तिन्ही त्रिकाळ
संध्याकाळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
मेंदूतले घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओले घसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओळींना धार
ओळींचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
जगायचा वीट
जगतोय धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
मरणाशी भेट
कविताच थेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 3:26 pm | विसोबा खेचर
वा!
एक वेगळीच परंतु सुंदर कविता...!
4 Aug 2008 - 4:52 pm | चतुरंग
एकदम शेलाट्या बांध्याची, डौलदार कविता! :)
(स्वगत - रंगा, असं काही नवीन वाचलं रे वाचलं की किती त्रास होतो ना 'ऊर्मी' दाबून टाकायला? ;) )
चतुरंग
4 Aug 2008 - 6:15 pm | मनीषा
कविता आवडली ...
4 Aug 2008 - 6:17 pm | नारदाचार्य
वेगळीच रचना. आवडली.
4 Aug 2008 - 6:19 pm | II राजे II (not verified)
मस्त !!
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओले घसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
बेला कविता देखील करता हे माहीत नव्हतं !!
* पुढील बोध कथा कधी ?
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
4 Aug 2008 - 6:32 pm | मनस्वी
वेगळा प्रकार आवडला.
सारेच तुकडे सुंदर!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
4 Aug 2008 - 6:36 pm | राधा
मस्त..........
4 Aug 2008 - 6:40 pm | प्राजु
वेगळीच रचना आहे ही. मस्त एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 7:56 pm | बिपिन कार्यकर्ते
छान आहे कविता. एक वेगळाच अंगभूत ठेका आहे कवितेला...
बिपिन.
4 Aug 2008 - 10:33 pm | धनंजय
जोरकस ठेच देणारा ठेका आणि अस्वस्थ करणारी रूपके (पांजरपोळ!) दमदार आहेत.
शंका : "ओले घसे" म्हणजे घशांत मादक द्रव टाकल्यामुळे ते ओले झाले आहेत काय? अनेक म्हणजे खरेच अनेक घसे आहेत का? दारूमुळे तोल घेला म्हणून कंसात (हसे) होते आहे काय? असे असल्यास हे कवितेच्या अंतर्गत तिचेच (कंसातले) विडंबन माझ्या दृष्टीने रसभंग करते. "तू"च्यामुळे दारू प्यावी लागली, हा भाव मात्र कवितेशी सुसंगत वाटतो आहे...
4 Aug 2008 - 10:56 pm | बेसनलाडू
शंका : "ओले घसे" म्हणजे घशांत मादक द्रव टाकल्यामुळे ते ओले झाले आहेत काय? अनेक म्हणजे खरेच अनेक घसे आहेत का? दारूमुळे तोल घेला म्हणून कंसात (हसे) होते आहे काय? असे असल्यास हे कवितेच्या अंतर्गत तिचेच (कंसातले) विडंबन माझ्या दृष्टीने रसभंग करते. "तू"च्यामुळे दारू प्यावी लागली, हा भाव मात्र कवितेशी सुसंगत वाटतो आहे...
घसेही अनेक आहेत,आणि ते ओले होण्याचे कारणही मद्यप्राशन हेच आहे. पण मूळ कारण मात्र 'तू' (तुझ्यामुळे प्यावे लागणे,हे जे तुम्ही म्हटलंय ते) जे कवितेशी सुसंगत वाटते. आता या अनेक घशांच्या ओले होण्याचे प्रत्यक्ष कारण 'तू' असेल (तुझ्यावर स्वतःला कुर्बान करणारे मल्टिपल् घसे) किंवा अप्रत्यक्ष कारण (तुझ्यामुळे कामातून गेलेला मी आणि स्वतःबरोबरच अनेक घसे बाजूला जमवून ते ओले करणे - माझ्यामार्फत/माझ्या 'थ्रू') 'तू' असेल. ती संदिग्धता ठेवायचे स्वातंत्र्य लिहिताना घेतले.
तोल जाण्याने हसे होणे, हेही बरोबर पण हा गेलेला तोल तारतम्याचा,संयमाचा,विवेकबुद्धीचा आहे;मद्यप्राशनाने अक्षरशः जाणारा/सुटणारा (शारीरिक) तोल नाही. थोडक्यात 'तुझ्यामुळे' माझ्याकडून जे सहसा अपेक्षित नाही,तेही घडले आणि तेच (माझे) हसे होण्याचे (लाज जाण्याचे) कारण ठरले,असे काहीसे.
विडंबन का नि कसे वाटले,हे मात्र नीटसे समजले नाही.
(सविस्तर)बेसनलाडू
4 Aug 2008 - 11:55 pm | धनंजय
कविता आवडली हे पुन्हा सांगणे नलगे.
"घसे" सोडले तर पूर्ण कविता "तू"मुळे "मी"मध्ये झालेल्या परिणामांबद्दल आत्मचिंतन (इन्ट्रोस्पेक्शन) आहे. त्या एकाच ठिकाणी "मी आणि माझ्यासारखे अनेक" यांचा उल्लेख आहे. या स्व-परीक्षक "मी"ने एका ओळीसाठी अन्यांचा उल्लेख करावा, यात स्व-परीक्षण-रसाचा भंग होतो आहे (माझ्यापुरता :-) )
"हसे" शब्दाला यमक जुळवण्यासाठी या बाकी आशिकांचे अनेक घसे शब्दबद्ध केलेत का? ;-)
विडंबन-भाव हा पूर्णपणे (कंसांमुळे) झाला आहे. कविता पूर्णपणे रोखठोक आहे. पांजरपोळ वाटला तर थेट "पांजरपोळ वाटला" असे सांगते. "माझे हसे होत आहे" असे थेट म्हटले असते तर तोच थेट स्वपरीक्षणात्मक भाव राहिला असता. कंसातल्या गोष्टी थेट नसतात. गौण असतात, कधी स्पष्टीकरणात्मक असतात (म्हणजे तुम्हाला अर्थाचे स्पष्टीकरण गरजेचे नसले तर कंसातले वाक्य नाही वाचले तरी चालते).
"(हसे)" कंसात टाकून कवी ही बाब गौण करत आहे. जणू काही स्वतःची चेष्टा करत हसे झाल्याचे सांगतो आहे. त्यामुळे (माझ्यासाठी तरी) स्व-परीक्षणाचा थेटपणा हरवतो आहे. वृत्त सांभाळून उरलेल्या कवितेतल्या थेटपणाला "पंक्चर" केले जात आहे, वेगळाच कुठलातरी विनोदी भाव सांगितला जात आहे, म्हणून त्या "(हसे)" ओळीला मी विडंबन म्हटले आहे.
5 Aug 2008 - 12:28 am | बेसनलाडू
सर्वप्रथम, विडंबन का म्हटले याबाबतचा तुमचा मुद्दा नीट कळला. तो समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
हसे होणे कंसात टाकावे की नाही,याबद्दल बराच विचार केला होता.स्वतःचेच हसे होणे ही आत्मपरीक्षणपर कबुली जाहीर न देता स्वतःलाच त्याची जाणीव करून देणे अधिक श्रेयस्कर वाटल्याने ते कंसात टाकले.मेंदूतला पांजरपोळ कबूल करण्यात काही गैर वाटले/वाटत नाही,पण स्वतःचे हसे झाले/होते हे मान्य करताना अंमळ संकोच वाटलाच/वाटतोच.त्यामुळे ती कबुली स्वतः स्वतःपाशी/मनाशी (कंसातून) दिली.मात्र यामुळे स्वपरीक्षणभावात झालेला बदल हा तुमचा मुद्दा किंवा 'थेटपणा' 'पंक्चर' झाल्याचा मुद्दा पूर्ण मान्य आहेच. पण कंस हे सामान्यपणे असतात तसे गौणत्त्वदर्शक नसून वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वगतदर्शक आहेत/असतात,हे लक्षात घेतले आणि ते पटले तर रसभंग न होता एकूण कल्पना 'अपील'च होईल असे वाटले/वाटते.
अनेक आशिक हे कवितेतील एकव्यक्तीभावाशी विसंगत हे कबूल;पण तुझ्यामुळे घसा ओला करणारा मी एकटाच असेन,हे देखील पूर्ण पटत नाही ;) नेहमीच तुझ्यामुळे माझा घसा ओला करण्याची/होण्याची कारणे इतरांपेक्षा वेगळी असतील,आणि माझे हसे झाले हे बोचले/बोचते.इतरांचे काय होते याची पर्वा नाही. घसे-हसे जोडीतील यमकभाव थेट असल्याने र ला ट जुळवायचा प्रकार वाटल्यास नवल नाही.पण त्या पर्टिक्युलर ओळीत अनेकांना गोवण्याचे मूळ कारणही 'तू'च :)
(सविस्तर)बेसनलाडू
धनंजय,तुमच्याशी झालेला हा संवाद एक वेगळाच आनंद देऊन गेला,हे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते.अशीच साधकबाधक चर्चा येथे झडत राहिली तर कवितेच्या 'कविता' या स्वरूपामागील आणि तिच्याशी निगडीत इतर अनेक अंगांवरही प्रकाश पडेल,हा आशावाद अधिक प्रबळ होतो आहे. धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू
5 Aug 2008 - 4:53 am | सर्किट (not verified)
जोरकस ठेच देणारा ठेका आणि अस्वस्थ करणारी रूपके (पांजरपोळ!) दमदार आहेत.
हेच म्हणतो. पांजरपोळ हा शब्द खरेच हलवून गेला.
वा, बेला, वा !
- सर्किट
4 Aug 2008 - 11:12 pm | अविनाश ओगले
वेगळया वळणाची कविता...
6 Aug 2008 - 4:18 pm | लिखाळ
बेला,
कविता आवडली. एकदम वेगळीच आणि सुंदर !
--लिखाळ.
7 Aug 2008 - 12:44 am | बबलु
जगायचा वीट
जगतोय धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
जबराट !!!
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
खूपच जबराट !!!!!!
मनापासून आवडली.
...बबलु-अमेरिकन