आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस.
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच.
इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता. मतदान सुरु झाल्यावर माझ्या पुढच्या दोघा तिघांचा क्र. दुसर्या खोलीत असल्याचे कळाले त्यामुळे पहिला नंबर माझा लागला. स्लिप नसल्यामुळे केंद्र अधिकार्याने फोटो आयडी पुरावा तपासून पाहिला व त्याच्या यादीतील माझ्या नावापुढे लाल रंगाने रेघ ओढली व माझी सही घेतली. त्याच्या पुढच्या अधिकार्याने पावती दिली व बोटाला शाई लावली व मला पुढच्या अधिकार्याकडे पाठवले. पुढील अधिकार्याने पावती जमा करून मतदानाचे यंत्र कार्यान्वित केले व मी मतदान करून बाहेर आलो.
मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे. आपणही आजच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य पार पाडाल याची खात्री आहेच.
आपले आजच्या दिवसातील मतदानाचे अनुभव आपण येथे अवश्य लिहावेत.
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 8:36 am | अर्धवटराव
पण...
तुम्ही स्वतः ऑफीसला जायला तयार असाल तर ठीक... अन्यथा (जर परप्रांतीय मॅनेजर असेल तर) मराठी बाणा दाखवायचा चान्स सोडल्याबद्दल तीव्र निषेध :P
15 Oct 2014 - 9:15 am | प्रचेतस
म्यानेजर मराठीच आहे पण लै काम आहे त्यामुळे यावे लागले. अर्थात सी-ऑफ मिळेलच त्यामुळे चिंता नाही. :)
15 Oct 2014 - 8:42 am | सतिश गावडे
अरे वाह...
माझे नांव गावी कोकणात (महाड मतदार संघ) आहे. कार्यालयास सुट्टी नसल्यामुळे तसेच सुट्टी घेणे शक्य नसल्यामुळे मतदान करता येणार नाही याबद्दल खेद वाटतो.
लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी कार्यालयास सुट्टी होती तेव्हा गावी जाऊन मतदान केले होते. :)
15 Oct 2014 - 8:53 am | नाखु
सत्रात मतदान करणार आहे.(कंपनी ने अर्धी सुट्टी दिलेली आहे).घरच्याच "भावी" मतदाराचे शाळेत मतदान असल्याने काहीच अडचण नाही.
15 Oct 2014 - 9:03 am | चौकटराजा
मला आज सकाळ पर्यंत कोण उमेदवार आहेत हेच माहीत नव्हते. मी समजत होतो मी चिंचवड मतदार संघात आहे. पण
सकाळी स्लीप पहातो तर पिंपरी मतदार संघ ! नोटा ला द्यावे की मोदी .....द एंटरटेनर ला ... ?
15 Oct 2014 - 9:17 am | प्रचेतस
काय काका, तुम्ही जागरूक नागरीक ना? मग हे असं कसं? ;)
बाकी माझाही मतदार संघ पिंपरीतच आहे.
15 Oct 2014 - 9:28 am | सतिश गावडे
काका जरी जागरुक नागरिक असले तरी त्यांचं आता वय झालंय हे विसरु नका.
पळा आता. चिंचवडला गेलो की म्हातारा खरडपट्टी काढणार. ;)
15 Oct 2014 - 9:34 am | नाखु
सत्कार्याला मी सक्रिय पाठींबा देणार.
15 Oct 2014 - 9:19 am | मुक्त विहारि
मतदान करू शकत नाही.
15 Oct 2014 - 9:28 am | पैसा
सर्व महाराष्ट्रीय मतदाराना मद्दानासाठी शुभेच्छा! मला वाटले होते, एवढे रंगीत सामने बघून लोक कंटाळतील पण सकाळी ७ वाजता १५-२० लोक म्हणजे बराच उत्साह दिसतो आहे! जास्त मतदान म्हणजे काँग्रेसला धोका हा आतापर्यंतचा समज आहे. १९ ला कळेलच काय ते!
15 Oct 2014 - 9:43 am | प्रचेतस
आमच्या पिंपरी मतदारसंघात मात्र मतदारांची थोडीशी गडबड झाली आहे. आमचा विभाग हा भाजपबहुल मतदारांचा. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात भाजपाकडून आठवलेप्रणित रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला गेलाय त्यामुळे येथे कमळ चिन्ह नाही. त्यामुळे बहुसंख्य मतदार कमळ कुठे दिसत नाही याची चर्चा करत होते.
15 Oct 2014 - 9:40 am | भाते
मतदान केंद्रावर बोटावर शाई लावायला बहुदा कॉलेजमधली (किमान तशी दिसणारी) मुलगी होती. इथे आपल्याला दुसऱ्यांच्या बोटावर नेलपॉलिश लावायला बसवले आहे अशी कदाचित तिने आपली समजूत करून घेतली असावी. बोटाचा अर्धा आणि संपुर्ण नख मिळुन किमान इंचभर मोठी रेघा तिने माझ्या बोटावर उमटवली. :)
15 Oct 2014 - 11:24 am | बिहाग
आमच पण अगदी अस्सच फक्त
नाखला रंग लावायला अज्जीबाई बसल्या होत्या.
15 Oct 2014 - 4:04 pm | बॅटमॅन
तर्जनीवरच का शाई लावायची, मधल्या बोटावर लावा म्हटल्यावर मद्दानवाले लोक जे उखडले म्हणता!! डोळे वटारून काहीतरी महापाप केल्यागत पाहू लागले. तेहाची...गाढवे...जे. असो.
15 Oct 2014 - 4:12 pm | टवाळ कार्टा
=))
15 Oct 2014 - 9:51 am | यशोधरा
आमीपण जाणारे मतदानाला पण हापिस संपवून. आमाला सुट्टी नाई. संध्याकाळी ५ परेंत आहे ना?
15 Oct 2014 - 9:52 am | जेपी
वल्लीद सारखा आनुभव.
बाकी रिझल्ट काय येईल याची कल्पना आल्यामुळे NOTA.
15 Oct 2014 - 10:18 am | विजुभाऊ
आमच्या क्लायन्टचा म्यानेजर मराठीच आहे पण तो इतक्या रेम्याडोक्याचा आहे की विचारायची सोय नाही.
त्याने कोण कोणत्या गावी मतदान करणार आहे या नोंदी अगोदरच घेतल्या आहेत. त्या नुसार एकतर पूर्न सुट्टी किंवा स्थानीक लोकाना दोन तास सुट्टी घ्यावी आणि डोंबिवली किंवा अंबरनाथ / वसई येथे जाउन मतदन करावे अशा मताचा आहे.
15 Oct 2014 - 10:52 am | टवाळ कार्टा
मी पण ७:१५ लाच गेलेलो...२०-२५ लोकतरी आधीच येउन गेलेली
15 Oct 2014 - 11:08 am | अजया
माझ्या इथले मतदान केंद्र गावाच्या टोकाला,वस्ती संपते तिथे शेताडीत एक उध्वस्त धर्मशाळेसारखी दिसणारी शाळा आहे ,त्यात होते.गवतात मोठ्ठी बीळं,सर्वत्र सांडपाणी.रस्त्याचा पत्ता नाही.
तिथल्या विद्यार्थ्यांची,आज तिथे काम करावे लागणार्या कर्मचार्यांची,पोलिसांची दयाच आली.आणि हो मद्दानाला मीच पयली होते!
15 Oct 2014 - 11:18 am | काळा पहाड
या वेळी नेली की नाही कार?
15 Oct 2014 - 12:55 pm | अजया
कार नाही स्कूटी!!न धडपडता!!
15 Oct 2014 - 11:43 am | क्रेझी
कार्यालयाला सुट्टी नाही आणि फक्त दोन तासामधे गावी जाऊन परत येऊ शकत नाही त्यामुळे मतदान नाही करू शकणार :(
15 Oct 2014 - 11:45 am | श्रीगुरुजी
सकाळीच जाऊन मतदान करून आलो. मतदान अधिकार्यांना दर २ तासांनी मतदानाचे आकडे पाठवावे लागतात. त्यामुळे ९ वाजता ८-१० मिनिटे मतदान थांबले होते. त्या दरम्यान १५-२० जणांची रांग लागली. मतदान पुन्हा सुरू होतानाच ६० च्या आसपास वय असलेले व चांगली ठणठणीत प्रकृती असलेले मागून येऊन पुढे घुसू लागले. घुसताना त्यांनी मागच्या अजून एका माणसाला खुणेने पुढे बोलाविले. तो माणूसही ५५ च्या आसपास वय असलेला व तब्येतीने चांगला धडधाकट होता.
मी त्या तिघांनाही आक्षेप घेतल्यावर पुढील माणसाने आपण ज्येष्ठ नागरीक असल्याचा दावा केला. ६० च्या आसपास वय व तब्येतीने धडधाकट असूनसुद्धा वयाचा फायदा घेऊन रांगेत घुसण्याचा प्रयत्न संतापजनक होता. त्या दोघांना चांगला झापडला. मागच्या माणसाला घुसखोरीबद्दल विचारल्यावर आपला मणका फ्रॅक्चर असल्याची थाप मारली. मणका फ्रॅक्चर असणारा माणूस अंथरूणातून उठू सुद्धा शकणार नाही आणि तुम्ही तर निवांत फिरताय असे सांगितल्यावर ३ वर्षांपूर्वी मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे त्याने सांगितले. त्यालाही चार शब्द सुनावल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणे तिघेही इतरांच्या पुढे आत घुसून मतदान करून आले. स्वतःची तब्येत धडधाकट असताना सुद्धा वयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तिघांनाही योग्य त्या शब्दात सुनावले. याचा चांगला परीणाम असा झाला का त्यांनी खूण करून पुढे बोलाविलेल्या अजून १-२ जणांना दारातल्या पोलिसांनी परत पाठवून रांगेतून येण्यास सांगितले.
मतदान संपल्यावर बाहेर आल्यावर आपण ज्येष्ठ नागरीक असण्याचा दावा करून मध्ये घुसलेला तोच "ज्येष्ठ" नागरीक अक्षरशः पळत पळत रस्ता ओलांडताना दिसला!
15 Oct 2014 - 11:51 am | स्पा
गुमान अकरा वाजता केंद्रावर गेलो, फक्त एक नंबर पुढे होता.
दोन मिनिटात मद्दान करुन बाहिर... आता वेंजोयिंग सुट्टी
15 Oct 2014 - 11:57 am | माम्लेदारचा पन्खा
कुणाची माय व्यालीये मद्दान न करायची... चला रे...
15 Oct 2014 - 12:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पहाटे पहाटे ७.११ वाजता प्राधिकरणाच्या म्हाळसाकांत विद्यालयात कर्तव्य पार पाडलेलं आहे. जेमतेक २ मिनिटात काम झाल. फार गर्दी नव्हती.
15 Oct 2014 - 12:20 pm | सुनील
काही वर्षांपूर्वी राहते घर बदलले परंतु मतदारयादींतून नावे बदलून घेतली नाहीत. त्यामुळे एकाच घरात दोन मतदान केंद्रांत (खरे म्हणजे दोन विधानसभा क्षेत्रांत) नावे असणार्या व्यक्ती! एक केंद्र घरापसून ६ किमींवर तर दुसरे विरुद्ध दिशेला २ किमींवर.
पावणे सातला घरून निघालो. दोन्ही मतदान केंद्रे आटोपून पावणे नवाला हपिसात हजर! कुठेही गर्दी नव्हती.
15 Oct 2014 - 12:49 pm | असंका
मतदारसंघ पुढच्या एक दोन आठवड्यात सोडणार आहे. तरी चाललोय अधिकार बजावायला. यस्टीत आहे. बहुतेक पोचेन वेळेत. पाच वाजता शेवट आहे ना? रांगेत असणार्यांना पाच वाजून गेल्यावरसुद्धा मतदान करु देतील अशी आशा आहे...
15 Oct 2014 - 1:29 pm | प्रचेतस
आपले अभिनंदन.
पाच वाजता रांगेत असूनही ज्यांचे मतदान झाले नाही त्यांच्यासाठी रांग संपेपर्यंत मतदान चालूच ठेवणार येणार आहे.
15 Oct 2014 - 1:24 pm | कंजूस
वल्लीने लेन बदलली आज. शाई लावण्याची पध्दत त्यांना शिकवली आहे तसेच ते करत आहेत चूक नाही. आता जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून आपण हक्काने काम करून घ्यायचे शाई उगाच नाही लावून घेतली आम्ही.
15 Oct 2014 - 2:32 pm | चौकटराजा
वल्ली मतदानाला गेला याचे कारण सातवाहन कालीन निवडणुका - आजच्या निवडणुकांचा मूलस्त्रीत असा लेख तो लिहिणार आहे. लेन बिन काही नाही बदलली.
15 Oct 2014 - 2:43 pm | राही
मुंबईत शुकशुकाट आहे. सेना कार्यकर्त्यांची नेहमीची लगबग आज दिसत नाहीय. त्यांना माणसे बाहेर काढता आलेली दिसत नाहीत. फ्लॅटवाले/टॉवरवाले मात्र सकाळीच मतदान करून आले आहेत. संध्याकाळपर्यंत झोपडपट्टीवाल्यांना बाहेर आणता आले नाही तर मुंबईतले निकाल उघड आहेत.
15 Oct 2014 - 4:14 pm | पैसा
३ वाजता मुंबईत ३७% आणि बाकी महाराष्ट्रात ४६% मतदान झाले अशा बातम्या दिसत आहेत.
15 Oct 2014 - 4:23 pm | टवाळ कार्टा
अरेरे...परत खांगरेस येनार??? :(
15 Oct 2014 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सकाळी ९:३०-१०:०० ला मतदान केले. यावेळेला मागच्या निवडणूकीच्या मानाने कमी गर्दी दिसली. आता १९ तारखेपर्यंत वाट पाहणे आणि तोपर्यंत दूरचित्रवाणीवर चर्चाचर्वण पाहणे हेच नशीबी आहे :)
15 Oct 2014 - 2:53 pm | सुहास..
आज आमचा सेल्फि काढुन चेपुवर बोट दाखविण्याचा हक्क हिरावला गेलाय !
पहाटे चार वाजेपासुन काम करत होतो, गावात एकुण तीनच मतदान केंद्रे आहेत, पुण्यात सर्वात जास्त मतदार संख्या असलेला वार्ड हा आपला आहे, मतदान कर्मचार्यांची मदत, अगदी ,खुर्च्या लावण्यापासुन ते बाहेर गर्डर लावणे, महिला पोलीस व स्त्री कर्मचार्यांसाठी सुविधा ची गाडी मागविणे ( जिप च्या शाळेत आहे मतदान ), बाहेर गर्डर लावणे, म्हणजे सीमा सुरक्षा करणे, मग बाहेर टेबल लावण्यापर्यंत सगळ काही करून दिले मंडळाने, अर्थात हे दरवेळचचं आहे काम !! सव्वासहाच्या सुमारास निवडणुक अधिकार्याबरोबर नाष्टा करताना मस्त गप्पा हाणल्या , त्यांना स्वतः ला पोस्टाने मत पाठवावे लागणार होते " या वर्षी मतदानाचा टक्का घसरणार बघा " !! साडे सहाच्या सुमारास सर्व मशीन च्या टेस्ट घेतल्या, एक बंद होती , लगेच दुसरी आली !! सात वाजता आपलीच काही मंडळी लायनीत मत देवुन गेली ....मग मी निघालो ..माझ व्होटिंग नागपुरचाळीत आहे , साडेसात ला सगळ्यांच्या झोपा उडवायला पोहोचलो ...सात लिस्टा उलट्या-पालट्या घातल्या ..आमचं नाव नाही ...च्यायला माझाच पत्ता कट !! घरातल्या बाकी पाच ही जणांच नाव .........
हाय रे किस्मत !! मायच्या भोपळा त्या निवडणुक आयोगाच्या :(
15 Oct 2014 - 4:06 pm | पैसा
मागच्या निवडणुकांत चुन चुन के नावं कट केली म्हणून पुणेकर बोंबलत होते. यावेळी काय झालं?
15 Oct 2014 - 4:44 pm | सुहास..
यावेळी पण आमच कोंबडं पाण्यात गेलं
15 Oct 2014 - 4:17 pm | भिंगरी
जाउन मतदान केले.
पण माझे वडील (वय ८९,ऐकायला येत नाही)काल नाशिकहुन ठाण्याला खास मतदानासाठी आले आहेत.
15 Oct 2014 - 4:28 pm | माम्लेदारचा पन्खा
एरवी नेत्यांच्या नावाने शिमगा करणारे..... कुठे नेऊन ठेवलेत लोक माझ्या महाराष्ट्राचे?
15 Oct 2014 - 4:34 pm | अनन्न्या
आमचे मतदानकेंद्र आमच्या घ्रराशेजारीच असल्याने दोन मिनीटांचा पायी प्रवास! घरासमोर सेना भाजपचे कार्यकर्ते मिळून मिसळून वडपाव खात होते, कसे फसवले असे म्हणत!
15 Oct 2014 - 4:43 pm | सुहास..
कार्यकर्ते सर्व एकत्रच असतात ..सकाळी ही आणि संध्या समयी ही ;) ...आज सात वाजेपासुन धिंगाणा सुरु होणार आहे बघा .......=))
15 Oct 2014 - 4:49 pm | यसवायजी
माझं नाव कर्नाटकातल्या मतदार यादीत आहे त्यामुळे 'पास'.
'पॉवर' सायबानं लोकसबेच्या टायमाला दोनीकडं मत द्याया सांगितलं हुतं. पण ह्या वेळेला तसं काय इशेश आवाहन (पक्षी- प्रलोभन) न मिळाल्याने - नॉट मतदान्ड इन पुणे टूडे. ;)
15 Oct 2014 - 5:31 pm | यशोधरा
आत्ता मतदान करुन आले.
15 Oct 2014 - 5:38 pm | अर्धवटराव
इतकं कमी मतदान झालय :(
15 Oct 2014 - 7:08 pm | धर्मराजमुटके
आमी ठाण्यात रवतयं पण मतदान असल्फा, साकीनाका भागात (जुन्या घरी) आहे. घाटकोपर ते असल्फा असा मेट्रोचा वातानुकुलीत प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचलो. उमेदवारांची यादी बघून डोके भंजाळले.
जी शिवसेना मराठी मराठी करते त्यांचा उमेदवार युपीवाला सिंह होता. कदाचित मराठी शेर संपले असावेत.
ईश्वर तायडे नावाचे साहेब जे मागच्या निवडणूकीत रा.कॉं. मधे होते ते चक्क मनसेच्या इंजिनावर आरुढ होते.
काही वर्षांपूर्वी नगरसेवकाच्या निवडणूका झाल्या ( तेव्हा मनसेला इंजिन हे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते) तेव्हा मनसेची निशाणी "शिट्टी" होती ती एक अपक्ष उमेदवार वाजवत होता.
मायाबाईंचा हत्ती होता.
शरद पवार नेहमीप्रमाणे घड्याळ या चिन्हावर लढत आहेत.
फक्त आरिफ नसीम खान हे ओळखीचे उमेदवार आणी त्यांचा हाताचा पंजा हे कॉम्बीनेशन वर्षानुवर्षे कायम आहे ते ह्या ही वेळेस कायम होते.
15 Oct 2014 - 7:23 pm | रेवती
आमी नाय केलं मद्दान, अजून १८ पूर्न न्हाईत.
15 Oct 2014 - 7:34 pm | धर्मराजमुटके
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही."
अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.
15 Oct 2014 - 7:55 pm | हाडक्या
अच्छा म्हणजे तो मेसेज पाठवणार्यास म्हणायचे आहे की तुम्ही(च) तुमच्या मुलीसाठी नवरा निवडायचा आहे आणि तो पण तुमच्याच जातीतील..!!
बाकी असे(च) असेल तर मग निवडणुकीत उमेदवार जात बघून निवडला तर काय झालं मग ?
भंकस दांभिकता साली सगळीकडे..
(तुमच्याबद्दल हा प्रतिसाद नाहीये हो, तो मेसेज ज्याने तयार केला आणि ज्यांनी पुढे पाठवला त्यांच्याबद्दल आहे.)
15 Oct 2014 - 8:06 pm | टवाळ कार्टा
याच्यातून स्त्रीयांचा उपमर्द कसा होईल???
15 Oct 2014 - 8:16 pm | धर्मराजमुटके
मी एक गरीब मध्यमवर्गीय विवाहीत पुरुष आहे हो. स्त्रियांचा विषय हा अतिशय संवेदनाशील आहे.
त्याच्या चुकूनही कोठे उल्लेख आला की मी शक्यतो त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. चुकून प्रतिक्रिया दिलीच तर फारच तोलून मापून देतो. प्रतिक्रिया दिलीच तर अगोदरच माफी मागून मोकळा होतो किंवा माझा हेतू प्रामाणिक आहे असे जाहिर करतो.
काये ना की आपला उगाच आरारा बाबा होऊ नये. म्हणजे वागणे चांगले पण बोलण्यात मार खायचा.
15 Oct 2014 - 8:37 pm | टवाळ कार्टा
पण बायकांना विचार करता येत नाही का???
16 Oct 2014 - 1:01 pm | असंका
:-))
बाकी +१
16 Oct 2014 - 3:35 pm | बॅटमॅन
स्त्रियांचा उप'मर्द' करायचा तर ते तूर्तास फक्त वैद्यकशास्त्र आणि तेही अंशतःच करू शकते असे वाटते. चूभूद्याघ्या.
15 Oct 2014 - 7:49 pm | एस
केले मतदान!
16 Oct 2014 - 1:44 am | विलासराव
आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान करायचेच होते. पण आता अंबरनाथला जायचे आहेच तर कोणी मिपाकर आहेत कालच तपासल.आपले भटक्या खेडवाले आहेत तिथे. त्यांचा नंबर कट्टासम्राट मुवींना मागीतला. त्याच्याकडे नंबर नव्हता मग त्यांनी ४-५ मध्यस्थांचे नंबर दिले , त्यांच्याकडुन भटक्यांचा नंबर मिळवला. तर मुवींचा रात्रीच डायरे़क्ट फोनच आला. त्यांनी शनिवारच्या डोंबोली कट्ट्याच आमंत्रणच दिलं. मग आज सकाळीच लवकर उठुन अंबरनाथला. भटक्यांना फोन केला तर ते १० मिनीटात घ्यायला स्टेशनला हजर. मग त्यांच्याघरी त्यांच्या आईअवडीलांची भेट झाली. योगा आनी विपश्यनेवर एक सेशन झाले. नाष्टा करुन एका मित्राकडे त्यांनी मला सोडले. तिथे आनी इतर ३-४ जुन्या दोस्तांच्या घरी चहापानी घेत २ ला बहीणीच्या घरी पोहोचलो. तीथे मेनु होता डोसे चटणीसहीत आनी मिसळपाव. मग चापुन हाणल्यावर तासभर आडवाच झालो. ४-३० ला चहापानी घेउन केंद्रावर हजर. नेटवरुन स्लीप प्रिंट मारली होती पण त्यात फक्त यादी नंबर होता. नाव सापडेना. मग मी अंदाजे १०६४ नंबर पहायला सांगीतले. तिथे दुसर्याचे नाव. मग मी १६४ पहा म्हणालो तर तो संशयानेच पाहु लागला. पण विनंती केल्यावर त्याने पाहीले तर हा मटका बरोबर लागला होता. पॅनकार्ड दाखवले तर त्यांना नावच वाचता येईना जुने असल्याने. ते म्हनाले की दुसरा आडी आहे का काही. मी म्हणालो आहे पण लालबागला. मग त्यांनी परवानगी दिली. खरतर होता माझ्याकडे वाहन चालवायचा परवाना पण म्हणलं बघु काय म्हणतात ते. पण झालं एकदाचं मतदान. ४-५ लोक माझ्यापुढे होते २-३ मागे. नंतर परत २-३ स्नेह्यांच्या भेटीगाठी घेउन लालबागला परत. येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर.
16 Oct 2014 - 4:32 pm | किसन शिंदे
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!
16 Oct 2014 - 6:10 pm | विलासराव
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!
अर्थातच.बेशर्त सहमती!!!!!!
16 Oct 2014 - 9:04 am | नाखु
कंपनीतून दुपारी घरी पोहोचल्याबरोबर म्हटलं आधी मतदान करू जेवण नंतर्.गेलो केंद्रावर.
यादी-क्रमांक शोधण्यासाठी "मांडी-सगणक" महोदय तयार होतेच पण त्यांच्या भवती गराडा पडला होता (तुळशीबाग्+आठवडी बाजार्+देवस्थान जत्रा) असे काहीसे स्वरूप होते. काही वेचक संवाद झाले:
माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का?
माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का?
लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
यथावकाश दालन क्रमांक समज्ल्यावर आमची वरात दालनाच्या दाराशी पोहोचली.
तिथेही काही शंकासूरांनी दालन क्रमांकवरून परस्पर विरोधी माहीती देवून पहिल्यांदाच मतदानाला आलेल्या "नवमतदारांना" सजग्-संभ्रम्-निरकारण्-पुन्हा संभ्रम" अशा दिव्य अवथेत पोहोच्वण्यास हात भार लावला.
दालनात पोहोचल्या-पोहोचल्या पडताळणी अधिकारी आणि जागरूक मतदार यांच्यातील संवादः
"माझ नाव आहे का बघा ना जरा!"
"अहो नाव-दालन क्र्मांक बाहेर बघा!"
"अहो तिथे फार गर्दी आहे ना म्हणून डायरेक तुमच्याकडं आलोय"
"बाबा कुनाचही नाव नंबर अस्ल्याबिगर नाही शोधता येणार"
"असं काय करताय मला बाहेर लाईनित उभं र्हाव लागेल. ईथे पण लाईनीतून्च आलोयना"
"नाही अगदी माझ्या पोराचे असले तरी नंबर शिवाय नाही नाव शोधता येणार !!!"
"छ्या तुम्ही सरकारी लोक अजिबात कोप्रेट करीत न्हाई"
=====================================
त्यानंतर एका आजीबाईंनी मशिनचा आवाज झाला का माझे मत झाले याची मतदान मदतनीसाकडून दोन्-तीन्दा खात्री करून घेतली.आणि मगच पुढच्या माणसाला मतदान "आडोसा खोक्यात" जावू दिले.
बाकी आमच्या भागात ही एकाच नावाचे २-३ उमेदवार उभे करून गंमत आणली आहे.
16 Oct 2014 - 11:29 am | कलंत्री
माझ्या मागील दोघांना आपण अगोदर मत द्या असे सांगितले आणि विचारासाठी थोडा वेळ घेतला. कोणाला मत द्यावे हेच समजत नव्हते.
क्षणोक्षणी मनात विचार येत होता, सगळ्यात कोण बरे कमी वाईट असेल बरे?
16 Oct 2014 - 12:43 pm | स्वामी संकेतानंद
सालाबादाप्रमाणे यंदाही मतदान करता आले नाही.
16 Oct 2014 - 3:59 pm | सौंदाळा
काल मतदान करुन आलो.
या धाग्याच्या निमित्ताने १० वर्षापुर्वीचा किस्सा आठवला.
विधानसभेच्या मतदानाला गेलो होतो. कॉलनीतलीच एक परिचित सुशिक्षित (?) महिला पुढे उभी होती. नावपडताळणी, सही वगैरे झाल्यावर ती गेली वोटींग मशिनकडे आणि तिकडुनच ओरडुन निवडणुक कर्मचार्याला अंगठा दाखवुन विचारु लागली डावा की उजवा? कर्मचारी मुळचा पुणेकर नसावा त्याने सांगितले तुम्हाला पाहिजे ते कोणतेही बटण दाबा. तर परत हिचे तेच डावा की उजवा? लोक हसायला लागले. शेवटी मत दिल्याचा बीप आला. डाव्या अंगठ्याने बटण दाबले का उजव्या देव जाणे पण परत जाताना त्या निवड्णुक कर्मचार्याला ती रागाने काहीतरी बोलली. त्यानंतर मात्र तो पिसाळला आणि निवडणुकिच्या प्रचारात उडाला नसेल एवढा धुरळा १० मिनिटात उडाला. अजुनही प्रत्येक मतदानाच्या दिवशी हा किस्सा आठवतोच. (आणि त्यावेळी माझ्या मागेच उभ्या असणर्या मित्राने हलक्याच आवाजात केलेली चावट कॉमेंट्सुद्धा)
16 Oct 2014 - 6:23 pm | आदूबाळ
एक शंका:
दहा वर्षांपूर्वी बटण दाबून मतं द्यायची सोय कुठे होती?
16 Oct 2014 - 6:52 pm | दुश्यन्त
२००४ साली लोकसभा / विधानसभेला मतदानासाठी इवीएमच वापरात होते.
16 Oct 2014 - 4:10 pm | कपिलमुनी
सालाबादप्रमाणे मतदान केला !
16 Oct 2014 - 4:16 pm | मदनबाण
अर्धा दिवस काम करुन घरी आलो... बॅग ठेवली. बायडीला तय्रार रहा म्हणुन हापिसातुन निघण्या आधीच सुचना केलेली होती. मग बाईकवर बसुन दोघो मतदान केंद्रात गेलो. १५ मिनीटात मतदानाचा हक्क बजावुन बाहेर आलो. आल्यावर शाई लावलेल्या बोटोचा फोटु मिपा व्हॉट्सअप ग्रुपवर शेउर केला... बाकीचा वेळ पिल्ला बरोबर दंगा-मस्ती करण्यात घालवला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण