आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो. काहीतरी महत्वाचे असेल म्हणून फोन उचलावा तर "रात्री जेवणात भोपळा चालेल का?" असा प्रश्न येतो. मग मी वैतागतो. सकाळी ८:३० ची वेळ "रात्रीच्या जेवणात भोपळा चालेल का?" हा गहन प्रश्न विचारण्याची आहे का असा भोपळ्याइतकाच सात्विक प्रश्न मी तिला विचारतो. "आज मला दिवसभर वेळ नाहीये भाजी आणायला आणि फ्रीजमध्ये फक्त भोपळा आहे म्हणून विचारलं." असं स्पष्टीकरण आल्यानंतर काय बोलणार? दिवाळीआधी मी एक दिवस कार्यालयात एका चर्चेत होतो. चर्चा महत्वाची होती की नाही माहित नाही. पण होतो, चर्चेतच होतो आणि काही माहिती मी देखील पुरवत होतो. तेवढ्यात बायकोचा फोन आला. महत्वाचा असेल म्हणून मी चर्चेतून बाहेर येऊन फोन उचलला. "लक्ष्मी रस्त्यावर आहे. दोन ड्रेस आवडले आहेत; एक निळा आहे आणि त्यावर गुलाबी फुलं आहेत आणि दुसरा पिवळा आहे आणि त्यावर लाल नक्षी आहे. कुठला घेऊ? तुझ्याकडे व्हॉट्सअॅप नाहीये नाहीतर फोटो पाठवले असते." व्हॉट्सअॅप नव्हते तेव्हा बायका कपडे विकत घेत नव्हत्या? व्हॉट्सअॅपमुळे आपण नाही नाही त्या गरजा निर्माण करून व्हॉट्सअॅप किती उपयुक्त आहे हे पटवून घेत आहोत. मी वैतागून म्हटलं "कुठलाही घे. पिवळा तुला बरा नाही दिसणार. निळा छान दिसेल. तुझ्याकडे तो गडद निळा ड्रेस होता तो तुला छान दिसायचा..." वैतागलो होतो तरीही मी माझे प्रांजळ मत दिलेच. माझे रंगज्ञान बायकोला माहित असल्याने माझा सल्ला ग्राह्य धरून तिने पिवळा ड्रेस विकत घेतला. असो. तर बायकोचा फोन आला. मी बायकोचा फोन कट करून माझ्या फोनवरून तिला लगेच फोन लावत असतो. सवयच झाली आहे. आता तिचे आणि माझे कॉल्सचे दर सारखे आहेत तरीही ही सवय सुटत नाही. हेडफोनवर फोन घेतांना माझी नेहमीच तारांबळ उडते म्हणून मी हेडफोन काढून फोन उचलत/करत असतो. यावेळेसही तसेच केले. तिचा फोन कट केला आणि पुन्हा फोन करण्यासाठी हेडफोन काढला. नेमके गाणे चालू असल्याने सगळ्यांना "तुम तो ठहरे परदेसी..." मोठ्या आवाजात ऐकू जाऊ लागले. या गोंधळात हेडफोन माझ्या हातातून खाली पडला. तो उचलावा की गाणे बंद करावे या गोंधळात गाणे चांगले १०-१२ सेकंद मोठ्या आवाजात वाजत होते. आजूबाजूची मंडळी हसून माझ्याकडे बघत होती. तोंड उघडे ठेवून झोपणारी एक नितांतसुंदर मुलगी तिच्या गहिर्या तपकिरी डोळ्यांमधून माझ्याकडे बघू लागली. मागे वळून पाहतांना तिचे रेशमी केस गिरकी घेऊन नितळ गोर्या मानेवर विसावले होते. हे जिवंत काव्य तशा परिस्थितीतही माझ्या नजरेतून सुटले नव्हते. गाणे चुकून मोठ्या आवाजात सुरू झाले याचे लोकांना काही वाटले नव्हते इतके मी कोणते गाणे ऐकतोय याचे आश्चर्य वाटले. "शी! काय घाणेरडी टेस्ट आहे याची!" असा लूक त्या 'काव्या'ने दिला. "दिसतोय तर चांगला थोराड घोडा आणि इतके चीप गाणे ऐकतोय" असा ही लूक मिळाला. मी थोडे दात विचकत गाणे बंद केले. फोन संपल्यावर मी विचार करू लागलो. आणि हाच विचार या लेखाचा विषय!
सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण करण्याची खोड असते. ढोबळपणे दर्जेदार आणि कमअस्सल किंवा अभिरुचीहीन (चीप) असे दोन वर्ग आपण पाडतो. कला, साहित्य, रंग वगैरे गोष्टींचं असं सरळसोट वर्गीकरण सर्रास घडतं. आकाशी रंग उच्च दर्जाचा, पिवळा थोडा चीप; वीर दास दर्जेदार कॉमेडीयन पण राजू श्रीवास्तव अगदीच ड दर्जाचा; सलमान, अजय देवगण मासेसचे दर्जाहीन नायक पण नसीरुद्दीन शाह आणि शेखर कपूर अभिरुचीसंपन्न अभिनेते वगैरे वर्गीकरण सगळ्याच क्षेत्रात सर्रास दिसते. काही क्षेत्रात असे वर्गीकरण रास्त असू शकेल, उदा. आयसीएससी आणि महाराष्ट्र बोर्ड यांच्या दर्जात फरक आहे असे मी ऐकले आहे. शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून घेतले जाणारे उपक्रम वगैरे बाबतीत आयसीएससी वरचढ आहे असे मी ऐकले आहे. अशा वस्तूनिष्ठ फरकांमुळे दर्जामध्ये आपसूक येणारा फरक मी समजू शकतो पण जिथे वैयक्तिक आवड-निवड महत्वाची असते तिथे असा फरक करणं कितपत योग्य आहे?
माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर खालील काही ठळक उदाहरणं मला आठवतायेत. या उदाहरणांमध्ये ढोबळ मानाने फारशा चांगल्या दर्जाच्या न समजल्या गेलेल्या पण मला काही प्रमाणात किंवा काही विशिष्ट केसेस मध्ये आवडणार्या गोष्टींचा समावेश आहे.
नदीम-श्रवणचे संगीत: मान्य, बर्याच चित्रपटांमध्ये या जोडगोळीने समीर नावाच्या महान गीतकारांकडून रचलेल्या साचेबद्ध गीतांना निरर्थक चाली चाली लावल्या पण असे बहुतेक सगळ्याच संगीतकारांच्या बाबतीत घडते. आर. डी. बर्मनची 'दीवार', 'गुरुदेव', 'शोले', 'ऊंचे लोग' वगैरे चित्रपटातली गाणी काही विशेष नव्हती. ए. आर. रहमानचे ऑस्कर-विजेते 'जय हो' देखील काही खास नव्हते. मग नदीम-श्रवण यांच्यावरच 'चीप'चा हा मनहूस शिक्का का? 'आशिकी', 'साजन', 'सडक', 'दिल का क्या कसूर', 'दीवाना', 'परदेस', 'राज' अशा कित्येक चित्रपटांना या दोघांनी लोकप्रिय आणि श्रवणीय संगीत दिले. 'आशिकी'ची गाणी ऐकायला अजूनही छान वाटतात. मग या जोडगोळीवर हा अभद्र शिक्का का?
"तुम तो ठहरे परदेसी": हे गाणे मला आवडते आणि कधी कधी मी ते मुद्दाम ऐकतो. अल्ताफ राजाचा आवाज तितकासा चांगला नाही हे मान्य पण या गाण्यात तो मस्त लागलाय. गाण्याची उडती चाल, दिलफेक शब्द, सोपे पण पंच असलेले थोडे विनोदाच्या अंगाने जाणारे शेर आणि मस्त ठेका ही या गाण्याची मला आवडलेली वैशिष्ट्ये. हे गाणं खासच जमून आलं होतं आणि म्हणून तूफान लोकप्रिय झालं होतं. तरी आमच्या (म्हणजे आमच्या बसमधल्या) 'काव्या'ने हे गाणं ऐकून तोंड का वेंगाडलं असावं?
चेन्नई एक्स्प्रेस: शाहरुख खान आणि दीपिकाचा हा चित्रपट मला आवडला होता. शाहरुख बर्याच वर्षांनी त्याच्या सुरुवातीच्या एनर्जीटिक फॉर्ममध्ये होता. दीपिका अफलातून दिसली आणि वावरली होती. कथा ठोकळेबाज होती पण सादरीकरण मस्त होते. पण बरेच जणांच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' आवडतो म्हटलं की भुवया आक्रसतात. किं कारणे?
हाऊसफुल: साजिद खानचा हा चित्रपट जितक्या वेळा टीव्हीवर सापडतो तितक्या वेळा मी शक्यतो पूर्ण बघतो. इतकी निरर्थक पण मस्त हसवणारी कॉमेडी फार थोड्या चित्रपटांमध्ये दिसली. बम्मन इराणीचे होणारे गैरसमज, अक्षय कुमारचा भाबडेपणा, रणधीर कपूरला चुकवतांना होणारी त्याची दमछाक...मजा येते बघतांना. दीपिकाचे हलकेच कंबर उडवून 'पप्पा जग जायेगा...' म्हणणे फारच मोहक होते. गाण्याची चाल छान खट्याळ खोडकर होती. पण लोक्स या चित्रपटाला आचरटपट समजून बदडून काढतात. व्हाय? तुम्हाला आवडला नाही मान्य, पण 'चीप'चे लेबल कशासाठी?
हिमेश रेशमिया: हिमेश रेशमियाची काही गाणी मला आवडतात. 'प्यार किया तो डरना क्या'मधले "तेरी जवानी बडी मस्त मस्त है, ये भीगा मौसम काली घटायें, सुनी पडी है उल्फत की राहे, प्यार करने का यही वक्त वक्त है..." हे हिमेशचे गाणे मला कॉलेजला असतांना मला खूप आवडायचे; अजूनही आवडते. एक मदमस्त रांगडेपणा या गाण्यात खूप सही कॅप्चर झालाय. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. साबरी ब्रदर्सची पहाडी रागदारी आणि भक्कम बीट्स असलेली ही रचना ऐकायला मस्त वाटते. हिमेशचे "तखणा तखणा..." हे 'नमस्ते लंडन'मधले गाणे ऐकायला किती छान वाटते! त्याचप्रमाणे 'वेलकम'मधले "तेरा सराफा ऐसा है हमदम..." पण मस्त वाटते. त्याचा आवाज हा संशोधनाचा विषय आहे. त्याची हीरो होण्याची खाज हा अध्यात्माचा विषय आहे. सगळं मान्य! पण 'चीप'चे लेबल का बिचार्याच्या माथी?
"ऊई अम्मा ऊई अम्मा मुश्कील ये क्या हो गयी", "ऊ ला ला ऊ ला ला", "तोफा तोफा तोफा": ही गाणी मी शोधून शोधून ऐकली आहेत आणि अशी बरीच गाणी माझ्या लक्षात राहिली आहेत. अहाहा! काय ते खटकेबाज संगीत, काय तो किशोर कुमारचा रोचक आवाज (ऊ ला ला चा बप्पी लाहिरीचा आहे), काय त्या मनाला प्रसन्न करणार्या चाली...वा वा! "रेशम के रूप मे तन से मेरे लिपटा हुआ मन तेरा...ता ता ता...प्यार का तोफा तेरा, बना है जीवन मेरा..." काय अगाध शब्द! कबूल की या शब्दांमध्ये कवितेची कळा नाही, कुठल्याच प्रकारची प्रतिभेची झळाळी नाही; आहेत ते फक्त ओबडधोबड कल्पना मांडणारे शब्द पण गाण्याच्या चालीत गेल्यानंतर हे साधे शब्द किती आनंद देतात म्हणून सांगू! "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात, सखया रे..." किंवा "मर्मबंधातली ठेव ही..." किंवा "वक्त ने किया क्या हंसी सितम..." ही गाणी सुंदरच आहेत आणि मी असंख्य वेळा ऐकतो देखील; पण म्हणून "तोफा तोफा" किंवा "ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना" दर्जाहीन आहेत, असे का? सकाळी सकाळी वेगाने फिरतांना "तम्मा तमा लोगे" ऐकल्याने चालण्याचा वेग आपसूकच वाढतो हा माझा रोजचा अनुभव आहे. सुटीच्या दिवशी निवांत फिरतांना "दूर रहकर ना करो बात, करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात, करीब आ जाओ" किंवा "वो भुली दासतां, लो फिर याद आ गयी" अशी गाणी ऐकण्याचा मझा निराळाच!
'धनंजय'सारखे दिवाळी अंक आणि पुस्तके: 'धनंजय' हा माझा आवडता दिवाळी अंक आहे. दिवाळीच्या दिवसात रात्री 'धनंजय'मधल्या कथा वाचतांना जबरा मजा येते. यावर्षीच्या कथा तितक्या धमाकेदार नाहीत पण २०१२, २०११ च्या धनंजयमधल्या कथा मस्त होत्या. रात्रीची १-२ वाजताची वेळ, दुसर्या दिवशी सुटी, रात्रीचे मस्त जेवण झालेले आहे, सोफ्यावर लोळत लोळत धनंजयमधली एखादी गूढ कथा वाचणं सुरु आहे.
"सारिका घाई-घाईने ऑफिसमधले काम संपवण्याच्या मागे लागली होती. काम खूप असल्याने तिला उशीर झाला होता. सारंग, सारिकाचा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त ३-४ दिवस हैदराबादला गेलेला होता. घरी कुणीच नव्हतं. शेवटी काम संपवून सारिकाने लॅपटॉप बंद केला आणि एक दीर्घ सुस्कारा टाकून घड्याळाकडे पाहिलं. बाप रे! १२:३०! तिने बाहेर एक नजर टाकली. सगळा आसमंत काळोखात बुडाला होता. एवढ्या उशीरा ऑफिसमध्ये बहुधा ती एकटीच होती. लॅपटॉप बॅगेत ठेवून सारिका जागेवरून उठली. काम संपवल्याचं समाधान तिच्या चेहर्यावर झळकत होतं. आठव्या मजल्याच्या लिफ्टजवळ ती येऊन पोहोचली. लॉबीमध्ये बर्यापैकी अंधार होता. दहा-पंधरा सेकंद वाट पाहिल्यानंतर लिफ्ट आली. सारिका लिफ्टमध्ये शिरली आणि तिने तळमजल्याचे बटण दाबले. लिफ्ट सुरु झाली. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबली. सारिकाला वाटलं कुणीतरी सोबत मिळेल तळमजल्यापर्यंत जायला. लिफ्टचा दरवाजा उघडला. कुणीच शिरलं नाही. सारिकाला थोडं विचित्र वाटलं. लिफ्ट पुन्हा सुरू झाली. पुन्हा सहाव्या मजल्यावर थांबली. दरवाजा उघडला. समोर मंद प्रकाश असलेली लांबलचक लॉबी दिसली. आत शिरणारं कुणीच नाही! आता मात्र सारिकाला थोडी भीती वाटू लागली. पाचव्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून सारिका हादरली..."
अशी एखादी उत्कंठावर्धक कथा नुकतीच सुरू केली आहे...हा आनंद मी काय वर्णू? पण का कुणास ठाऊक अशा दिवाळी अंकांना नाके मुरडली जातात. आखिर क्यूं?
क्राईम पट्रोलः ही माझी अत्यंत आवडती मालिका! क्राईम पट्रोल बघतांना माझे अक्षरशः भान हरपून जाते. गुन्हा कसा घडतो, त्यामागची पार्श्वभूमी कोणती, गुन्ह्याच्या मागे असणारे विविध सामाजिक-आर्थिक संदर्भ कोणते इत्यादी सगळ्या पैलूंची चर्चा करणारी आणि रहस्य अतिशय रोमांचकारी पद्धतीने मांडणारी गुन्हेविषयक मालिका म्हणून क्राईम पट्रोल खूप लोकांना आवडते. या मालिकेतल्या सगळ्या कथा या सत्य घटनेवर आधारित असतात. अतिशय छोट्या छोट्या धाग्यांवरून संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्याचे पोलिसांचे कसब वाखाणण्याजोगे असते. कधी शर्टावरचे लेबल, कधी एखाद्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन, कधी मोबाईलचा ओळख क्रमांक, कधी आसपास असलेल्या पण सहजासहजी न दिसणार्या बारीक बारीक वस्तू अशा कित्येक साध्या साध्या दुव्यांवरून पोलिस मोठे मोठे गुन्हे ज्या पद्धतीने उघडकीस आणतात त्याचे चित्रण केवळ लाजवाब! या मालिकेतील सगळेच अव्वल दर्जाचा अभिनय करतात. कित्येकदा मी रात्री २-३ वाजेपर्यंत क्राईम पट्रोलचे भाग बघत बसलेलो आहे. पण पुन्हा तेच. "शी, काहीही आवडतं तुला. ती काय बघण्यासारखी मालिका आहे?" अरेच्चा! मग काय 'होणार सून मी त्या घरची' किंवा 'जुळून येती रेशीमगाठी' फार महान मालिका आहेत?
साधे नो-फ्रिल्स डायनिंग हॉल: 'जनसेवा' हा माझा पुण्यातला आवडता डायनिंग हॉल आहे. मुळात मला डायनिंग हॉल आवडतात. आरामशीर बसून १५-२० पदार्थांवर येथेच्छ ताव मारता येतो. 'जनसेवा' साधे आहे. कुठलाच तामझाम नाही. टेबलं, खुर्च्या, पंखे आणि जेवण याखेरीज तिथे फारसं काही नाही. जेवणदेखील साधंच! पण मला आवडतं. मी आणि बायको तिथे बर्याचदा जेवायला जातो. शनिवारी दुपारी तिथे जावं, पोळी, भाज्या, भात, आमटी, दहीवडा, थालपीठ, कोशिंबीर, मूगभजी, साबुदाणा वडा असं भरभक्कम जेवण मनसोक्त हादडावं, खाली येऊन दोन साधी पानं तोंडात कोंबावी आणि थेट घरी येऊन ताणून द्यावी हा माझा आवडता कार्यक्रम असतो. पण कार्यालयातल्या माझ्या मित्रांना असलं काही आवडत नाही. "अरे उससे अच्छा तुम 'कोपाकबाना' या फिर 'पोस्ट ९१' गये होते. अमेझिंग फूड! वैसे 'फोर सीझन्स' भी अच्छा है." असेल, या हॉटेल्समध्येदेखील जेवण छान असेल म्हणून 'जनसेवा' वाईट??? का? नाव 'जनसेवा' आहे म्हणून? नाव इंग्रजीमधलं नाहीये म्हणून? जेवण काय फक्त 'बार्बेक्यू नेशन'लाच मिळतं आणि बाकी ठिकाणी काय झुरळांची कढी आणि ढेकणांची उसळ मिळते? जळगांवमध्ये 'आर्यनिवास' नावाचा एक डायनिंग हॉल आहे. हादेखील माझा खास आवडीचा. जुलै २०१४ मध्ये जळगांवला ४-५ दिवस राहिलो होतो तेव्हा ३-४ वेळा मी 'आर्यनिवास'मध्ये जेवलो. काय सुरेख कढी! स्वर्ग! 'आर्यनिवास' खरं तर डायनिंग हॉल कमी आणि खानावळ जास्त आहे. आसपासच्या गावातली जळगांवला कामानिमित्त आलेली माणसं तिथे जेवायला जास्त येतात. विशेषतः लग्नाच्या खरेदीला आलेली माणसं. कुणीही कुठेही बसा पण आधी कुपन घ्यायला विसरू नका, झप्पकन ताट येतं, चटचट भाज्या, वरण, आमटी, कढी, कोशिंबीर वगैरे पदार्थ वाढले जातात. लगेच पोळी येते. गोड-बिड काही नाही. पाहिजे असेल तर निराळे पैसे मोजा. त्यातही फक्त श्रीखंड आणि गुलाबजाम! तळलेलं काहीच नाही. पण चव मात्र खूप छान असते. वाढणं मुबलक! मजा आ जाता हैं...
घरी जमवलेले पानः चांगल्या जेवणानंतर पान नसणं जेवणाचा आनंद कमीत कमी ३०% कमी करतं असं माझं मत आहे. बाहेरच्या पानांपेक्षा मला घरचे पान जास्त आवडते. आमच्या घरी महिन्यातून ७-८ दिवस तरी पाने असतात. काही कार्यक्रम असला तर सगळ्यांना पान बनवून देण्याची जबाबदारी माझी असते. काथ, चुना, सुपारी, बडिशेप, धनाडाळ, ओवा, आसमंततारा, इलायची, आणि एक बारीकशी लवंग घालून केलेला दोन मोठ्या पानांचा विडा शरीर आणि मन शुद्ध करून जातो असे माझे स्पष्ट मत आहे. मी तर ३-४ पानांचा विडा जमवतो. त्यात भरपूर सुपारी टाकतो. त्यासाठी एक मजबूत अडकित्ता मी घेऊन ठेवलेला आहे. तास-दीड तास पान चघळत एखादे आवडीचे पुस्तक वाचणे यातला आनंद अवर्णनीय असतो. पण घरी पान खाण्याला आता ग्लॅमर नाही. सुपारी फारसं कुणी खात नाही. ओवा सहजपणे तोंडात टाकणारा माझ्या पिढीचा माझ्या पाहण्यात कुणीच नाही.
एकपडदा चित्रपटगृहे: आजकाल यांना तर कुणी वालीच राहिलेला नाही. पण अजूनही पुण्यात नीलायम, अलका, किंवा प्रभातला चित्रपट बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो. मी आणि बायको कधी-मधी एकपडदा चित्रपटगृहात जातो चित्रपट बघायला. 'तलाश आम्ही अलकामध्ये पाहिला; स्पेशल २६ लक्ष्मीनारायणला; देल्ही बेली नीलायमला, बालक-पालक प्रभातला...' असं म्हटलं की लोकांच्या चेहर्यावर दयेचे भाव येतात. एकपडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ते ही बायकोसोबत ही कल्पनाच आता कित्येकांना अतिभयंकर वाटते. मी त्यांना सांगतो की बाबांनो पुण्यात चांगली एकपडदा चित्रपटगृहेदेखील आहेत. तिथला क्राऊड म्हणजे जनावरांचा कळप नसतो. "थोडा ऑड लगता है रे...फॅमिली के साथ जाना.." अरे बाबा, तुझी बायको ऐश्वर्या आहे की दीपिका की तिथली माणसे तिच्याभोवती गराडा घालतील! पण 'ई-स्क्वेअर मे देखा चेन्नई एक्स्प्रेस...वहीं पे डिनर खाया, कोल्ड कॉफी पिया...मजा आया...' हे कसं सांगता येईल मग चारचौघात? मला अगदीच मान्य आहे की मल्टिप्लेक्सला चित्रपट पाहणं हा एक सुखावह अनुभव असतो म्हणून पण म्हणून एकपडदा चित्रपटगृहे भिकार? डाऊनमार्केट? मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे हा अजून एक डाऊनमार्केट वाटणारा प्रकार आहे. घरी बसून 'चार दिवस सासूचे' पाहतील पण बाहेर गप्पा 'ई-स्क्वेअरमध्ये ग्रॅव्हीटी, अॅडलॅब्जमध्ये हंगर गेम्स'च्या!
तर अशा या काही गोष्टी ज्या डाऊनमार्केट समजल्या जातात पण मला मात्र मनापासून आवडतात. अजूनही बर्याच आहेत पण आता आठवणार्या इतक्याच. मला आवडतात म्हणून दुसर्यांना या आवडल्याच पाहिजेत असं माझं अजिबात म्हणणं नाही किंवा मला आवडतात म्हणून त्या चांगल्याच आहेत असादेखील माझा गैरसमज नाही. पण आवडतात तर आवडतात! अब कोई क्या कर सकता है? आपल्याला अशा काही गोष्टी आवडतात का ज्यांना 'चीप' किंवा 'डाऊनमार्केट' किंवा 'ओन्ली फॉर मासेस' किंवा 'अभिरुचीहीन' वगैरे लेबलं लागलेली आहेत? बघा बरं जरा आठवून...
प्रतिक्रिया
3 Nov 2014 - 2:34 pm | गणेशा
मनापासुन आवडला लेख. खरे तर मनातला लेख. पहिला सुरुवातीचा पॅरा लेखनाची शोभा वाढवणारा ..
साधा..सरळ पण मनात घर करणारा लेख
3 Nov 2014 - 3:15 pm | पैसा
आणि प्रतिक्रिया पण भारी आहेत एकेक!
4 Nov 2014 - 4:14 am | निनाद मुक्काम प...
आपले सुद्धा असेच आहे , एखादी गोष्ट आवडत असेल तर तिच्याबद्दल चार चौघात वाच्यता करण्यास मागे पुढे पाहत नाही.
कलेमध्ये ,साहित्यात चातुर्वर्ण्य व्यवस्था मला मान्य नाही , जगात प्रत्येक माणसाची जडण घडण वेगळ्या वातावरणात होते , त्यानुसार त्याच्या आवडी निवडी बनतात , एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणजे ती केवढी वाईट व शुल्लक आहे हे जगाला दाखवण्याचा अट्टाहास का बरे असावा.
तुम्हाला लावणी आवडते , फिल्मी गीते आवडतात व शास्त्रीय गाणे कळत नाही म्हणून ते आवडत नसेल तर उगाच चार चौघात
मला ते रडगाणे आवडत नाही अशी मताची पिंक मारणे अनिवार्य मला व माझ्या पत्नीस भयकथा व भयपट आवडतात , लहानपणी रामसे ब्रदर्स माझ्या भाव विश्वाचा व उन्हाळी सुट्ट्यांचा अनिवार्य घटक होते , त्या संदर्भात पुरानी यादे ताजा करणारा लेख मी मागे लिहिला होता.त्याची आठवण झाली , आज ह्या निमित्ताने परत आंजा वर रेषेवर रामसे चा एक सिनेमा पाहून झाला. त्यावर लेख लिहावा असे मनात आले.
4 Nov 2014 - 2:33 pm | चिनार
१. "तुम तो ठेहरे परदेसी " हे एक उच्च दर्जाचं गाणं आहे . त्यातला वर्षातील महिन्यांचा केलेला उल्लेख तर अप्रतिम आहे.
२. हिमेशची काही गाणी खरोखर छान आहेत. उदा. नमस्ते लंडन मधलं "मैं जहा रहु .. मै कही भी रहु ". पण नंतर तो वाहवत गेला.
३. नदीम- श्रवणचं संगीत उच्च दर्जाचं नसलं तरी श्रवणीय असायचं .
४. "हाउसफ़ुल " सारखे सिनेमे सहनशक्तीच्या पलीकडले आहेत. मला "अशी ही बनवाबनवी " खूप आवडतो
५. जनसेवा मध्ये नक्की जेवायला जाईल . आपटे रोडवर "आशा डायनिंग पण छान आहे.
६. पुण्यात यायच्या आधी अमरावतीला एकपडदा थेटर मधेच सिनेमे बघितले . पुण्यातल्या एकपडदा थेटर चा अनुभव मात्र चांगला नाही . काही ठिकाणी तर आवाजचं आपल्यापर्यन्त् पोहोचत नाही
4 Nov 2014 - 2:43 pm | बॅटमॅन
या सर्व भानगडीत गोविंदाच्या पिच्चरचा आणि त्यातल्या 'मैं तो रस्ते से जा रहा था' नामक खाद्यविषयक गाण्याचा, तसेच
'अ आ ई उ उ ओ' नामक व्याकरण व हार्टब्रेकचा संबंध लावणार्या अजरामर गाण्याचा उल्लेख न आल्यामुळे निषेध व्यक्त करतो.
5 Nov 2014 - 3:03 am | रेवती
लेख आवडला. बर्याच बाबतीत सहमत. कधीकधी गाणी नुसती ऐकू आली, आवडली की मी सीडी वर उतरवून घेते. त्याची गंमत आठवली. गाडीत गाणे लावले. कोणते ते आता आठवत नाही पण मैत्रिण एकदम (तिच्याच)तोंडावर हात ठेवून हसू लागली. का? तर त्या गाण्यात रणबीर कपूर टॉवेल गुंडळून नाचलाय की अश्लील असे काहीसे. मला उगीचच लाज वाटली. मग घरी येऊन आधी आपण काही अश्लील कृत्य केले नाही ना हे तपासण्यासाठी गाणे बघितले. इतके काही 'हे' नाही. तिने त्यावेळी मात्र माझी टेस्ट किती वैट्ट आहे हे मला जवळजवळ पटवले होते.
5 Nov 2014 - 11:41 am | समीरसूर
गाणं चित्रपटात कसं शूट केलं आहे हा मुद्दा निराळा; ऐकायला छान असेल तर काय हरकत आहे?
'ये दुनिया पित्तल दी' मध्ये सनी लिओन आहे म्हणून हे गाणं ऐकण्यातली गंमत कमी होत नाही.
मला तर लहानपणी 'जवा नवीन पोपट हा, लागलाय मिठू मिठू बोलायला...' देखील खूप आवडायचं. जिथे ऐकू येईल तिथे मी ते पूर्ण ऐकून घ्यायचो. काय ती चाल, काय तो ठेका, आनंद शिंदेंचा गाण्यातला अर्थ अक्षरश: जिवंत करणारा आवाज...मजा यायची. पण घरी हे गाणं गुणगुणलं तरी एक गंभीर व्याख्यान झडायचं. एकटं असतांना म्हणून किंवा ऐकून घ्यायचं मग हे गाणं. बरं, कुणाला सांगायची चोरी. "मी आताच 'नवीन पोपट हा' ऐकलं; काय रचना आहे म्हणून सांगू; चिंब झालो त्या स्वर्गीय स्वरांमध्ये" असं सवाईगंधर्वीय थाटात कुणाला सांगीतलं तर मग "कसला आहे हा?" सारख्या पुणेरी नजरा देह भस्मसात करून टाकण्यासाठी तयार!!! याच चालीवर बप्पीदांनी प्रामाणिकपणे चोरलेलं किशोरदांच्या आवाजातलं 'पाप की दुनिया' नामे अविस्मरणीय चित्रपटातलं "मै तेरा तोता, तू मेरी मैना, माने तू कहना, फूलों के जैसी तेरी जवानी, जाने क्या जादू चला...मेरा दिल तोता बन जाये, कैसा मिठू मिठू बोले हाय..." हे गाणं देखील आवडतं मला.
'पाताल भैरवी' मधलं "मेहमान नजर की बन जा, एक रात के लिये..." हे गाणं मस्त आहे. अजून काही 'मस्त मस्त' गाणी:
लगन लगन लगन लगी है, तुझसे मेरी लगन लगी - तेरे नाम
पैसा पैसा करती है तू पैसे पे क्यूं मरती है - दे दनादन
तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त - मोहरा
हर किसी को नही मिलता यहां प्यार जिंदगी में - जानबाज
एक दो तीन चार पाच (मोहिनी) - तेजाब
सो गया ये जहां, सो गया आसमां - तेजाब
अंगूर का दाना हूं, सुई ना चुभा देना - सनम बेवफा
यम्मा यम्मा - शान
बेकरार बेकरार बेकरार किया, इस जवानी ने दिल बेकरार किया - बेकरार
कितने दिनों के बाद है आयी सजना रात मिलन की - आयी रात मिलन की (मो. अझीझ...अहाहा...काय पाईपधर आवाज)
आज रपट जाये तो हमे ना उठ्ठयो - नमक हलाल
ताथैय्या ताथैया हो ओ ओ - हिम्मतवाला
एक नंबर की लडकी - कामयाब
अजून बरीच्...दिन कम पड जायेगा :-)
5 Nov 2014 - 4:58 pm | रेवती
हा हा. हो अगदी!
5 Nov 2014 - 8:57 pm | रेवती
कालच एक गाणं समजलय. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे......बरच हसू आलं आधी पण असं नाचणं सोपं नाही हेही लक्षात आलं.
6 Nov 2014 - 9:26 am | समीरसूर
'रा...राजकुमार'मधलं आहे हे गाणं. मिकाचा आवाज आहे. प्रीतमचं संगीत आहे. आणि गाण्यात मध्येच जे 'टँअ..' असं व्हायोलिनसदृष वाद्य वाजतं तो पीस मस्तच वाटतो. मला मिका आवडत नाही पण हे गाणं मस्त गायलाय तो. :-)
'रावडी राठोड'मधलं "चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया..." पण ऐकायला मस्त आहे. मूड फ्रेश होऊन जातो. सोनाक्षी जे तडांगतडांग नाचते या गाण्यात ते बघत रहावसं वाटतं. सोनाक्षी म्हणजे नायिकांमधली धर्मेंद्र वाटते. :-) थोडा ८०ज मधला फील येतो.
अजून एक "कॅरेक्टर ढीला...". जरीन खान फक्त या एका गाण्यात आवडलीये. आणि चाल मस्तच. :-)
6 Nov 2014 - 9:52 am | पिलीयन रायडर
लेख आवडला...
मलाही "तुम तो ठहरे.." आवडतं...
निगडी-कात्रज गाडी अशी झोकात हायवे वरुन जात असताना.. पावसाळ्यातल्या दुपारी.. गर्दी नसताना.. पावसाची हलकीशी सर येऊन गेलेली असताना.. खिडकीतुन गार वारं अंगावर घेत... हे गाणं सलग २दा ऐकलय.. मोबाईलवर नाही.. बसच्या ढॅण ढॅण साउंडसिस्टिमवर..!! ड्रायव्हरपण मुड मध्ये होता... पुर्ण २० मिनिटं हेच गाणं चालु होतं..
नमस्ते लंडनची गाणी अप्रतिम आहेत ह्यात वाद नाही.. हिमेश्ची गाणी बर्याचदा चांगली असतात..
अशोकाची गाणी सुद्धा आवडली तेव्हा ती अन्नु मलिकने केली आहेत हे कळल्यावर धक्काच बसला.. पण गाणी चांगली आहेत हे ही खरंच ना.. मग अन्नु मलिक म्हणुन नाक कसं मुरडावं...?!