आग्रऱ्याहून सुटका भाग 3
शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.
3. दर गुरूवारी व्रतानिमित्त उत्सव करून राजांच्या निवासस्थानाजवळ गर्दी जमवण्यास सुरवात झाली होती. त्या गर्दीची पहारेकऱ्यांनी सवय झाली होती.
4. मिठाई वाटण्याच्या निमित्ताने तसेच इतर मार्गांनी राजांनी वजीर व इतर उमरावांशी मैत्री वाढवली होती. राजे उमरावांशी मैत्री करीत असल्याचा उल्लेख 13 जुलै 1666च्या राजस्थानी पत्रात परकळदासाने केला आहे.
5. आता आपण दिल्लीतच राहणार असा विश्वास राजांनी मोगल पहारेकऱी, उमराव तसेच औरंगजेब यांच्यात निर्माण केला होता. त्यामुळे यासर्वांमधे थोड्याफार प्रमाणात गाफीलपणा आला होता. तो आणखी अंगवळणी पडणे आवश्यक होते.
6. 16 जूनच्या (फकीर होण्याच्या) अर्जानंतर राजांनी कोणताच अर्ज औरंगजेबाकडे केला नाही. एकदम 13 जुलैचे पत्र सापडते. त्यामधेही राजांचे प्रकरण जैसे थे असल्याचा उल्लेख आढळतो.
7. तोवर शिवाजीराजांच्या एकूण सुमारे 350-400 जणांच्या लवाजम्यापैकी बहुतेक सर्वांचे परवाने किंवा दस्तक मिळवण्यात आले होते. काही बनावटही होते. दस्तकावर लष्करप्रमुख या नात्याने मीर बक्षी मुहंमद अमीनखानचा शिक्का होता. याला राजेंनी आधीच वश करून घेतला होता. त्यांमुळे मोठ्याप्रमाणात बनावट दस्तक करायला सहज शक्य झाले.
8. नजरकैदेत कधी कधी रामसिंहाच्या मुलाबरोबर खेळायला संभाजी राजेंचे येणे-जाणे चालू असे. स्वतः शिवाजी महाराज कधीकधी रामसिंहाकडे जात असत. राजांनी डेऱ्याबाहेर पडू नये असा हुकूम असूनही मोगल पहारेकऱ्यांनी आक्षेप घेतला नव्हता. बहुधा अशा वेळी राजांबरोबर पहाऱ्यावरील काही शिपाई राजांबरोबर जात असावेत.
9. साधारण 15 जुलैला रामसिंहाशी भेटीत असे कळले की औरंगजेब 3 दिवसासाठी शिकारीला जाणार आहे. रामसिंहाच्या विचारणेला की ‘तुम्ही येणार असाल तर तुम्हालाही बरोबर घेऊन चलतो’ यावर महाराजांनी ‘बादशाह माझे प्रकरण केंव्हा निकालात काढणार? बादशाहांना अर्ज करा की आमचे प्रकरण निकालात काढा, नाहीतर मी असाच इथे मरून जाईन! आणि बादशहांच्या हातात माझे गडही मिळणार नाहीत.’ शिवाजीराजे व रामसिंहाचे हे संभाषण इंग्रजी भाषांतरात यदुनाथ सरकारांनी वगळले आहे!
10. राजांचा डाव – शिवाजीमहाराजांसारखा दिसणारा दुसरा माणूस राजांच्या जागेवर ठेवणे, संभाजी राजांना डेऱ्यातच ठेवणे, राजे निसटल्याची बातमी जास्तीजास्त काळपर्यंत गुप्त ठेवणे.
11. निराजी रावजी यांची निवड ‘कैदेतील सिवा’ म्हणून केली असे दिसते. निराजी रावजी वयाने महाराजांच्या 40-45 वयाचे होते, त्यांचा 14 -15 वर्षाचा मुलगा प्रल्हाद, संभाजीराजांच्या पेक्षा जरा मोठा पण बरोबरीचा होता. ते अत्यंत चौकस, बुद्धिमान, अनेक भाषा जाणणारे, न्यायनीती तज्ञ (नंतरच्या काळातील स्वराज्याचे न्यायाधीश होते) आग्रा शहरात ते राजांचे वकील होते. या प्रकरणातील गुंतागुंत त्यांना माहिती होती.
12. आज उपलब्ध असलेल्या पत्रात कुठेही निराजी रावजी याने शिवाजी महाराजांची जागा घेतल्याचा उल्लेख नाही! परंतु हिरोजी फर्जंद हा फक्त एक ते दीड दिवसच राजांच्या रूपात असल्याचा स्पष्ट उल्लेख बखरीत सापडतो.
13. दुसऱ्या कोणा व्यक्तीकडे बोट दाखवणारे पुरावे उपलब्ध झाल्यास निराजी रावजी ऐवजी ती दुसरी व्यक्ती राजांच्यारूपात राहिली असे अनुमान करता येणे शक्य आहे. परंतु आजच्या विश्लेषणातून निराजींचे नावच पुढे येते.
14. हिरोजी फर्जंद हा रांगडा शिपाईगडी. मुत्सुद्देगिरी, कुटीलनीती हा त्याचा प्रांत नव्हे. दीर्घकालील अनिश्चित अशा योजनेसाठी हिरोजी फर्जंद उपयोगाचा नव्हता. एखादा पेचप्रसंग आल्यास गोंधळून जाऊन बेत फिसकटला जाण्याची शक्यता हिरोजी फर्जंद याच्या बाबतीत खूपच अधिक होती.
15. कवींद्र परमानंद - सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावचा रहिवासी होता. त्याला कवींन्द्र कवीश्वर ही पदवी मिळाल्यावर ‘परमानंद’ हे नाव धारण केले होते... पुढे शिवाजीराजांनी कवींद्र परमनंदांच्या कुटुंबाला मलकापूर व कोल्हापूर जवळील गावे इमान दिली होती. परमानंद पोलादपुरात विद्यार्थ्यांना शिकवीत असत.
16. सन 1673 च्या सुमारास शिवाजीराजे पोलदपूरला कवींन्द्र परमानंदांना भेटले असे दिसते. यावरून राजे कवींद्रांना खूप मान देत होते असे दिसते. आग्र्याहून सुटकेची घटना या पुर्वीची असल्याने कवींद्र परमानंदाने आग्र्यातून निसटण्यासाठी शिवाजीराजांना मदत केली असावी असा निष्कर्ष काढता येतो.
17. एक विद्वान मराठी पंडित म्हणून कवींद्र परमानंदाला शिवाजीराजे पुर्वीपासून म्हणजे 1664 पासून ओळखत होते. राजगडाकडून आग्र्याकडे जाताना राजांनी मथुरा व इतर क्षेत्रातील काही ब्राह्मणांना पत्रे पाठवली. तसेच एक पत्र राजांनी कवींद्रांना पाठवले असावे. त्या पत्रानुसार शिवाजीमहाराजांच्या निमंत्रणावरून कवींद्र परमानंद राजांना भेटण्यासाठी काशीहून आग्रा येथे आले. त्याच्या बरोबर इतरही पंडित असण्याची शक्यता आहे.
18. पुर्वीपासून ओळख असलेला विद्वान, काशीस्थ मराठी ब्राह्मण शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेसाठी रचलेल्या डावात सामील करून घेतला.
19. औरंगजेब बादशहा तीन दिवसाच्या शिकारीसाठी जाणार हे शिवाजीमहाराजांना दहा दिवस आधीच समजले होते. दर गुरूवारी व्रतानिमित्त मिठाई वाटायला कार्यक्रम आता पहारेकऱ्यांच्या अंगवळणी पडला होता. अशा वेळी एकाद्या समारंभाच्या गर्दीतून निसटण्याचा राजांनी बेत आखला.
20. कवींद्र परमानंद नेवासकर आग्र्यात महाराजांच्या डेऱ्यातच राहात होता. राजांनी त्याचा सत्कार व मोठे दान करायचे ठरवले. दान समारंभाचे मोठे वर्णन राजस्थानी पत्रात आढळते पण मराठी बखरीत ओझरता उल्लेख ही सापडत नाही.
21. शिवाजीमहाराजांनी कवींद्र परमानंदांची यथोचित पुजा केली व एक हत्ती, हत्तीण, एक घोडा, सरोपा (शिर से – पाव तक पोषाख) व एक हजार दान केले. शिवाय वर एक हत्ती देण्याचे वचन दिले. ‘आता मी आपले हत्ती-घोडे देऊन टाकीन व फकिरासारखा बसून राहीन’ असे ते त्या दानाच्या वेळी म्हणाले. महाराजांचे हे शब्द म्हणजे दिशाभूल करणारा सापळा आहे. मंदगतीचे गज दीर्घ प्रवासाला कुचकामी पण दानाच्या दृष्टीने महान. पण घोडा व हजार रुपये दान देऊन बाहेर एका वाहनाची व पैशाची तयारी करता आली हे महत्वाचे.
22. महाराजांनी कवींद्र परमानंदांना चाळीस चाकर दिले होते असे राजस्थानी पत्रांवरून दिसते. या चाळीस नोकरांमुळे डेऱ्याबाहेर जाणाऱ्यांची गर्दी वाढली. पहाऱ्यावर असलेली रामसिंहाची माणसे, औरंगजेबाचे हेर, फौलादखानाचे शिपाई तसेच बादशाहाचे खास सैनिक हे सारे हा हत्ती-घोडे-दान–समारंभ काही अदभूत पहावे अशा नजरेने पहात होते. एक श्रीमंत राजा एका पंडितास एवढी मोठी दाने शास्त्रोक्त समारंभपुर्वक देत असल्याचे दृष्य त्या मोगलांच्या चाकरांनी उभ्या आयुष्यात पाहिले नव्हते! त्यामुळे भारावून गेल्याप्रमाणे सर्वांचे लक्ष समारंभावर केंद्रित झाले होते. म्हणूनच परकळदासाला त्याचे वर्णन पत्रात करावेसे वाटले. दानानंतर सर्वांना भोजन दिले गेले. पहारेकरी व इतरांना पोटभर मिष्टांन्ने दिली गेली. त्यामुळे अर्थात पहारा ढिला पडला.
23. शिवाजी महाराज यावेळी काय करीत होते? निराजी रावजी याच्याबरोबर राजे आपल्या महालात गेले. तेथे आपल्या डोक्यावरील केस साफ कापून काढले. दाढीही काढून टाकली! फक्त भरदार मिशा व डोक्याला एक शेंडी ठेवली राजांनी ब्राह्मणांचे कपडे घालून डोक्यावर पगडी चढवली. ब्राह्मण वेषात शिवाजीराजे कवींद्र परमानंदांच्या जथ्थ्यातील ब्राह्मणात मिसळून गेले. त्यांच्याभोवती त्यांचे विश्वासू कारभारी होतेच.
24. इकडे निराजी रावजी शिवाजी राजांचा वेष व दागिने चढवून राजांच्या पलंगावर स्वस्थ निजले! ‘तोतयाने’ शिवाजीमहाराजांची जागा घेतली! कवींद्र परमानंदांसह सर्व प्रमुख ब्राह्मणांची जेवणे उरकली होती. त्यांच्यासाठी पालख्या तयार होत्या. आपापल्या पालख्यात ते बसले. एका पालखीत ब्राह्मण वेषधारी महाराज बसले. राजांबरोबरच त्यांचे कारभारी रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, इत्यादि मातब्बर मंडळी पालखीतून तर तानाजी मासुसरे, येसाजी कंकं, इत्यादि जिवास जीव देणारी मंडळी घोढ्यावरून निघाली!
25. कवींद्र परमानंदांना मिळालेले हत्ती-घोडा-चाळीस चाकर यांच्यासह प्रचंड लवाजमा हवेलीच्या परिसरातून बाहेर पडला. या सर्वांचे परवाने तयारच होते. ब्राह्मण वेषातील शिवाजीमहाराजांचा बनावट नावाचा दस्तकही तयार होता. परंतु, मिष्टान्न खाऊन सुस्तावलेल्या पहारेकऱ्यांनी दस्तक काटेकोरपणे न तपासताच या मोठ्या लवाजम्याला बाहेर जाऊ दिले. चाळीस चाकरांमुळे व पहायला जमलेल्या लोकांमुळे मोगलांचे राजांकडे आणखी दुर्लक्ष झाले. आशा रीतीने आग्रा शहरातील नजरकैदेतून, पोलादी पिंजऱ्यातून महाराज सहीसलामत निसटले. राजांच्या सुटकेचा एक महत्वाचा टप्पा पुर्ण झाला!
26. दुपारनंतर निघालेला हा 60 -70 माणसांचा जथ्था सूर्यास्ताच्या सुमारास फतेपूर – सीक्री व आग्रा याच्या मधील 12-15 मैल दूरच्या एका गावात पोहोचला. मुक्कामासाठी तंबू ठोकले गेले. कवींद्र परमानंदांना निरोप द्यायला आलेली कारभारी मंडळी परत आग्र्याला निघाली. यावर लक्ष ठेवायला आलेल्या हेरांना चकवून शिवाजीराजेही पालखी सोडून घोड्यावरून परत फिरले. राजांची रिकाम पालखी जथ्यातच सोडली गेली. तानाजी मालुसरे, येसाजी कंक वगैरे राजांचे शिलेदार आग्रा शहराला वळसा घालून धौलपुरकडे वळले.
27. वेगवेगळ्या वाटांनी पुढे जाण्याआधी शिवाजीमहाराजांनी पुढील योजना आपले कारभारी रघुनाथपंत कोरडे व व्यंकट डबीरांना नीट समजावून सांगितली. संभाजीला आग्र्ऱ्यातून केंव्हा बाहेर काढायचे कुठे पोहोचवायचे, काही गहन प्रश्न निर्माण झाल्यास काय उत्तरे द्यायची, हे ठरले! संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी गुप्त पद्धती, परवलीचे शब्द आदि गोष्टी ठरल्या! तिकडे परमानंदांनी कोठे जायचे, केंव्हा काय करायचे याच्या बारीक सारीक सूचना महाराजांनी आधीच दिल्या होत्या!
28. इतके आग्रा आघाडीत शांतता होती. शाही दरबार काही दिवस बंद असल्याने सुट्टीचे वातावऱण होते. औरंगजेब शिकारीहून परत येईपर्यंत निराजींचा जम बसला होता. राजांचे कारभारी, प्रल्हाद निराजी व संभाजीराजे यांच्या दिनक्रमात काहीच बदल नव्हता. ‘जैसे थे’ असल्याने पहाऱ्यावरच्या रामसिंहाच्या माणसांना, फौलादखानाच्या शिपायांना औरंगजेबाच्या हेरांना, अगदी वरच्या दर्जाच्या हसन अली हेराला देखील कसलाही संशय आला नाही!
29. शिवाजीमहाराजांनी पुर्वीच घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे निराजी रावजी ‘राजे’ बहुतेक वेळ खोलीत असत. बादशाहाने राजांना मनसबदारांना भेटण्याची बंदी केली होती. पहाऱ्याचे शिपाई पहारा बदलताना ठराविक वेळी राजांच्या महालात डोकावून पहात तेंव्हा त्यांना राजे भिंतीकडे तोंड करून पलंगावर पहुडलेले दिसत. निराजी रावजी राजे पहाटे सूर्योदयापुर्वी किंवा संध्याकाळी म्हणजे उजेड कमी असताना डोक्यावरून चादर किंवा शाल लपेटून बाहेर बागेमधे मोकळ्या हवेत फेरफटका मारीत असत. त्यामुळे राजांचे गुपित फुटण्याची शक्यता खूपच कमी होती!
30. शिवाजीमहाराजांच्या सुटकेच्या प्रसंगाच्या या नव्या मांडणीवरून असे दिसते की महाराज 17 ऑगस्टच्या सुमारे एक महिना आधीच म्हणजे 22 जुलैला आग्रा शहरातून निघून गेले होते. याचा काही अप्रत्यक्ष पुरावा सापडतो. 22 जुलै ते 18 ऑगस्ट यामधील कालातील राजांच्या हालचाली, अर्जांची अनुपस्थिती जाणवते उठून दिसते. मराठी बखरींमधे कालविपर्यास मोठ्याप्रमाणात केला आहे. असे लेखकाचे म्हणणे आहे. फक्त 91 कलमी बखरीत (कलम 55) ...असा नित्य खुशाली अस्ज शिमा जाली. असे दोन मास होतां कोणे एके दिवशीच घटकादिवस असता उभयता पिता पुत्र डोलीत बसोन दिली बाहेर कुंबार राहात होते त्याच्या कडे गेले...यातील असे दोन मास होता उल्लेख महत्वाचा आहे.
वरील पुस्तकाची ‘सप्रेम भेट’ प्रत पु. ना. ओकांना लेखकाने 28 जुलै 1997 ला दिली होती. ती मी वाचायला काही काळापुर्वी मिळवली. तोवर पुस्तकाचे मुखपृष्ठ उपलब्ध गायब होते. भाग 2 मधील मुखपृष्ठ नेटवरून नंतर मिळवले आहे. या नव्या प्रमेयावर मान्यवर इतिहासकारांचे काय म्हणणे आहे, ते मला ज्ञात नाही. ते कोणास उपलब्ध झाल्यास सादर करावे. मला वरील प्रमेय अन्य मान्यताप्राप्त मतांपेक्षा जास्त सयुक्तिक वाटते.
....
आगामी समापरोपाचा भाग ४ ....
प्रतिक्रिया
19 Mar 2015 - 12:36 am | खटपट्या
खूप छान माहीती !!
19 Mar 2015 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा
सदर लेखन वाचत असताना..,
ही नव्या प्रकारानी केलेली मांडणी अत्यंत खरी आहे,अशी मनाला खात्री पटते. :)
19 Mar 2015 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशय माहितीपुर्ण लेख. अजुन संदर्भ मिळु शकतील का?
19 Mar 2015 - 9:14 am | शशिकांत ओक
पूर्ण ग्रंथातील विविध कागदपत्रे, रुमाल, शाही अखबार, राजस्तानी राजघराण्याचे पत्राचार यांनी युक्त आहे.
तथापि, हे प्रमेय अन्य मान्यवर इतिहासकारांना कितपत मानवले आहे याची कल्पना नाही.
19 Mar 2015 - 9:25 am | सुनील
महाराज पेटार्यातून पळाले, हे कोणताच मान्यवर इतिहासकार मानीत नाही. वेशांतर करून आणि/किंवा लाच देऊन, हे प्रमेय सवलपास सर्वच मान्यवर इतिहासकारांना मान्य आहे.
प्रश्न आहे तो निसटल्याचीतारीख आणि अन्य तपशिलात.
तो सोडवण्याठी जोशी यांनी वेगळी ऐतिहासिक साधने वापरली की तीच साधने (जी अन्य इतिहासकारांनीदेखिल वापरली) अथवा त्याच साधनांचा वेगळा अन्वयार्थ काढला, ही पाहणे रोचक ठरेल.
सदर लेखमालेवरून असे दिसते की, जोशी यांनी उपलब्ध साधनांनाच जरा वेगळा अनवयार्थ काढला आहे. त्यावर अन्य इतिहासकारांची मते वाचण्यास आवडतील. (पीअर रिव्यू)
नवे शात्रीय सिद्धांत जसे वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करून पीअर रिव्यू केला जातो तसे इतिहासाबद्दल कसे केले जाते, ते नक्की ठाउक नाही.
19 Mar 2015 - 9:18 am | आयुर्हित
संभाजी राजांना डेऱ्यातच ठेवणे हे काही पटत नाही.
कारण १)संभाजी राजे हे स्वराज्याचे भावी राजे होते व वारसदार सुरक्षित असणे हे गरजेचे होते.
२) सुरक्षा व्यवस्था किती जागरूक आहे हे तपासणे गरजेचे होते, त्यासाठी संभाजी राज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून पहिले गेले असेल, ह्या सफलतेनंतरच राज्यांनी पळून जायचा विचार पक्का केला असण्याची शक्यता आहे.
3) राजे एकदा निघून गेल्यानंतर नंतरची परिस्थिती सांभाळणे राजांना मुळीच शक्य नव्हते. त्यामुळे आधी संभाजींना डोळ्यादेखत बाहेर काढणेही जास्त सुरक्षित होते.
सोबत नेलेल्या एकाही माणसाला न गमावता सही सलामत बाहेत पडणे हे एक मोठे दिव्यच आहे.
खऱ्या अर्थाने "झिरो लॉस" काय असतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
19 Mar 2015 - 2:55 pm | मृत्युन्जय
मला वाटते झीरो लॉस नव्हता. महाराजांची काही माणसे पकडली गेली आणि त्यांना मृत्युदंड दिला गेला.
19 Mar 2015 - 5:20 pm | आयुर्हित
३ एप्रिल १६६७ या दिवशी आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.
19 Mar 2015 - 2:10 pm | अभिरुप
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख..धन्यवाद
20 Mar 2015 - 4:39 pm | शशिकांत ओक
अनुरूप टिप्पणी बद्दल
24 Mar 2018 - 1:10 am | शशिकांत ओक
वरील धाग्याच्या संदर्भात डॉ अजीत जोशींच्या पुस्तकाचा परिचय पुन्हा वर आणला आहे..
9 Dec 2020 - 7:41 am | शशिकांत ओक
नव्याने सादर केला आहे.