लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.
गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे. घरचे सगळे, तपासणी करण्यासाठी मागे लागले. पण कॅन्सर निघाला तर, या भीतिने मी ते टाळू लागलो. समारंभात लोकांना चुकवून कमीतकमी जेवू लागलो. माझा आकार बघून मी डाएट करतोय, असे लोकांना वाटायचे.
शेवटी एक दिवस, जेवल्यानंतर मळमळू लागले आणि एक उलटी झाल्यावर घरच्यांचा धीर खचला. मीही, आता एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असे ठरवून स्पेशालिस्टची वेळ घेतली. त्याने वेळ न घालवता मला एन्डोस्कोपिस्टकडे पाठवले. ती अत्यंत पेनफुल झाली आणि त्यातून रोगनिदान झाले. या रोगात, जठरावरचा वॉल्व्ह(एलीएस) घट्ट होतो. परिणामी, वरची अन्ननलिका विशाल होते. याबाबतची जास्त माहिती गुगलून सहज मिळते. आता याचे पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी मॅनोमेट्री अर्थात इसोफॅगसमधले प्रेशर मोजणे, ही टेस्ट झाली. पण मधल्या काळात, माझा जठरावरचा वॉल्व्ह त्या एन्डोस्कोपीमुळे सैल झाला होता. त्यामुळे विनासायास गि़ळता येऊ लागले होते. मॅनोमेट्रीच्या रिझल्टवरुन तज्ञांमधे दोन मते पडली. एक तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी वा बलून डायलेशन! या प्रकारात एका फुग्याने तो जठरावरचा वॉल्व्ह सैल करतात. पण धोका पाच टक्के केसेसमधे परफोरेशनचा ! ते झालं की मोठ्ठा राडा! पण दोन विरुद्ध एक अशा मतांमुळे मी सोपा उपाय करण्याचे ठरवले. काम पंधरा ते वीस मिनिटांचे, आणि एक दिवस ऑब्जर्व्हेशनसाठी हॉस्पिटल मधे वास्तव्य! दिवस ठरला. सकाळी हॉस्पिटलमधे दाखल झालो. तिथून ऑपरेशन थिएटर! आधी जय्यत तयारी केली होती. मेडिक्लेम वाल्यांना कळवले होते. मला आंत घेण्यात आले. बायको बाहेर. अर्धा तासाच्या वर लागल्याने तिचे प्राण कंठाशी.मला ऑपरेशन चालू असतानाच शुद्ध आली. पोटात वेदना आणि कोणीतरी 'परफोरेशन' म्हटल्याचे ऐकू आले.
मी ज्या गोष्टीला घाबरत होतो तेच झाले होते. मी लगेच डॉक्टरांना विचारले, 'माझ्या अन्ननलिकेला भोक पडले आहे का ?' ते म्हणाले , हो पण आम्ही सर्व स्टेप्स घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी त्या भागात एक स्टेंट घातला होता. काही नुकसान झाले नाहीये या खात्रीसाठी मला लगोलग सीटी स्कॅन करायला नेण्यात आले. वाटेत, मी बायकोला काय झाले आहे याची कल्पना दिली. नशिबाने सीटी स्कॅन चा रिपोर्ट चांगला आला. मला आता रुममधे हलवण्यात आले. हाताला सलाईन चिकटले. इंजेक्शन्सचा मारा झाला. पाठोपाठ सर्जन वर आले. त्यांनी आम्हाला सर्व समजावून सांगितले. मला तोंडावाटे आता पाणीही घ्यायचे नव्हते. गेल्या बासष्ट वर्षांत, प्रथमच मी उपास करणार होतो आणि तोही अगदी निर्जळी! पहिली रात्र ग्लानीतच गेली. डॉक्टर सकाळ,संध्याकाळ येत होते. सर्व गोष्टी मॉनिटर होत होत्या. चार दिवसांनंतर एक्स रे मधे माझा स्टेंट थोडा खाली घसरल्याचे लक्षांत आले. डॉक्टरांनी दुसरा स्टेंट बसवावा लागेल याची कल्पना दिली. तोपर्यंत आमच्या नातेवाईकांनी इतर तज्ञांशी सल्लामसलत करुन डॉक्टरांना त्यांचाशी चर्चा करायला लावली. आम्ही तर घाबरुनच गेलो होतो. पण दुसरा इलाजच नव्हता. दुसरा स्टेंट बसवताना तो पहिल्याशी इंटरलॉक करुन नीट बसवण्यात आला. आता माझ्या अन्ननलिकेत दोन डब्यांची छोटी 'मोनोरेल' झाली होती. आणखी दोन दिवस खात्री करुन नंतर मला लिक्विड डाएट वर घालणार असे ठरले. एव्हाना सगळ्यांचे फोन यायला लागले होते. मुलगी अमेरिकेतून रोज विचारपूस करत होती. मी तिला धीर देण्यासाठी मी अजिबात घाबरलो नसल्याचे सांगितले. 'स्टेंटसे स्टेंट मिला' असे गाणे तयार केल्याचे सांगून माझ्यातला 'सेन्स ऑफ ट्युमर' जागरुक असल्याची खात्री पटवून दिली.
लहान असताना आम्ही एक शन्ना नवर्यांचे एक रहस्य नाटक,अ,ब आणि क बघितले होते. त्यातील प्रत्येक अंकाच्या शेवटी अनुक्रमे, अचलाबाई अत्तरदे,बनुताई बनसोडे या ललनांचा खून होतो. तिसर्या अंकाच्या शेवटी कमलाबाई कविश्वर मरणारच असतात, पण खुनी पकडला गेल्यामुळे त्या वाचतात, असे काहीसे कथानक होते. माझी बहिणही माझ्यासारखीच विनोदी स्वभावाची आहे. त्यामुळे माझे 'बलून डायलेशन' करायचे ठरल्यावर मी तिला , अचलाबाईंना घालवायला बलूनताई बनसोडे वापरणार आहेत असे मजेने सांगितले होते. नंतर ती भेटायला आली तेंव्हा मात्र, ती गंभीर असली तरी मीच तिला माझी कमलाबाई होणार होती असे म्हणून हंसवले. असो.
तर सद्यस्थितीला मी घरी आहे पण स्टेंटस महिनाभराने काढायचे असल्यामुळे अन्ननलिकेतच आहेत. त्यांत काहीही अडकण्याचा धोका टाळण्यासाठी लिक्विड डाएट चालूच रहाणार आहे. त्यानिमित्ताने वजन घटवण्याची एक नामी संधी मला मिळाली आहे.
यापुढील भागात या रोगाविषयी विस्तृत लिहिनच. शेवटचा भाग अर्थातच माझे स्टेंटस यशस्वीरीत्या काढले गेले का नाही याबद्दल असेल. अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!!
प्रतिक्रिया
15 May 2014 - 8:03 am | यशोधरा
शुभेच्छा!
15 May 2014 - 8:12 am | सस्नेह
लवकर ठीक व्हा !
15 May 2014 - 8:27 am | आतिवास
अनुभव भयानक आहे - तो लिहिल्यावर कदाचित तुम्हाला बरं वाटलं असेल.
पुढच्या भागाची वाट पाहते असं म्हणवत नाही खरं तर :-(
काळजी घ्या; लवकर बरे व्हा आणि पुढचा भागही लिहा.
शुभेच्छा.
15 May 2014 - 8:48 am | चौकटराजा
विनोदी स्वभाव हेच औषध लवकर बरे व्हायला लागू पडेल.बाकी काय बोलणार.
15 May 2014 - 8:54 am | प्रमोद देर्देकर
तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हिच देवाकडे प्रार्थना.
पुढिल भागात तुम्ही शस्त्रक्रिया कोठे केली (म्हणजे कोणत्या इस्पितळात), अंदाजे कर्च खर्च किती आला, तसेच आजाराची काय लक्षणे आहेत या विषयी सविस्तर लिहा.
15 May 2014 - 2:00 pm | शिद
असेच म्हणतो.
15 May 2014 - 10:20 am | मदनबाण
तुमच्या प्रकॄतीला आराम पडो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
काळजी घ्या...
15 May 2014 - 10:35 am | स्पंदना
तिमा काळजी लावलात हो!
शिस्तीत रहा बाबा!
अहो आम्हाला रोशोमान फ्रेम बाय फ्रेम पहायला लावलात तुम्ही आता या ट्रीटमेंटच पण तसच करा. होउन जाउ दे फ्रेम बाय फ्रेम.
15 May 2014 - 3:16 pm | मुक्त विहारि
सहमत...
15 May 2014 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे
इतके घाबरून जाऊ नका. आता ही शस्त्रक्रिया आणि त्याच्यात झालेले काँप्लिकेशनचे उपचार या फार मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत. मात्र जखम भरण्यासाठी निसर्गाला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यावा लागणारच. लेखात तुम्ही दाखवलेल्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही या समस्येला धिराने तोंड देत आहात हेच दिसत आहे ही तुमची मोठी जमेची बाजू आहे *good*
तुम्ही लबकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !
15 May 2014 - 10:45 am | स्पंदना
बर झालं तुम्ही सांगीतलत ते एक्काजी!!
15 May 2014 - 12:47 pm | मृत्युन्जय
शुभेच्छा तिमा. सगळे ठीक होइल.
15 May 2014 - 1:08 pm | प्यारे१
ईश्वर आपल्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो!
15 May 2014 - 1:11 pm | गवि
लवकरात लवकर पूर्ण रिकव्हरीसाठी सदिच्छा..
काळजी घ्या.
15 May 2014 - 1:49 pm | केदार-मिसळपाव
तुमची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुमच्या विनोद्बुद्धीचे तर आपण फ्यान झालो बापु.
लै झाक. छान लिहीत राहा.
15 May 2014 - 2:49 pm | दिपक.कुवेत
व्हा हिच सदिच्छा.
15 May 2014 - 3:22 pm | सूड
स्टेंट्स यशस्वीरित्या काढले गेल्याबद्दल लेख येईलच तुमच्याकडून. तोवर काळजी घ्या. :)
15 May 2014 - 5:54 pm | कवितानागेश
तिमाकाका, आता तुम्ही बरे झालेले आहात. वजन कमी करण्यासाठी शुभेच्छा. :)
15 May 2014 - 9:14 pm | सखी
अंतिम भाग येईलच हो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!
15 May 2014 - 10:14 pm | पैसा
लवकर बरे वाटण्यासाठी शुभेच्छा!
15 May 2014 - 11:07 pm | तुमचा अभिषेक
अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!!
क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल.
आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे.
मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.
15 May 2014 - 11:20 pm | आत्मशून्य
यु सिरीअस्ली रॉक.
तुम्ही नक्किच यातुन बाहेर पडाल. मन, डोळे, आणी सगळे ओप्शन्स मात्र ओपन ठेवा. ऑल द बेस्ट.
16 May 2014 - 1:05 am | बहुगुणी
एक तिमा-कट्टा होऊ द्यात :-) अवघड आजारांची ऐशी-तैशी! मिपाकरांना ऐन आजारात हसवता आहात, तुमची सहनशक्ती वाया जाणार नाही!
16 May 2014 - 6:05 am | रेवती
तुम्ही असे लेखन करताय म्हणजे नक्की बरे व्हाल.
शुभेच्छा!
16 May 2014 - 7:25 am | तिमा
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हे लिहिण्यामागे सर्वांच्या सहानुभूतिचा विषय व्हावे ही इच्छा नव्हती. तरी तुमच्या प्रेमाने मन भरुन आले. 'दत्ताजी शिंदे' सारखा, 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या वृत्तीचाच मी आहे.
इतक्या लवकर नेटवर कसा आलो याचे गुपित म्हणजे, सध्या मला जास्त काळ आडवे झोपता येत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या जास्त आरामशीर वाटते, हे आहे.