✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोझाम्बिकची निवडणूकः १

आ
आतिवास यांनी
Sat, 09/13/2014 - 19:51  ·  लेख
लेख
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली. नाही, म्हणजे चालत किंवा रस्ता शोधत नव्हतं यायचं मला; पण तरी निदान पृथ्वीच्या कोणत्या तुकड्यावर आपण असणार हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं मला. मग दक्षिणेला दक्षिण आफ्रिका (उत्तर आफ्रिका थोडीच असणार दक्षिणेला!) आणि स्वाझीलँड, पश्चिमेला झिम्बाब्वे, झांबिया, वायव्येला टांझानिया, मलावी, आणि पूर्वेला अथांग हिंदी महासागर (इंडिअन ओशन) (आणि त्यात मादागस्कार) असलेला देश नकाशावर सापडला. फार माहिती गोळा करत बसायला वेळ नव्हता पण तरी साधारण भौगोलिक आणि राजकीय माहिती गोळा करायचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश आलं नाही. ज्या बातम्या हाती आल्या त्या काही पुरेशा वाटल्या नाहीत. मापुटोला पोचल्यावर दुस-या दिवशी स्थानिक वर्तमानपत्र उघडलं आणि कळलं की मोझाम्बिकमध्ये १५ ऑक्टोबरला निवडणूक आहे. भारतातला लोकसभा निवडणुकीचा रागरंग यावेळी कधी नाही इतका रस घेऊन पाहिला होता, अनुभवला होता; प्रचारमोहिमेत काही अंशी सामीलही झाले होते. त्यात मी समर्थन करत असलेल्या (‘आप’ल्या) पक्षाचा साफ धुव्वा उडाला असला तरी निवडणूक हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे याची जाणीव मला झाली होती. पक्ष हा आणि तो या वादात न पडताही लोकांच्या आकांक्षा संयतपणे व्यक्त होण्याचं ‘निवडणूक’ हे तुलनेनं एक चांगलं माध्यम आहे हे नव्याने लक्षात आलं होतं. या ताज्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मोझाम्बिकच्या निवडणुकीबद्दलही मला रस वाटणं स्वाभाविक होतं. अर्थात माहितीचा अभाव, भाषेची अडचण, परकीय लोकांनी स्थानिक राजकीय परिस्थितीत रस घेण्यात असलेले धोके, स्थानिक संघर्षाची परिस्थिती, निवडणुकीत एकूणच वातावरण तापलेलं असणं, स्थानिक संस्कृतीशी ओळख नसणं, स्थानिक लोकांशी अत्यंत कमी ओळखी असणं – अशा अनेक कारणांमुळे ही माहिती परिपूर्ण अजिबात नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती. पार्श्वभूमी मोझाम्बिक ही एक ‘तरुण लोकशाही’ आहे असं म्हणता येईल. या देशाचा इतिहास (आणि काही अर्थी वर्तमानही) गुंतागुंतीचा आहे. ८,०१,५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणा-या या देशात २००७ च्या जनगणनेनुसार २,१३,९७,००० लोक होते. २०१४ मध्ये २,६०,००,००० लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. मोझाम्बिकची विभागणी दहा प्रॉविन्सेसमध्ये आहे आणि ‘मापुटो’ ही राजधानी असल्याने त्याला ‘विशेष शहर’ असा खास दर्जा आहे. १९७५ मध्ये प्रदीर्घ लढाईनंतर पोर्तुगीज राजवटीतून हा देश मुक्त झाला. २५ जून १९७५ हा मोझाम्बिकचा स्वातंत्र्यदिन. पण तरी पुढची काही वर्ष आपापसातील संघर्षात गेली (ज्याची चिन्हं अजूनही आहेत वातावरणात!) आणि पहिली निवडणूक १९९४ मध्ये झाली. इथं संसदेला National Assembly म्हणतात आणि त्यात २५० सभासद निवडून दिले जातात. बहुपक्षीय व्यवस्था असली तरी सत्ताधारी ‘फ्रेलिमो’च्या (Liberation Front of Mozambique/ Frente de Libertação de Moçambique) तुलनेत ‘रेनामो’ (Mozambique National Resistance/ Resistência Nacional Moçambicana) आणि ‘एमडीएम’ (Democratic Movement of Mozambique/ Movimento Democrático de Moçambique ) वगळता अन्य पक्षांना नगण्य स्थान आहे असे माझे प्रथमदर्शनी मत झाले आहे – जे अनुभवाने बदलू शकते! १५ -१६ वेगवेगळे राजकीय पक्ष असले’ अगदी या निवडणुकीसाठीही तीस राजकीय पक्षांनी नोंद केली आहे - तरीही ही व्यवस्था बहुपक्षीय न वाटता द्विपक्षीय अथवा तीन-पक्षीय वाटते आहे.. राष्ट्राध्यक्ष आणि National Assembly यांच्यासाठी एकाच वेळी मतदान केले जाते. National Election Commission ही स्वतंत्र यंत्रणा निवडणूक घेते आणि प्रचार, मतदान यावर देखरेख करते. ‘तटस्थ निरीक्षक’ म्हणून अनेक युरोपीय देशांचे प्रतिनिधी यावेळच्या निवडणुकीचं निरीक्षण करणार आहेत. घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष देशाचे, सरकारचे आणि सैन्याचे प्रमुख आहेत. (Head of State, Head of Government, Commander in Chief). पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतात. इथे राष्ट्राध्यक्ष थेट मतदारांकडून निवडले जातात; त्यांची मुदत पाच वर्षांची असते. ५०% पेक्षा जास्त मत मिळवणारा उमेदवारच राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास; पहिल्या फेरीत क्रमवारीनुसार पहिल्या आणि दुस-या असणा-या उमेदवारांपैकी एक निवडण्यासाठी फेरमतदान घेतले जाते. राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांनी मतदानाच्या तारखेपूर्वी साठ दिवस आधी Constitutional Council कडे उमेदवारी अर्ज भरावा लागतो. उमेदवारीच्या समर्थनार्थ अर्जावर किमान १०००० मतदार नागरिकांच्या सह्या हव्यात असे बंधन आहे. मतदानाच्या ४५ दिवस आधी प्रचार सुरु होतो – तो १ सप्टेंबरला सुरु झालाय; आणि मतदानाच्या ४८ तास आधी तो संपतो. १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. अर्थात ओळखपत्र वगैरे दाखवून त्याना ‘मतदाता’ म्हणून नोंदणी करावी लागते. इथेही आपल्यासारखा ‘मतदार यादीतून नावं गायब होण्याचा’ प्रकार घडतो का याबद्दल माझ्या मनात कुतूहल आहे; थोड्या दिवसांत याचं उत्तर मिळेलच म्हणा! इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन. २००९ चं चित्र असं आहे: फ्रेलिमो – मिळालेली मते – ७४.६६% जागा – १९१ रेनामो - मिळालेली मते – १७.६८% जागा – ५१ एमडीएम - मिळालेली मते – ३.९३% जागा – ८ सध्याचे राष्ट्राध्यक्ष अर्मांडो गुएब्झा (Armando Guebuza – पोर्तुगीज उच्चार अजून मला नीट जमत नाहीत – त्यामुळे देवनागरी शब्द चुकीचा असल्यास कृपया दुरुस्ती करावी) ‘फ्रेलिमो’ पक्षाचे असून ते २ फेब्रुवारी २००५ पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष केवळ दोन टर्म्स काम करू शकतात, तिस-या वेळी निवडणूक लढवण्यास त्यांना परवानगी नाही. यावेळी ‘फ्रेलिमो’ने फिलीप नूसी (Filipe Nyussi) यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. nyussi 'रेनामो'चे उमेदवार आहेत अफोन्जे दाकामा (Afonso Dhlakama) आणि एमडीएमचे आहेत दिवीस सिमंगो (Daviz Simango). mdm ५ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष अर्मांडो गुएब्झा आणि रेनामोचे अफोन्जे दाकामा यांच्यात एका मोठ्या समारंभात ‘शांती करारावर’ सह्या झाल्या. हा करार का झाला? त्याचं काय महत्त्व? त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, प्रचार कसा चालतो, प्रचाराचे मुख्य मुद्दे काय आहेत ..... अशा काही प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात. या लेखासाठी पुढील संदर्भांचा उपयोग केला आहे: http://africajournalismtheworld.com/ http://www.bbc.com/news/world-africa-13890416 http://www.jornalnoticias.co.mz/ http://www.indexmundi.com/mozambique/government_profile.html
  • मोझाम्बिकची निवडणूक: २

Book traversal links for मोझाम्बिकची निवडणूकः १

  • मोझाम्बिकची निवडणूक: २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
10335 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

लै देश फिरता बॉ तुमी.

जेपी
Sat, 09/13/2014 - 20:01 नवीन
लै देश फिरता बॉ तुमी. आपल्याला परकीय राजकारणाच जास्ती कळत नाय. 'मी पयला ' एवढे बोलुन माझे मोजके शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments

अरे वा ! मोझाम्बिकची

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/13/2014 - 21:40 नवीन
अरे वा ! मोझाम्बिकची चाक्षुर्वेसत्यम माहिती... ती सुद्धा निवडणूकीच्या धामधूमीतली... वाचायला खूप आवडेल !
  • Log in or register to post comments

+१

एस
Sat, 09/13/2014 - 21:52 नवीन
धागा आणि धागाकर्तीचं नाव वाचूनच धागा उघडला. मालिका रंगणार हे नक्की! पुभाप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वाचतेय..

यशोधरा
Sat, 09/13/2014 - 22:49 नवीन
वाचतेय..
  • Log in or register to post comments

जर्मनी

रमेश आठवले
Sat, 09/13/2014 - 22:50 नवीन
--"इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक ‘उमेदवाराला’ मत न देता ‘पक्षाला’ मत देतात. पक्षाला जितकी मते मिळतात त्या प्रमाणानुसार National Assembly मध्ये त्या पक्षाला जागा दिल्या जातात. अर्थात पक्ष उमेदवार आधी जाहीर करतात की कोणते सदस्य National Assembly मध्ये जाणार याबाबत पक्ष निकाल जाहीर झाल्यावर निर्णय घेतो हे मला अजून नीट समजलेलं नाही (भाषेची अडचण!) – मला समजलं की त्याबद्दल इथं लिहीन--" जर्मनी मध्ये वर दिलेल्या पद्धती प्रमाणेच निवडणुका होतात.जर्मनी आपल्या सारखेच federal republic आहे. तेथे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची यादी आधी प्रसिद्ध होते आणि मिळालेल्या मतांच्या आधारावर ज्या जागा मिळतील तेवढ्या जागांवर आधी जाहीर केलेल्या यादीतील अनुक्रमाप्रमाणे पार्टीचे सदस्य निवडून येतात.
  • Log in or register to post comments

या माहितीसाठी धन्यवाद.

आतिवास
Sat, 09/13/2014 - 23:07 नवीन
या माहितीसाठी धन्यवाद. पण मला अजून इथं राष्ट्राध्यक्ष सोडून इतर उमेदवारांची नावं, त्यांचा प्रचार हे काहीच दिसत नाही. त्यामुळे मनात शंका आहे की नावं आधी जाहीर होतात की नंतर. शोध घेतेय, काहीतरी सापडेल त्या दिशेने ही आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

वाचतेय.

कवितानागेश
Sat, 09/13/2014 - 23:41 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments

उत्तम सुरुवात

श्रीरंग_जोशी
Sun, 09/14/2014 - 00:06 नवीन
नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे. पुढच्या भागात अधिक फोटो असल्यास आनंद वाटेल.
  • Log in or register to post comments

अधिक फोटो!

आतिवास
Sun, 09/14/2014 - 14:16 नवीन
प्रयत्न करते; पण शक्यता कमीच दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाचत आहे....

मुक्त विहारि
Sun, 09/14/2014 - 01:24 नवीन
एका नविन (अपरिचित) देशाची उत्तम रित्या ओळख करून द्याल अशी अपेक्षा आहे....
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

प्रचेतस
Sun, 09/14/2014 - 09:38 नवीन
लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

वाचतेय!

आनन्दिता
Sun, 09/14/2014 - 11:08 नवीन
वाचतेय!
  • Log in or register to post comments

पण

काउबॉय
Sun, 09/14/2014 - 15:25 नवीन
तुम्ही तिकडे का गेला आहात ?
  • Log in or register to post comments

हा प्रश्न आहे खरा

आतिवास
Sun, 09/14/2014 - 22:05 नवीन
हा प्रश्न आहे खरा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

वाचतोय !

मदनबाण
Sun, 09/14/2014 - 18:14 नवीन
वाचतोय ! तुम्ही फिरलेल्या देशांची यादी कॄपया इथे द्यावी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू चीझ बडी है मस्त मस्त... ;) { Mohra }
  • Log in or register to post comments

आज स्विडनमध्ये लोकसभेसाठी

शिद
Mon, 09/15/2014 - 03:29 नवीन
आज स्विडनमध्ये लोकसभेसाठी निवडणूक झाली. त्यासंदर्भात अधिक माहीती येथे मिळेल. Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

आतिवास
Mon, 09/15/2014 - 11:59 नवीन
धन्यवाद. या निमित्ताने वेगवेगळ्या व्यवस्था मला समजत आहेत. तुमच्या दुव्याचा आधार घेऊन मी हा दुवा शोधला; पण त्यातून सविस्तर माहिती मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

सुरेख माहिती

सुनील
Mon, 09/15/2014 - 12:13 नवीन
हा भाग आवडला. पुभाप्र. भारतीय पर्यटकांच्या रडारवर सहसा नसलेले देश जसे की जॉर्डन, पेरु, मोझांबिक इत्यादी ठिकाणे पाहिली जाताहेत आणि त्याविषयीची माहिती मराठीत लिहिली जात आहे, हे छानच!
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Mon, 09/15/2014 - 22:08 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा