चित्रवीणा

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
10 Jul 2014 - 9:29 am

बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला.

कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं.

एकेक कविता वाचायला घेतली. तीन आठवडे केवळ बाकीबाब मनात तरंगत होते. किती अफाट लिहिलंय या माणसानं !

निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !

बोरकरांच्या निसर्गकविता हा अतिशय चित्रदर्शी अनुभव असतो. गोव्याच्या समुद्रासारखी लखलखणारी त्यांची निसर्ग कविता कधी कधी आपला अत्यंत व्यक्तिगत अनुभव बनून जाते.

चित्रवीणा या कवितेचा ठसा मनावर अमीट आहे.

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

एका साध्या भिंतीचे वर्णन कवीच्या लेखनीतून येताना

जिकडेतिकडे गवत बागडे
कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होऊनी अनावर... ! असा साज लेवून येते.
कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांग
पूर्वेला राऊळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे ....

गोव्याचा निसर्ग हा बोरकरांच्या कवितेचा श्वास आहे. तिथला समुद्र कधी सखा होऊन येतो तर कधी लेकरू. गोव्याच्या समुद्राला बिलोरी आरशाची उपमा देत कवी म्हणतो

समुद्र बिलोरी ऐना
सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली
कार्तिक नौमीची रैना ॥.

निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते

एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा

या निळ्या रंगाची फुलपाखरं, निळ्या रंगाचा शिकारा नि निळा कान्हा त्यांच्या अनेक कवितात डोकावतो. एका कवितेत तर आकाश निळी गाय होते !

लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय
थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय

पाऊस तर कवीचा सखा ! पावसाची असंख्य रूपे या कवितांमध्ये येतात.

घन लवला रे घन लवला रे
चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रुजून आता
त्याचा झाला मरवा रे !

हे मरवा झालेलं कवी मन कधी पावसाच्या सरींमध्ये भिजताना गोपी होते ; हरवते; म्हणते-

मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनात गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
वेली ऋतुमति झाल्या गं....सरीवर सरी आल्या गं..

बोरकरांची गडद निळे ही कविता तर अविस्मरणीय !

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

सर ओसरल्यावर जणू दृष्टी लख्ख होते नि कवी म्हणतो

सर ओसरली जरा, ऊन शिंपडले थोडे
चमकले गारांपरी शुभ्र प्राजक्ताचे सडे
इटुकल्या पाखराने निळी घेतली गोलांटी
फूल लांबट पिवळे झाली सोन्याची वेलांटी

आकाश, समुद्र, संध्याकाळ आणि रात्र, पहाट, पाऊस, फुलपाखरं, झाडे वेली सगळेच त्यांच्या कवितेत आपल्याला 'दिसतात' ! सागराला उद्देशून एका कवितेत ते म्हणतात-

आनंदाच्या निळ्यापांढर्‍या
लाटा नच मावुनिया पोटीं
तुझ्याच परि मी गात लोळलो
कर्पुरकणिकांच्या या कांठी

तर 'आकाशमाउलीस' ते म्हणतात

कोर बिलोरी तुझ्या कपाळी शिरी मोत्यांची जाळी गं
तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी गं

एका संध्याकाळचे वर्णन करताना शब्द येतात

फांदीसारखी झुकते सांज जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन पेंगुळपांगुळ होते जग
गगन भरल्या आठवणींचे गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो उकत्याझाकत्या काजव्यांसवे

निसर्गाची हे उदात्त वर्णन काहीसे अंतर्मुख करणारे, गोव्याच्या मातीबद्दल अतीव जिव्हाळा नि ममत्त्व दाखवणारे. त्यांच्या मते गोव्याची भूमी चांदण्यांचे माहेर, चांदीच्या समुद्राची नि सोन्याच्या पावसाची.

माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे
त्यात सावित्रीची माया जन्मजन्मांतरी जळे

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कडेकपारींमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर.. फळी फुलांचे सुवास..

तिथल्या पालापाचोळ्यावरही त्यांनी उदंड प्रेम केले .
गळण्याआधी या अशाच कवितेतल्या या शब्दांचे लालित्य पहा-

गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळिती पाने
आग लागल्यागत राळांचा फाग खेळिती पाने
उन्हे सांजची सरीसरींनी त्यांत ओतिती सोने
झडती पानेदेखिल होती अमृतभरले दाणे
झडण्याची चाहूल लागतां असा महोत्सव त्यांचा
सण गणुनी पिटितात चौघडा येणार्‍या मरणाचा

मातीत माखलेला नि निळाईत रंगलेला हा कवी खर्‍या अर्थाने निसर्गपूजक होता. त्यांच्या सर्व आकांक्षा या निसर्गाशी जोडलेल्या होत्या.

इतुक्या लवकर येइ न मरणा
मज अनुभवुं दे या सुखक्षणा

असे म्हणत कवी 'मी विझल्यावर' या कवितेत आपली अंतिम इच्छाच जणु व्यक्त करतो.

मी विझल्यावर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या राखेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळित विखुरल्या माझ्या कविता
धरितिल चंद्रफुलांची छत्री
तरीही नसावे असोनी जगी या
निरालंब छांदिष्ट वार्‍यांपरी
कळावे न कोणा कसा पार झालो
भुलावून लोकांस पार्‍यापरी

बोरकरांच्या निसर्गकवितांबद्दल किती किती भरभरून लिहावे ! नव्हे ! त्या कविता अनुभवाव्या. कवितांची विचित्रवीणा दिडदा दिडदा वाजतच राहाते. मनाच्या निळ्या घुमटात घुमत राहते.
यावेळी कविता वाचताना अनेक कवितांमधले सुवर्णकण पुन्हा नव्याने, अधिक झळाळत सापडले. त्यातले काही तुमच्यासोबत वाटून घेतेय. खरं तर ही वीज हातात धरण्याएवढे सामर्थ्य माझ्या लेखणीत नाही. तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच.
आज एवढेच फक्त बोरकरांच्या निसर्गकवितांबद्दल. त्यांच्या प्रेमकवितांमधून डोकावणारा निसर्ग ही तर वेगळीच भुरळ आहे.पण प्रेमकवितांबद्दल पुन्हा कधीतरी.
इति लेखनसीमा.

वाङ्मयकविताभाषासाहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jul 2014 - 9:36 am | यशोधरा

छान लेख. आवडला.

बोरकर नेहमी वेगळ्याच जगात घेऊन जातात आपल्याला ...!

दिव्यत्वाची जेथ प्रतीती,
तेथे कर माझे जुळती
_/\_

सुबोध खरे's picture

10 Jul 2014 - 10:26 am | सुबोध खरे

लेख उत्तम
बाकीबाब बोरकरांची कविता अनुभवण्यासाठी गोव्यात असताना एक दिवस मी मुद्दाम त्यांच्या गावी बोरीला गेलो होतो.(नौदलात असताना मी साडेचार वर्षे गोव्यात होतो) पावसाळा संपत असताना (ओगस्ट महिना अखेर). त्यांच्या निवडक कविता असलेले एक पुस्तक मला आमच्या स्नेह्यांनी वाचायला दिले होते ते पुस्तक तिथल्याच एका शेताच्या बांधावर उभे राहून मी चालत असताना त्याची खरी अनुभूती झाली. त्यांचे गाव पाहिल्यावर त्यांच्या प्रतिभेला इतका बहर कसा आला असेल याची प्रचीती येते. अर्थात हे वर्णन शब्दात करणे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाला शक्य नाही.
परत त्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

निसर्गातला निळा रंग त्यांच्या फार कौतुकाचा. आपल्या कवितांना ते निळावतीच्या कळ्या म्हणतात. निळ्या रंगाचे त्यांचे वेड कितीतरी कवितांत उतरते.

एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा

मला निळा रंग अजिबात आवडत नाही, पण या रंगाचे कौतुक मात्र वाटते. आणि बाकिबाबनी काय सुंदर लिहिलंय निळ्याबद्द्ल... तितकंच अनवटपणे तुमची ले़खणीही उतरलीय. मस्त लेख. खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं.

सविता००१'s picture

10 Jul 2014 - 11:16 am | सविता००१

एकदम भन्नाट लेख. खूप सुरेख.

माधुरी विनायक's picture

10 Jul 2014 - 11:52 am | माधुरी विनायक

चित्रविणा हे शीर्षक वाचताच लंपन आठवला... ती चित्रविणा दिडदा दिडदा वाजू लागली मनात... बाकीबाब माझेही आवडते कवी. खूप सुरेख रसग्रहण केलंय तुम्ही. मी आत्ताच्या आत्ता तीन वेळा वाचला हा लेख. प्रत्येक वेळी अधाशासारखा. लेखाची एक विंडो सुरूच ठेवलीय... मला राहवणारच नाही. पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...

स्वाती दिनेश's picture

10 Jul 2014 - 12:01 pm | स्वाती दिनेश

फार सुंदर, तरल! खूप आवडला लेख..
पुन्हा पुन्हा वाचावं, असं झालंय हे लिखाण...
सहमत!
स्वाती

सखी's picture

10 Jul 2014 - 2:09 pm | सखी

सुरेख लेख मितान!
अगदी परवाच परत निळा रंग अनुभवला आणि बाकीबाब आठवले.

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले - या गाण्याला श्रीधर फडक्यांनी सुरेख संगीत दिले आहे आणि पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात आहे, मला वाटते २ कविता एकत्र केल्या आहेत. किती वेळा ऐकले तरी परत, परत ऐकावेसे वाटते, ह्यात अर्थातच कविच्या मुळ शब्दांचीही ताकद आहे पण सगळ्याच गोष्टी छान जुळुन आल्यात.

चित्रगुप्त's picture

10 Jul 2014 - 2:29 pm | चित्रगुप्त

निसर्ग, प्रेम, शृंगार असे सगळे धुमारे घेऊन ही कविता बेभान नदीसारखी वळणं घेत राहाते. कधी कुटुंबवत्सल होते. कधी क्रांतिकारक होऊन पेटते तर कधी अध्यात्मात अंतर्मुख होते. कोकणी शब्दांचे साज लेवून मराठीत उतरणारी ही ललना प्रत्येकाच्या अंतरातले एखादे तरी गुपित साक्षात्कारुन जातेच ! मग तो निसर्गाला भिडल्याचा अनुभव असो की प्रेमात पडल्याचा !

.... सुंदर.
लेख आवडला, आणि बर्‍याच काळानंतर बोरकरांच्या कविता वाचायला मिळाल्या.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2014 - 2:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख सुंदरच
अवांतर-बोरकरांचे "कशी तुज समजावु सांग" जितेंद्र अभिषेकीबुवांच्या आवाजात तूनळीवर ऐकले आणि मग त्यांच्या कविता वाचल्या.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

आवडला...

नंदन's picture

10 Jul 2014 - 2:44 pm | नंदन

लेख आवडला. नेहमीच्या रहाटगाडग्यात बोरकरांच्या कविता म्हणजे - त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर - 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले; माझ्या परागंदा जीवा पुन्हा माहेर मिळाले' सारख्या आनंदयात्रेत सामील करून घेणार्‍या.

प्रदीप's picture

10 Jul 2014 - 6:36 pm | प्रदीप

ह्याउप्पर अजून काय म्हणणार?

इतकेच लिहीतो: लेखिकेने लिहीले आहे "....तरीही मोह आवरत नाही म्हणून हा लेखन प्रपंच".

ह्या तुमच्या मोह न आवरण्यामुळे आमचे भाग्य मात्र फळाला आले. धन्यवाद.

रेवती's picture

10 Jul 2014 - 7:20 pm | रेवती

ग्रेट.

हा कार्यक्रम चुलल्याची हुरहुर होतीच. लेख वाचल्यावर ती अजूनच वाढलीये! :(

नाव बघून लेख उघडला आणि अर्थातच सार्थक झालं. निवडक आणि सुरेख!! आवडल्या गेले आहे हेवेसांनल.

अनिता ठाकूर's picture

10 Jul 2014 - 3:10 pm | अनिता ठाकूर

बोरकर काय, माडगूळकर काय....ते तर शब्दप्रभू!! शब्द जणू वश होते त्यांना. कविता आणि त्यावरील भाष्य..दोन्ही अप्रतीम!

तलम,रेशमी,सळसळ उठली तुमच्या लेखणीतुन मितान.
अतिशय रसाळ क्षणभरही न थांबणार लिखाण.
धन्यवाद.

प्यारे१'s picture

10 Jul 2014 - 5:41 pm | प्यारे१

सु रे ख!

पद्मश्री चित्रे's picture

10 Jul 2014 - 6:21 pm | पद्मश्री चित्रे

सुंदर कवितांचे रसाळ रसग्रहण.

शुचि's picture

11 Jul 2014 - 5:28 am | शुचि

अतिशय सुंदर लेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2014 - 11:53 am | ज्ञानोबाचे पैजार

खरच फार मस्त लिहिलय.

बोरकरां बद्दल जितक लिहाव ते कमीच आहे. अफाट माणुस होता तो. त्यांची एक एक कविता म्हणजे एक एक वेड आहे.

पैजारबुवा,

राही's picture

11 Jul 2014 - 12:16 pm | राही

मधुराधिपते: अखिलं मधुरम् |
तद्वतच, बोरकरांची कविता अतिसुंदर, त्याचे रसग्रहणही तितकेच सुंदर.
लेख आवडला, मितान.

कवितानागेश's picture

11 Jul 2014 - 12:27 pm | कवितानागेश

चाखत चाखत वाचते..... :)

चौकटराजा's picture

13 Jul 2014 - 12:00 pm | चौकटराजा

आपल्याकडे ज्या तीन कविना शब्द वश होते असे माडगूळकर, बोरकर व शिरवाडकर ! मलाही स्वॅप यांच्या प्रमाणेच निळा रंग आवडत नाही तरीही बोरकरांच्या प्रतिभेतून त्याचे वर्णन आले की वाटते का बरे आपल्याला पिवळा रंग सर्वात जास्त आवडावा ? निळ्याने काय पाप केलेय ?
आपण एक मेजवानी चे ताटच समोर ठेवलेय हो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2014 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले लेखन.

-दिलीप बिरुटे

मितान's picture

13 Jul 2014 - 4:42 pm | मितान

मिपाच्या लपंडावामुळे आभार मानायला उशीर झाला मंडळी !
येथे मिळालेले कौतुक माझे नसून कवितांचे आहे याची नम्र जाणीव मला आहेच. कारण लेख म्हणावा असं काहीही या लेखात नाही.
मला भावलेल्या बोरकरांच्या कविता तुमच्यासोबत शेअर करताना आनंद वाटला.
मनःपूर्वक आभार !

सुनील's picture

14 Jul 2014 - 10:45 am | सुनील

लेख आवडला.

गेयता हे त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य. तलम त्वचेसाठी "सटीनकांती" असा शब्द अगदी सहजपणे घडवणारे बोरकर शब्दप्रभूही होतेच.

उभे आयुष्य भरभरून जगणार्‍या ह्या कवीच्या आयुष्यातील तीन गोष्टींची मात्र खंत वाटते.

उतार वयात त्यांना डॉक्टरांनी दिलेली "पेयान्त प्रायश्चित्ताची" शिक्षा!
गांधीच्या जीवनावर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केलेले परंतु अपूर्ण राहिलेले "महात्मायन"!!
आणि क्षूद्र भाषिक राजकारणामुळे त्यांना कधिच न मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद!!!

संदीप चित्रे's picture

14 Jul 2014 - 11:48 pm | संदीप चित्रे

जुलै महिन्याच्या, भर दुपारी बाहेर रणरणते ऊन असताना, हा लेख वाचला.
बोरकरांच्या कविता पुन्हा वाचताना पुन्हा एकदा गोव्याच्या समुद्रात डुंबून आलो आणि हिरवाईचा थंडावा अनुभवला!

किसन शिंदे's picture

16 Jul 2014 - 2:00 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख...बाकीबाबच्या कविता अन् तुमचा हा लेखही!

कौशिकी०२५'s picture

7 Nov 2014 - 3:44 pm | कौशिकी०२५

सुंदर कवितांची सुरेख ओळख....फार आवडली..