बोलक्या जगातील... मुक्या कळ्या

अमृत's picture
अमृत in जनातलं, मनातलं
11 Jun 2015 - 12:22 pm

(मिपावर यापूर्वी लिहिलेल्या व या विषयाशी संबधीत असलेल्या प्रयास वरदान या लेखांवर खूप सकारात्मक व आपुलकिच्या प्रतिक्रीया आल्यात म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.)

आजच्या लोकमतला एक बातमी आहे '१५४२ अपंगांना आधार'. महाराष्ट्र शासनातर्फे अपंगांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य केले जाते त्यासंबंधीची ही बातमी. बातमीत सुरूवातीलाच लिहिलय की अपंगाना शासकीय नोकरीत ३% आरक्षण असूनसुद्धा जवळपास ४०% अनुशेष आहे. हा इतका मोठा अनुशेष असण्यामागचे कारण काय? याचा कधी विचार केला गेलाय का? उत्तर अर्थातच - नाही.सोप्प करून सांगतो वानगीदाखल,बेसल ३ मानदंड क्या है? या प्रश्नाचं उत्तर कुणी देऊ शकेल काय . बहुतांश सामान्य लोकं सुद्धा देऊ शकणार नाही. पण हा प्रश्न विचारला गेला होता तो नुकत्याच झालेल्या पोस्टाच्या MTS (Multi Tasking Staff)च्या परीक्षेत. या पदाकरीता शैक्षणीक पात्रता होती १०वी पास. आणि या प्रश्नाचा आणि या नोकरीचा काय संबंध आहे हे तो पेपरसेटरच जाणे.

हे सगळं सांगण्यामागचं कारण की, आज जगात २५ ते ३० कोटी मुकबधीर लोकं आहेत. यातील बहुतांश म्हणजेच दोन तृतीयांश लोकं विकसनशील देशातील आहेत. एकट्या भारतातच प्रत्येक १२व्या मुलाला जन्मतः श्रवणदोष असतो. तरीही ही मुलं उपेक्षित का? केवळ आरक्षण देऊन आपली जवाबदारी पूर्ण होते काय? खचितच नाही. ऐकायला येतं नाही म्हणून बोलता येत नाही कारण जोपर्यंत मेंदूला आवाजाची ओळख होतं नाही तो पर्यंत आपण त्या आवाजाची नक्कल करूच शकत नाही. उदा. जर आपल्याला कधी सिंह कसा गर्जना करतो हेच माहीती नसतं तर आपण कसं काय तो आवाज काढायचा प्रयत्न केला असता. आणि याच कारणामूळे या मुलांचा शब्दकोश मर्यादीत असतो या मर्यादेमूळे ही (बहुतांश) मुलं व्यवस्थीत शिक्षण घेऊ शकत नाही. आपसुकच जेव्हा नोकरी करण्याची वेळ येते तेव्हा ही मुलं या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत.

शोकांतीका अशी आहे की ही मुलं दिसायला अगदी सर्वसामान्य असल्याने अपंग असूनसूद्धा अपंगांच्या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. नोकरी मिळत नाही, धंदा करायचा असेल तर संवाद साधणे आवश्यक मग तो पण पर्याय अगदीच मर्यादीत. मग करायचं काय? तर मनात कुढत राहायचं. वरून आनंदी दिसणारी ही मुलं मनानी पार खचलेली असतात. आईवडलांचं पेंशन्सुद्धा यांना मिळू शकत नाही कारण शासनालेखी ही मुलं धडधाकट. हो मग काय तसा शासन निर्णयच आहे. या सगळ्याची परिणीती म्हणजे हि मुलं समाजापासून अलिप्त होत जातात, स्वभाव लहरी बनतो, मनासारखं झालं नाही तर लगेच रूसवेफुगवे येतात. तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर टीव्ही लावा आणि आवाज बंद करा. कस वाटतं? किंवा अंधार्‍या खोलीत न बोलता संवाद साधून बघा. कसं वाटतय?

मग या मुलांनी जायचं तरी कुठे? सुशिक्षीत आई वडील असतील तर ठिक नाहीतर परिस्थीती खरच बिकट आहे. मी लहानपणीपासून बघतोय माझ्या भावाला व त्याच्या मित्रांना, दिसायला इतके सुंदर, बुद्धीमान मुलं पण नोकरी काय तर चपराशी, फीटर, रंगारी. बरं पगाराचं काय तर तोही नियमीत नाही, कधी मिळणार कधी नाही. कित्तेकदा तर या मुलांचे मेहनतीचे पैसे लोकांनी बुडविल्याचं माझ्या पहाण्यात आलय. आमच्याकडे भावाचा मित्र राहायचा भाड्याने. रंगसफेदीची कामं घ्यायचा पण त्याच्या एकाही ग्राहकाने वेळेत पैसे दिल्याचं कधी बघण्यात आलं नाही. कधी कधी तर त्याला पत्नी व मुलाला माहेरी ठेवावं लागायचं पैसे नसल्याकारणानी. भावाचीपण तीच गत टायपिंगची काम करून सुद्धा कधी वेळेत पैसे मिळणार नाहीत. रेल्वेत मुकबधीरांकरिता राखीव जागा असतात, सवलतीच्या दरात पण आरक्षण केंद्रावरील कारकून सहसा याचा लाभ मिळूच देत नाहीत. काही दिवसांपूर्वी भावाला पूण्याला यायचं आरक्षण करायचं होतं, मी आंतरजालावरून माहीती बघितली तर अपंगाच्या कोट्यातील सर्व जागा शिल्लक होत्या, पण भाऊ जेव्हा तिकीट काढायला गेला तर कारकून सरळ नाही म्हणून मोकळा झाला. याला बोलता येत नसल्यानी वाद घालायचा प्रश्नचं नव्ह्ता. शेवटी मीच काढून दिले तिकिट. हीच गत अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची. प्रमाणपत्रावर स्पष्टपणे 'Permanent, non progressive, not likely to improve' लिहीलेलं असूनसुद्धा हे प्रमाणपत्र दर ३ की ५ वर्षांनी नुतनीकृत करावं लागतं. हे अपमानकारक नाही का? दर ३ - ५ वर्षांनी हा सरकारी शिक्का माथी मारून घ्या.

आपणाला सुशिक्षीत व सुसंस्कृत म्हणवणार्या समाजानी इतकीपण अनास्था का दाखवावी या मुलांप्रती? या मुलांना मुख्य प्रवाहात आणायचं सोडून केवळ स्वतःचा स्वार्थ का बघावा? केवळ या मुलांबरोबर संवाद कसा साधायचा इतका एकच एकांगी विचार करून नोकरी नाकारणे हे खरच योग्य आहे काय? एक गोष्ट प्रकर्षानी सांगू इछितो की या मुलांइतकी एकाग्र मुलं शोधून सापडणार नाहीत कारण काम करताना यांना कोणत्याच आवाजाचा व्यत्यय येत नाही. एकदा का काम समजलं की ते फत्ते करणारी ही मुलं.

मनुष्य हा समाजात रहणारा प्राणी आहे असं आपण मोठ्या गर्वानी म्हणतो. मग ही अपंग मुलंसुद्धा समाजचा एक भागच नाही काय? आपल्या लहानग्यांना शिकवताना सर्वसमावेशाचे धडे लहानपणापासूनच द्यायला हवेत. काही दिवसांपूर्वी डिजनीवर हँडी मॅनी या कार्टून मधे एक पात्र मुकबधीर दाखविल्याच पाहाण्यात आलं. तसच NDTV च्या संकेतस्थळावर हा धागा बघण्यात आला, तुम्हीसुद्धा अवश्य बघा खूपच भावपूर्ण विडीओ आहे. जर पाश्चात्य जगात खर्या अर्थानी Inclusivity ची सुरवात झालीये तर मग भारतातपण का नाही?

(लेख थोडा विस्कळीत वाटु शकतो पण जसं सुचलं तसं लिहिलं. तसच या लेखात प्रामुख्याने केवळ मुकबधीरांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रीयांच्या अनुशंगाने जर कमी भांडवलात करण्याजोगे काही उद्योगधंदे असतील तर अवश्य कळवा )

मुक्तकसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

"सुशिक्षीत आई वडील असतील तर ठिक, नाहीतर परिस्थीती खरच बिकट आहे......"

एकदम योग्य.

आमच्या घरातील एक उदाहरण.

१९७०च्या सुमारास, माझ्या आजोबांनी त्यांच्या संपत्तीचा (स्वकष्टार्जित) अर्धा वाटा, माझ्या विकलांग आत्याच्या नावे केला आणि उरलेला अर्धा वाटा, माझ्या इतर काकांना आणि आत्यांना (४ काका आणि ६ आत्या) समप्रमाणात दिला.मुले आणि मुलीत भेदभाव केला नाही.

१९८०-८१ मध्ये आजोबांची मालमत्ता विकली आणि ठरल्याप्रमाणे विकलांग आत्याला, अर्धा वाटा मिळाला.त्या पैशात तिचे उर्वरीत आयुष्य व्यवस्थित गेले.

तुमच्या ह्या लेखामुळे, माझ्या आजोबांच्या न्यायप्रिय गुणाची, परत नव्याने ओळख झाली.

खूप छान लेख आणि हा प्रतिसादही चांगला आहे.

पैसा's picture

11 Jun 2015 - 5:03 pm | पैसा

अगदी मनापासून लिहिलाय आणि तुम्हाला या सर्व परिस्थितीची अगदी जवळून ओळख आहे. आम्हाला तर हे सगळे माहितच नसते.

थोडक्या शिक्षणात आणि भांडवलात करण्यासारखे धंदे म्हणजे जसे तुमचा भाऊ टाइपिंग करतो त्याच्याबरोबर झेरॉक्स काढणे, स्टेशनरी विकणे, ऑनलाईन तिकिटे काढून देणे, मोबाईल, डिश टीव्ही रिचार्ज असेही काही करता येईल. त्या सोबत मुलांना कॉम्प्युटर प्रिंट आऊट्स काढून देणे इ. कामेही याच दुकानात होऊ शकतात.

एखादे लहान हॉटेल/ टेक अवे चालवणे हे करता येईल. माझ्या माहितीत एकजण रेडिओ, पंखे, इस्त्र्या इ. विक्री आण दुरुस्तीचे दुकाम चालवतो. मात्र त्याचा भाऊ सुद्धा बराच वेळ त्याच्याबरोबर दुकानात असतो. या धंद्याला अर्थातच जरा जास्त भांडवल लागेल. लघु उद्योजकांना बर्‍याच अंशी सरकारकडून प्रशिक्षण वगैरे मदत मिळते. असे काहीही करता येईल. तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा!

मधुरा देशपांडे's picture

11 Jun 2015 - 5:06 pm | मधुरा देशपांडे

लेखात मांडलेल्या भावनांशी सहमत. मुविंचा सकारात्मक प्रतिसादही आवडला.

एका मित्राचे आईवडील आठवले. वडील थोडंफार बोलू शकतात पण आई अजिबातच नाही. त्यांना बोलायचं फार असतं पण मित्रं समोर असल्याशिवाय संवाद साधणं कठीण होतं. कारण मुकबधिरांना जी खुणांची भाषा शिकवली जाते ती आम्हाला कळत नाही. पण त्या काळातही त्यांचे आईवडील बर्‍यापैकी सजग असल्याने त्यांची नोकरी वैगरे व्यवस्थित आहे हा काय तो प्लस पॉईंट!!