MIDC

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
12 Aug 2015 - 3:50 pm

लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो.
अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो.
"शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?"

एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो-
ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी.

मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल. हा चिन्मय तन्मय असून खेड्यासाठी एवढा जागरूक वगैरे आहे.

या डिस्कशनच्या विचारात मी आराम-खुर्चीवर गढुन गेलेलो असतो. एका कॉल ने तंद्री भंग होते.
( अननोन नंबरचा कॉल बघताना आताशा पूर्वीची अस्वस्थता असत नाही. कशाने संपली??)
समोरचा विशी बाविशीतल्या खेड़ूत आवाजाचा मुलगा म्हणतो,
आ तुमी सचिन दादा बोलताय का? मी रमेश मोड़के बोलतोय मसल्यावरणं. गणु भैय्यानं तुमचा थेट नंबर दिलता.
(गणु म्हणजे माझा आठवीतनं शाळा सोडलेला इपितर चुलत भाऊ)
मी म्हणतो:
हाँ बोल. अन सॉरी, जरा पटकन बोलतो का. माझी एक मीटिंग आहे रे 15 मिनटात. सॉरी.
तो म्हणतो. बर बर.
मला जॉब लावता का तुमी तुमच्या कंपनीत??. माझा कॉम्पुटर डिप्लोमा झालाय. तुमची कंपनीबी कॉम्पुटर मधेच काम करते. लावा तुमी. तुमच्या हाता-ताय सगळं. मला गरज पण हाय आता जॉबची.
मी म्हणतो.
अरे बाबा असा नसतो जॉब लागत. आमच्या कंपनीत तर नाहीच. फ्रेशरला घेतच नाहीत. अन engg सोडून दुसऱ्या कोनाला तर नाहीतच.
तो:
गणु म्हणला तुमच्या आता वळकी भरपुर झाल्यात पुण्यात. कुठंतरी चिटकवा म्हणून सांगीतलंय त्यांनं. तुमाला बायोडाटा दिलं की झालंच काम म्हणला. मी बायोडाटा पाठवतो. तुमी ईमेल id पाठवा. पण जॉब लावा मला.
मी: अरे त्या गण्याला काई कळत नाई. तेजं काय आयकु नको. कायपण सांगतं ते. माझ्या हातात वगैरे काहीच नसतं. बघू तरीपण दुसरीकडं कुठं काई असलं तर सांगतो. पण काई गॅरेंटी नाही बघ.
(अनेकांचे CV मी परत मेल वरुन PC वर सुद्धा घेतलेले नाहीत, म्हटलं त्याच्या समाधानासाठी हा घेऊन ठेवावा, पडूनच राहणार शेवटी.
पण हाच विचार करताना मला माझी माझ्या जॉबच्या वेळची 'सेम' निरक्षर चरचर आठवली. अन छाती दड़पुन गेली)

तो: आवो मला मार्क 78 टक्के पडले डिप्लोमाला. गवर्मेंट कॉलेजला 2 रा नंबर आला. मग इंजिनीरिंगला एडमिशन घेतलं. पण सोडलंय आता ते. गेल्या महिन्यात वडील वारले. बारके शेतकरी होते. आता घरी काही पैशे येत नाहीत. म्हणून मला जॉब पायजे. शिकायचं होतं. पण आता शक्य नाही. मला तुमी जॉब वर घ्या.

मी: हहम. (ऐकून थोड़ी कळवळ वाटली. डेस्क वरणं उठून गॅलरीत गेलो.) त्याला म्हटलं
अरं मग पुण्यात ये ना, हिथं कोर्स लाव टेस्टिंग-बिस्टिंग चा. तिथं गावात राहून काय होणाराय?? एवढे मोठे engg पडून आहेत हिथं ऑलरेडी. तुझा डिप्लोमाचा कसा मेळ लागायचा.
तो महटला:
आलतो मी तिकडं पुण्याला जॉब बघायला.
हिंजवडीत फिरलो दिवसभर. पण तिथं काही समजलं नाही कसा जॉब लागायचा ते. पैशे पण नव्हते- आठवड्यात माघारी आलो. बघू थोड़े पैशे साटल्यावर येतो अजुन. कोर्स ला लय पैशे लागले तर अवघडाय मग.

मी म्हणलो: साठवून ये. होईल काहीतरी.

............
बाकी सध्या गावाकडं काय करतो मग?
तो म्हटला
हितून दारफळ जवळाय आमाला. तिथं जातो MIDCत कामाला. मी आई बहिन. मला 300 अन त्यांला 250, 250 हाजरी हाय दिवसाची.

(गण्यानं आट.वी सोडली होती मधेच.. तो ही तीथंच कामाला जातो.)
---------------------------------------------------------
माझ्या डोक्यात कितीतरी वेळ त्याचं ते अज्ञानी वाक्य घुमत होतं ''हिंजवाडीत आलतो. फिरलो. पण जॉब कसा लागायचा काही कळलं नाही.''
---------
हिंजवडीत आता कुणीही गावच्या चेहरयाचं रोडवर हिंडताना दिसलं की मला उगीचंच अकारण अपराध्यासारखं वाटायला होतं...............वऱचेवर संवेदना संपूर्ण बोथट होत चाललीय की उलट अजुनच जास्त तीक्ष्ण होत चाललिय-- हे सुदधा समजेना झालंय......
अशे अजुन किती रमेश मोड़के सध्या गावाकडं खेड़ोपाडी या क्षणी पडून असतील.....??. गायडंस सुद्धा करण्याच्या पलिकडचं वाटतं मला हे सगळं...
खेड्यातल्या पोरांचे असे हाल बघुन विनाकारण ,, काहीही दोष नसताना मला शहरातल्या पोरांचा राग येतो. मी चुकतोय हे माहीत असून. खुप राग येतो. खुप. खुप जास्त. माफ़ करा मित्रांनो...

कथासमाजविचारलेख

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

12 Aug 2015 - 3:58 pm | ब़जरबट्टू

अगदी खरी व्यथा..
खुपदा असे फ़ोन येतात आशा ठेऊन.. पण फार काही करता येत नाही, ही खंत आहेच.. फ्रेशरला तर फारच त्रासदायक असते.. :(

अनुप ढेरे's picture

12 Aug 2015 - 4:07 pm | अनुप ढेरे

कंपन्यांबाहेर सिमकार्डाची माहिती सांगणारे, पर्सनल लोनची पँप्लेट्स वाटणारे पाहूनपण असच वाटतं.

टवाळ कार्टा's picture

12 Aug 2015 - 4:11 pm | टवाळ कार्टा

शेतकी साहित्य निर्माण करणार्यांकडे पाठवा

अर्थहीन's picture

12 Aug 2015 - 5:21 pm | अर्थहीन

ओके.

एस's picture

12 Aug 2015 - 5:05 pm | एस

खेडूत यांच्या तंत्रशिक्षणाच्या सद्यस्थितीवरील लेखमालेची आठवण झाली.

रच्याकने, आपण मुलांना शाळामहाविद्यालयांत अमुक एक गोष्ट कशी करावी हे शिकवतो. पण पैसे कसे कमवावेत हे कुठल्याच कोर्स वा पदवीच्या अभ्यासक्रमात नसते.

मुक्त विहारि's picture

12 Aug 2015 - 6:01 pm | मुक्त विहारि

.....कुठल्याच कोर्स वा पदवीच्या अभ्यासक्रमात नसते."

+१

सिरुसेरि's picture

12 Aug 2015 - 5:43 pm | सिरुसेरि

"हिंजवडीत आता कुणीही गावच्या चेहरयाचं रोडवर हिंडताना दिसलं की मला उगीचंच अकारण अपराध्यासारखं वाटायला होतं"
--तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे . पण तसेच हिंजवडीत आता गावच्या चेहरयाचे अनेक गुंठामंत्रीही हिंडत असतात . त्यामुळे खरे गरजू बरेचदा लक्षातच येत नाहीत .

कोमल's picture

12 Aug 2015 - 9:38 pm | कोमल

तंतोतंत परिस्थिति वर्णन केली आहे. फ्रेशरला जर कॅम्पस मधून प्लेसमेंट नाही मिळाली तर खूपच धडपड करावी लागते.

या प्रसंगात एकच गोष्ट खटकली, डिप्लोमा इन कॉम्प्यूटर मध्ये २रा आलेल्या विद्यार्थ्याला हिंजवडी मध्ये फिरून जॉब शोधयचा नसतो त्यासाठी जॉब पोर्टल असतात हे किमान नॉलेज नक्कीच असत.

बाकी मांडणी आवडली.

उद्या जाऊन मेल बॉक्स मध्ये आलेले रेझ्युम अपलोड करावे म्हणते..

खूप वाईट वाटलं वाचून. मी तर पडलो एक सामान्य माणूस. अतिशय सामान्य. कुठेही वशिला नाय, ओळख नाय. देवाला इतकीच प्रार्थना करेन "अरे, विश्वाच्या ईश्वरा, कुणालाही उपाशी ठेवू नकोस. तू आणि महामायेने मांडलेला खेळ हा. तुझीच सर्व रूपे. इथली दुष्टता आणि कटुता कमी कर रे बाबा!!! तुझ्या लेकराला कधी खायची भ्रांत पडू देवू नकोस." काय म्हणू? काय बोलू?

जडभरत's picture

12 Aug 2015 - 9:54 pm | जडभरत

या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

उगा काहितरीच's picture

13 Aug 2015 - 1:02 am | उगा काहितरीच

मनापासून आवडलं !
(सध्या थोड्याफार फरकाने रमेशसारखीच परिस्थिती असलेला) :'(

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही मुलेही गावाकडून येउन भोसरी एमायडीसीत पायी फिरत असू. त्याकाळी तसेच चाले. आता प्लेसमेंट संस्था खूप आहेत.

ग्रामीण भागातल्या मुलांनाच काय त्यांच्या शिक्षकांना देखील नोकरी कशी मिळते-मिळवावी हे माहीत नसते. नोकरी नाही म्हणून तर ते शिक्षक होतात!

गावातली आधी इंजिनियर झालेली मुले - माणसे हाच त्यांना आधार वाटतो. त्यामुळे गावाकडून आलेल्या सर्वांना असे उमेदवार मागे लागतात. असे वीस-बावीस उमेदवार माझ्याशी नेहमीच संपर्कात असतात. काहींना नोकरी मिळते - काहींना नाही!

डिप्लोमानंतर डिग्री करणे चांगले असले तरी शंभर टक्के मुलांनी सरसकट तसे करण्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. उलट या मुलाचा डिप्लोमा असल्यानेच त्याला नोकरी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

या मुलांना प्रशिक्षणाची फार आवश्यकता असते.

दहा वर्षांपूर्वी मी अश्या दोन ग्रामीण महाविद्यालयांना प्रशिक्षणाचा प्रस्ताव दिला होता. प्राचार्यांना पटले, पण त्यांच्या व्यवस्थापनाने पैसे खर्च करण्यास नकार दिल्याने माझाही उत्साह मावळला.

डिप्लोमानंतर डिग्री करणे चांगले असले तरी शंभर टक्के मुलांनी सरसकट तसे करण्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. उलट या मुलाचा डिप्लोमा असल्यानेच त्याला नोकरी मिळण्याची अधिक शक्यता आहे. हे कसे काय? उत्सुकता म्हणून विचारत आहे.

पुण्याच्या बाजारात गरजेपेक्षा जास्त पुरवठा आहे. आमच्या समूहाच्या हेचारच्या मते दरसाल पस्तीस हजार अभियंते पुण्यात ओतले जातात. (इथे सर्व शाखा धरल्या आहेत- फक्त हिंजवडीवाल्या नव्हे) . साहजिकच डिप्लोमाधारक जे दरवर्षी चारपाच हजार लागतात ते मात्र दोनेक हजार येतात. उरलेले काम सध्या कुशल कामगार पार पाडत आहेत. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास डिप्लोमावाल्याला नोकरी मिळतेच.

इथे कामाच्या स्वरूपाबाबत बोलत नाही आहोत. गरजूला काम मिळणे या अर्थाने पाहिले तर डिप्लोमावाल्याला नोकरी मिळण्याची शक्यता डिग्रीवाल्यापेक्षा जास्त आहे. त्याच्या अपेक्षा मर्यादित असतात, ते सोडून जाण्याचं प्रमाण कमी असतं आणि कामगाराची मस्ती आणि उद्धटपणा त्यांच्यात कमी किंवा जवळपास नसतोच.

कधीकधी कामगार म्हणून हे वापरले जातात. पूर्वी मी स्वतः असे काम केले आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Aug 2015 - 7:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्या ह्या प्लेसमेंट एजन्स्यांचं पेव जबर फुटलं आहे. लुटतात अक्षरशः. १,२,३ अश्या महिन्यांचा पगार आगावु द्यायला लागतो. आणि त्यातुनही जॉब सिक्युरिटी शुन्य. एच.आर. सामिल असतात ह्या भुरट्यांना.

तुषार काळभोर's picture

13 Aug 2015 - 9:38 pm | तुषार काळभोर

आहे माझ्या कंपनीतला .
आता मोबल्यावरनं टंकाळा आलाय. ऊद्या सांगतो.

तुषार काळभोर's picture

14 Aug 2015 - 1:43 pm | तुषार काळभोर

दोन वर्षांपुर्वी आमच्याकडे नवीन येचार मॅनेजर आला. त्याने आल्या आल्या नॅशनल येचार हेड आणि साईट जिएम ला पटवून (फक्त बोलून पटवलं का आर्थिक लाभ देऊन, ते माहिती नाही), लाईनवर काम करण्यासाठी कंपनीच्या पेरोलवर ट्रेनी घ्यायचे ठरवले. (आधी लाईनवर काम करण्यासाठी कंपनीचे कायम कामगार + काही अतिरिक्त कंत्राटदाराचे कामगार असायचे)
मग तो गेला ओरिसाच्या एका छोट्या गावातल्या छोट्या इंजिनियरींग कॉलेजमध्ये(बरोबर एक डेप्युटी येचार) . तेथे कॅम्पस इंटरव्यु घेऊन २०० जणांना "ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" या नावाने ऑफर लेटर देऊन आला. पगार ९००० रु प्रति महिना. बस + कँटीन सुविधा. दीड लाखाचा आरोग्यविमा. कायम करण्याची कोणतीही हमी नाही. प्रोविडंड फंड नाही. त्यातले सुमारे दीडशे जण येऊन जॉईन झाले. शिवाय महाराष्ट्राच्या विविध भागातून याच मोबदल्यात १००-१५० जण आले.
असे २५०-३०० "ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" लाईन वर काम करू लागले.
विशेष म्हणजे यात कमीत कमी २०० जण बीई झालेले होते. तर ३०-४० जण एमई करत होते. ३ मुली एमई पुर्ण करून "ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" म्हणून काम करण्यासाठी आल्या होत्या. आठवडाभरात सर्वांच्या लक्षात आले की ते "ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" च्या नावाखाली कामगाराचे काम करताहेत. ८०-१०० जण महिना पुर्ण करून निघून गेले.
बरेच जण पुढील ६-८ महिन्यात हळू हळू निघून गेले. काही जण अजून काम करताहेत."ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" म्हणून दोन वर्षापुर्वीच्या पगारावर. कधीतरी कायमस्वरुपी नोकरी मिळेल व पगार चांगला मिळेल या आशेवर.
अजूनही दर आठवड्याला ४०-५० ग्रामीण-निमशहरी भागातील डिप्लोमाधारक/ काही अभियांत्रिकी पदवीधारक येतात "ट्रेनी प्रॉडक्शन इंजिनियर" बनायला. कारण आधी जॉईन झालेले ३०-४० जण सोडून गेलेले असतात.

असो,
तर त्या येचार म्यानेजरने ओरिसात जाऊन २०० जणांकडून प्रत्येकी ५००० रु प्रशासकीय फी म्हणून घेतले होते, कंपनीचे असे कसलेही धोरण/नियम नसताना.
शिवाय, कंपनीच्या गेटवर 'भरती' साठी येणार्‍या प्रत्येकाला सिक्युरिटी गार्ड सांगत असे: "अशी डायरेक्ट भरती नाही होत. अमुक पत्त्यावर अमुक एजन्सीमध्ये नोंदणी करा, त्यांच्याकडे रु २०००० (हो. रुपये वीस हजार फक्त) भरा. दहा हजार नोंदणीवेळी आणि दहा हजार भरती नंतर. मग ते तुम्हाला इथे पाठवतील. मग नोकरी मिळेल."

असे रु २०००० भरलेले अंदाजे २०० जण नोकरीला लागले. वीस हजारातले किमान १०००० येचारला मिळाले असतील.
ही जी कोणती एजन्सी होती, तिचा कंपनीशी कसलाही संबंध नव्हता. येचारच्या कुठल्याही पत्रव्यवहारात त्या कंपनीचा कधीही उल्लेख नव्हता.

तर येचार म्यानेजर ने अंदाजे (२००*५००० + २००*१०००० = ३०००००० फक्त)) रुपये तीस लाख फक्त कमावले.
(हा अति-कॉन्झर्व्हेटिव अंदाज आहे).

अवांतर शंकेला उत्तरः (पैलवानाला कसं कळलं)?
१) ओरिसात प्रत्येकी ५००० गोळा केलेले ओरिसाच्या ट्रेनीजनी सांगितलं.
२) आमच्या बसमध्ये एक मुलगा व त्याचे वडील स्वारगेटला उतरण्यासाठी आले होते. ते सातार्‍यावरून भरती साठी आले होते. मुलगा जळगावच्या कुठल्याशा कॉलेजमधून बीई-मेक झाला होता. मुलाच्या वडीलांनी सिक्युरीटीने त्यांना दिलेली माहिती मला सांगितली.

अवांतरः ६ महिन्यांपुर्वी उघडकीस आल्यावर कंपनीने त्या येचारला हाकलले. पण तोपर्यंत त्याने (किमान) तीस लाख रुपये कमवले होते. आणि नविन ठिकाणीसुद्धा हे चालू असेल.

ज्यांना कॉलेज कॅम्पस मधून जॉब मिळत नाही, त्यांचे कठीण आहे. सगळ्यांना अनुभव लागतो.फ्रेशर्सना कुणी विचारत नाही. मी वेल्लोर इन्स्टीट्युट्,चेन्नई मधून एम.टेक.(कॅड कॅम) झालेल्या एका नातेवाईक मुलाचे ब-याच ठिकाणी रेज्युमी पाठवले. कुठुनही रीस्पॉन्स आला नाही . मॅन्युफॅक्चरींग सेक्टर मधे मंदी असल्यामुळे काही ठिकाणी रीक्रुटमेंटच बंद आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2015 - 11:39 pm | श्रीगुरुजी

>>> ज्यांना कॉलेज कॅम्पस मधून जॉब मिळत नाही, त्यांचे कठीण आहे.

फारसा सहमत नाही. कॅम्पस मधून जॉब न मिळालेल्या (फर्स्ट क्लास नसल्याने किंवा बॅकलॉग नसल्याने किंवा तत्सम कारणाने) काही जणांना काही काळानंतर चांगल्या कंपनीत जॉब मिळाल्याची किमान ३ उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. जॉबसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. परंतु मिळणे अगदीच अशक्य नसते.

डिग्री /डिप्लोमा झाला, नोकरी लागायला हवी वगैरे ११०% मान्य. पण माझा बर्‍याच वेळेचा अनुभव आहे की बहुतेक सगळ्यांना एकजात MNC मध्ये मोठ्ठं पॅकेज किंवा "कसल्याही" कंपनीत "भरपूर पगार" हवा असतो.
अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक छोट्या कंपनीत करीअर सुरु करायला तयार असतात.
कॉलेज मध्ये वगैरे खरंच हे पण शिकवण्याची गरज आहे की स्वतःला ओळखा आणी शक्य असेल तिथे पट्कन नोकरी पत्करून आधी "करियर" सुरु तर करा.
मला स्वतःला एक छोटी कंपनी चालवण्याचा अनुभव आहे.
२००९ नंतर फार विचित्र अनुभव आहे फ्रेशर्सचा. विश्वास बसणार नाही पण "Interview call" देऊनसुद्धा बरेच लोक फक्त कंपनी लहान आहे म्हणून येत नाहीत. एकदा एका "हुशार" MCA फ्रेशरनं (५८% मार्क) मला फोनवरच विचारलं होतं "कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे का?" म्हणून. महत्त्वाचं म्हणजे, बहुतेक फ्रेशर्सपैकी ७०% लोकं जेवढं कॉलेजमध्ये शिकवलं तेवढंच रटून असतात आणि तेच जगातील सर्वोत्तम ज्ञान असून त्यायोगे मला "भरपूर पगार" मिळालाच पाहिजे अशी बहुतेकांची धारणा असते.
बरेच लोकं फायनल ईयरचे प्रोजेक्ट "विकत" घेतात आणि आपल्या "रट्टामार" परिक्षा पद्धतीच्या कृपेने ७०%-८०% मार्क मिळवून स्वतःला ऐटीत आय.टी. तज्ञ समजू लागतात.
पास झालेल्या पहिल्या वर्षी तर यांचे नखरे बघण्याजोगेच असतात. कारण पास झालेल्या महिन्यापासून साधारण १०-११ महिने यांना "फ्रेशर कॉल" येतच असतात. बरं प्रोफेशनल स्किल्स म्हणावी तर ० ते ५%. communication किंवा भाषा तर प्रचंड भयानक (या बाबतीत मात्र, शहरी आणी ग्रामीण असा फरक बर्‍याच वेळेस जाणवत नाही).
ज्यांना आपली व्यावसायिक कुवत माहिती नाही, जर आपल्याकडे काही व्यावसायिक कौशल्य कमी असेल तर कमी पगारावर छोट्या कंपनीत जाण्याची तयारी नाही, थोडक्यात तडजोडीची तयारी नाही असेच लोक बहुधा "बेकार" आहेत.
अर्थात काही लोक खरंच लायकी असून सुद्धा योग्य माहितीअभावी बेकार असू शकतात हे मान्य.
माझा प्रतिसाद फक्त आय.टी. क्षेत्रासाठी आहे. संपूर्णपणे स्वानुभवावर आधारित. कुणाच्याही भावना हेतुपुरस्सर दुखावणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हेमन्त वाघे's picture

14 Aug 2015 - 12:52 am | हेमन्त वाघे

@ कॅप्टन जॅक स्पॅरो -" लुटतात अक्षरशः. १,२,३ अश्या महिन्यांचा पगार आगावु द्यायला लागतो." म्हणजे उमेदवाराला / नोकरी शोधत असलेल्या ला पैसे द्वावे लागतात ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Aug 2015 - 6:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

होय!! आणि कितीतरी वेळा अगदी मोठ्ठ्या मोठ्ठ्या एम.एन.श्यांच्या एच.आर. चं ह्यांच्याशी साटं लोटं असतं.

हेमन्त वाघे's picture

14 Aug 2015 - 9:16 pm | हेमन्त वाघे

उमेदवारांकडून पैसे ? मी विचार hi करू शकत नाही
मी स्वत अनेकदा नोकरी शोधायचा प्रयत्न केला आहे . त्यामुळे मुंबई तील अनेकचांगल्या जॉब consultants शी समंध आला.
आणि मी स्वत: एका MNC जॉब कनस्ल्तांत कडे काम केले ३ वर्ष . पण आम्ही सेनिओर मानागेर च्या वरील फक्त जागा भरीत असू ..