माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
31 Mar 2014 - 5:26 pm

माझं कोकणातलं गांव :- भाग-४

मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे.....
तिथुन पुढे >>>

दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु. कारण परत मुंबईला येताना दापोलीलाच यावे लागायचं.
एक डोंगर उतरुन नदी पार केली की लगेच दुसरा डोंगर चढायचा की आलेच माझ्या मामाचे गाव. या नदीवर पहीले पुल नव्हाता तेव्हा ए.स्टी.चं अर्धे चाक पाण्यात बुडायचे तेव्हा आपली गाडी पाण्यातनं जाते हे खिडकीतनं बघताना खुप मजा यायची. नदी ओलांडली की लगेच चढ चढायला सुरवात होते. नदीतुन बाहेर पडताच एक इंग्रजी एस आकाराचं वाकण आहे. ते चढताना हमखास ए.स्टी. दोन तीन वेळा मागे पुढे व्हायची. मी पहिल्यांदा २०१२ ला ओमनी व्हॅन घेवुन गेलो होतो तेव्हा पण माझी तारांबळ उडाली होती. (कारण मला गाडी नविन आणि गाडीला मी नविन :-)))) ) दुपारी ४.०० वाजता सुटलेली गाडी ४.३० वा. मामाच्या गावाला आजोळी पोहचत असे. स्टॉपवर कळव्यातील मामाची मुले, गावाकडचे मामा, आणि मे महिन्यात आलेली इतर हौशी गावकरी मंडळी, मुले यांची उत्सुकतेने कोण कोण आलंय हे बघायला बरीच गर्दी जमा झालेली असे.

उतरलो की आम्ही मुले एकमेकांना टाळी देत काय काय हल्लागुल्ला केला त्याचा रीपोर्ट एकमेकांना देत असु. खरं तर आमच्या घरापासुन ३०/४० पावलांवरच हा स्टॉप असल्या कारणाने कोण कोण आलंय ते अंगणातुनच दिसते. मग मोठी मंडळी नवी जुनी होई पर्यंत आम्ही १०/१२ मुले (प्रत्येक मामांची दोन तीन आणि आम्ही तीघ) अशी गावच्या पाण्याच्या पाटावर धावत जात असु. हा पाटाला मात्र पाणी खुप मोठे असे. मग पाटावर खुप मजा करायची, गुढघा एवढया उंचीच्या द्रोणीत सोडुन दिलेले वाहते पाणी पुढे खालच्या बागेला (सुपारीच्या) निघुन जायचे. मग ती द्रोणीत आळीपाळीने पाय टाकुन पाण्यात खेळत राहायचे. सगळ्यात पहिला पाट आमचा मग ओळीने ५ पाट इतर गावकर्‍यांचे मग आमचे घर. त्यामुळे घरी परत येताना काजु किंवा पिंपळाच्या पानांची टेंभुर्णीच्या किंवा करवंदाच्या काटायाच्या मदतीने टोके दुमडुन होडी बनवायची आणि पाटात सोडायची की पाटाच्या बाजुबाजुने होडीला काठीने ढकलत नेत चालत घरापर्यंत पहिलं पोहचण्यात सगळ्या मुलांची चढाओढ लागायची.

मग सगळे अंगणात (खळ्यात) एकत्र जमायचे गोट्या, लगोरी, इस्टॉप इस्टॉप आणि डबा ऐसपैस खेळायचो. डबा ऐसपैस, खांब खांब खांबोळी खेळताना तर आमच्या कळव्यातील मामी मंडळी पण सामील व्हायच्या. नुसती हुल्लडबाजी. वीस ते पंचवीस माणसांनी घर कसं भरलेलं असायचं, बहुतेक कोकणातील प्रत्येक घर त्यावेळी पै पाहुण्यांनी भरलेलं असायचं आणि त्या घरांतील लहान मंडळी पण आमच्यात खेळायला यायची. अशा वेळेला सगळया जगाचा विसर पडायचा मग नको तो अभ्यास; आणि नको ती शाळा.

संधाकाळी उन्ह उतरली की पहिले पर्वचा आणि मग पुन्हा अंगणात रेडियो ऐकायला जमायचं. त्या वेळी विरंगुळ्याचे साधन म्हणजे रेडियो आमच्या मामांनी घराच्या कौलावर एक कर्णा बसवला होता जेणेकरुन सगळ्या आजुबाजुच्या घरातील लोकांनाही एकत्रीतरित्या त्याचा लाभ व्हावा.

सगळी लहान थोर मंडळी बातम्या ऐकायला जमत असत. (त्यावेळी रेडीयो हाच सोबती तेव्हा एफ. एम वगैरे यायचे होते. मुंबई "अ" आणि "ब" हिच काय ती दोन स्टेशन्स आणि आपली आवड, श्रुतिका, आंबटगोड, सकाळचे कॉफी हाऊस हे महत्वाचे कार्यक्रम मग नंतर कधीतरी बोक्या सातबंडे हा लहान मुलांचा कार्यक्रम चालु झाला होता. तो आम्ही आवडीने ऐकत असु.)
ते झालं की रात्री ७.३० ते ८.०० वा. मग लहान मुले ओळीने पहीले जेवायला बसत असु. (कारण इतर वेळी कोकणातील लोकांसाठी रात्रीचे ७.०० म्हणजे मध्यरात्र असायची पण मे महिन्यामध्ये तेच फार फार तर ९.३० पर्यंत जाग असायची कारण सकाळी बागेत शिंपण्याला जायला लागायचे.) गुरगुट्या मऊ भात, लोणचं, पापड (कधी पोह्याचे असायचे), मेतकूट, दही, लसणाचे तिखट (चटणी), कढी असा साधा बेत पण मस्त चवदार जेवण असायचे की एरवी न जेवणारी, कुरबुर करणारी आम्ही मुले इतर मुलांबरोबर म्हणुन की काय किंवा त्या केळीच्या पानावर वाढलेल्या चवदार जेवणामुळे काय भराभर जेवुन मोकळी व्हायचो.

आता कधी काळी दोन तीन वर्षातनं जाणं झालंच तर उभ्या उभ्या जाणं होतं. बहिणींची लग्न होवुन त्या सासरी गेलेल्या. भावंडांची लग्न होवुन ते सगळे आपआपल्या संसारात मग्न झालेली आहेत. बाकीची भावंडही जमेल तसे गावाकडे जावुन येतात. कोकणातील घराघरात आता मात्र घरटी २/३ माणसे उरलेली आहेत. ती सुद्धा म्हातारपणाने साफ थकलेली आणि काही घरं मात्र कुलुपं लागलेली बघायला मिळतात.

आता पाण्याचा पाट साफ सुकत चाललाय. दर निवडणुकीला पाण्याच्या प्रश्नावरुन नेते मंडळी आश्वासनांची खैरात करतात. गावकरी मात्र पाटामध्ये दर दोन फुट अंतरावर खड्डा खणुन साठलेलं पाणी पंपाने आपापल्या वाड्यापर्यंत नेण्याचा अट्टाहास करत आहेत. आणि पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला घराच्या अंगणातच विहिर खोदावी लागली. पण पाणी नाहीच आहे तिला. जेमतेम पिण्या पुरता पुरतं.
असो चालायचंच परिवर्तन संसार का नियम आहे असं म्हटलंय ना. ....
नुकतेच मे-२०१२ ला आम्ही सगळे आमचे गावाकडचे सगळ्यात मोठे मामा यांचा सहस्त्रदर्शन सोहळा केला तेव्हा ७० माणसे एकत्र जमलो होतो. चार दिवस नुसती मजा केली होती. आता आमच्या मुलांनी क्रिकेट, बॅडमिंटन, पत्ते, पकडापकडी असे खेळ खेळले आणि जी मजा केली ती पाहुन आम्हाला आमचे बालपण परत आठवले.
क्रमश:

वावरकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

1 Apr 2014 - 1:16 am | खटपट्या

आवडला!!!

कोकणी पुणेकर's picture

1 Apr 2014 - 12:32 pm | कोकणी पुणेकर

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलय. नोकर्या, पैसा उपलब्ध झालाय, पण यासाठी माणसाला फार मोठा त्याग करावा लागतो - वेळेचा,आपल्या माणसांच्या सहवासाचा.

मस्त लेख.

सौंदाळा's picture

16 Apr 2014 - 11:06 am | सौंदाळा

हा भागसुद्धा आवडला.
थोडं हळवं करुन गेला.

कंजूस's picture

17 Apr 2014 - 8:53 am | कंजूस

मस्तच हो .
लहानपणी फक्त अॅसेटस आणि रिसिवबलस माहित होती .घरी पोहोचल्यावर ताटात गरमागरम भात पापड लोणचे .नंतर ओढयात हुदडणे .मोठेपणी कळले लाएबिलिटिझ आणि पेअबल आहेत .म्हातारी माणसे वर्षभर घरे सांभाळतात तेव्हा सुटीत जायला आयती मजा करता येते .
आता काहींनी कोकणात घरे बांधली पण सुटीत गेल्यावर पहिली झाडलोट ,नंतर बिले भरणे झाल्यावर निघायची वेळ येते .