अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा!
खात्री असणार्यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून आणि शास्त्रीय पुराव्यानिशी सिध्द करुन घेण्यावर त्यांचा भर असतो.
परंतु अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून कोणी चक्कं भुतांचा फोटो काढला तर??
१९२४ सालच्या डिसेंबर महिन्यात वॉटरटाऊन या जहाजाने न्यूयॉर्क बंदरातून कॅलिफोर्नियाची वाट धरली होती. वॉटरटाऊन हे तेलाची वाहतूक करणारं - ऑईल टॅंकर - जहाज होतं. न्यूयॉर्कमधून अटलांटीक महासागरातून पनाम कालवा ओलांडून पॅसिफीक मध्ये प्रवेश करणं आणि कॅलिफोर्नियाचा पश्चिम किनारा गाठणं असा जहाजाचा नियोजीत प्रवासमार्ग होता.
एस्. एस्. वॉटरटाऊन
४ डिसेंबर रोजी एका साठवण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी जेम्स कर्टनी आणि मायकेल मिहान हे खलाशी टाक्यात उतरले होते. त्यांच्या दुर्दैवाने टाक्यातून अनपेक्षीतपणे झालेल्या वायुच्या गळतीमुळे टाक्यातील तेलाने पेट घेतला. कर्टनी आणि मिहान यांना टाक्यातून बाहेर पडण्याचा बराच प्रत्यत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही. टाक्यातच होरपळून दोघांचाही मृत्यू झाला. तत्कालीन प्रथेप्रमाणे दोघांनाही समुद्रात जलसमाधी देण्यात आली आणि जहाज पुढे निघालं.
सर्व जहाजावर कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूमुळे दु:खाची छाया पसरलेली होती.
लवकरच या छायेचं भीतीमध्ये रुपांतर झालं.
दुसर्या दिवशी जहाजावरील टेहळ्याला समुद्रात दूरवर काही अंतरावर पोहत असणारी दोन माणसं दिसली. त्याने ताबडतोब कॅप्टन कीथ ट्रेसी याचं तिकडे लक्षं वेधलं. भर समुद्रात पोहत असलेल्या या दोघांना पाहून कॅप्टन ट्रेसी बुचकळ्यात पडला. त्यांना काही मदत हवी आहे का हे पहावं या हेतूने त्याने आपलं जहाज त्यांच्या दिशेला वळवलं. काही अंतर त्या दोघांजवळ जाताच जहाजावरील सर्वांना जबरदस्तं धक्का बसला!
"माय गॉड! हे तर कर्टनी आणि मिहान आहेत!" कॅप्टन ट्रेसी न राहवून ओरडला.
काही काळ एका लयबध्द गतीने जहाजाला समांतर पोहत राहील्यावर कर्टनी आणि मिहान अचानकपणे दिसेनासे झाले!
जहाजावरील कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण जे पाहीलं ते सत्यं की स्वप्नं असा कॅप्टन ट्रेसीसह सर्वांना प्रश्न पडला होता.
सुरवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर कॅप्टन ट्रेसीने या घटनेची जहाजाच्या लॉगबुकमध्ये सविस्तर नोंद केली. कॅप्टनच्या हकीकतीवर साक्षीदार म्हणून जहाजावरील सर्वांनी सह्या केल्या होत्या.
दुसर्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तासाभराने कर्टनी आणि मिहान पुन्हा जहाजाच्या बाजूला प्रगटले! टेहळ्याने कॅप्टनच्या कानावर ही गोष्टं घातल्यावर सर्वजण पुन्हा डेकवर जमा झाले. यावेळीही आदल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. काही काळ जहाजाला समांतर पोहून झाल्यावर दोघंही अदृष्यं झाले!
"दिवसाच्या कोणत्याही वेळेला ते जहाजाच्या बाजूने पोहताना दिसत असंत!" कॅप्टन ट्रेसीने लॉगबुकात नोंद केली, "जहाजाचा वेग कितीही कमी-जास्तं झाला तरी ते त्या वेगाने जहाजाला समांतर पोहत असत! मात्रं जहाजापासून एका ठराविक अंतरावरुन त्यांचा हा पोहण्याचा कार्यक्रम चालत असे. जहाजाच्या जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्नं केला नाही. समुद्रात उतरुन त्यांच्या जवळ जाऊन तपास करण्याची आमच्यापैकी कोणापाशीही हिंमत नव्हती!"
कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या प्रगट होण्याच्या आणि अदृष्य होण्याच्या प्रत्येक वेळेची काळजीपूर्वक नोंद लॉगबुकमध्ये करुन ठेवली होती. आपल्या सर्व सहकार्यांच्या त्यावर सह्या घेण्यास तो विसरला नाही.
अटलांटीक महासागरातून जहाजाने पनामा कालव्यात प्रवेश केला आणि कर्टनी आणि मिहान एकदम गायब झाले!
पनामा कालव्यातून बाहेर पडून जहाज कॅलिफोर्नियाला पोहोचलं. कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूचा आणि 'पुनरागमना'चा तपशीलवार रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना केला. सुरवातीला कंपनीच्या अधिकार्यांचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. अत्यंत संशयाने ते या सर्व प्रकाराकडे पाहत होते. परंतु जहाजाच्या लॉगबुकमधील नोंदी पाहिल्यावर आणि इतर खलाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी परतीच्या वाटेवर कर्टनी आणि मिहान पुन्हा दिसून आल्यास कॅप्टन ट्रेसीने त्यांचा फोटो काढावा अशी सूचना केली! त्यासाठी ट्रेसीला एक कॅमेरा आणि फिल्मही देण्यात आली.
वॉटरटाऊन जहाजाने कॅलिफोर्निया सोडलं आणि न्यूयॉर्कच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. अमेरिकेच्या पश्चिम किनार्याने दक्षिणेला येत त्यांनी पनामा कालवा गाठला आणि अटलांटीकमध्ये प्रवेश केला.
अटलांटीक महासागरात जहाज शिरताच दुसर्याच दिवशी कर्टनी-मिहान जहाजाशेजारी हजर झाले! जहाजाला समांतर पोहत राहण्याचा त्यांचा शिरस्ता पुन्हा सुरु झाला!
एक दिवस फोटो घेण्याइतका स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागताच कॅप्टन ट्रेसीने जहाजाच्या तिजोरीत ठेवलेला आपला कॅमेरा बाहेर काढला. तो एक साधा बॉक्स कॅमेरा होता. जहाजाला समांतर पोहणार्या कर्टनी आणि मिहान यांच्यावर कॅमेरा रोखून कॅप्टन ट्रेसीने एकापाठोपाठ एक सहा फोटो काढले. फिल्म संपताच कॅमेरा पुन्हा जहाजाच्या तिजोरीत ठेवून त्यावर सील करण्यात आलं. कॅप्टन ट्रेसीने आपल्या लॉगबुकात तशी नोंद करुन ठेवली.
कॅप्टन ट्रेसीने फोटो काढल्यानंतरही काही दिवस कर्टनी आणि मिहान यांचं जहाजाच्या बाजूने पोहण्याचं सत्रं सुरूच राहीलं. समुद्राच्या ज्या भागात त्यांचा मृत्यू झाला होता, तो भाग ओलांडून जहाज उत्तरेला निघाल्यावर मात्रं ते दोघं पुन्हा कोणाच्याही नजरेस पडले नाहीत!
यशावकाश जहाजाने न्यूयॉर्क गाठलं. बंदरात पोहोचताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीसांच्या साक्षीने जहाजाच्या तिजोरीचं सील उघडण्यात आलं आणि आतला कॅमेरा आणि फिल्म प्रोसेस करण्यासाठी एका स्टुडीओत नेण्यात आली!
स्टुडीओत कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि कॅप्टन ट्रेसी अस्वस्थंपणे वाट पाहत बसले होते. एकेक फोटो धुवून झाला की तत्काळ पाहीला जात होता.
पहिले दोन फोटो हलले होते. त्यात काहीच दिसत नव्हतं!
तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या फोटोत समुद्राच्या लाटाच दिसत होत्या!
सहावा फोटो धुतला गेला!
तो पाहिल्यावर मात्रं कॅप्टन ट्रेसीने सुटकेचा नि:श्वास टाकला. तर कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आश्चर्याने थक्कं झाले होते.
सहाव्या फोटोत जहाजाजवळ पोहोणार्या दोघांची डोकी स्पष्टं दिसत होती!
हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच प्रचंड खळबळ उडाली. कर्टनी आणि मिहान यांच्या नातेवाईकांनी, मित्र-मंडळींनी आणि त्यांच्या अनेक जुन्या सहकार्यांनी फोटोवरुन दोघांना ओळखलं!
स्टुडीओमध्ये आणि एका शास्त्रीय प्रयोगशाळेत कॅमेरा आणि फोटोंच्या निगेटीव्हची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. सर्व तपासणी आणि विविध चाचण्यांनंतर फोटोच्या अस्सलपणाची सर्वांची खात्री पटली.
सागरावरील या अभूतपूर्व घटनेचं कोणतंही शास्त्रीय स्पष्टीकरण देणं कोणालाही शक्यं झालं नाही!
कर्टनी आणि मिहान
( टीप : वॉटरटाऊन जहाजावरील या घटनेबद्दल पुढे अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या. हा फोटो खोटा असल्याचे अनेकांनी दावे केले. परंतु तसा निर्णायक पुरावा कोणालाच देता आला नाही. ही जुनी निगेटीव्ह आता नष्टं झाल्याने त्यावर नव्याने शास्त्रीय संशोधन होणं आता अशक्यं आहे. )
*****************************************************************************************************
संदर्भ :-
The Ghost Tale - डग्लस मॅफर्ड
Ghost Ships - टी. ड्युप्लेन
Ocean Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
प्रतिक्रिया
10 Aug 2014 - 9:49 pm | मुक्त विहारि
जबरा...
10 Aug 2014 - 10:18 pm | खटपट्या
मस्त !!!
अजुन येवुद्या !!!
10 Aug 2014 - 10:47 pm | किसन शिंदे
बाब्बौ!! आता नाईट शिफ्ट्ला ऑफिसात आलोय नि लागोपाठ हे तिनही भाग वाचून काढले. लय भ्या वाटतंय. ;)
11 Aug 2014 - 7:34 am | अजया
मला बी भ्या वाटतंय .....
11 Aug 2014 - 10:22 am | भिंगरी
भारतीय कप्तानांना असा अनुभव आला असेल का?
त्यांचे काही अनुभव असतील तर तेही येवु द्या.
11 Aug 2014 - 11:15 am | कवितानागेश
बरं झालं काल रात्री हे काही वाचलं नाही. :)
11 Aug 2014 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरा !
-दिलीप बिरुटे
11 Aug 2014 - 12:01 pm | योगी९००
विजय देवधर यांनी Ocean Triangle या पुस्तकाचे अनूवादन केले आहे तेव्हा त्यांचे नाव सुद्धा संदर्भात यावे.
बाकी डाव्या बाजूचे भूत थोडेफार चार्ली चॅपलीन (आणि हिटलर ) यांच्या सारखे दिसते...!!
11 Aug 2014 - 12:06 pm | स्पार्टाकस
ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे देवधरांचे नाही. हे पुस्तक रिचर्ड वायनरचे डेव्हील्स ट्रँगल आणि चार्ल्स बार्लीत्झच्या ओशन ट्रँगल पुस्तकाचे एकत्र भाषांतर / संपादन आहे.
11 Aug 2014 - 12:20 pm | योगी९००
थोडा घोळ झाला... ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे. विजय देवधरांचे "बर्मुडा ट्रॅंगल" आहे...त्यात हा किस्सा (फोटोसकट) वाचला होता.
11 Aug 2014 - 12:13 pm | एस
वाचतोय. बाकी ही भूतछायाचित्रणकला म्हणजे शुद्ध फेकूपणा असतो हो! ;-) जाऊ द्या! पुढचा भाग आने दो!
11 Aug 2014 - 12:52 pm | मंदार दिलीप जोशी
थरारक !
चौथ्या भागाच्या प्रतीक्षेत
11 Aug 2014 - 3:16 pm | सविता००१
पण भीती वाटते वचून झाल्यावर. वाचताना मस्त वाटतं!
11 Aug 2014 - 5:35 pm | नन्दादीप
पु. भा. ल. टा.
11 Aug 2014 - 5:41 pm | रघुपती.राज
पुढचा भाग आने दो
12 Aug 2014 - 9:21 am | इशा१२३
आधिचेहि भाग वाचले...मी एकूणच भुत कथांना घाबरते..पण सविताने लिहिलय तसच ..वाचताना मजा येतिये..
पु.भा.प्र.
15 Aug 2014 - 10:39 am | स्पंदना
अजुन एक भाग वाचायचा आहे.
15 Aug 2014 - 2:19 pm | पैसा
जाम मजा येतेय वाचायला!