गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.
आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).
गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.
कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.
प्रतिक्रिया
20 Jun 2015 - 11:37 am | एस
:-) मस्त!
20 Jun 2015 - 3:21 pm | विवेकपटाईत
धन्यवाद, स्वॅप्स
20 Jun 2015 - 8:22 pm | पैसा
किती छान!
21 Jun 2015 - 6:58 pm | के.पी.
मस्त!!
22 Jun 2015 - 1:30 am | पद्मावति
एकदम क्यूट आहे तुमची परिराणी.
22 Jun 2015 - 8:45 am | असंका
फारच सुंदर!!
22 Jun 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मनोगत !
नाचणारी, नाक मुरडून खळखळून हसणारी आणि काजू खाताना हळूच दादाजींच्या हाताचा चावा घेणारी परी डोळ्यासमोर उभी राहिली !
22 Jun 2015 - 4:30 pm | सस्नेह
एखादा फोटो द्या ना तुमच्या परीचा !
23 Jun 2015 - 12:30 am | रातराणी
आवडले!
23 Jun 2015 - 12:38 am | श्रीरंग_जोशी
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. तुमची परिकथा आवडली.
23 Jun 2015 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा
+++१११ अगदी हेच्च आलं मनात,परिकथाच !
23 Jun 2015 - 9:42 am | सिरुसेरि
सुंदर लेख .. अगदी आराध्या आणि अमिताभ यांची आठवण झाली.
23 Jun 2015 - 10:00 am | विशाल कुलकर्णी
एकदम मस्त आहे तुमची परीराणी ....
24 Jun 2015 - 10:16 am | यशोधरा
किती गोड :)
24 Jun 2015 - 10:20 am | खेडूत
एकदम मस्त ..!
:)
24 Jun 2015 - 12:26 pm | नाखु
परी खरेच शांती + आनंदी दूत असते.
परीचा बाप
अनुभवी नाखुस