भुताळी जहाज - ९ - जोयिता

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
21 Aug 2014 - 9:47 am

भुताळी जहाज - १ - इव्हान व्हॅसिली
भुताळी जहाज - २ - यूबी - ६५
भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन
भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी
भुताळी जहाज - ५ - कॅरोल ए. डिअरींग
भुताळी जहाज - ६ - बेकीमो
भुताळी जहाज - ७ - विचक्रॅफ्ट
भुताळी जहाज - ८ - ओरँग मेडान

पृथ्वीवरील सर्वात मोठा समुद्र म्हणजे पॅसिफीक महासागर! उत्तरेला आर्क्टीक महासागर, पश्चिमेला आशिया आणि ऑस्ट्रेलिया, पूर्वेला अमेरीका आणि दक्षिणेला अंटार्क्टीक महासागराच्या दरम्यान पसरलेला अफाट सागर म्हणजे पॅसिफीक! पृत्थ्वीवरील सर्व भूभागांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही जास्त विस्तार असलेला पॅसिफीक महासागर म्हणजे अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टींचा अवाढव्य खजिना आहे! पृथ्वीवरील सर्वात खोल असलेली मरियाना ट्रेंच (गर्ता) ही पॅसिफीकमध्येच आढळून येते. (समुद्रपृष्ठभागापासून १०.९५ किमी खोल!)

रोलँड वेस्ट या हॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकासाठी कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिस इथल्या विल्मींग्टन बोट वर्कस या कंपनीने १९३१ मध्ये २१ मी (६९ फूट) लांबीचं एक याच बांधलं. याचचा मुख्य सांगाडा दोन इंच जाडीच्या उत्कृष्ट प्रतीच्या ओक लाकडांपासून बनवण्यात आला होता. या बोटीला दोन डिझेल इंजिने होती. रोलँड वेस्टने आपल्या गर्लफ्रेंडचं - ज्युवेल कार्मेनचं नाव या बोटीला दिलं..

जोयिता!

जोयिताचा अर्थ छोटे रत्न अथवा माणिक. १९३६ मध्ये मिल्टन बेकनच्या नावाने हे याच नोंदवण्यात आलं.

याच ताब्यात घेतल्यावर वर्षाभरातच वेस्ट आणि कारमेनचं फाटलं! रोलँड वेस्टनेच मग हे याच भाड्याने देण्यास सुरवात केली. मेरी पिकफोर्ड, डग्लस फेअरबँक्स, हंफ्रे बोगार्ट यासारख्या सुपरस्टार मंडळींनी हे जहाज वापरलं. या काळात जहाजाने मेक्सीकोच्या अनेक वार्‍या केल्या. चेस्टर मिल्स हा जहाजाचा कॅप्टन होता. हंफ्रे बोगार्टला हे जहाज विकत घेण्याची इच्छा झाली होती, परंतु या जहाजावरुन सफरीवर गेलेला एक पाहुणा अचानक गायब झाल्यावर त्याचा विचार बदलला.

दुसर्‍या महायुध्दाला सुरवात होताच अमेरीकन सरकारने हे जहाज ताब्यात घेतलं आणि गस्तं घालण्यासाठी त्याचा वापर करण्यास सुरवात केली. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात बचावलं होतं.

दुसर्‍या महायुध्दानंतर लुईस बंधूंनी हे जहाज विकत घेतलं. जहाजाच्या सांगाड्यावर बुरशी धरण्यापासून बचावासाठी रोगणाचा लेप देण्यात आला. त्याचप्रमाणे समुद्रात पकडलेले मासे टिकवून ठेवण्याची लाकडी यंत्रणा (रेफ्रीजरेशन) जहाजावर उभारण्यात आली. मूळच्या दोन डिझेल इंजिनांच्या जोडीला जनरेटर्ससाठी आणखीन दोन इंजिने जहाजावर बसवण्यात आली. १९५२ मध्ये हवाई युनिवर्सिटीच्या कॅथरीन ल्युमेला हिच्याकडे जहाजाची मालकी आल्यावर तिने ते सामोआ बेटावर वास्तव्यास असणारा ब्रिटीश कॅप्टन थॉमस 'डस्टी' मिलर याला चालवण्यास दिलं.

.... आणि जोयिताने आपले रंग दाखवण्यास सुरवात केली!

दुसर्‍या महायुध्दात जनरल डग्लस मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली लढलेल्या दोस्त राष्ट्रांच्या नौसेनेत डस्टी मिलरचा समावेश होता. महायुध्द संपल्यावर दक्षिण पॅसिफीक महासागरातील पॉलीनेशियन बेटांपैकी सामोआ बेटाची राजधानी आपिया इथे तो वास्तव्यास होता. जोयिताचा कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर त्याने आपिया ते टोकेलू बेटांच्या दरम्यान वाहतुकीसाठी आणि मासेमारीसाठी फेर्‍या मारण्यास सुरवात केली.

१९५३ मध्ये जोयिता आपियाहून टोकेलू बेटाच्या मार्गावर होतं. आपिया सोडल्याला काही तास उलटून गेले होते. पहाटेची वेळ असल्यामुळे समुद्रावर सर्वत्र धुक्याचं आवरण पसरलेलं होतं. दृष्यमानता जेमतेम काहीशे फूटांपर्यंतच होती. सागरात दुसर्‍या कोणत्याही जहाजाशी टक्कर होऊ नये म्हणून जोयितावरील खलाशी चौफेर लक्षं ठेवून होते.

जहाजाच्या मागील भागात असलेल्या खलाशाला एक मोठा आकार आपल्या जहाजामागून सरकत असल्याचं दृष्टीस पडलं! धुक्याचा पडदा असल्याने नेमका काय प्रकार असावा हे त्याला कळेना. दहा-पंधरा मिनीटे काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण केल्यावर त्याने ही गोष्ट मिलरच्या निदर्शनास आणली. जहजामागून येणारा तो आकार नेमका कसला असावा याचा मिलर विचार करत असतानाच धुक्याचा पडदा विरळ झाला आणि....

,,,, एखाद्या भुताप्रमाणे एक मोठं जहाज त्यांच्यासमोर उभं ठाकलं!

कॅप्टन मिलरसह सर्वजण ते जहाज पाहून आश्चर्याने थक्कं झाले!

१६ व्या किंवा १७ व्या शतकातील जहाजाप्रमाणे त्या जहाजाची बांधणी केलेली दिसत होती! स्पॅनिश अथवा पोर्तुगीजांची खजिना वाहून नेणारी जहाजं असत त्याच पठडीतील हे जहाज होतं! जहाजावर मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाची कोणतीही खूण दिसत नव्हती, परंतु जहाज आपल्या गतीने जोयिताच्या मागोमाग येतच होतं.

आपल्या मागोमाग येणारं हे जहाज पाहून कॅप्टन मिलर अस्वस्थं झाला. त्या जहाजाला पाठवण्यात आलेल्या रेडीओ संदेशांना कोणतंही प्रत्युत्तर मिळत नव्हतं. स्वतः मिलरने सुकाणू हातात घेतलं आणि त्या जहाजाच्या मार्गातून जोयिता बा़जूला घेण्यास सुरवात केली....

... आणि जोयिताने दिशा बदलताच मागून येणार्‍या त्या जुन्या जहाजानेही दिशा बदलली!

ते जहाज आपल्या मागोमाग येत असलेलं पाहिल्यावर मिलरने त्याच्या मार्गातून बाजूला होण्याचा विचार बदलला आणि शक्यं तितक्या वेगाने जोयिता पळवण्यास सुरवात केली! मात्रं मागच्या जहाजावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ज्या वेगाने जोयिता जात होतं, त्याच वेगाने ठराविक अंतरावरुन ते जहाज मागोमाग येत होतं!

पाठशिवणीचा हा खेळ सुमारे तासभर सुरु राहीला!

हळूहळू विरळ होत धुकं पूर्णपणे नाहीसं झालं. मोकळ्या हवेत पोहोचल्यावर त्या जहाजाचं नीट निरीक्षण करण्याच्या दृष्टीने कॅप्टन मिलरने जोयिताचा वेग कमी केला आणि मागे नजर टाकताच त्याला दुसरा धक्का बसला.

जेमतेम पाव मैल अंतरावरुन जोयितापाठोपाठ येणार्‍या त्या जहाजाचा कुठेही मागमूस नव्हता!
दुर्बिणीतून पाहील्यावर दूर क्षितीजापर्यंत त्या जहाजाच्या अस्तित्वाची कोणतीही खूण आढळून आली नाही!

टोकेलू बेटावर पोहोचल्यावर मिलरने आपल्या सर्व खलाशांना एकत्रं केलं आणि त्यांना विचारलं,

"जुन्या काळातली.. खजिना वाहून नेणारी जहाजं कशी दिसत होती याची तुम्हांला कल्पना आहे काय? आपल्यामागे लागलेलं ते जहाज त्या काळातल्या जहाजांप्रमाणेच दिसत होतं!"

मिलरच्या प्रश्नाला सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं. जोयितावरील कोणालाही जुन्या जहाजांविषयी फारशी माहीती नव्हती.

टोकेलूवरुन परतीच्या वाटेवर असताना मात्रं पुन्हा ते जहाज कोणाच्या दृष्टीस पडलं नाही!

आपल्या डायरीत मिलरने नोंद केली,
"जुन्या काळातल्या स्पॅनिश किंवा पोर्तुगीज जहाजांप्रमाणे दिसणारं ते जहाज आमच्या मागे का आलं होतं याची काहीच कल्पना करता येत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाने ते जहाज पाहीलं होतं. मात्रं विचार करूनही नंतर अचानक ते कुठे गडप झालं याचा कोणालाच उलगडा झाला नाही!"

मिलर पुढे म्हणतो,
"हे प्राचीन काळातलं जहाज दिसणं जरी विस्मयकारक असलं तरी जोयितावर आलेले इतर अनुभव पाहता फारसं नवलाचं नव्हतं! माझ्या केबिनमध्ये बंकरवर झोपलेलो असताना माझ्याबाजूला सतत कोणीतरी वावरत असल्याचा मला भास होतो. कधी कधी आमच्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाला एका स्त्रीच्या हसण्याचा स्पष्ट आवाज ऐकू येतो! भर उन्हाळ्यातल्या रात्री येणारी थंड हवेची अनैसर्गीक झुळूक आसपास कोणाच्यातरी अस्तित्वाची चुणूक दाखवून देत असते!"

३ ऑक्टोबर १९५५ ला पहाटे ५.०० वाजता जोयिताने आपिया बंदर सोडलं आणि टोकेलू बेटाची वाट पकडली. कॅप्टन डस्टी मिलर आणि फर्स्ट मेट चार्ल्स सिंप्सनसह सोळा खलाशी आणि नऊ प्रवासी अशी एकूण २५ माणसं जहाजावर होती. प्रवाशांमध्ये दुसर्‍या महायुध्दात लष्करात काम केलेला डॉक्टर आल्फ्रेड पार्सन्स याचा समावेश होता. जहाजावर टोकेलू बेटावर नेण्यात येत असलेली अन्नसामग्री आणि औषधं अशी एकूण २० टन सामग्री भरलेली होती. त्याखेरीज प्रत्येकी ४५ गॅलन (२०० लीटर) क्षमतेचे ८० रिकामे ड्रम जहाजावर होते. विल्यम्स या प्रवाशाजवळ ५० पौंड चांदी होती. परतीच्या वाटेवर जोयिता नारळ भरुन येणार होतं.

आपिया बंदरातून निघण्यापूर्वी जहाजाच्या एका इंजिनाचा क्लच नादुरुस्तं झाला होता. मात्रं आपियाहून निघण्यास उशीर करण्याऐवजी टोकेलूच्या मार्गाला लागल्यावर समुद्रावर असताना क्लच दुरुस्तं करण्याचा कॅप्टन मिलरने निर्णय घेतला. एका इंजिनासाह त्याने आपिया बंदर सोडलं. टोकेलू पर्यंतच्या प्रवासाला ४२ ते ४८ तास लागू शकत होते. ५ ऑक्टोबरपर्यंत जोयिता टोकेलूतील फाक्फो बंदरावर पोहोचेल अशी अपेक्षा होती.

६ ऑक्टोबरला फक्फो इथून संदेश आला. जोयिता अद्याप टोकेलू बेटावर पोहोचलं नसल्याचं संदेशात म्हटलं होतं. जहाजावरुन कोणताही धोक्याचा संदेश आलेला नव्हता.

जोयिता टोकेलू इथे पोहोचलं नाही हे स्पष्ट झाल्यावर एकच गोंधळ उडाला. जहाजाचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली. अनेक वेगवेगळ्या जहाजांनी आणि रॉयल न्यूझीलंड एअरफोर्सच्या विमानांनी १२ ऑक्टोबरपर्यंत सुमारे १ लाख चौरस मैलांच्या प्रदेशात कसून शोध घेतला. परंतु जोयिता किंवा एकाही माणसाची कोणतीही खूण अथवा अवशेष आढळून आले नाहीत. अखेर काही अज्ञात कारणाने जहाज बुडालं असावं असा निष्कर्ष काढण्यात आला.

१० नोव्हेंबरला तुवालू हे जहाज फिजी बेटांतील सुवा इथून निघालं होतं. कॅप्टन जेराल्ड डग्लस या जहाजाचा कॅप्टन होता. पॅसिफीकमध्ये पसरलेल्या बेटांवरील मालवाहतूकीवर तुवालूची नेमणूक झाली होती. सुवा इथून निघाल्यावर व्हानुआ लेऊ बेटाच्या उत्तरेला दूर अंतरावर पाण्यात अर्धवट बुडालेलं एक जहाज कॅप्टन डग्लसच्या दृष्टीस पडलं. जवळ जाऊन पाहील्यावर तुवालूवरील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला...

जोयिता!

Starboard
पाण्यात अर्धवट बुडालेलं जोयिता

आपल्या मूळ मार्गापासून सुमारे ६०० मैल (१००० किमी.) भरकटलेलं जोयिता पाहताच तुवालूवरील सर्वजण चकीत झाले. जोयिता डाव्या बाजूने पाण्यात कलंडलेलं होतं. जहाजाच्या अर्ध्या भागात पाणी शिरलं होतं. परंतु तरीही ते बुडालेलं नव्हतं!

Port

कॅप्टन जेराल्ड डग्लस आणि तुवालूवरील काही खलाशी जोयितावर चढले. जहाजावर पूर्ण फेरी मारल्यावर ते संपूर्ण रिकामं आहे असं त्यांना आढळून आलं.

जहाजावरील २५ माणसांपैकी एकाचंही नामोनिशाण दिसून येत नव्हतं!

जोयिताची डावी बाजू पूर्णपणे पाण्यात होती. खेकड्यासारख्या जलचरांच्या अस्तित्वावरुन जहाजाचा तो भाग बराच काळ पाण्याखाली असावा असा निष्कर्ष काढता येत होता. जहाजाच्या वरच्या भागाचं बरंचसं नुकसान झालेलं होतं. डेकवरील केबिनची काच फुटली होती. केबिनच्या वर कॅनव्हासचं आच्छादन घातलेलं दिसून येत होतं. जहाजाच्या पुढील भागातलं इंजिन दोन गाद्यांनी झाकून टाकण्यात आलेलं होतं! मागील बाजूच्या इंजिनाचा क्लच अद्यापही नादुरुस्तंच होता. एका फळीवर पाणी उपसणारा पंप ठेवण्यात आलेला होता. परंतु तो चालू नव्हता.

जहाजावरील रेडीओ २१८२ किलो हर्ट्झला ट्यून केलेला आढळला. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार जहाज संकटात सापडल्याचा संदेश देण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते. परंतु रेडीओचं बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्वाची वायर तुटली असल्याचं निदर्शनास आलं! ही वायर तुटल्याचं लपवण्यासाठी त्यावर रंग फासण्यात आला होता! त्यामुळे रेडीओची रेंज जेमतेम दोन मैल एवढीच उरली होती!

जहाजावरील घड्याळ १० वाजून २५ मिनीटे झाल्याचं दर्शवत होतं. जहाजावरील सर्व दिव्यांची बटणं चालू अवस्थेत आढळली होती. त्यावरुन जे काही झालं ते रात्री झालं असावं असा निष्कर्ष काढता येत होता. जहाजावरील लॉगबुक, सेक्स्टंट, क्रोनोमीटर आणि इतर सर्व दिशादर्शक सामग्री नाहीशी झालेली दिसून येत होती. त्याखेरीज कॅप्टन डस्टी मिलरची बंदूकही दिसून येत नव्हती!

डेकवर डॉक्टरची एक बॅग आढळून आली! या बॅगेत स्टेथोस्कोप, एक स्काल्पेल आणि रक्ताने भरलेली चार मोठी बँडेजेस आढळली!

जोयिताच्या इंधनांच्या टाक्यांमध्ये अद्याप डिझेल शिल्लक होतं. वापरल्या गेलेल्या डिझेलवरुन जहाजाने सुमारे २४३ मैल (३९१ किमी) प्रवास केल्याचं दिसून येत होतं. जोयिताने पूर्वनियोजित मार्गाने प्रवास केला असल्यास टोकेलू बेटापासून सुमारे ५० मैल अंतरावर असताना इंजिन बंद झालं होतं!

Route
जोयिताचा पूर्वनियोजित मार्ग आणि भरकटलेली जागा

कॅप्टन जेराल्ड डग्लसने फिजीतील सुवा इथल्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून जोयिताची सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. नादुरुस्त अवस्थेतील जहाज समुद्रावर तसंच भरकटत राहीलं असतं तर त्या भागातून जा-ये करणार्‍या इतर जहाजांना ते धोकादायक ठरणार होतं.

कॅप्टन डग्लसने जोयिता ओढत सुवा इथे आणलं. फिजी अधिकार्‍यांनी त्याचा ताबा घेतला.

जहाजाच्या तळातील भागात पाणी साचलं होतं. जहाजचं इंजिन थंड राखण्याच्या प्रणालीत बिघाड झालेला आढळून आला. या मुळेच जहाजाच्या तळात पाणी भरलं होतं. मात्रं इंजिनरुममध्ये पाणी भरेपर्यंत खलाशांना जहाजात पाणी शिरल्याचा अंदाज येणं शक्यं नव्हतं. एकदा इंजिनरुममध्ये पाणी भरण्यात सुरवात झाल्यावर मग पाणी आत येण्याची नेमकी जागा शोधणं हे अशक्यंच होतं. जहाजाच्या तळघरातील पंपाची एक झडप कचरा अडकल्यामुळे बिघडली होती. त्यामुळे पंपाने पाणी उपसणं अशक्यंच झालं होतं. जहाजावरील २० टन मालापैकी ४ टन माल गायब झाल्याचं आढळून आलं.

जोयितावरील २५ माणसांचं नेमकं काय झालं होतं?

जहाजावर असलेले तीन लाईफ रॅफ्ट्स गायब झालेले होते. त्या रॅफ्ट्सवर गर्दी करुन सर्वांनी जहाज सोडलं होतं का?

जोयिता कधीही बुडू शकणार नाही असं ते बांधणारे सांगत होते. त्यांचा हा दावा खरा असल्याचं सप्रमाण सिध्दं झालं होतं. जहाजामध्ये पाणी भरल्यावरही ते बुडालं नव्हतं. त्याच्या बांधणीत उत्कृष्ट प्रतिच्या लाकडाचा वापर करण्यात आला होता. जहाजाच्या संपूर्ण सांगाड्यावर बुचाचा थर देण्यात आला होता. त्यामुळे तर जहाज बुडणं अशक्यंच होतं. प्रत्येकी २०० लीटरच्या ८० रिकाम्या ड्रम्समुळे तर जहाजाला आणखीनच सुरक्षा कवच मिळालं होतं.

जोयितावरील २५ माणसांचा कधीही तपास लागला नाही!

Bert
फार्मसिस्ट बर्ट हॉजकिन्सन

**********************************************************************************************

जोयिताचा उल्लेख अनेकदा दक्षिण पॅसिफीकमधील मेरी सेलेस्टी असा केला जातो. मेरी सेलेस्टीप्रमाणेच जोयितावरील सर्व माणसे गायब झाल्यामुळे अशी तुलना अपरिहार्य असली तरी मेरी सेलेस्टी पेक्षा जोयिताचे रहस्य निश्चितच गडद आहे. मेरी सेलेस्टीच्या काळात संपर्काची माध्यमे अपुरी होती. परंतु जोयिताच्या काळात रेडीओचा शोध लागलेला होता. संदेशवहनाची सोय होती, मात्रं असं असतानाही २५ माणसांच्या गायब होण्यामागे नेमकं कोणतं कारण असावं याचा पत्ता लागत नाही हे आश्चर्यंच होतं.

जोयितावरील माणसांच्या गायब होण्यामागे नेमकं काय कारण असावं याविषयी अनेक तर्क मांडण्यात आले.

कॅप्टन डस्टी मिलरला जोयिताच्या रचनेची संपूर्ण कल्पना होती. जहाज बुडणार नाही याची त्याला पक्की खात्री असल्याने त्याने लाईफ रॅफ्टवरुन जहाज सोडण्याचा मार्ग कधीच पत्करला नसता. एका तर्कानुसार काही कारणाने कॅप्टन मिलर जखमी अथवा मरण पावला असावा. जहाजाता पाणी भरू लागल्यावर इतरांमध्ये घबराट उडाल्याने त्यांनी लाईफ रॅफ्टवरुन घाईघाईने कॅप्टन मिलरसह जहाज सोडलं असावं. उघड्या तराफ्यांवर खुल्या पॅसिफीकमध्ये त्यांचा निभाव लागला नसावा.

कॅप्टन मिलरचा मित्र कॅप्टन ब्राऊनच्या मते मिलर शुध्दीवर असेपर्यंत जोयिता सोडणं अशक्यं होतं! मिलर आणि फर्स्ट मेट चक् सिम्प्सन यांच्यातील बेबनावाची ब्राऊनला कल्पना होती. दोघांचा वाद गुद्दा-गुद्दीवर आला असावा आणि तोल जाऊन दोघंही समुद्रात कोसळले असावे असा त्याचा कयास होता. कॅप्टन किंवा फर्स्ट मेट नसल्याने जहाजात पाणी शिरण्यास सुरवात झाल्यावर सर्वांनी भेदरुन जावून लाईफ रॅफ्टवरुन जहाज सोडलं असावं.

फिजी टाईम्स आणि हेराल्ड यांनी एक निराळाच तर्क मांडला. या तर्कानुसार जोयिता जपानी नौकांच्या तांड्यात शिरली असावी. जपानी नौसेनेचं एखादं महत्वाचं रहस्यं नकळतपणे जोयितासमोर उघडं झाल्यावर ते लपविण्यासाठी जपान्यांनी सर्वांची कत्तल करून प्रेतं समुद्रात बुडवून टाकली! लंडनच्या डेली टेलीग्राफच्या मते अद्यापही कार्यरत असलेल्या दुसर्‍या महायुध्दातील जपानी तुकडीच्या सैनिकांनी जोयितावरील माणसांचा बळी घेतला होता. त्याकाळी शीतयुध्द सुरू असल्याने रशियन पाणबुडीने सर्वांचं अपहरण केलं असावं असाही भन्नाट तर्क मांडण्यात आला! उडत्या तब़कड्यांवर विश्वास असणार्‍यांनी तर हा त्याचाच प्रकार असावा असं छातीठोकपणे प्रतिपादन केलं!

पॅसिफीकमध्ये कार्यरत असणार्‍या सागरी चाचांनी जहाजाचा ताबा घेऊन सर्वांची हत्या केली असाही एक तर्क मांडण्यात आला. त्याचप्रमाणे जहाजाच्या इंशुरन्सचा पैसा मिळवण्यासाठी कॅप्टन मिलरनेच ते बुडवण्याचा प्रयत्न केला असंही मत व्यक्तं करण्यात आलं.

जोयितावर अनेक वर्ष संशोधन करणारा रॉबिन मॉगनने वेगळाच मुद्दा मांडला. त्याच्या तर्कानुसार तळघरापासून पाणी भरण्यास सुरवात झाल्यावर आणि पंप नादुरुस्तं झाल्यावर पुढील इंजिनमध्ये पाणी जाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर गाद्या टाकण्यात आल्या असाव्या. याच दरम्यान हवामानाही बिघडलं असावं आणि जोयिता मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडण्यास सुरवात झाली असावी.

डस्टी मिलरला जहाज बुडू शकणार नाही याची पक्की खात्री असल्याने त्याने त्याही परिस्थितीत टोकेलूच्या दिशेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असावा. परंतु फर्स्ट मेट सिंप्सन आणि इतरांनी त्याला विरोध दर्शवला असावा. मिलरला न जुमानता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला असावा. मिलर आणि सिंप्सन यांच्यातील संघर्षात मिलर जखमी अथवा मृत झाला असावा. एव्हाना जहाजात पाणी भरण्यास सुरवात झाल्यामुळे सिम्प्सन आणि इतरांनी लाईफ रॅफ्टवर गर्दी करुन जहाज सोडलं असावं. मिलरलाही त्यांनी आपल्यासोबत घेतलं असावं. जवळच दिसलेल्या एका बेटावर जाण्याचा त्यांचा इरादा असावा, मात्रं जहाज सोडल्यावर खुल्या समुद्रात उघड्या तराफ्यावर कोणाचाही निभाव लागला नसावा.

या सर्व तर्कांचा विचार करता काही प्रश्नांची उत्तरं मात्रं मिळत नाहीत.

डेकवरील डॉक्टरच्या बॅगमध्ये रक्ताने भरलेली बँडेजेस आढळून आली होती. याचा अर्थ कोणीतरी नक्की गंभीर जखमी झालं होतं. परंतु नेमकं कोण असावं?

जहाजावरील २० टन सामग्रीपैकी केवळ ४ टन सामग्रीच गायब होती. समुद्रीचाचांनी जहाज लुटलं असं मानलं, तर त्यांनी संपूर्ण २० टन सामग्री लुटून नेली असती. जपानी अथवा रशियन सैनिकांनी जोयितावरील माणसांची हत्या केली असती तर त्यांना लुटालूट करण्याची काहीच गरज नव्हती. दुसर्‍या बाजूने विचार केला तर सर्व २० टन सामग्री लुटणं शक्य असताना केवळ ४ टन सामग्रीवर जपानी अथवा रशियनांनी समाधान मानलं नसतं. सर्वांची हत्या केली गेली असल्यास जहाजावरील लाईफ रॅफ्ट्स कसे गायब झाले?

समजा २५ जणांनी लाईफ रॅफ्टवरुन खरंच जहाज सोडलं असलं, तरी चार टन सामान रॅफ्टवरुन कसं नेलं असतं ? विल्यम्सजवळ असलेली ५० पौंड चांदीही रॅफ्टच्या दृष्टीने विचार करता अनावश्यक वजन होतं, अशा परिस्थितीत ४ टन सामग्री रॅफ्टवरुन नेणं ही निव्वळ अशक्यं कोटीतली गोष्ट होती.

चक् सिम्प्सन आणि इतर खलाशांनी बंड करुन मिलरला पदच्युत केल्यानंतरही लाईफ रॅफ्टवरुन जहाज सोडण्याची शक्यता खूप कमी वाटते. मिलरबरोबर असलेले खलाशी अनेक सफरीत त्याच्याबरोबर वावरलेले होते. त्यांच्यापैकी अनेकांना जोयिता बुडू शकणार नाही याची पूर्ण कल्पना होती. अशा परिस्थितीत ते जहाजावरुन बाहेर पडणं सहज शक्यं वाटत नाही.

जोयितावरील २५ माणसांचं नेमकं काय झालं हे कधीही न उलगडणारं रहस्यं पॅसिफीकने आपल्या उदरात कायमचं दडवून ठेव्लं आहे!

**********************************************************************************************
संदर्भ :-

The Devil's Triangle - रिचर्ड वायनर
Ghost Ships - रिचर्ड वायनर
The Joyita Mystery - रॉबिन मॉगन
Without Trace: the Last Voyages of Eight Ships - जॉन हॅरीस
The Marie Céleste of the South Pacific (Joyita) - स्टीफन नोक्स
World's Greatest Mysteries - जॉन पिंक्नी

कथालेख

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

21 Aug 2014 - 10:23 am | सुहास झेले

अद्भूत.... काही प्रसंग खरंच कुठल्याही आकलनशक्ती पलीकडचे असतात.. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2014 - 10:33 am | प्रमोद देर्देकर

हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या.
बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

आवडला. लगे रहो!

माधुरी विनायक's picture

21 Aug 2014 - 11:47 am | माधुरी विनायक

अनंत सामंतांच्या एम.टी. आयवा मारूची आठवण येते, तुमच्या जहाजकथा वाचून. भन्नाट अनुभव...

प्रत्यक्षात जाऊ देत पण मी स्वप्नातही बोटीत बसणार नाही आता! मरो त्या सागरी सफरी!

अजया's picture

21 Aug 2014 - 2:00 pm | अजया

रेवाक्काशी बाडीस!!

सगळं एकत्र केलं तर चांगलं पुस्तक निघेल या वर.
मनावर घ्या.

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2014 - 2:36 pm | प्रमोद देर्देकर

गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना.
ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला.
त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

मुक्त विहारि's picture

21 Aug 2014 - 2:55 pm | मुक्त विहारि

बादवे...

ह्या कथांत पण आपली भारतीय जहाजे मागेच दिसत आहेत.

कदाचित इथली भूते सागराला घाबरत असावीत...

समुद्र उल्लंघनाला मज्जाव होता ना! त्यामुळं धर्म बुडेल वगैरे भीती असणार.... भुतांना ;)

मुक्त विहारि's picture

21 Aug 2014 - 8:15 pm | मुक्त विहारि

आयला...

हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो.

असो,

कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.

जावूदे,

ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको.

जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

टवाळ कार्टा's picture

21 Aug 2014 - 8:54 pm | टवाळ कार्टा

कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.

सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

कवितानागेश's picture

21 Aug 2014 - 4:45 pm | कवितानागेश

भारी गोष्ट!

एस's picture

21 Aug 2014 - 7:08 pm | एस

स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-)

* असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Aug 2014 - 10:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही.

पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

एस's picture

22 Aug 2014 - 1:33 pm | एस

आपण त्यांना शिंगावर घेऊ. स्पार्टाकस, तुम्हांला भरपूर पाठिंबा आहे इथे. आता मनावर घ्याच. :-)

त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.

सहमत.

मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा's picture

21 Aug 2014 - 11:06 pm | पैसा

मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2014 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचला हाही भाग.

-दिलीप बिरुटे