्ही नीट न वाचताच लिहिताय असा समज झाला आणि त्यामुळे जरा वेगळा सूर लागला....:D
29 Sep 2015 - 9:16 pm | rutusara
लेख वाचून त्यावर तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर तुमचे विचार वाचून मी पुन्हा एकदा विचार केला माझ्या लेखाबद्दल..आणि माझ्यापुरते तरी ते विचार खरे असल्याची पुन्हा एकदा खात्री पटली. कारण तुम्ही जे विचार मांडलेत ते मी नाकारतच नाहीये. आपली आत्ताची जीवनपद्धती चुकीची आहे असं मी म्हणतच नाही. आज मी स्वतः काही वर्षं अमेरिकेत settle झालेले आहे. भारतातले आमचे घर, माणसे सोडून येताना त्रास झालं तरीही आमचे पुढचे आयुष्य, आमचे career , पैसा ह्यालाच प्राधान्य देऊन आम्ही अमेरिकेत यायचा निर्णय घेतला. आपण सगळेच आसाच विचार करून पुढे जात असतो, नाही का? मुलांना सगळ्या सुख-सोयी देऊ शकतोय ह्याची खंत का वाटेल कुणाला? प्रत्येकाला आनंदच असतो त्यात.....'क्षण' मधेही मी म्हटलं आहेच तसं....माझा मुद्दा जरा वेगळा आहे. आयुष्य म्हणजे फक्त पुढे जात राहणंच असतं का? आयुष्यातला फक्त वर्तमान आणि भविष्य वेगळे काढता येतील का ? वर्तमान आणि भविष्याची तरतूद करण्यासाठी आपलं सगळ्या भौतिक सुखांच्या मागे धावणं हे आवश्यकच आहे ..पण ते तसं धावताना एखाद्या वळणावर थोडं विसावून भूतकाळातले आपले अनुभव, आठवणी, नाती, क्षण हे आपल्या मनात पुन्हा जिवंत करून त्यात थोडं रमून जायला काय हरकत आहे ? कदाचित आपला पुढचा प्रवास त्यामुळे सुखकर होईल, असं मला वाटतं....
आज आपण मुलांना disney land सारख्या वेगवेगळ्या theme पार्क्स मध्ये नेतो, त्यांच्याबरोबर पुन्हा लहान होऊन ती मजा अनुभवतो तेव्हा आपल्या वेळी ही अशी मजा नव्हती अशी खंतही वाटतेच ना आपल्याला ? ती खंत गावाकडची धमाल आपल्या मुलांच्या नशिबात नाही ह्याबद्दलही मनाशी बाळगली तर त्याचा अर्थ आपण भविष्याचा विचार करण्यापेक्षा भूतकाळात रमून गेलोय असा होतो का? काळ पुढे गेलाय त्यामुळे आता 'ह्या' गोष्टीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, ह्यापेक्षा ती गोष्ट कायम मनात जपून ठेवणं, ती आता करणं शक्य होत नाही ह्याची खंत उराशी बाळगणं ह्यामुळे आपण आयुष्याच्या जास्त जवळ जाऊ असं मला वाटतं. ह्यालाच तर आपण "जिवंत असणं" म्हणतो ना ? कुणास ठावूक, उद्या कदाचित ह्या अशा जिवंत असण्यामुळेच, आयुष्यात पुन्हा एकदा मुलांसोबत एखाद्या गावी जाऊन तिथे चार दिवस मनसोक्त जगता येण्याचं स्वप्न सत्यात उतरेल.
काळाप्रमाणे पुढेच जात राहण्याच्या घाईमध्ये मात्र मनातच न जपलं गेलेलं हे स्वप्न मात्र क्षण-भंगुरच ठरेल, नाही का? हेच मांडलंय मी माझ्या लेखात. ही खंत, आठवणी, ते क्षण आपल्या मनात जपणं, जिवंत ठेवणं फार महत्वाचं असतं, असं मला वाटतं. माझ्यापुरतं उदाहरण द्यायचं झालं तर, आज माझा मुलगा फारच लहान आहे. उद्या तो मोठा होऊन प्रगतीच्या उच्च शिखरावर जाईल तेव्हा निश्चितच आनंद वाटेल, समाधान वाटेल पण तरीही त्याने पु.लं. चं 'असं मी असामी' वाचलेलं नसेल तर ती खंत मात्र कायम वाटत राहील. " फक्त जुनं तेच सोनं", असं मी कधीच मानत नाही, पण म्हणून जुन्यातलं मिळेल तितकं सोनं न घेताच पुढे जाणं, हे निश्चितच पटत नाही.
पुन्हा एकदा मनापासून thanks ....:)
29 Sep 2015 - 2:16 pm | पैसा
या क्षणात जगण्याबद्दल मितानचा एक सुंदर लेख जरूर वाचा!
http://www.misalpav.com/node/16081
29 Sep 2015 - 9:37 pm | rutusara
माझा लेख वाचून आपला प्रतिसाद नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपण सुचविलेला लेख मी जरूर वाचेन...:)
29 Sep 2015 - 9:45 pm | बिन्नी
खूप छान लिहिलंय हो तुम्ही
मलाही असं च वाटतं कधी कधी पण लिहिता येत नाही
30 Sep 2015 - 2:19 am | rutusara
धन्यवाद !! :)
29 Sep 2015 - 9:46 pm | पद्मावति
छान लिहिलंय. सरळ, प्रामाणिक लेखनशैली आवडली.
29 Sep 2015 - 10:04 pm | मितान
+१
अगदी असंच म्हणते:)
30 Sep 2015 - 2:37 am | rutusara
धन्यवाद :) तुमचाही ह्याच विषयावरील लेख वाचला आणि तो खूप आवडलाही....
30 Sep 2015 - 2:33 am | rutusara
धन्यवाद पद्मावती !! :)