शहरात राहून आपण आपल्या जाणिवा विसरलोय, वगैरे उगाच लंब्याचौड्या उच्चभ्रू बाता मी मारणार नाही. पण शहरात राहून मी गावातल्या जीवनापासून युगानुयुगांच्या अंतराइतका दूर आहे हे मात्र नक्कीच. अर्थात, हे साहजिकच आहे. त्यात काही फार चांगलं किंवा फार वाईट असं नाहीच. पुण्यात राहून अमेरिकेतलं जीवन अनोळखी आहेच की. अडीचशे किलोमीटरवर असलेलं माझ्या वाडवडीलांचं गावसुद्धा आता मला अनोळखीच. (अमेरिकाच जवळची तुलनेने.)
मागच्या आठवड्यात गावाला जायचा योग आला. रस्त्यात असताना एका मित्राबरोबर व्हॉट्सपवर काही तरी टिवल्या बावल्या चालू होत्या. गावात कसं सगळं इनोसंट, छान छान असतं असा काहीसा सूर त्याने लावला होता. मग त्याला गावाकडले एक दोन ’इरसाल/चवचाल’ किस्से ऐकवले.
त्यावर, ’आयला गावातपण असलं चालतं?’ असं तो म्हणून गेला. मला हसायला आलं.
गावात पोचलो. मुंबईहून डॉक्टर असलेला काकाही पोचला त्याच वेळेस.
आमच्या वाटेकर्याचा तरूण मुलगा नुकताच वारला. म्हणून, त्याला भेटायला शेतावर गेलो. गावात भावकी आहेच भरपूर. त्यातल्या एका शाहण्यासुरत्याने फोनवरच ’जरा जपून बरं का’ असा सल्ला दिला. काही कळेना. शेतावर अक्षरश: १५ मिनिटेच थांबणार होतो. शेतावरल्या त्या झोपडीत तोंड भरून स्वागत झालं. गप्पा झाल्या. म्हातारे वाटेकरी हातात हात घेऊन मायेने बोलले.
’बिमारी सांगिटलीच न्हायी कदी. त्याचं त्याला ठावं होतं. पन कदी बोललाच न्हायी. अगदी शेवटाला बोलला. पार सातार्याला न्हेला त्याला पण डाकटर म्हनं, कायी उपेग न्हायी. घेऊन जा याला. पाचसा दिसात ग्येलाच. एक बायकू अदुगरच ग्येली व्हती. एकीला रंडकी करून ग्येला. चार पोरं ठिवली मागं. या वयात परत कंबर धरून हुबं र्हाया पायजे आता.’
हे सांगतानाही हसत होता गडी. दु:ख खरं नव्हतं असं नाही. त्याची खरी व्याप्ती जाणवत नव्ही असंही नाही. पण जे होईल त्याला, फार पुढचा विचार न करता सामोरं जायची पद्धत जगणं सोपं करत होती. किंबहुना जगणं सोपं व्हावं म्हणूनच ही पद्धत शाण्यासुरत्यांनी पाडली असावी.
नुकत्याच दहावी झालेल्या नातीला जवळच्याच शेतात राहात असलेल्या तिच्या चुलत्याकडे दूध आणायला पाठवलं. ही पोरगी चुणचुणीत. गावातून (आमच्याच) शेताचा रस्ता माहित नव्हता आम्हाला तर शेतातून गावात आली आणि आम्हाला घेऊन गेली.
थोड्या वेळाने त्या ’रंडकी’ने पाण्याचे ग्लास आणले. आम्ही घोट घोट पाणी प्यायलो. फार थांबणं शक्य नव्हतं. पालखी पोचायच्या आत परत गावात पोचणं आवश्यक होतं.
निघताना डॉक्टर काकाला हळूच विचारलं, ’कशाने गेला रे हा?’
तो ही हळूच कानात बोलला ’एड्स!!’
माझी बोलतीच बंद झाली. जगाच्या एका कोपर्या असलेल्या गावातल्याही एका कोपर्यात असलेल्या शेतात राहाणारा एक माणूस एड्सने गेला याची कल्पनाही माझ्या मनाला शिवली नव्हती. त्याला एड्स होता म्हणजे, तो प्रसाद त्याने बायकोलाही दिला असणार. आणि मुलांचं काय?
माझ्या मनात त्या क्षणी काय दाटून आलं ते माझं मलाच अजून समजलेलं नाहीये.
शहरातल्या माणसाला एड्स झाला तर शहरातलं ’सुधारलेलं’ जग त्याला कसं तांदळातल्या खड्यासारखं बाजूला सारतं हे ऐकलं बघितलेलं आहे. (खोटं कशाला बोला... अगदी क्षणभरच का होईना पण मी पण जरा हडबडलो. पण आजवर ऐकलेलं सगळं प्रबोधन कामी आलं आणि भानावर आलो लगेच.)
इथे एड्सने गेलेल्या जवान पोराचं दु:ख तर पचवलेलं होतंच पण त्यानंतर त्याचं कुटुंब त्या मानाने पूर्वीसारखंच नांदत होतं.
जगणं सोपं करण्याची रीत की रितीनं वागून जगणं सोपं करण्याची धडपड?
उत्तर शोधायचा प्रयत्न चालू आहे.
प्रतिक्रिया
26 Jul 2015 - 11:43 am | सस्नेह
होय, 'रीत' हा प्रकार आता शहरातून हद्दपार झालाय. गावात मात्र टिकून आहे..
26 Jul 2015 - 12:46 pm | एस
प्रश्न अवघड असतात तेव्हा उत्तरे सोपी होतात. हीच कदाचित रीत असावी दुनियेची!
26 Jul 2015 - 12:56 pm | एक एकटा एकटाच
लेख चांगलाय
26 Jul 2015 - 1:10 pm | आतिवास
अवघड आहे.
अवांतर: बायको-मुलांची टेस्ट करून घेता येईल. पण त्यात 'लागण आहे' हे निष्पन्न झालं तर त्यांचं जगणं आणखी अवघड होऊन जाईल ही शक्यताही आहे!
27 Jul 2015 - 1:59 pm | अमृत
सहमत
26 Jul 2015 - 6:48 pm | मुक्त विहारि
निराशा झाली नाही.
26 Jul 2015 - 7:16 pm | खटपट्या
आवडला लेख...
26 Jul 2015 - 7:18 pm | प्रीत-मोहर
खरच. कश्यावर आणि काय बोलु ते कळेच ना
27 Jul 2015 - 8:55 am | योगी९००
लेख आवडला ...!!
जगणं सोपं करण्याची रीत की रितीनं वागून जगणं सोपं करण्याची धडपड?
हे खास वाक्य म्ह्णजे बिकाटच..!!
27 Jul 2015 - 10:40 am | श्रीरंग_जोशी
विचारात पाडणारा लेख.
27 Jul 2015 - 1:43 pm | द-बाहुबली
है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ...
27 Jul 2015 - 2:10 pm | तुषार काळभोर
शेवटच्या दहाएक ओळींनंतर माझी वाढलेली धडधड मला जाणवतीये. बस्स्स.. या पलिकडे काही सांगण्यासारखे नाही.
.
.
.
.
वेळ लागेल यातून बाहेर यायला.
27 Jul 2015 - 2:33 pm | सविता००१
अस्वस्थ करुन गेलाय हा लेख.
जगणं सोपं करण्याची रीत की रितीनं वागून जगणं सोपं करण्याची धडपड?
हे भन्नाटच.
3 Aug 2015 - 8:39 pm | पैसा
याबरोबरच परिस्थितीबद्दल संपूर्ण अज्ञान हेही जगणं सोपं करणारं कारण असतं. मुळात एड्स म्हणजे काय हेच माहीत नसेल तर? आपल्याला माहीत असतं म्हणून आपण कोणाला झाल्याचं कळलं तर दचकतो.
"अज्ञानात सुख" असं आई, आजी कडून नेहमी ऐकलं आहे. ते खरंच वाटतं एकेकेदा.
3 Aug 2015 - 9:34 pm | चिगो
'एड्स'बद्दलची टाळाटाळ जी शहरवासीयांमधे आहे, ती त्याबद्दलच्या अर्धवट माहिती आणि त्या माहितीमधल्या अज्ञानामुळे आहे. जर त्याबद्दल माहितीच नसेल तर..
4 Aug 2015 - 2:54 am | जुइ
विचार करायला लावणारा लेख.
4 Aug 2015 - 7:18 pm | विजुभाऊ
रामदास काकानी या विषयावर एक अठवण सांगितली होती.
एका ट्रक ड्रायव्हरची.