ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा .
सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते. सरदाराला एक राणी होती पण त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याचे नायकिणी, दासी यांच्याशी सुद्धा संबंध होते. सरदाराला जरी औरस संतान नसले तरी वेगवेगळ्या दासींपासून झालेले दोन दासीपुत्र होते. पुढे वसुलीतील काही भांडणावरून सरदाराचा खून झाला . तो कुणी केला याचा काही शोध लागला नाही . साहजिकच सर्वांना वाटले की विधवा राणी काही आता वसुली वगैरे भानगडीत पडणार नाही . पण राणी होती खमकी . तिने नोकाराला बरोबर घेऊन वसुलीचे काम सुरूच ठेवले. बरं राणी हयात असेपर्यंत सरदाराच्या संपत्तीवर अनौरस मुलाना काही हक्क सांगता येईना . त्यामुळे त्यांनी राणीलाही मारायचा डाव आखला . त्याप्रमाणे ती वसुलीला त्या गावात आली असताना रात्रीच्या वेळी तिच्या डोक्यात मोठ्ठा दगड घालून ठेचून तिला ठार मारले . मारेकऱ्यांना कुणी बघितले नव्हते यामुळे याहीवेळी कोणी सापडले नाही .
सर्व आता सुरळीत होईल असे वाटत असताना त्या दासीपुत्राच्या कुटुंबातील कुणी कर्ता माणूस अचानक मरण पावला . काही दिवसानंतर अजून कोणी मृत्यू पावले. अशा दुर्घटना वारंवार होऊ लागल्या . सगळे घाबरले . राणीचा शाप भोवतोय असे त्यांना वाटू लागले . गावात तेव्हा भगत म्हनुन्लोक असत . ते अशा गोष्टींमध्ये सल्ला देत असत . भगताकडे गेल्यावर त्याने सांगितले," राणीचे दिवस ( मरणोत्तर क्रियाकर्म) केले गेले नाही म्हणून हा त्रास होतोय . तर तिचे यथोचित श्राद्ध करा आणि जिथे तिला ठार मारले तिथे प्रसाद नेउन ठेवा .पण घरातील पुरुषांनी मात्र तिथे त्या दिवशी जाऊ नका " त्याप्रमाणे त्या घरातील पुरुषांनी केस कापले , श्राद्ध केले , ज्या दगडाने तिला मारले त्या दगडापाशी वडे आणि वाटाण्याची आमटी हा श्राद्धाच्या वेळचा प्रसाद ठेवला . घरातील सर्व पुरुष त्यावेळी गावाबाहेर थांबले . त्यानंतर दर वर्षी ,राणीला मारले साधारण त्या तिथीच्या आसपास त्या कुटुंबातील लोंक ही प्रथा पाळू लागले . बाजूच्या जंगलात त्या सुमारास डुक्कर किंवा सश्याची शिकार करत आणि ती मिळाल्यानंतर काही दिवस सोडून श्राद्धाचा मुहूर्त पकडला जाई . हळूहळू त्या दगडाच्या भोवती शेड बांधली . लोक जातायेता त्याला नमस्कार करू लागले , घुमटीचे छोटे देऊळ झाले. त्या देवळात प्रसाद तसेच थोडीफार दक्षिणा जमा होऊ लागली .
आता प्रश्न आला या दक्षिणेवर, उत्पन्नावर हक्क कोणाचा ? इतक्या वर्षांत ते दोन्ही दासीपुत्र मरण पावले होते . पण त्यांची मुले होती . ती कोर्टात गेली . केस चालू झाली . सर्व जुन्या लोकांच्या साक्षी झाल्या आणि वरती संगितलेली माहिती बाहेर आली . ज्याने कर्म केले त्याला त्याचे फळ या न्यायाने त्या दोन्ही कुटुंबाना खरेतर त्या घुमटीचे उत्पन्न मिळायला पाहिजे . पण गोम इथेच होती . एका कुटुंबाला स्वत:ला दासीपुत्र म्हणून घेणे लाजिरवाणे वाटत असे म्हणून त्यांनी आपली जात बदलून मराठा करून घेतली होती . विरुद्ध बाजूच्या वकिलांनी हाच मुद्दा कोर्टासमोर मांडला आणि त्या आधारे त्यांचा उत्पन्नावरील हक्क उडवून लावला . आणि केस जिंकली .
दरवर्षीच्या श्राद्धाची प्रथा चालूच राहिली . घुमटीचे छोटे देऊळ झाले . हळूहळू त्या दगडाच्या बाजूला एक देवीची मूर्ती आली . देऊळ मोठे झाले . आणि देवळाचा बिझिनेस चालू झाला . काही वर्षांपूर्वी ऐकण्यात आले की देवीची मोठी मूर्ती बसवण्यात आली आणि दगड काढून टाकण्यात आला . भाविकांची गर्दी वाढतच आहे . अजूनही जत्रेच्या वेळी वाडे आणि काळ्या वाटण्याची आमटी हा नैवेद्य दाखवला जातो . ७५ सालापर्यंत त्या विशिष्ठ आडनावाचे लोक जत्रेच्या वेळी क्षौर ( केस कापणे) करत असत . त्या जागी जत्रेच्या पहिल्या दिवशी फिरकत नसत . सध्या काय होते माहित नाही .
हे सर्व सांगायचे कारण की परवा विकीपीडीया मध्ये या जत्रेची आणि देवस्थानाची (?) माहिती वाचली . त्यात या देवीचा उगम ४०० वर्षे सांगितला आहे , एवढेच नाहे तर एक गाय इथल्या दगडावर आपणहून दुध देत असे कुणा गावकऱ्याने हे पाहिले किंवा त्याच्या स्वप्नात आले असेही सांगितले आहे .( विकिपीडियात कुणी चुकीची माहिती सुद्धा फीड करू शकतात . )
म्हणून वाटले की ही सत्य माहिती समोर यायला हवी .
१ ज्यांच्या हयातीत ही घटना घडली ते सर्व केव्हाच मरण पावले . ही केस कोर्टात लढली गेली तेव्हा त्या केसशी जोडले गेलेले लोक देखील आता हयात नाहीत. ( माझ्या आजोबांनी ही केस चालवली होती) . त्यावेळी लहान असलेले लोक किंवा माझे वडील ज्यांना ही माहिती त्यांच्या वडिलांकडून मिळाली ते सर्व आता सत्तरीत किंवा त्याहून वयस्कर आहेत . त्या पिढीबरोबर ही माहिती सुद्धा नष्ट होईल . म्हणून इथे सांगायचा प्रयत्न केलाय . खरे तर त्यासाठी त्या स्थानाचे नाव सांगायला हवे . पण हल्लीच्या सुसंस्कृत , पुढारलेल्या महाराष्ट्रात जिथे नरेंद्र दाभोलकरांची दिवस ढवळ्या हत्या होते तिथे नाव सांगायची हिम्मत नाही .
२ ही केस कोर्टात लढली गेली . कोर्टात सर्व केसेस ची माहिती जपून ठेवली जाते म्हणून अजूनही ती माहिती असावी असे वाटते.
३ देऊळ चित्रपट पाहिल्यानंतर ही घटना पुन्हा आठवली .
प्रतिक्रिया
20 Mar 2015 - 4:39 pm | सतीश कुडतरकर
उद्यान गणेश आता एकटा नाही. बाळासाहेब आलेत सोबतीला.
20 Mar 2015 - 7:46 pm | माहितगार
गूगल बुक्सवर भराडी देवी आणि भराडी समाजाचे (भैरव/भैरवनाथाचा उपासक) बर्या पैकी संदर्भ उपलब्ध दिसतात. भराडी देवीच्या नावाची व्युत्पत्तीचा आंतरजालावर काही उल्लेखात भरड जमिनीशी संबंध जोडलेला दिसतो आहे तो कदाचित ज्यांना भराडी देवी आणि भराडी (गोसावी सदृश्य) समुदाय किमान हिमाचल प्रदेश ते महाराष्ट्रात एवढ्या व्यापक प्रदेशात आहे हे माहित नसलेल्यांनी ओढून ताणून रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वाटते.
23 Mar 2015 - 11:10 am | सतीश कुडतरकर
आमच्याकडे एखाद्या जमिनीवर वर्षानुवर्षे भराव पडल्याने तो भाग थोडासा उठल्यासारखा दिसतो. त्याला भरड म्हणतात. अशा एखाद्या जागेवर कोणी देव वसवला कि झालाच तो भराडी, भराडावरचो येताळ वगैरे. कुठल्या समुदायाशी काहीही संबंध नाही.
प्रत्येक गावात अशी भरड आहे. आमच्या स्वतःच्या जमिनीत अशी भरड आहे, पण आम्ही अजूनही देव नाही बसवला तिथे.
21 Mar 2015 - 3:06 pm | सांगलीचा भडंग
अवघडच आहे.असे प्रत्तेक देवळाचे मागे मागे जात संदर्भ शोधून काढले तर वेगळीच स्टोरी मिळेल.
22 Mar 2015 - 9:40 am | नगरीनिरंजन
लेख आवडला. आपल्याकडे गाढवांस तोटा नाही. आसाराम, अनिरुद्ध आणि ते क्रिपावाले कोण ते अशा गणंगांचेही भक्त असतात म्हटल्यावर काय म्हणायचे?
22 Mar 2015 - 11:49 am | प्राची अश्विनी
धन्यवाद सर्वांनाच!
25 Mar 2015 - 1:59 am | मयुरा गुप्ते
देवळाच्या स्थापनेविषयी वाचुन 'अरेरे' अशीच प्रतिक्रिया मनात उमटली. म्हणजे नुसतं देव आहे म्हणुन श्रध्दा आहे असं होताना दिसत नाही, उलट देव आहे तिथे मानापमान, हेवेदावे, पैसा त्याच्या भोवती राजकारण हे ही अविभाज्य भाग झालेले आहेत असचं चित्र दिसतयं.
जनरली देउळ आणि त्याचा खरा पूर्वेतिहास असा सहजासहजी बाहेर येत नाही, प्राची तुम्ही तो इथे सांगितल्या बद्दल तुमचे आभार.
-मयुरा.
25 Mar 2015 - 3:33 am | अभिजीत अवलिया
जस जशी माणसाची प्रगती होत आहे तस तसे देव आणी देवळांचे स्तोम वाढतच चालले आहे. ज्या दिवशी माणसे दगडात देव शोधणे बंद करतील तो सुदिन म्हणायचा.
25 Mar 2015 - 7:57 am | अर्धवटराव
हा बिझनेस करण्याचं सगळं कसब अंगी होतं (अजुनही आहे थोडंफार... लग्न होऊन देखील आम्हि काहि फार ते हे नाहि झालो ;) ) पण तिर्थरूपांना आम्हाला अभियांत्रीकीत घुसवण्याचं काय वेड होतं कोण जाणे. अन्यथा आज पैशाचा पाऊस पाडला असता :(
26 Mar 2015 - 12:07 pm | गुनि
आपन बोलु शकत नहि ....हि खेदाचि बाब आहे.
26 Mar 2015 - 12:09 pm | गुनि
पन लेख उत्तम आहे