यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो.
त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले. आम्ही गाडीतुन उतरुन जसजसे पहिल्या सुरक्षा कड्यापाशी जाण्यासाठी चालयला सुरवात केली तसतसे गर्दी वाढत चालल्याचे निदर्शनास आले. सर्व देशाभरातुन भारतीय पर्यटक नागरिक तिथे दु. ३.०० वाजल्या पासुन हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमा होत होते. संपुर्ण रस्त्यावर एकमेकांना धक्के देत जो तो पुढे जाण्याचा प्रयत्न करित होता.
या पहिल्या सुरक्षा कड्यापाशी महिलांना वेगेळे करुन त्यांची स्वतंत्र रांग केली व त्यांना अगोदर सोडले. त्यानंतर २ सुरक्षाकडे पार करुन माझा १० वर्षाचा मुलगा आणि मी मुख्य स्थळाजवळ पोहचलो. तर असे दिसुन आले की त्या स्टेडीयमसारख्या दिसणार्या जागेकडे जाणारे दोन्ही बाजुचे जिने गर्दीने फुलुन गेले होते. जिथे एका पायरीवर २ माणसे जेमेतेम उभी राहु शकत होती तिथे दाटीवाटीने ५ माणसे कशीबशी एकमेकांचा आधार घेत पुढे रेटा देत स्टेडीयमच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्या दोन जिन्यांच्या मधुन जो रस्ता जात होता तो एका ४ फुट उंचीच्या आडव्या लोखंडी खांबाने (पोल)बंद केला होता. याच रस्त्यावर ते ध्वज संचालन होणार होते पण त्या खांबाच्या पलिकडे. मग आता ज्यांना स्टेडीयमच्या आंत जागा मिळाली नाही ते सर्व आता खांबाला टेकुन गर्दी करत उभे राहिले. मी मुलाला घेवुन कशीबशी जागा काढत त्या आडव्या पोलला चिटकुन पहिल्या रांगेत उभा राहलो. त्या एवढ्याशा जागेत किमान १.५० लाख लोक जमा झाले होते. जसाजशी आमच्या मागे गर्दी वाढत होती तसतसा आम्ही पहिल्या रांगेतल्या सर्व लोकांचा त्या पोलवरचा दाब वाढत होता.
आता आम्ही मागे सुध्दा फिरु शकत नव्हतो.कसाबसा त्या पोलला दोन्ही हाताने रेटा देत मी मुलाला पोलच्या जाळीवर चिरडण्यापासुन वाचवु पहात होतो. पण रेटा जसा वाढला तसे मग त्याला उचलुन मी डाव्या हातावर घेतले आणि उजव्या हाताने गर्दीचा रेटा थोपविण्याचा व्यर्थ प्रयत्न करु लागलो. गर्दी मध्ये एकमेकांना खुप जोरात ढकलाढकली होत होती. पोलच्या पलिकडे काही जवान जमावाला शांत बसविण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते. पण त्यांचे कोणीच ऐकत नव्हते.
आम्ही पहिल्या रांगेतल्या सर्व लोकांनी आधारासाठी पोलला धरल्या मुळे तो मागे पुढे हेलकावे घेत होता. तो जर पुढे पडला तर आम्ही सर्व जण त्यावर पडुन आमच्या अंगावर मागे उभा असलेला १०००/१२०० लोकांचा जमाव कोसळणार की काय ही भिती वाटत होती. समोरील दृष्य असे होती की दोन्ही बाजुने उतरत्या क्रमाने असलेला स्टेडीयमही खुप भरुन गेला होता. खाली रस्त्यावर सुध्दा लहान मुले आणि बायकांना बसायला दिले होते.
समोरिल बाजुला अंदाजे ६०० मीटर अंतरावर पाकिस्तानचे गेट दिसत होते. उजवीकडील बाजुस सैनिकांसाठी एक हॉल बांधला होता. आणि तिथे एका डॉल्बी स्टिरियोवर " ये देश है वीर जवानोंका" पासुन ते आत्ताच्या बॉर्डर सिनेमा मधली सर्व गाणी अगदी कर्णकर्र्कश्य आवाजात(सु. १५० डेसिबल्सच्या पुढे) वाजत होती. ज्याने लहान मुले बिथरली होती. नंतर "ज्या कुणाला या देशभक्तीपर गाण्यावर नाचायचे आहे त्यांनी सहभागी व्हावे" असे सांगण्यात आले. तेव्हा परेडवाल्या रस्त्याच्या मध्यभागी सर्व बायका , मुली या नाचात सहभागी झाल्या.
सहभागी झालेल्या नाचणार्यांची हुल्लडबाजी, मुलांची रडारड, मोठ्याचे ओरडणे, याने गदारोळात आणखी वाढ झाली. त्यात तिथे होणारी माशांची होणारी भुणभुण, आणि घामाच्या धारांनी सर्वजण त्रस्त झाले होते.
आता त्यात भर म्हणजे नंतर येणार्या ज्या स्त्रियांना आणि लहान मुलांना बसायला जागा मिळाली नाही त्यांना नेमके पोलच्या पलिकडील बाजुस खाली मुख्य परेडच्या रस्त्यावर बसावयास सागिंतले. पण १० मीनटातंच त्या उठुन उभ्या राहिल्या. आणि आमच्यामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे एवढ्या मिनतवारी करुन कशीबशी टिकवलेली जागा असुन सुध्दा काहीही न बघता परत जावे लागणार असे दिसले. "खाली बसा: असा सर्वांनी एकच जल्लोष केला, गस्त घालणार्या जवानाला सांगुन पाहिले. पण ऐकतो कोण? कोण काय बोलतंय ही हे ऐकुच येत नव्हते. मुलाला घेवुन माझा हात तर अगदि भरुन येत होता. शेवटी एकदाचे ५.५५ झाले ती गाणी बंद झाली आणि संचालनाच्या एका संयोजाकाने माईक हातात घेतला.
त्याने आल्या आल्या सुमारे ५ मिनीटभर भाराताच्या वेगवेगळ्या जयघोषणांनी ती जागा दुमदुमन टाकली मग सांगितले की आता संचालन चालु होईल आणि जेव्हा जेव्हा ते समोरचे गेट उघडेल तेव्हा मी "भारत माता की... किंवा अश्याच काही घोषणा दिल्या की तुम्ही "जय" वगैरे म्हणुन साद द्यायची म्हणजे पलिकडे बसलेल्या पाकिस्तानी जमावाला ते ऐकु गेले पाहिजे.
त्या पुढिल संचालन म्हणजे आपले सैनिकांची एक एक तुकडी उजवीकडील हॉल मधुन बाहेर पडुन गेटकडे रवाना होत होती, त्यात महिला सैनिकही होत्या. मग जेव्हा ते गेटचे दरवाजे दोन्ही बाजुने उघडण्यात आले तेव्हा सैनिकांचे जरुरी पेक्षा मोठ्याने पाय आपटत (होय नेहमीच्या २६ जानेवारीच्या सैनिकांच्या संचलानापेक्षा पाय जास्त जोरात आपटत होते) एकमेकांना दातओठ खात बघत, एकमेकांना चिडवत आपापल्या झेंड्याला मानवंदना देण्याचे प्रकार झाले. तेव्हा त्या संयोजकाने माईक हातात घेवुन वेगवेगळ्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणांचा पुढिल भाग पुर्ण करण्यासाठी जमावाकडे पाहुन "अजुन मोठ्याने तिकडे ऐकु गेले पाहिजे " असे काहीसे हाताने खुणावु लागला कि इकडे जमावाने चेकाळुन त्याही पुढिल पायरी गाठली आणि "पाकिस्तान मुर्दाबाद..." वगैरे घोषणा देवु लागला.
मध्येच स्टेडीयमच्या वरिल भागाकडुन काही उपद्रवी बघ्यांकडुन पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा जिथे महिला मुली बसल्या होत्या तिकडे मारा झाला. सैनिक फक्त बघ्याचे काम करु शकत होते. सगळीकडे सावळा गोंधळ चालु होता.
६.२० मिनिटांनी जेव्हा सर्व संपलं तेव्हा सुध्दा आमच्या पहिल्या ओळीतल्या लोकांना आमच्या मागे उभ्या असलेल्या दिड हजार जमावाला भेदुन जाणे शक्य नव्हते. काही जण अजुन हातातला मोबाइल उंचावुन कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. मी मुलाचा हात घट्ट पकडून ज्या दिशेने गर्दी कमी त्या जिन्याच्या दिशेने कशीबशी वाट काढत जिकडे आमच्या गाड्या उभ्या केल्या होत्या त्या दिशेला निघालो.
माझ्या मनात विचार येतो कि
१)भारताला खरच या ध्वज संचालनाच्या प्रात्यक्षिकांची गरज आहे काय?
२)जी माणसे १० मिनिटांकरिता देशभक्तीपर गाण्यावर नाचतात (हुल्लडबाजी म्हणा) त्याने आपले देशप्रेम व्यक्त
होते का? किंवा तिथल्या सैनिकांचे मनोबल वाढते का?
३)जर त्या संयोजकाला जमावाचे पलिकडच्या पाकिस्तानी जमावाला ऐकु जायला पाहिजे असे वाटत होते तर
तो स्वःत माईकवर आमच्या बरोबर भारत माता की नंतर "जय " हे का म्हणत नव्हाता आणि असे अजुन
जोरात म्हणा असे खुणा करुन का सांगत होता. तो नक्की कोणाला घाबरत होता?
४)जर तिथे येणार्या पर्याटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर त्यांच्या सुरक्षेची कोणती हमी
(चेंगराचेंगरी, मुल हरविणे) पंजाब सरकार किवा भारत सरकार घेणार आहे?
५)भारताला पंजाब मधिल एक वाघा हे स्थळ सोडल्यास दुसर्या राज्यातील (राज्यस्थान, गुजरात, काश्मिर)
सीमा रेषेवरिल भागात असे संचालन का होत नाही? कारण तसे झाले म्हणजे एकाच ठिकाणी छोट्या जागेत
एवढा जमाव एकवटणार नाही.
५)पंजाब हा कार्यक्रम बंद होण्यास काही करेल असे वाटत नाही कारण येणार्या पर्यटकांच्यावतीने खुप चांगला
महसुल पंजाबला सरकारला मिळतो आहे. जसे कोणतेही खाद्य/पेय पदार्थ तिथे घेवुन जायचे नाही पण त्या/
स्टेडीयम मध्ये काही स्थानिक विक्रेते १४ रुपयांची बिस्लेरी बॉटल ६० रुपये किंमतीने विकत होते .
अमृतसरपासुन वाघा सीमारेषे पर्यंत जाण्या येणाच्या मार्गावर वाहनांच्या फेर्या वाढल्या आणि त्यांनी २.५०
कि.मी. अगोदर सोडल्यामुळे तिथुन पुढे पहिल्या सुरक्षाकड्यापर्यंत घेवुन जाणारे सायकल, रिक्षां आदी
स्थानिक वाहनांना मिळणारे वाढीव उत्त्पंन्न असा एकंदर मामला आहे.
पण सर्वांच्या मुळाशी प्रश्न असा की मुळात या दोन्ही बाजुंच्या माकडचेष्टांनी काय साध्य होते.
याला दोन्हीकडच्या सरकारने कशासाठी आणि कधीपासुन परवानगी दिली. जगात मला वाटते भारत आणि पाकिस्तान या दोन देशातच असा प्रकार चालत असावा.
प्रतिक्रिया
30 Jun 2014 - 4:22 pm | प्रसाद१९७१
दोन्ही बाजुंच्या माकडचेष्टांनी काय साध्य होते. >>>>>>>>>> तुमच्या प्रश्ना तच उत्तर आहे. "माकड"चेष्टा आहेत म्हणल्यावर त्यातुन साध्य काही होण्याची शक्यता नाहीच.
30 Jun 2014 - 4:47 pm | आतिवास
"वाघा" समारंभ पाहिल्यानंतर 'हे प्रकरण बंद करायला पाहिजे' असं वाटलं होतं.
पण आपल्याकडच्या तथाकथित देशभक्तांना हे असलं मत रूचणार नाही हे माहिती होतं (या वाक्याचा मोदी सरकारशी काही संबंध नाही.)
'टुरिस्ट इकॉनॉमी' मध्ये असल्या गोष्टी खपून जातात - आपणही तितकंच पाहायचं. लोकांकडून पैसे घेत नाहीत तोवर बोलणार तरी काय?
30 Jun 2014 - 4:54 pm | arunjoshi123
सांप्रतकालिन अनेक शासकीय, कॉर्पोरेट, इ इ प्रथा अनावश्यक आहेत. लेगसी इफेक्ट जबरदस्त असतो, एखादी गोष्ट मूर्खपणा आहे हे कळणे देखिल अवघड असते.
30 Jun 2014 - 5:26 pm | ऋषिकेश
:)
तिथे पर्यटकांनी जाणे बंद करणे हा एकमेव उपाय. (जो मी पाळतो, इतरांनी पाळावा अशी आशा असली तरी अपेक्षा नाही)
जर पर्यटक जाताहेत तरी त्यांनी कार्यक्रम ठेऊ नये हे योग्य वाटत नाही. त्याद्वारे स्थानिकांना बराच रोजगार मिळत असतो.
त्यापेक्षा सरकारने प्रवेश व आसनव्यवस्था अधिक सुरक्षित कराव्यात व शिस्तबद्धता यावी इतपत अपेक्षा ठीक.
30 Jun 2014 - 5:27 pm | इरसाल
वाघा बॉर्डर पेक्षा अमृतसर जवळील हुसैनीवाला बॉर्डर वर गेलात तर कार्यक्रम तोच पण शांततेत, माफक घोषणा, संचलन (पाय आपटुनच याला पर्याय नाही) वर तिथेच भगतसिंह इ. च्या समाधी व्यवस्थित काळजी घेवुन राखलेल्या आहेत. तसेच पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात तिथल्या इमारतींवर पडलेल्या तोफगोळ्यांच्या खुणाही पहावयास मिळतात.
भगत सिंह व इतरांच्या समाधीवर उर अभिमानाने आणी डोळे पाण्याने भरुन येतात. ही तिच जागा आहे जिथे त्यांना "तडकाफडकी फाशी दिल्यानंतर" त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन आणुन अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला होता.
30 Jun 2014 - 5:51 pm | जे.पी.मॉर्गन
माझाही अगदी हाच अनुभव. फरक हाच की ती गर्दी आणि तो थिल्लरपणा पाहून खूप वाईट वाटलं आणि कार्यक्रम बघायची इच्छाच मेली. मी आणि माझा मुलगा तिथल्या एका हॉटेलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. खूप उत्सुकता होती रिट्रीट परेड बघायची... पण तिकडचा माहोल बघितल्यावर पुढे जावंसं वाटलंच नाही.
हुसैनीवालाबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद इरसाल. फिरोझपुर अमृतसरपासून साधारण २ तासांवर आहे तेव्हा तिथे पोहोचणं फार कठीण नाही. पुढच्या येळी तिकडे.
जे.पी.
30 Jun 2014 - 5:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
हाच एकमेव उपाय आहे..तिकडे जाउन नंतर तक्रार करण्यात काय अर्थ?
30 Jun 2014 - 9:05 pm | कंजूस
प्रत्येक पर्यटनस्थळी एक तरी पकाऊ जागा असते .टुअरमधून जाणाऱ्यांना ती टाळता येत नाही .ग्रुपमध्ये असलात तरी कोणाच्या इच्छेखातर सर्वाँची वरात निघते .स्वतंत्र जाणारे टाळू शकतात .
1 Jul 2014 - 8:34 am | चित्रगुप्त
जे ठिकाण (वा सिनेमा वगैरे सुद्धा) खूप गर्दी खेचणारे आणि लोकप्रिय वगैरे असेल, ते साफ टाळण्याचाच पायंडा फार वर्षांपासून पाळत असल्यामुळे असले एकही ठिकाण बघितलेले नाही. आपली ही सवय अगदी योग्यच असल्याचे असे लेख वगैरे वाचून वारंवार जाणवत आलेले आहे. देर्देकर साहेब, अश्या आणखी एका ठिकाणाची माहिती तुम्ही स्वतः अतोनात कष्ट झेलून दिल्याबद्दल आभार.
1 Jul 2014 - 10:23 am | ज्ञानव
येण्याजोग्या जागा कोणत्या ते इथे जर प्रत्येकाने उद्धृत केल्या तर बराच फायदा होईल. जसे सूर्योदय सूर्यास्त केंद्रे हि पण एक टाळता येण्याजोगी किंवा मार्ग बदलून पर्यायी जागी जाऊन पाहता येण्याजोगी असतात.
हुसैनिवाला हेसुद्धा इरसालजींनी दिलेले चांगले उदाहरण आहे म्हणजे जे पहायचे आहे ते पाहण्याचा आनंद हि मिळाला आणि गर्दीचा उपद्रव हि टाळता आला.
1 Jul 2014 - 3:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
चतुर्थीला सिद्धिविनायक, अष्टमीला महालक्ष्मी,दसरा दिवाळीला शिर्डी आणि १२ महीने तिरुपती बालाजी शिवय एकुणच यात्रांच्या वेळी देवदर्शन टाळावे या मताचा मी आहे.
2 Jul 2014 - 2:52 pm | एस
महाराष्ट्रातील डोंगरयात्रींनी आता राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, रायगड, राजमाची, लोहगड, कर्नाळा असे किल्ले निदान सुट्ट्यांच्या दिवशी टाळायला हवेत या मताचा मी आहे.
1 Jul 2014 - 10:02 am | भडकमकर मास्तर
माहितीबद्दल आभार .. गर्दी, ढकलाढकली आणि चेंगराचेंगरी, गोंधळ आणि या सार्यात लहान मुले घेऊन जाणे अगदीच अवघड... . पूर्वी कदाचित गेलो असतो, आता हे सारे वाचून अजिबात जाणार नाही..
1 Jul 2014 - 10:24 am | प्रसाद गोडबोले
दे श भ क्ती चा त मा शा
1 Jul 2014 - 10:25 am | सामान्यनागरिक
कलियगामधे सगळेकाहेी विकले जाते.जेथे देवांचासुद्दधा बाजार मांडला जातो मग हेकाहेीचनाहेी !काहेी दिवसांतच पाचशे रुपयेसेीटानेतिथेबसायचेी जागाविकलेी जाईल. नाचण्याचे हजार रु एक्स्ट्रा. मग सगळे तथाकथित (! देशप्रेमेी लोकतिथे नाचायलाजातेील. जितके पैसे जास्त खर्च केल तेवढेी देशप्रेम जास्त ! त्याचे सर्टिफेकेट घेउन घरात टांगतेील !!!
1 Jul 2014 - 12:47 pm | बॅटमॅन
तुम्ही जावा की द्वापरयुगात, कोण अडवलंय?
1 Jul 2014 - 2:23 pm | गजानन५९
त्यांना जिथे जायचे असेल तिथे ते जातील तूमी का उगा सल्ले देता मालक ?
1 Jul 2014 - 4:44 pm | बॅटमॅन
ते आम्ही दोघेही बघून घेऊ ना, तुम्ही कशाला सांगताय ओ?
2 Jul 2014 - 12:32 pm | गजानन५९
:)
काय नाय ओ तुमच्याशी जरा ओळख करून घ्यायची होती (पुणेरी पद्धतीने)
1 Jul 2014 - 11:35 am | सुबोध खरे
प्रमोदराव
अहो या २६ जानेवारी च्या ध्वज वंदनाच्या वेळी राष्ट्रगीत चालू असताना भ्रमण ध्वनीवर बोलणारे एक महाभाग मला सर्वाना २ वर्षे लष्करी शिक्षण सक्तीचे केले पाहिजे त्याशिवाय देश सुधारणार नाही हे सांगत होते. (एक मिनिटाच्या राष्ट्रगीताच्या वेळेत सुद्धा यांना सावधान मध्ये उभे राहता येत नाही. )
तेंव्हा मला खालील विनोदाची(मुळ विनोद इंग्रजीत आहे) आठवण झाली.
एक मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते, "अग आजकाल लोकांना देवधर्म पावित्र्य इ बद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. कालच मी चर्च मध्ये बसले होतो तेंव्हा एका दीड शहाण्याने तेथे सिगारेट पेटवली. मला इतका धक्का बसला कि माझ्या ग्लासातील बियर सांडली."
आपण देश भक्त असणे जरुरीचे नाही पण "दाखवणे" मात्र जरुरीचे आहे.
1 Jul 2014 - 12:30 pm | प्रमोद देर्देकर
सुबोध खरे - :- अगदी +१
आमच्या ऑफिसमध्ये रोज न चुकता १०.०० ठोक्याला "जन गण मन" चालु होते. त्यावेळी पुर्वसुचना दिली जाते की सगळ्यांनी उभे राहावे राष्ट्रगीत चालु होत आहे. तरी १० तले ३ जण तरी असे सापडतात की कोणी फोन वर बोलत असतात, काही जण पहिले कडवे चालु झाल्यावर सावकाश नाईलाजाने उठतात, तर काही जण शेवटचे कडवे पुर्ण होण्या आधीच धपकन खुर्चित बसातात. २ मि. त्यांना उभं राहवत नाही हो.
हेच मॉलमध्ये भटकत असाताना, थिएटर मध्ये तिकिटाच्या रांगेत उभे असाताना, पॉपस्टारच्या गाण्याच्या प्रोग्राम तासंतास उभे राहुन पहाताना यांना काही होत नाही. काय बोलावे?
भडकमकर मास्तर:- मी आणि माझ्या पत्नीने तेच मनात नक्की केलं की या पुढे कधी गर्दीच्या कोणत्याच ठिकाणी जायचं नाही,अगदी मंदिरात सुध्दा. कारण पुढे याच सहलीत काशीच्या विश्वनाथ मंदिरातही तोच अनुभव आला. तिथे तर एक ५० शीचा गृहस्थ (भैया होता) महिलांच्या रांगेत घुसायला पहात होता. ज्याला तिथल्या सिक्युरिटी गार्डच्या लोकांनी डोक्यावर खुप जोरात टपलीत मारत मारत त्याच्या कॉलरला पकडुन बाहेर काढले. तेव्हा खुप ढकलाढकली झाली आणि लहान मुलांना कसेबसे सावरत बाकीच्यांनी संयम दाखवला म्हणुन चंगरा चेंगरी झाली नाही.
@ इरसालः- माहिती बद्द्ल धन्यवाद पुन्हा कधी योग आलाच तर नक्की तिथेच जाईन. (वाघा बॉर्डर रद्द) .
1 Jul 2014 - 12:38 pm | प्रसाद गोडबोले
विषयांतर १: "जन गण मन" ला उभे राहिलेच पाहिजे असा कोठेही नियम नाही .... संविधान म्हणते की "आदर दाखवला पाहिजे" ...बस्स ...
विषयांतर २: ज्यांना "जन गण मन" हे राष्ट्रगीत म्हणुन मान्यच नाही , ज्यांना अजुनही "वंदे मातरम " हेच राष्ट्रगीत म्हणुन हवे आहे त्यांच्यावर "जन गण मन" ला उभे राहण्याची सक्ती का ?
1 Jul 2014 - 1:56 pm | सुबोध खरे
विषयांतर १-- मंदिरात सिगारेट ओढली तर चालेल काय ?
विषयांतर २-- स्त्रीरोग तज्ञाने अर्ध्या चड्डीत स्त्री रुग्ण तपासले तर चालतील काय?
प्रत्येक गोष्टीचे एक औचित्य असते. आपला जर राष्ट्र ध्वज किंवा राष्ट्र गीतावर विश्वास/ श्रद्धा नसेल तर ध्वजारोहण किंवा तत्सम सार्वजनिक समारंभाला येउन हात दाखवून अवलक्षण करण्याचे कारण काय?
4 Jul 2014 - 2:48 pm | प्रसाद गोडबोले
अहो थेटरात वाजवतात जन गन मन , त्यात आपलं कसलम आलय अवलक्षण ? २ मिनिटाच्या विरोधासाठी काय पिक्चर पाहणं सोडु ?
-----------------------------------------
If we start throwing stones at every barking dog , we will never reach our destination , Better throw bread and move on !
पटत नाही त्या प्रत्येक गोष्टीवर कुठे आंदोलन करत बसा ? आपला विरोध नोंदवा आणि पुढे चला !!
1 Jul 2014 - 2:49 pm | थॉर माणूस
विषयांतर १: Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. (संदर्भः knowindia.gov.in)
विषयांतर २: वेगवेगळ्या जथ्यातल्या ***वाद्यांना त्यांचे प्रदेश भारताचा भाग असणे मान्यच नाही, त्यांना भारतातच असण्याची सक्ती का? उद्या एखाद्या हुशार माणसाला भारताचा तिरंगा झेंडा म्हणुन मान्यच नसेल त्याला चरखावाला नाहीतर गेलाबाजार सध्याच्या ट्रेंडनुसार कमळवाला झेंडाच भारताचा झेंडा म्हणुन हवा असेल तर त्याच्यावर तिरंग्याची सक्ती का?
1 Jul 2014 - 3:49 pm | कंजूस
सूर्योदय/सूर्यास्त पाहण्याच्या जागा बद्दल खरं आहे .
इतर ठिकाणे :
वृंदावन (म्हैसूर) चे कारंजे (अतिशयोक्ती) ,
वृंदावन ( गलिच्छपणा) ,
अजमेर दर्गा (गर्दी ,पाकिटमारी) ,
नाथद्वारा (गर्दी ,कमी वेळ) ,
गुरुवायुर (गर्दी ,कमी वेळ)
आणि शिर्डी
येथे नाही गेलो तरी चालेल .
इथली दैवते खरोखरच पावणारी असतील तर घरी बसून पावोत .
3 Jul 2014 - 3:56 pm | प्रमोद देर्देकर
अहो कंजुस साहेब अजुन अशी कितीतरी ठिकाणांची नावे लिहता येतील की. एक स्थळ म्हणजे लालबागचा राजाचे देता येईल की. मी तर फक्त एकदाच गेलो होतो तिथपासुन कानाला खडा पुन्हा जायचे नाही यांची मुजोरीगिरी पहायला.
घरी देव्हार्यात देव आहे ना त्याला नमस्कार करुया. आपण सर्वांनीच अशा ठिकाणी न जाण्याचा संकल्प केला पाहिजे.
2 Jul 2014 - 4:38 pm | अजया
अगदी खरं आहे !!
2 Jul 2014 - 8:31 pm | भाते
इतकी भयानक अवस्था आहे सध्या तिकडे. ऑक्टो-नोव्हे २००८ मध्ये तिकडे गेलो होतो. गर्दी बऱ्यापैकी होती. पण इतकी बेकार परिस्थिती नक्कीच नव्हती.
कदाचित दोन कारणे असू शकतील.
१. मुलानां शाळेच्या सुट्टया असल्याने सगळे पालक आपल्या मुलाबाळांना घेऊन तिथे जात असतील.
२. अचानक सगळ्यांना देशप्रेमाचे भरते आले असेल.
पण ते प्रात्यक्षिक पहायला छान वाटले होते.
4 Jul 2014 - 2:36 pm | कंजूस
खरं आहे .जाणारे लिहितात त्यामुळे पुढचे सावध होतात .धन्यवाद देर्देकर .
15 Jul 2014 - 3:41 am | समिर१२३
देशभक्ति जर लि॑क्विडेट करता आलि तर या जागेचि देशभक्ति एकत्र करून पूर्ण भारत-पाकिस्तान सीमेवर सारखि पेरावि.
काहि वष्रानपुर्वि भूजला गेलो तेव्हा एक उनटवाला म्हणाला ५०० रुपयात कराचिला सोडतो. मी म्हणालो, पासपोर्ट, विसा नाहि. तो म्हणाला ते काहि नको, फ्कत पैसे द्या. ???
काहि नाहि हो प्रमोद- पेट्रिओटिझम अॅट ईट्स चिझियेस्ट लेवल.
15 Jul 2014 - 1:08 pm | सुबोध खरे
समीर साहेब
उंट वाला तुम्हाला उंटावर बसून कराचीला पाठवीण्याचे पैसे सांगत होता. (परत आणण्याचे पैसे विचारायचे). मध्ये गोळी बिळी लागली तर ती त्याची जबाबदारी नाही. पाचशे रुपयात सीमा सुरक्षा दलाचे जवान पटणे शक्य नाही. नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या?
हे उंट तेथे तस्करी करण्यासाठी वापरतात. अफघाणीस्तानातून पाकिस्तानात आणलेली अफू भारतात पोहोचवणे हे त्यांचे काम असते त्यासाठी ते उंटाच्या पोटाला अफूचे पोते बांधून पाकिस्तानातून भारतात पाठवतात. उंट तेथल्या रेताड जमिनीतून आरामात चालू शकतो जेथे जीप रुतून बसते. हे उंट शिकवलेले असतात ते पाकिस्तानात रिकामे जातात. दोन्ही बाजूना त्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिले जाते. सीमा सुरक्षा दलाचे जवान सुध्दा उंटावरून गस्त घालतात. असा जवान दिसला कि उंट खाली बसतो म्हणजे त्यःच्या पोटाचे पोते दिसत नाही. शिवाय रणात कित्येक थकलेले उंट असे बसलेले दिसतात प्रत्येक उंटाला उठवून त्याच्या पोटाखालचे पोते तपासणे जवानांना शक्य नाही.( अशा तर्हेचा तस्करीतील पैसा हे गुजरात दंगलीचे एक कारण आहे)
मुळात भारत पाकिस्तान सीमा वाघा सिमेसारखी व्यवस्थित रस्ते बांधलेली नसून जवळ जवळ ३,००० किमी लांब आणी अत्यंत दुर्गम वाळवंट, हिमशिखरे नद्या दलदली अशा तर्हेची आहे. तेथे दिवसरात्र गस्त घालणे हि गोष्ट आपण समजता तशी सोपी नाही.
तेंव्हा ५०० रुपयात आपण पाकिस्तानात पोहोचाल हे खरे पण जिवंत कि मृत याचा भरवसा नाही आणी तेथे पोहोचल्यावर सरकारी पाहुणे झालात त्याची जबाबदारी आपलीच.
तसे तर काय आपण ओख्यावरून किंवा कच्च्ह मधील मांडवी जाखाऊ ई ई बंदरातून होडके घेऊन कराचीला सुद्धा जाऊ शकाल. आना फ्री , जाना फ्री , पकडे गये तो (तुरुंगात) खाना फ्री.
देशभक्ती सोडा हो. मी तुम्हाला गहू देतो शंभर मीटर अंतरावर एक एक गहू पेरा ३०,००० गव्हाचे दाणे पेरता पेरता आयुष्य संपेल
15 Jul 2014 - 9:38 am | मुक्त विहारि
धन्यवाद
15 Jul 2014 - 10:05 am | यशोधरा
डिसेंबर २०१३ मध्ये मी बाघा सीमारेषा पाहण्यासाठी गेले होते. आपण म्हणता तशी गाणी वगैरे तिथे वाजत असलेली वा लोक नाचत वगैरे असलेले आठवत नाहीत. घोषणा आठवतात. हुल्लडबाजी मात्र अजिबात नव्हती हे ठळकपणे आठवते. उलट, काही लोकांनी जरुरीपेक्षा अधिक आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तेथील एका सैनिकी अधिकार्याकडून व्यवस्थित काढली गेलेली खरडपट्टी चांगलीच आठवते.
भयानक अवस्था वगैरे काही नाहीये. अतिशय उत्तम संचलन पाहताना अतिशय अभिमान वाटला होता. आपण म्हणता तशी गर्दीही होते, मी स्वतः परेडच्या रस्त्यावर जिथे ध्वज उतरवला जातो त्या दरवाजाच्या विरुद्ध बाजूच्या गेटपाशी बसून हा सोहळा पाहिला आहे, पण दर थोड्या अंतरावर सैन्यातील सैनिक, सुभेदार वगैरे असतात/ होते व गर्दीचे व्यवस्थित नियंत्रण करत होते, तसेच उगाच कोणाला उभे वगैरे राहू देत नव्हते.
एकूणात बाघा बॉर्डरचा माझा अनुभव अतिशय उत्तम होता. पुन्हा एकदा भेट द्यायचे फार मनात आहे.
15 Jul 2014 - 12:53 pm | अनिता ठाकूर
माझा अनुभव मध्यम आहे. आम्ही २०१० मध्ये अटारी सरहद्दीवर (आता वाघा सरहद्दीला अटारी सरहद्द म्हणतात.हे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. तारीख सांगता येणार नाही.) गेलो होतो. ७ - ८ व्या पायरीवर बसायला जागा मिळाली होती. गाणी होती, फुगड्या, नाच, देशभक्तीपर गाणी, घोषणा..सर्व होतं. नंतर आलेल्या लोकांना त्रास झालाहि असेल. आमची तेथे पोहोचण्याची वेळ कदाचित नीट साधली गेली असेल.त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला नाही.एव्ह्ढ्या संख्येने आलेल्या लोकांसमोर देशभक्तीपर वातावरण ठेवणे आवश्यकच आहे ना? त्यामुळे तशी गाणी, घोषणा इ. असावे. *clapping*