सुर्याची लेकरे

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 12:43 pm

एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले वृषसेनाचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर कर्णाच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही वॄषसेनावर आहे) :). कर्ण सुर्यपुत्र म्हणुन मग ही सगळी सुर्याची लेकरे :)

कर्ण स्वतः महाभारतातल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. कर्णाभवतालचे वलय खरे सांगायचे तर कृष्णार्जुन वगळता इतर सर्वच पात्रांना झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की कृष्ण, अर्जुन आणि कर्ण ही तीन पात्रे मिळुन महाभारतावर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते असे नाही पण या तीन पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. अर्जुनाच्या वलयातुन बाहेर पडुन अभिमन्युने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. घटोत्कच सुद्धा कर्णाच्या शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या बाणाने मारला गेलेला वृषसेन किंवा भानुसेन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात.

त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या कर्णपुत्रांसाठी हा लेख. महाभारतानुसार कर्णाला ५ मुले:
१. वृषसेन
२. भानुसेन
३. चित्रसेन
४. सुषेन
५. सत्यसेन

शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये सुदामन नावाच्या अजुन एका मुलाला जन्म दिला आहे. मला इतर कुठल्या प्रतीत मात्र हा सुदामन दिसला नाही. सावंतांनुसार द्रौपदी स्वयंवरात सुदामन भीमार्जुनांकडून मारला गेला. नंतर कर्णाने दिग्विजया दरम्यान द्रुपदाला नतमस्तक करुन सुदामनाची समाधी बनवुन घेतली असा उल्लेख सावंतांनी केल्याचे आठवते. कर्ण युधिष्ठिरापेक्षा १६ वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझ्यामते एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळेपर्यंत कर्णाचे लग्न होउन त्याचा एक मुलगा तरी हाताशी आला असावा असा तर्क करुन कदाचित सावंतांनी हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.

अजुन एका मुलाचा उल्लेख काही कथांमध्ये येतो. नेमक्या पुराणाचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा जैमिनी भारतात वॄषकेतुचा उल्लेख येतो. हा कर्णाचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. कर्णाच्या सर्व मुलांमध्ये दैवी अंश असलेला किंवा दैवी कार्यसंपादनासाठी जन्मलेला हाच एक. शैशवावस्थेत असताना कृष्णाने याच्याकरवी एका दैत्याचा वध घडवला. या दैत्याला कुठल्याही पुरुष अथवा स्त्री कडुन अथवा कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही असे अभय होते. शैशव अवस्थेतील मुले म्हणजे स्त्री अथवा पुरूष नाहित असा कुठलासा धर्माचा आधार घेउन वृषकेतुच्या हातात मंतरलेल्या दर्भाची काडी देउन कृष्णाने त्या दैत्याचा वध करवला अशी कथा मला पुसटशी आठवते. अर्थात मान्य प्रतींमध्ये हा उल्लेख कुठेच नाही. मुळात वॄषकेतुचा उल्लेखच जैमिनी भारत सोडून इतर कुठेही नाही. जैमिनी भारतानुसार वृषकेतु अर्जुनाबरोबर अश्वमेध यज्ञाच्या युद्धांमध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. बभ्रुवाहनाबरोबर त्यांचे जे युद्ध झाले त्यात अर्जुनाबरोबर वॄषकेतु देखील मारला गेला. मात्र नंतर अर्जुना बरोबर त्यालादेखील परत जिवंत केले गेले. जैमिनी भारताचे केवळ अश्वमेध पर्व सध्या अस्तित्वात असल्याने युद्धोत्तर काळात वृषकेतुचे काय झाले आणि राज्य त्याला न मिळता परिक्षिताला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही.

कर्णाच्या इतर पाचही मुलांनी महाभारत युद्धात भाग घेतला होता. महाभारताच्या युद्धापुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना दोन्ही बाजुंनी तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की एका यौद्धाशी एकाच यौद्धाने लढावे. लढाईच्या पहिल्याच दिवशी काही मिनिटांमध्येच अनेक यौद्ध्यांनी भीष्मावर हल्ला करुन या नियमाला तिलांजली दिली. दुसरा नियम असा होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्यावर हल्ला करु नये. या नियमालाही लवकरच तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे करत असत. स्वत: कृष्ण ज्याचा सारथी होता त्या अर्जुनाच्या रथाचे रक्षण त्याचे दोन मेव्हणे उत्तमौजा आणि युधामन्यु करायचे (हे दोघे शिखंडी, दॄष्ट्यद्युम्नापेक्षा धाकटे म्हणजे अर्थात द्रौपदीपेक्षादेखील लहान) तर कर्णाच्या रथाचे रक्षण पुढच्या बाजुने सुषेण आणि चित्रसेन करायचे आणि मागील बाजुने वॄषसेन करायचा. वॄषसेन वगळता कर्णाच्या सर्व मुलांनी कर्णाच्या आजुबाजुला राहुन युद्ध केले याचा एक अर्थ असाही काढता येइल की ते कदाचित युद्धात वॄषसेना इतके निपुण नव्हते. अर्थात सुषेण आणि चित्रसेन युद्धनिपुन होते असा उल्लेख काही ठिकाणी दिसतो.

कर्णार्जुनाची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की अर्जुनाच्या उपस्थितीत फार कमी प्रमुख यौद्ध्यांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन बाण मारुन तरी कधी मागुन अधर्माने बाण मारुन. कर्ण मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकला किंवा कदाचित त्याला तितका वेळ नाही मिळाला. त्याच्या दोन किंवा तीन मुलांना पांडवांनी त्याच्या उपस्थितीत मारले. सर्वप्रथम बळी गेला भानुसेनाचा. त्याला भीमाने मारले. त्याच वेळेस सुषेणाचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी वृषसेनाने भीमापासुन त्याला वाचवले आणी स्वतः भीमाशी युद्ध सुरु केले. सत्यसेन आणि चित्रसेन मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही नकुलाने मारले. चित्रसेन हा एक कसलेला धनुर्धर होता. त्याने नकुलाचे धनुष्ञ तोडले, रथ मोडला, घोडे मारले. मात्र त्यानंतर नकुल त्याच्या आवडत्या शस्त्रानिशी चित्रसेनावर तुटुन पडला. नकुलाने तलवार हातात घेउन चित्रसेनाच्या रथावर उडी मारली आणि तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. कर्ण आणि वृषसेनाच्या मृत्युनंतर देखील शेवटच्या दिवशी चित्रसेन आणि सत्यसेन जिवंत होते. दोघांनाही नकुलानेच मारले. सुषेण होता की नाही याबाबत गोंधळ आहे.

सुषेणाच्या मृत्युसंदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर सुषेण हे नाव त्या काळातले निखिल, सचिन किंवा अमित होते. १० पात्रांपैकी एकाचे नाव तरी सुषेण असायचेच. धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव देखील सुषेण होते (एकाचे कर्ण आणि एकाचे चित्रसेन देखील होते म्हणा. १०० वेगळीवेगळी नावे कशी आठवावीत. ही मुले जेव्हा गांधारी धृतराष्ट्राला भेटायला जात असतील तेव्हा कदाचित सांगत असतील की मी तुमचा ३३ वा मुलगा नंदक बरंका. आठवते का आपण साडेतीन वर्षापुर्वी भेटलो होतो वगैरे. कसे ना लक्षात राहणार सगळे आणि त्यांची नावे). तर सुषेण नावाबद्दल खुप गोंधळ आहे. एक तर खुप सुषेण होते. त्यातले बरेच राजे, एक धृतराष्ट्राचा मुलगा, दोन्हीकडच्या राजांची नावे सुषेण. या गोंधळात व्यासांनी या सुषेणाबद्दल गोंधळ केला. हा एक निष्णात धनुर्धर परंतु कसा मारला गेला याबद्दल गोंधळ आहे. एकेठिकाणी व्यास म्हणतात की शेवटच्या दिवशी चित्रसेन, सत्यसेनापुर्वी नकुलाने त्याला देखील मारला तर दुसरीकडे हेच व्यास म्हणतात की त्याला उत्तमौजाने कर्णाच्या डोळ्यादेखत मारला (आणि मग पळुन गेला). नक्की काय कळत नाही.

पण ही मुले म्हणजे कर्णाचे कवच होते. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत कर्ण सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मारले गेले. अंतिम युद्धापुर्वी वृषसेन मारला गेल्यावर त्याचे मुख्य संरक्षक कवचच तुटले. तसे अर्जुनाच्या बाबतीत कधीही झाले नाही. अर्थात हे संरक्षक अंतिम कर्णार्जुन युद्धात असेही कुचकामीच ठरले असते. कारण महाभारतात लिहिल्याप्रमाणे ते युद्ध इतके भीषण झाले की त्यांच्या जवळपासच्या प्रत्येक यौद्धाला त्या दोघांनी मिळुन टिपुन काढले. त्या दोघांच्या आसपास लढाई करायची म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे हे ओळखुन इतर सर्व यौद्धे लांब जाउन थांबले. अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या सैनिकांनी युद्ध पुर्णपणे थांबवले होते. तिथे वृषसेन असता तरीही फारसा फरक पडला नसता.

इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांसमोर वृषसेन थोडासा झाकोळला गेला आहे. परंतु महाभारताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. युद्ध्याच्या सुरुवातीला दृष्ट्यद्युम्नाने जेव्हा यौद्ध्यांची वाटणी केली तेव्हा एकेका यौद्ध्याला त्याने कौरवपक्षातील एकेका यौद्ध्याला मारण्याची जबाबदारी दिली. त्यात अर्जुन - कर्ण, भीम - दुर्योधन अशी वाटणी झाली तेव्हा अभिमन्यु - वृषसेन अशी देखील वाटणी झाली. दृष्ट्यद्युम्नाच्या मते अभिमन्यु अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता हे लक्षात घेता वृषसेनाचे महत्व जाणवते. भीष्माने देखील त्यांच्या पक्षातल्या यौद्ध्यांचे मुल्यमापन केले तेव्हा कर्णाला युद्धभूमीपासुन दूर ठेवण्याच्या हेतुन जाणुनबुजुन त्याची अर्धरथी अशी संभावना केली मात्र वृषसेनाला त्यांनी महारथी असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचे दिसते.

एकप्रसंगी कर्ण युद्धभूमीपासुन दूर असताना शल्याला भीमाने घायाळ केले तेव्हा त्याला घेउन कृतवर्मा युद्धभूमीपासुन दूर गेला असता एकट्या वृषसेनाने सर्व पांडवांना सळो की पळो करुन सोडले. त्याने भीमाला निरस्त्र केले, नकुलाच्या मुलाला शतानिकाला तो मारणारच होता इतक्यात इतर पांचाल वीर आणि द्रौपदीपुत्र मध्ये पडले म्हणुन तो वाचला. चक्रव्युहामध्ये देखील द्रोणांनी जयद्रथाला इतर पांडवांना द्वारातच रोखण्यासाठी नियुक्त केले होते (जयद्रथाला तसा वर मिळाला होता) तर त्याच्यामागे लगेच वृषसेनालाच ठेवले होते. अभिमन्यु चक्रव्युहात शिरताच त्याला सामोरा गेलेला पहिला यौद्धा वृषसेनाच होता आणि तो शौर्याने लढला मात्र अभिमन्युने त्याला बेशुद्ध केले आणी पुढे शिरला. यथावकाश अभिमन्युचा बळी गेल्यावर अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा जयद्रथाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी द्रोणांनी ज्या सहा यौद्धांना नियुक्त केले होते त्यात एक वृषसेन होता. इतर जण होते कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य आणि कृपाचार्य. थोडक्यात सांगायचे तर द्रोणाचार्यांनी त्यांचे सर्वोत्तम योद्धे त्याच्या आजुबाजुला ठेवले.

पंधराव्या दिवशी खुद्द द्रोणांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती त्या लोकांमध्ये वृषसेन एक होता. त्याने आख्ख्या द्रुपद सैन्याला खिळवुन ठेवले होते. स्वतः द्रुपद जो तोवर फार कमी लोकांकडुन हारला होता तो देखील वृषसेनासमोर निष्प्रभ ठरला आणि बेशुद्ध झाला. नंतर दृष्ट्यद्युम्नाने द्रोणांना मारल्यावर मात्र तो पळुन गेला.

द्रुपद, पांडव, सात्यकी, अर्जुन यापैकी सर्व महत्वाच्या यौद्ध्यांबरोबर वृषसेन लढला. अश्या या शूर यौद्धाचा अंत देखील त्याला साजेसा झाला. भीम ऐन भरात असताना त्याने कौरवांची दाणादाण उडवली होती. स्वतः कर्ण पळुन जायच्या तयारीत होता. त्यावेळेस एकटा वृषसेनच काय तो भीमाला तोंड देण्यासाठी उभा राहिला. त्याच्याकडे बघुन कर्ण देखील परत फिरला. त्यानंतर त्या युद्धभूमीवर सर्वात घनघोर युद्ध लढले गेले. भीमाच्या मदतील नकुल आला. वृषसेन एकटा
त्या दोघांशीही लढत होता. नकुलाने पराक्रम गाजवला देखील मात्र वॄषसेनाने प्रथम त्याचे चिलखत आणि मग त्याचे धनुष्य तोडले आणि मग त्याचे घोडे देखील मारले. कर्णाच्या दुसर्या मुलाने चित्रसेनाने देखील हा पराक्रम नंतर केला मात्र तेव्हा नकुलाने तलवारीने युद्ध करुन चित्रसेनाला मारले . वॄषसेनाने मात्र नकुलाची तलवार देखील बाणांनी तोडली. हतबल झालेला नकुल अखेर भीमाच्या रथावर चढला आणि तिथुन त्या दोघांनी परत वॄषसेनाशी युद्ध सुरु केले. वृषसेनाचे आक्रमण इतके धडकी भरवणारे होते की भीमाने नकुलाला वाचवण्यासाठी थेट अर्जुनाची मदत मागितली. अर्जुन येइपर्यंत वॄषसेनावर द्रौपदीची पाच मुले, द्रुपदाची पाच मुले आणि स्वतः सात्यकी (भीम नकुल वेगळेच) अश्या ११ यौद्ध्यांनी हल्ला केला. इतर कौरव यौद्धेदेखील मग वॄषसेनाच्या मदतीला गेले. नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात युद्ध करणार्या लोकांच्या जोड्या पडल्या.

वॄषसेनाने जणू नकुलाला मारण्याचा विडाच उचलला होता. तो वारंवार त्याला निशस्त्र करुन मारु इच्छित होता. अखेर अर्जुनाने वृषसेनाला स्वतः मारण्याचे ठरवले. याखेपी भीम, अर्जुन, नकुल आणि शतानिक (नकुलाचा मुलगा) असे चार प्रमुख यौद्धे वॄषसेनाशी लढत होते. वॄषसेनाने त्या सर्वांना आपल्या बाणांनी विद्ध केले. त्याच्या या पराक्रमावर खुष होउन कौरव सैन्य त्याला उत्तेजन देत होते. तिथेच घात झाला. जखमांनी चवताळलेल्या अर्जुनाने अतिशय प्रखर युद्ध करत अखेर त्याचे दोन्ही हात बाणांनी छाटुन मग त्याचे शिर उडवले. इतर कुठल्याही यौद्ध्याच्या मृत्युपेक्षा जास्त दु:ख कर्णाला वॄषसेनाच्या मृत्युवर झाले. त्याच दिवशी लढल्या गेलेल्या महाभारतातल्या सर्वात भीषण युद्धात अखेर अर्जुनाने रथाचे चाक जमिनीत घुसलेल्या कर्णाचे देखील शीर उडवले. राधासुताचा सर्वात निष्णात शूर पुत्र युद्धाच्या सतराव्या दिवशी पडला. जैमिनी भारताकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की युद्धाच्या १८ व्या दिवशी चित्रसेन आणी सत्यसेनाच्या मृत्युसरशी राधासुताचा वंश पुर्णपणे संपला.

संस्कृतीधर्मइतिहासलेख

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 11:49 am | मृत्युन्जय

युधीष्टीराची कुठली मुत्सद्देगीरी?

हा माझ्या एका लेखाचाच विषय आहे. संदर्भांची आणि घटनांची नीट बांधणी करतो आहे. त्यामुळे आत्ता लगेच यावर काही बोलत नाही. पण महाभारताचे राजकारण मुख्यत्वे तीन माणसांच्या अवतीभोवती फिरते कृष्ण, दुर्योधन आणी युधिष्ठिर (शकुनी तोंडी लावण्यापुरता). या तिघांची प्रत्येक चाल ही त्या त्या परिस्थितीतल्या राजकारणाची एक उत्कृष्ट खेळी होती. यात कृष्ण दुर्योधनाला भारी पडला. युधिष्टिर या दोघांपेक्षाही राजकारणात थोडा कच्चा होता पण इतरांपेक्षा खुप पुढचा. म्हणुनच तो इतर सर्व बाबतीत उणा असुनही यथायोग्य राज्य करु शकला.

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 12:01 pm | प्रचेतस

'थोरला हो' हे शब्द मूळ महाभारताच्या प्रतीत नाहीत. हे शब्द इरावती कर्व्यांनी 'युगांत' मध्ये द्रौपदीच्या विवेचनात वापरले आहेत.

त्यांच्या तशा शब्दयोजनेमागील सोर्स काय होता हे दिलेय का कुठे?

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 12:09 pm | प्रचेतस

सोर्स कसला. हे नुसते विवेचन आहे.

बाकी ह्या शब्दावरुन कुरंदकर आणि बाईंमध्ये वाद झाल्याचे स्मरते. बाईंनी हे वाक्य पुढील प्रतीत 'पाचांमध्ये थोरला हो' असे दुरुस्त केले.

नेमका वाद काय होता ह्याचा संदर्भ युगांतमध्ये बघावा लागेल.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 12:34 pm | बॅटमॅन

हात्तेरेकी, असंय होय.

बाकी प्रकाशक रा० ज० देशमुख यांना लिहिलेल्या एका पत्रात कुरुंदकरांनी बाईंची फुल साले काढली आहेत. "एकदा वादविवादाच्या राउंडात घेतले तर बाईंना झेपणार नाही" अशा आशयाचा मजकूर तिथे वाचल्याचे स्मरते.

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 12:42 pm | प्रचेतस

अगदी खरंय.
कुरुंदकरांनी युगांतमधल्या बाईंच्या इंटरप्रीटेशनमधले बरेच कच्चे दुवे दाखवून दिलेत.

पैसा's picture

24 Jul 2015 - 5:57 pm | पैसा

त्यांचे लिखाण हे त्यांच्या मते घटनांचा अर्थ आणि व्यक्तिरेखांच्या वागण्याचे त्यांना वाटणारे विश्लेषण असेच आहे ना!

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 6:36 pm | प्रचेतस

हो.
पण ते बऱ्याच ठिकाणी गंडलेलं आहे.

जगप्रवासी's picture

24 Jul 2015 - 12:16 pm | जगप्रवासी

अप्रतिम लेख

वा..खूपच छान लेखन. कर्णाबद्दल बोलायचं झालं तर कृष्णानंतर तोच लाडका आहे.
मृत्युंजय खूपदा वाचलय, पण ह्या लेखामुळे वृषसेनाबद्दल खूप छान माहिती कळली.
धन्यवाद :)

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2015 - 11:18 pm | श्रीगुरुजी

अत्यंत माहितीपूर्ण असा अप्रतिम लेख! बरीच नवीन माहिती मिळाली.

लेखाचे शीर्षक "झाकोळलेल्या सूर्यपुत्राची लेकरे" असे हवे होते.

मृत्युन्जय's picture

27 Jul 2015 - 10:37 am | मृत्युन्जय

शतकी धाग्याबद्दल सर्व वाचक प्रतिसादकांचे पुनःश्च आभार.