आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
1. कोणताही पुर्वाग्रह नको.
2. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
3. काही माहिती अनुपलब्ध असेल तर ते स्पष्ट करावे.
4. अस्सल माहितीवरून काही सिद्धांत काढायचा असेल तर काढावा.
5. उपमान प्रमाणावर कोणताही सिद्धांत ठरवू नये.
साधनचिकित्सा – साधनांचे दोन वर्ग अस्सल कागद आणि बखरींसारखे चरित्रात्मक ग्रंथ. औरंगजेबाच्या दरबारातील कामकाजाची दररोजची नोंदींना ‘अखबार’ म्हणतात. मिर्झाराजे जयसिंह आणि रामसिंह यांच्यातील पत्रव्यवहार ‘राजस्थानी व फारसीतून’ आहे.
रस्ते व सराया
शिवाजीराजे आग्र्याला जात असतानाच्या वर्णनात लेखकानी रस्ते बैलगाडी जाता येईल इतके रुंद असल्याचे नमूद केले आहेत. प्रवाशाच्या सोईसाठी शेरशाहने दर 2 कोसावर सराया बांधल्या. अशा 1700 सरायांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक सराईत पाण्याचे कुंड, जेवण व झोपायची सोय, तसेच घोड्यांना दाणा-पाणी याची सोय असे. प्रवाशाच्या पदा, श्रेष्ठतेप्रमाणे सोय उपलब्ध असे. नंतरच्या काळात या सरायांभोवती गावे वसली. या सराया डाकचौकी म्हणून ही वापरल्या जात.
बातमीदार व संदेशवाहक
मोगल राज्यात 4 प्रकारचे बातमीदार असत. 1. वाकेनवीस 2. सवाहनिगार. 3. खूफिया नवीस. 4. हरकारा.
पहिले दोन सैन्यात व परगण्यात विखुरलेले असायचे. हरकारा म्हणजे तोंडी निरोप्या किंवा कधी कधी लखोटे नेणारा. आजच्या भाषेतील अंगडिया, कुरीयरवाला तर खूफियानवीस म्हणजे गुप्त हेर. बातमीपत्रे नळ्यातून पाठवली जात. चंगेजखानाच्या सैन्यात मोहिमेवर निघताना अधिकृत बातमीदार जासूदांची दोन रिंगणे सैन्याभोवती असत. पुढील परदेशाची मोहिमेच्यासाठी उपयुक्त माहिती ते सतत पुरवत असत. नदी-नाले, व्यापार-उदीमाच्या जागा, छावण्यांच्या जागा, हातघाईसाठी, लढाईचे मैदान वा जागांची निवड हे काम असे. जासूदाकडे राजमुद्रा असलेला बाण असे त्यातील आदेश राजाज्ञा मानल्या जात.
लेखकाने आग्रा ते बऱ्हाणपुर 520 मैलाचे गणित घालून नोंदींचा पाठपुरावा नकाशे व अन्य साधनांनी केला आहे यावरून त्यांच्या चिकाटीचा व सखोल शोधाचा माग लागतो.
नेताजी पालकर यांवर सखोल माहितीचे परिशिष्ठ 1 वाचनीय आहे.
पुरंदरचा तह झाल्यावर पन्हाळ्याच्या मोहिमेत अपयश आल्याचे निमित्त होऊन नेताजी पालकर विजापुरच्या अदिलशहाकडे चाकरीला गेला. नंतर शिवाजीमहाराज आग्र्याला 5 मार्च 1666 रवाना झाल्यानंर लगेच 15 दिवसात तो मोगलांना येऊन मिळाला. शिवाजीराजे निसटल्यावर नेताजीला बीड मधून पकडून दिल्लीला रवाना करण्यात आले. नंतर धर्म परिवर्तन करून त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेत पाठवले असताना त्याने निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर त्याची दिलेरखानावरोबर दक्षिणेत नेमणूक झाली असताना 1676 साली त्यानी पुन्हा महाराजांकडे गमन केले.
पुढील संशोधनाच्या दिशा परिशिष्ठ 2 मधे
हे पुस्तक कुठे उपलब्ध? रसिक साहित्य
कदाचित बुकगंगा.कॉम वर चौकशी करून पहावी.
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188-2 शनिवार पेठ, पुणे.
पाने - 276. किंमत रु. 300
सध्या लेखक वरील पत्त्यावर राहात नाहीत. त्यांचा सध्याचा फोन क्रमांक इ.सं.मं. मधे चौकशी करून उपलब्ध होऊ शकला नाही. कोणाला माहित असल्यास जरूर कळवावा. ही विनंती.
समाप्त
प्रतिक्रिया
21 Mar 2015 - 3:35 pm | एस
चांगली ओळख. पुस्तक नक्कीच वाचले जाईल इतपत उत्सुकता वाढली आहे, हे श्रेय आपल्या लेखनाचेच आहे. धन्यवाद.
12 Nov 2016 - 12:01 pm | शशिकांत ओक
आधीच्या भागांच्या लिंक्स...
भाग १ :
भाग २
भाग ३
21 Mar 2015 - 5:07 pm | तिमा
महत्वाचा विषय घेऊन, या पुस्तकाच्या अनुषंगाने, विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. चारी लेख वाचल्यावर ज्ञानात भर पडली. इतिहास विषय लहानपणापासून आवडीचा असल्यामुळे सर्वच इतिहासावरचे लेख कायम आवडीने वाचतो.
21 Mar 2015 - 9:27 pm | खटपट्या
या लेख मालिकेच्या निमित्ताने खूप चांगली माहीती मिळाली आणि चर्चा झाली. अशीच चर्चा प्रतापगड-अफजलखान प्रकरणावरही व्हावी.
21 Mar 2015 - 10:18 pm | आनंदराव
लगेच्ल
लगेचच पुस्तक आणवले
आता उद्या वाचुन काढणार.
21 Mar 2015 - 10:20 pm | आनंदराव
लगेच्ल
लगेचच पुस्तक आणवले
आता उद्या वाचुन काढणार.
21 Mar 2015 - 11:12 pm | शशिकांत ओक
इथे अनेकांनी या धाग्यांवर लेखमाला वाचून दिलेल्या प्रतिक्रियां बद्दल....
आनंदराव आपणही पुस्तक वाचून आणखी काही या विषयावर वेचक व माहितीपूर्ण लेखन करावे ही विनंती...
21 Mar 2015 - 11:23 pm | प्रचेतस
पुस्तकाची उत्तम ओळख ओककाका.
बाकी इतिहास संशोधनातील साधनांत बखर हे निम्न दर्जाचे साधन मानले जाते. तर करीना, पत्रव्यवहार, सरकार दफ्तर दस्तावेज ही उच्च दर्जाची मानली जातात.
22 Mar 2015 - 9:45 am | शशिकांत ओक
डॉ अजीत जोशींनी तेच म्हटले आहे. त्यात बखरी सारख्या संदर्भांना सपोर्टिंग एव्हिडन्स मानले आहे मेन नाही.पुस्तकात या गोष्टीची चर्चा आहे.
त्यांच्या शोध कार्याला पुरस्कार मिळाले आहेत. असे त्यांच्या वेबसाइट वरील माहितीतून समजते. मात्र त्यावर त्यांचा फोटो, नवा पत्ता व फोन क्र मिळत नाही.
12 Nov 2016 - 1:10 am | शशिकांत ओक
कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा.
मध्यंतरीच्या काळात डॉ अजित जोशींशी संपर्क साधला गेला. चर्चा झाली. त्यातून पुढे सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांनी चढलेल्या बुरूजा जवळून चढायचा प्रयत्न केला अशा लढाईचे मिलिटरी कँपेनवर आधारित लढाया कशा प्रकारे लढल्या गेल्या असाव्यात यांचा सध्याच्या मिलिटरी कमांडरांनी अभ्यास करून ते सादर करावे असा प्रयत्न करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9881901049.
12 Nov 2016 - 6:47 am | चित्रगुप्त
असे काही बघितले की आपले अजून फार काही वाचायचे राहून गेले आहे हे जाणवते (आणि आता ते बहुधा होणारही नाही याची काहीशी खंतही).
याविषयी अवश्य लिहावे.
12 Nov 2016 - 9:15 am | मनो
भाग १,२,३ यांच्या लिंक्स इथे टाकता येतील का?
पुस्तक ईबुक स्वरूपात सापडले नाही. भारताबाहेर कसे मिळेल माहित आहे का?
12 Nov 2016 - 12:02 pm | शशिकांत ओक
आपल्या विनंती प्रमाणे आधीच्या भागांच्या लिंक्स...
भाग १ :
भाग २
भाग ३
12 Nov 2016 - 10:25 am | शशिकांत ओक
नमस्कार, ते पुस्तक रसिक साहित्य, बुकगंगा.कॉम साईटवर विदेशात पाठवायची व्यवस्था करू शकतील. ईबुक प्रत उपलब्ध नाही.
13 Nov 2016 - 3:01 am | मनो
धन्यवाद. सगळॆ भाग आत्ताच वाचून पाहिले. लेखक स्वतःच म्हणतो त्याप्रमाणे ही एक शक्यता आहे की काय घडले असावे, पण जोपर्यंत प्रत्यक्ष पुरावे हाती लागत नाहीत तोवर कुणीच काही नक्की सांगू शकत नाही. मूळ पुस्तक पाहून त्यांनी दिलेले आधार तपासून पाहावे लागतील.
माझ्या इतर वाचनाप्रमाणे खालील मूळ / विश्वसनीय साधने या आग्रा प्रकरणाबद्दल आहेत
१) राजस्थानी पत्रे - पराकालदास, कल्याणदास, गजराज इत्यादी
२) संक्षिप्त अखबार - नकला राजस्थानी दप्तरातील
३) खाफी खान, सभासद बखर, जेधे शकावली आणि इंग्रजी, पोर्तुगीज पत्रे यांच्यातील सुटकेची दंतकथा
४) नरवरच्या सुभेदाराची बातमीपत्र
५) विमलदासचे परमानंदाच्या अटकेबद्दल पत्र (त्यांच्याबरोबर हत्ती देखील होते)
त्यामुळे परमानंदाबरोबर शिवाजी होता हे म्हणणे अशक्य आहे कारण परमानंद पकडला गेला होता आणि त्याच्याबरोबर हत्ती होते त्यामुळे त्याला जलद पळणे अशक्य होते. आणि पकडले गेल्यावर शिवाजीराजांची ओळख गुप्त राहणे अशक्य होते.
आग्रा प्रकरणाशी मला स्वतःला संशोधनात सापडलेल्या काही गोष्टी
१) शिवाजी आणि औरंगझेब यांची ज्या आग्रा किल्ल्यातल्या घुसलखान्यातल्या दरबाबरात भेट झाली तो घुसलखाना आज अस्तित्वात नाही. पण तो १८१९ पर्यंत तिथे होता. त्याचे शहाजहान बादशहाच्या काळातले चित्र माझ्याकडे आहे. त्या घुसलखान्याचे काही खांब कुठे आहेत, तो कसा होता ह्याची बरीच माहिती सापडली आहे. त्याचे पुढे काही करेन, वेळ मिळेल तसे.
२) आग्र्यात त्या काळातल्या हवेल्यांचे architecture कसे होते याचा एक ठराविक साचा होता (उदाहरणार्थ आपल्याकडे मराठा वाडा हा नेहेमी एका ठराविक पद्धतीचा असायचा). त्यातल्या काही हवेल्या अजून उभ्या आहेत, तुटक्या स्वरूपात. त्यानुसार शिवाजीराजांना ठेवले होते ती हवेली कशी असावी याचा अंदाज करता येतो. शेकडो लोक, जनावरे यांच्यासाठी तिथे मोठी जागा असली पाहिजे. मला नाही वाटत की अश्या मोठ्या जागेवर अनेक महिने कडेकोट पहारा ठेवणे शक्य आहे - कारण सुरुवातीला ३००-४०० लोक जरी पकडले तरी त्यांना लागणारा शिधा, जनावरांना लागणारा चारा हा भरपूर असतो, त्यामुळे खूप कडक पहारा ठेवणे अशक्य आहे. त्यात आधी आत रामसिंगचा पहारा होता आणि बाहेर दुसरा पहारा होता. आणि राजे सुरुवातीला रामसिंगला भेटायला गेलेही होते, त्यामुळे ही काही पक्की कैद नव्हती, काही मुख्य प्रवेशद्वारांवर चौक्या ठेवून पहारा असावा. (राजांना कैदेत ठेवायचे असते तर सलीमगढ अथवा ग्वाल्हेर येथे किल्ल्यात पक्की कारागृहे होतीच - जिथे दारा, शुजा, मुराद, त्यांचे मुलगे, औरंगझेबाचा मुलगा मुहम्मद सुलतान असे महत्वाचे कैदी ठेवले होते. त्यांच्यापैकी कुणी निसटू शकले नाही). त्यामुळे नजर चुकवून (जसे रात्री, किंवा ठराविक वेळी ज्या वेळी गस्त संपते, अथवा पहारेकर्याच्या वेळेचा अभ्यास करून) निसटणे सहज शक्य असावे. एकदा राजे पळून गेल्यावर फौलादखानाच्या हिताचे होते की पहारा कसा खूप कडक होते ते सांगायचे. राजांच्या हिताचे होते की प्रत्यक्ष ते कसे निसटले, त्यांना कुणी आतून मदत केली ते गुप्त राहावे आणि कोणती तरी दंतकथा लोकात पसरावी. अगदी औरंझेबाच्या काही प्रमाणात हिताचे होते की शिवाजी पळून जावा. (खुद्द बादशहाचे आसन स्थिर नव्हते कारण शहाजहान जिवंत होता आणि तो या भेटीपूर्वी काही महिने वारला. दरबारात दोन पक्ष होते - शाहिस्तेखान इत्यादी लोकांचे म्हणणे होते की शिवाजीस ठार करावे आणि राजपूत आणि इतर लोकांचे म्हणणे होते की बादशहाचा शब्द - पुरंदरचा तह -आणि जयसिंगाची प्रतिष्ठा यामुळे धोक्यात येईल आणि कुणी यानंतर पुन्हा बादशाहावर विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्ष औरंगझेबाचे पूर्वी शाहजादा असताना दख्खनचा सुभेदार म्हणून शिवाजीबरोबर यापूर्वी पत्ररूपाने संबंध आले होते आणि त्यामुळे संभाजीराजाच्या वेळी जशी उघड वैराची स्थिती होती तशी इथे मुळीच नव्हती. बादशाही वर्चस्व शिवाजीराजांनी पुरंदरच्या तहानुसार कबूल केले होते. बादशहाला त्यामुळे शिवाजीप्रकरणाचा असा निर्णय लागणे एक प्रकारे चांगले होते कारण शिवाजीला सोडला तर शाहिस्तेखानाची पक्ष नाराज झाला असता आणि ठार केला असता तर राजपूत दुखावले असते) प्रत्यक्ष पहारा इतका कडक नसावा. (जसे अगदी २०१६ मध्ये भारतीय सैन्य जगातल्या सर्वात जास्त नजर ठेवल्या जाणाऱ्या सीमेवरून पाकिस्तानात जाऊन परतलेच की) त्यामुळे आश्चर्य आणि अनपेक्षितता याचा भरपूर फायदा शिवाजीराजांना मिळाला.
13 Nov 2016 - 3:21 pm | शशिकांत ओक
नमस्कार, लेखकाने पुस्तकात आपण लिहिलेले पुरावे सादर केले आहेत. ही एक शक्यता सत्यतेच्या जवळ जाते. असे मला वाटते. कवींद्र परमानंदाच्या सोहळ्या निमित्ताने ते बाहेर पडले. मात्र पमानंदावर आळ आला होता असे घडले नाही कारण ही घटना २२ जुलाईची होती. मुलगा मागे ठेवून ते गेले ही सत्यता आहे. फक्त ते १७ ऑगस्टला मथुरेला त्याची व्यवस्था लावून गेले हे सर्वमान्य आहे. असो. ते चांदवड जवळच्या मनोहर गडावर आले तो कुठला असावा हा या पुस्तकातील पुराव्यातील कच्चा दुवा आहे.
घुसलखाना नामक इमारत कुठे होती यावरील आपले शोधकार्य समजून घ्यायला आवडेल. पुस्तक मागवून जरूर अधिक चर्चा लेखकांच्या समावेश करण्यात मला आनंद वाटेल. डॉ अजित जोशी व मी व्हॉट्स अॅपवर आहोत.
14 Nov 2016 - 8:57 pm | मनो
व्य. नि. केला आहे.
24 Mar 2018 - 1:11 am | शशिकांत ओक
वरील धाग्याच्या संदर्भात डॉ अजीत जोशींच्या पुस्तकाचा परिचय पुन्हा वर आणला आहे..
9 Dec 2020 - 7:42 am | शशिकांत ओक
नव्याने सादर केला आहे.