आशावाद

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
4 Feb 2015 - 2:08 am

“काय आज तुझी बाई नाही आली का?
“नाही”
“२६ जानेवारी, नॅशनल हॉलीडे का?”
“तिला तिच्या मुलांना फिरायला घेउन जायचे आहे”
“काय?”
“हो तीन चार महीन्यातून एकदा मुलांना कुठेतरी फिरायला घेउन जायला सुट्टी घेते.”
मी अवाक. खरे म्हणजे मुलांना फिरायला घेउन जाणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आपण ते नेहमीच करतो परंतु कामवाली बाई ही मुलांना फिरायला घेउन जायला नियमित सुट्टी घेते हे जरा नवीन होते. त्यामुळे आश्चर्य वाटले पण तसा विचार केल्यास ही फार आशादायी अशी घटना होती. मुलांना फिरायला घेउन जाणे, नवऱ्याच्या एकट्याच्या पगारात भागत नाही म्हणून घरातल्या स्त्रीने नोकरी करणे ही मध्यमवर्गीयात आढळनारी गोष्ट, घरची गरीबी, नवऱ्याची दारुची सवय, बायकोला मारझोड ह्याच गोष्टी जिथे पाचवीला पुजल्या आहेत अशा ठिकाणी घडणे ही खरोखरच आशादायी परिस्थिती होती. सहज काही जुन्या घटना आठवल्या. कॉलेजला असताना आमच्या कॉलेजतला एक मुलगा आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांच्या वसतिगृहात राहायचा. त्यावेळेला सरकारी भाषेत आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे ४८०० रुपये वार्षिक उत्पन्न. महीन्याला ४०० रुपये हे त्याही वेळेस फार कमी होते. मी माझ्या मित्राला विचारले
“होस्टेलवर राहायला काय करावे लागते?”
“फक्त उत्पन्नाचा दाखला लागतो”
“मग तर गौडबंगालच आहे सार, असे दाखले तर कुठेही मिळतात. खरच कोणी महीना ४०० रुपयावर जगू शकतो का?”
“मग किती मिळणार? वखराची फास लागून पाय मोडल्याने वडील घरी आहेत आणि आई निंदनाची नाहीतर रोजंदारीची कामे करते. किती मिळनार?”
स्वतःवरुन जग ठरविण्याचा माझा मध्यमवर्गीय शहाणपणा मला चांगलाच नडला होता. मला त्यावेळेस तर स्वतःची लाज वाटलीच पण आजही कधी तो प्रसंग आठवला की स्वतःची तितकीच लाज वाटते. एक छोटासा प्रसंग बरेच काही शिकवून गेला त्यानंतर मी पुढे कधीही कुणाच्या आर्थिक स्थितीवर संपूर्ण माहीतीशिवाय कुठलेही भाष्य केले नाही. पुढली चार वर्षे मी त्याची परीस्थिती बदलण्याची धडपड जवळून बघितली. आज तो एका सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीत डीजीएम आहे.
मला बंगलोरला घर शोधण्यात एका ब्रोकरने मदत केली. आता ब्रोकर म्हटल्यावर माझ्या डोळेयासमोर एक विशिष्ट अशी छबी होती. हे प्रकरण वेगळे होते, एक सत्तरीतली बाई हे ब्रोकरचे काम करीत होती. नवऱ्याचे वय पंचाहत्तर वगेरे असावे आणि अर्धांग वायूमुळे नवऱ्याच्या फिरण्यावर काही बंधने होती. कामाचा प्रचंड उत्साह, पारदर्शी व्यवहार, आणि बोलण्यातला आत्मविश्वास ह्यामुळे त्या भागातील घरांसाठी लोक आंटीकडेच येत होते. बोलण्यातून कळले की आंटी दिवसभर कुण्या बिल्डरकडे मार्केटींग कन्सल्टंट म्हणून मदत करीत होत्या आणि उरलेल्या वेळात ब्रोकरचे काम. मला घर बदलावे लागले, माझे घर भाड्याने द्यावे लागले या साऱ्यासाठी आंटीनींच मदत केली. हळूहळू मला कळले की दोघेही बरीच वर्षे आखातात नोकरीला होते, त्यानंतर काही वर्षे हाँगकाँगला पण होते. अगदी अर्धांगवायूचा झटका येत पर्यंत नवरा बायको दोघेही काम करीत होते. तेंव्हा आर्थिक परिस्थिती खराब आहे असे काही नव्हते. असे असूनही वयाच्या सत्तराव्या वर्षी या बाईला दिवसभर काम करुन उरलेल्या वेळात ब्रोकरचे काम करायची काय गरज आहे हेच कळत नव्हते. शेवटी मी एक दिवस विचारलेच, त्यावर आंटींनी उत्तर दिले
“Our kids may be of you people’s age, they may be finding house same way as you are. In this profession I get a chance to meet such young people. That just makes me and my husband happy.”
शेवटी आशावाद, आशावाद म्हणजे नक्की काय तर जीवन सुंदर बनविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आहे ती परिस्थिती निदान आपल्यापुरती तरी बदलू शकते अशी निष्ठा. हा आशावाद जाडजूड चरित्रग्रंथात किंवा अर्धा रिता अर्धा भरला अशी थिअरी सांगनाऱ्या सेल्फ हेल्पच्या पुस्तकात सापडत नाही. पुरस्कारप्राप्त निराशावादी साहीत्यात तर अजिबातच सापडत नाही. हा सापडतो तो आपल्या आजूबाजूच्या सामान्य दिसनाऱ्या माणसात, सामान्यांच्या सामान्य जीवनात बरच काही असामान्य घडत असत. सहज कधी कुणाच्या आयुष्यात डोकावले तर सामान्यांची असामान्यता जाणवायला लागते. त्याचा परिस्थितीवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि यशस्वी होउ असा दुर्दम्य आशावाद दिसायला लागतो.
काही वर्षे माझ्याकडे एक केशव नावाचा मुलगा कार साफ करायचा, तोच पेपर सुद्धा टाकायचा. व्यवस्थित काम, कधीच कुठली तक्रार करावीसी वाटली नाही. सुटी जरी घेतली तरी सांगून जायचा आणि फक्त महीन्याच्याच शेवटी पैसे मागायला यायचा. सकाळी साडेसहा पर्यंत त्याचे पेपर टाकून आणि कार साफ करुन झालेले असायचे. एक दिवस सकाळी साडेसहा वाजता तो धावतच लीफ्टमधे आला.
“कॉलेजको देर हो रही है”
“क्या पढते हो?”
“एम कॉम फर्स्ट इयर अभी चालू हुआ है.”
“बी कॉममे कितना परसेंटेज था.”
“सिक्सटी फाइव्ह.”
“तेलगू मिडीयम”
“नही इंग्लिश मिडीयम.”
त्या क्षणाला माझ्या मनात कुठला विचार आला असेल तर आज माझी कार साफ करनारा हा मुलगा उद्या कदाचित माझ्या मुलाचा बॉस सुद्धा होउ शकतो. त्या दिवशी केशव माझ्यासाठी आदर्श झाला. माझा पाय फ्रॅक्चर झाल्याने मला काही दिवस ड्रायव्हर ठेवावा लागला तरीही मी कार साफ करायला केशवलाच ठेवले. सोसायटी सोडल्यानंतर मात्र तो केशव भेटेनासा झाला पण मी मात्र ऑटोमधे, टॅक्सीमधे, कुरीयरमधे केशवच शोधत असतो कारण माझा आशावाद हा अशा केशवमधेच दडलेला आहे.

जीवनमानविचारलेखमत

प्रतिक्रिया

मस्त....

असे बरेच केशव होते, आहेत आणि असणार.

लेख आवडला.

रुपी's picture

4 Feb 2015 - 2:34 am | रुपी

सगळेच प्रसंग त्यांमधून काही ना काही शिकावे असेच आहेत.

अर्धवटराव's picture

4 Feb 2015 - 3:59 am | अर्धवटराव

आशावाद आवडला.
आमच्या जुन्या घरमालकीण पण याच पठडीतल्या. नवरा विद्युत कर्मचारी, वर त्याचा अपघात झालेला. पोरगं दुनीयाभरचं कर्ज घेऊन बसलेलं. बाईंनी प्रचंड कष्ट करुन अगदी पैसा-पैसा वाचवुन घर बांधलं, सावरलं. पण बईंचा चेहेरा नेहेमी हसतमुख. दैवाला दोष देणं वगैरे प्रकार नाहि

स्पंदना's picture

4 Feb 2015 - 5:36 am | स्पंदना

सह्ही!!

पैसा's picture

4 Feb 2015 - 7:21 pm | पैसा

लेख आवडला. अतिशय प्रेरणादायी कहाण्या आहेत!

जेपी's picture

4 Feb 2015 - 8:23 pm | जेपी

लेख आवडला.

(O+ )जेपी

पिंपातला उंदीर's picture

4 Feb 2015 - 8:45 pm | पिंपातला उंदीर

अप्रतीम. अजुन लिहा साहेब

सुरेख लेख.सकारात्मक.खूप आवडली उदाहरणं.

मित्रहो's picture

5 Feb 2015 - 2:07 pm | मित्रहो

प्रतिसादा बद्दल धन्यवाद!