लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे.
मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो . डेक्कन कडे फक्त संध्याकाळी येणारी आत्या आणि तिथे अंडा राइस + बुर्जी + हाफ फ्राय सगळं एकाच वेळी एकाच प्लेट मध्ये द्या, अशी दिलेली आमची ऑर्डर असो. किंवा मग शाहूपुरीत "वामन" मध्ये बसून यथेच्छ हाणलेले मासे आणि , खेकडा , शिंपले सोलकडी. असो, विषयांतर होतोय वाटतं . किंवा असं म्हणू कि विषयाला सुरुवातच केली नाहीये . होतं असं. चांगलं खायला प्रचंड आवडतं. आणि ते मिळणारी ठिकाणं आठवली कि तिथे आत्ता या क्षणी जाता येत नाहीये हे समजलं कि अस्वस्थ होतं . तर असोच .
मुद्दा हा कि अश्याच एका ' रोज घरचं खाउन कंटाळा आला च्यायला ' अश्या संध्याकाळी घरी जात असताना नेहमीच्या हॉटेल कडे गाडी वळली . पण आईची धमकीही आठवली . " श्रावण नाही , कमीत कमी गणपतीचे २ दिवस तरी मांसाहार नको रे . चिकन मासे खाल्लेलं समजलं तर विहिरीत बुडवून मारेन ", कमीत कमी वडापाव तरी खावा असा विचार आला .
हरिमंदिर समोर हा माणूस गेली कित्येक वर्षी एक हातगाडीवर वडापाव आणि कचोरी तळून विकतोय. किती ते नक्की नाही माहित . पण मी तरी गेली १५ वर्ष त्याला बघतोय, तोच सरळ साधा अवतार, जोडीला अखंड बडबड. याचा अक्खा मेनू दोन गोष्टीत संपतो . कचोरी आणि वडापाव . आणि किंमत . अजुनी फक्त १० रुपये .
तिथे पोचलो ते पक्क्या राजस्थानी खड्या आवाजात "माझे माहेर पंढरी " च्या सुरात पोहतच. याला हि पण सवय होती . रोज साधारण ६ वाजता याचा " बिसनेस " सुरु व्हायचा , आणि ९ वाजता संपायचा. पण या मधल्या वेळात सुरुवातीची गरम वाडे आणि कचोरी काढण्याची धांदल संपली . कि हा लोकांना एक एक प्लेट मध्ये वाढत गायला सुरुवात करी . राजस्थानी हिंदी गाणी तर होतीच , पण इतकी वर्षे बेळगावात राहून कन्नड मराठी आणि कोकणी गाणी पण शिकला होता. आवाज हि अगदी आकाशापर्यंत चढे. आणि सुरांचं ज्ञान होतं. मुख्य म्हणजे गावाकडे कोणा गुरु कडे लहानपणी शिकला हि होता .
पोचल्या पोचल्या त्याने गात गातच सलाम केला, आणि मी वडापाव खात खात त्याच्या राजस्थानी बोलीतल्या मराठी भजनाची मजा घेऊ लागलो. मला गाण्यातलं फार काही कळत नाही . पण अण्णा असते तर कमीत कमी तरी कौतुकाची थाप नक्कीच मारली असती त्याच्या पाठीवर . गाणं संपलं तसं याची बडबड सुरु झाली .
"क्या साब बोहोत दिन दिखे नई "
"हा काम बोहोत आय पिछले कुछ दिन मे . गाना क्यू रोका ? दुसरा कुछ गाओ "
"अरे साब गाना तो गाते रहेगा . कम से कम और कुछ दिन तो . मदत करोगे क्या ? "
"हा बोलो "
" मै वापीस गाव जाएगा अगले महिने. तबियत खराब रेहता है. पर मेरा बेटा येही रहेगा . दसवी गया उसका. अभी ITI सिखेगा . वायर्मेन बनेगा . "
मागून त्याचा मुलगा आला समोर
" हा तो पैसा चाहिये क्या? "
"अरे नही नही . पैसा नही. हम भिकारी थोडी है . पैसा वो खुद कमाएगा. गाडी चलाएगा वो शाम मे . दोपहर तक सिखेगा . और शाम तक पढेगा . शाम को यहा सेवा करेगा . सब धंदा सिखा दिया है. वडा भी अच्छा बनता है. आपको बस यहा आते रेहना है. "
"ठीक है . मै कोई पैसा का बात नाही करेगा . और यहा आता भी रहूंगा . लेकिन एक शर्त पर . "
" जी कहिये "
"ये भी गाना गाता है? "
"हा मुझसे भी अच्छा . "
प्रतिक्रिया
24 Sep 2015 - 5:10 pm | खेडूत
एका मस्त माणसाचा तितकाच सुरेख परिचय!
अजून माणसांची व्यक्तिचित्रे येउद्या!
24 Sep 2015 - 5:30 pm | मांत्रिक
खरंच मस्त आहे व्यक्तिचित्रण
24 Sep 2015 - 5:22 pm | मधुरा देशपांडे
काय सुंदर लिहिलंय. आवडलं.
24 Sep 2015 - 5:51 pm | रेवती
छान लिहिलय.
24 Sep 2015 - 5:59 pm | अनुप ढेरे
आवडलं!
24 Sep 2015 - 6:12 pm | एस
नमनाइतकंच पुढचंही खुलवायला हवं होतं असं वाटलं. बाकी छान लिहिलंय.
24 Sep 2015 - 8:07 pm | किसन शिंदे
हेच म्हणतो. शेवट अजून खुलवायला हवा होता.
रच्याकने 'रावसाहेब' हा तुमचाच आयडी होता का आधीचा?
24 Sep 2015 - 8:56 pm | अद्द्या
हो :)
24 Sep 2015 - 7:22 pm | सूड
सुरुवात चांगली केलीस, शेवट पटापट आवरल्यासारखा वाटला. लेखाच्या सुरुवातीलाच तेवढा नेहमीचा अद्द्या दिसला. मल्टिटास्कींग चाल्लं होतं काय?
24 Sep 2015 - 7:59 pm | पद्मावति
वाह, मस्तं लिहिलंय.
24 Sep 2015 - 8:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
राजस्थानी अत्यंत मानी असतात (अनुभव) अन तराट वातावरणाला तोंड देत देत काटक ही फार होतात तुम्ही म्हणता तसे लोक नेहमी पाहण्यात येतात माझ्या तुमची शैली सुलभ आहे फार! ओघ ही मस्त! खुप आवडले हे व्यक्तिचित्रण
(राजस्थान चा जावई) बाप्या
25 Sep 2015 - 3:19 pm | अद्द्या
पण फक्त काटक होतात . जर्रा पाणी बदललं कि लगेच ताप आला सर्दी झाली असल्या गोष्टी होत नाहीत यांना .
24 Sep 2015 - 8:59 pm | अद्द्या
@स्वॅप्स , सूड , किसान शिंदे
मलाही असं वाटतंय कि अर्ध्यातून गंडला लेख . .
पण आता वाढवून फायदा नाही . पुढल्या वेळी लक्षात ठेवेन हे :)
@सूड
व्हय . . इमेल सर्वर वर दंगा करत होतो :D
24 Sep 2015 - 9:00 pm | अद्द्या
सर्वांचे धन्यवाद :)
24 Sep 2015 - 9:18 pm | वेल्लाभट
क्या बात है.....
अशी लोकं जाम लक्षात राह्तात राव. भैरवीच्या 'सा' सारखी कोमल तरीही पहाडीच्या 'प' सारखी चेतना, ऊर्जा देणारी ही माणसं. Several such unworn jewels around each of us.
या ओळखीबद्दल अनेक आभार. जात रहा. वडे खात रहा. आणि गाणी ऐकत रहा. जमल्यास एखादी सीडी द्या त्याला नाट्यसंगीताची वगैरे.
24 Sep 2015 - 11:28 pm | बोका-ए-आझम
मी काय म्हणतो, त्याचा आवाज record करून इथे audio टाका की. वडे एकट्याने खातात त्याबद्दल आम्ही काही बोलत नाही आहोत. आम्हाला आवाज तर ऐकू दे! ;)
25 Sep 2015 - 3:18 pm | अद्द्या
पुढल्या वेळी गेलो आणि तो मूड मध्ये असेल तर नक्कीच :)
24 Sep 2015 - 11:45 pm | रातराणी
खूप छान लिहलय!
25 Sep 2015 - 1:01 am | उगा काहितरीच
प्रचंड सहमत!
25 Sep 2015 - 1:06 am | प्यारे१
'पूर्ण' होता होता अपुरं राहिलेलं चित्र आवडलं.
25 Sep 2015 - 12:12 pm | पिशी अबोली
सुंदरच!
25 Sep 2015 - 12:37 pm | बॅटमॅन
इन्नु सोल्प बरिबेकागित्तप्पा! मस्त आगेदं!
25 Sep 2015 - 3:16 pm | अद्द्या
होउदु .
इन्नु स्वल्प बेकागीद्दू :)
25 Sep 2015 - 2:23 pm | नाखु
शशक धक्क्यातून बहेर आला नाहीस काय??
स्वगतः+अवांतर लेख भन्नाट.
भाजीपाला नाखु
25 Sep 2015 - 3:17 pm | अद्द्या
हाहाहाहा
नाय हो . . पुढे काही सुचत नवतं
आणि मध्ये काही अजून मसाला टाकावा वाटला नाही .
सो एवढाच राहिला :-/
25 Sep 2015 - 4:26 pm | शंतनु _०३१
लेखनशैली आवडली
26 Sep 2015 - 12:36 am | अभ्या..
भारीच लिहिलायस रे अद्द्या.
पण पट्कन आटोपला शेवटी शेवटी. :(