विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
26 Mar 2014 - 1:32 pm

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४4.

1

2
भगवान बुद्ध कमलासनावर ध्यानस्थ मुद्रेत

‘मी आत्महत्या करायला निघालोय.

....‘मी आत्महत्या करायला निघालोय. ... गेले काही महिन्यापासून अशा विमनस्क अवस्थेत मी आहे की आज जीव द्यावा की उद्या, गळफास लाऊन घ्यावा की लोहमार्गावर उडी घ्यावी इतकाच निर्णय उरलाय’. मी त्यांना न्याहाळत होतो. ते मजेत मुळीच बोलत नव्हते....
...तू जर हे यंत्र स्वतःसाठी पैसे मिळवायचे साधन म्हणून न मानता मानवतेच्या कल्याणासाठी तयार केले आहे असे म्हणतोस तर मग त्या यंत्रासाठी तुला आपला बळी द्यायचा अधिकार नाही....

विपश्यना केंद्रातील विविध घटनांत अनेकांच्या अनुभवाची भर तेंव्हा पडली, जेंव्हा साधकांना शिबिराच्या शेवटच्या म्हणजे दहाव्या दिवशी साधकांना बोलायला परवानगी देण्यात आली. एकेकांनी नावे व कर्तृत्व सांगायला सुरवात केली. काही जण गेली 20 वर्षे साधना करत होते. तर एकांची ही तिसाव्वीखेप होती. असे सांगताच आमच्यासारख्यां नवोदितांची छाती दडपली. पाच पेक्षा जास्त वेळा वर्णी लावलेले अनेक होते. पुण्याहून सारा नामक आलेल्या तरुणीची कमाल होती. ती जराही हालचाल न करता ती दोन दोन तास ध्यानात रंगलेली दिसे. मृदु हालचाली, खाली मान. मुद्दाम ओळख करून घेऊन मी माहिती घेतली तेंव्हा कळले की या बाईंनी मजा म्हणून सुरवात केली व आता घरी देखील त्या रोज समरसून साधना करतात. वेळोवेळी शिबिरात येऊन पुन्हा नव्याने प्रेरित होतात. यावेळी तर त्यानी सारख्या खोकणाऱ्या आपल्या सासूला बरोबर आणले होते.
रात्रीच्या पुज्य सत्यनारायण गोएंकांच्या प्रवचनात विषय होता - आता घरी गेलात की विचारणा सुरू होतील. काय कसे वाटले शिबिर? आमची आठवण येत होती का? कितपत झेपले?, काही अध्यात्मिक प्रगती झाली का? आदी... अशा प्रश्नांना कशी काय उत्तरे द्यायची याची गुरूकिल्लीही त्यांनी त्यात सांगितली. असो.
जीवन दुःखी व क्षणभंगुर आहे, राग-द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू, पाप-पुण्य म्हणजे काय? मुक्ती का हवी? जन्ममरणाचा फेरा, कर्मगती आदि शाब्दिक आडंबर कळत आहे असे वाटत राहाते. पण त्याचा अनुभव नसल्याने ती फक्त पोपटपंची होते. तेच प्रत्यक्षात आपल्या शरीराच्या माध्यमातून अनुभवले, जाणवले जाऊ शकते. भगवान गौतम बुद्धांनी विपश्यना (विशेषत्वाने आपल्या शरीरावरील संवेदनांना जाणत वा पहात राहाणे) ध्यान पद्धतीचा विकास करून सामान्यांना ही कला अवगत करता येते असे प्रत्यक्षात करून व करवून घेऊन दर्शवून दिले. आता पुढील मार्गातील प्रगती करणे आपल्या हाती.
ते म्हणाले, ‘शिबिरात साधना व प्रज्ञा यांचे पालन व प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करायची कला साधली. शीलाचा - भंग न व्हावा म्हणून – मौन, एकांत वास, भिक्षा पात्रातून म्हणून अन्न सेवन आदी प्राचीन परंपरेतील काही गोष्टींतून स्वतःच्या शरीराला अशा प्रकारच्या साधनेला तयार करायला पुरक वातावरण व मानसिक बळ मिळवणे आदि गोष्टी घडल्या असे आपण सांगू शकाल’.
घरातील काही लोक थटटा करतील, मित्रमंडळींना चेष्टेचा विषय मिळेल. काहींना धर्म बदलायसाठीची मखलाशी असे वाटेल. त्याकडे लक्ष दिले नाही तर त्यातून सुटका होते. असो.
साधकांना बोलायला परवानगी मिळाल्यावर, पुज्य गोएंकांच्या सुत्रबद्ध पद्धतीने रात्रीच्या कथनातून मानसिक बळ कसे मिळाले. काही साधकांनी कधी कधी श्वासावर थोडावेळ नियंत्रण करता आले तर आपल्याला फाजिल आत्मविश्वास कसा दगा देतो आदीची मजेशीर उदाहरणे सांगण्याला ऊत आला. अनुभव सांगायला मी इतरांना बोलते केले. प्रत्येकाला काय सांगू व काय नाही असे झाले व माझ्याभोवती गप्पांचा अड्डा जमला. रात्र जास्त झाली. पहाटे 4 वाजता (शेवटचे) उठायच्या धाकाने काही पांगले. त्या वेळी एकांनी मला जरा बाजूला नेले व म्हणाले, ‘का कुणास ठाऊक मला तुमच्याशी बोलावेसे वाटतेय म्हणून आपल्याला मी इकडे आणले’. अंधारी वेळ, अंधुक प्रकाशात मी त्याला पहात म्हटले, ‘हो जरूर बोला’.
ते हलक्या आवाजात सांगायला लागले...... मी लिपारे....
‘मी आत्महत्या करायला निघालोय. काही अर्थिक अडचणी इतक्या हाताबाहेरच्या थराला गेल्यात की आता मला यातून सुटका होणे शक्य नाही असे वाटते. गेले काही महिन्यापासून अशा विमनस्क अवस्थेत मी आहे की आज जीव द्यावा की उद्या, गळफास लाऊन घ्यावा की लोहमार्गावर उडी घ्यावी इतकाच निर्णय उरलाय’. मी त्यांना न्याहाळत होतो. ते मजेत मुळीच बोलत नव्हते.
घरच्यांची आपल्या पश्चात काय दैना होईल, ते नाहक वाताहतीचे जीवन जगायला ढकलले जातील. त्यांचा काय अपराध असे वाटून मी कोणाशी ही मनातील न बोलता कुढत दिवस काढतोय. मी हे आपल्याला का सांगतोय ते मला माहित नाही. तरीही आपल्याशी बोलावेसे वाटले.
मला त्यांच्या मनाचा अंदाज येईना. दहा दिवसाच्या विपश्यने नंतर या ग्रहस्थांच्या दुःखाच्या संवेदना इतक्या तीव्र का असाव्यात, त्याला अजून मनाला सांभाळता येऊ नयेत या मागे नक्कीच काहीतरी जबरदस्त कारण असले पाहिजे असे मी मनात म्हणत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोघ घेण्याचा प्रयत्न करत होतो.
‘असे काय घडले की इतकी अटीतटीची वेळ यावी आपल्यावर? मी विचारुन कोंडी तोडायचा प्रश्न केला.
‘लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असणे त्रासदायक नाही. पण ते फेडायचे सर्व मार्ग खुटलेत. मित्रांनी, नातलगांनी शक्य तेवढी मदत केली. काही भार कमी झाला. पण त्या रकमेवरील व्याज लाखोच्या घरात गेले आहे’. त्यांनी मनाचा एक कवडसा उघडला.
‘बर मी फाटका म्हणावा तसाही नाही. शिवाय मला अशी कला व तंत्रज्ञान माहित आहे की त्यावर मी करोडो रुपये निर्माण करू शकतो. पण ही सध्याची वेळ निभावणे मला असह्य झाले आहे’.
आपण मग शिबिराला कसे काय आलात?
त्यावर ते म्हणाले, ‘शिबिराबद्दल मी ऐकून होतो की साधनेमुळे काहींच्या मनस्थितीत फरक पडतो. जगाकडे पहायच्या दृष्टीत बदल होतो, असे ही मी वाचले होते. जायच्या आधी निदान हा प्रयत्न तर करू असे वाटून मी इथे आलो. पण मौन वगैरेमुळे सुरवातीला मनातील कोंडमारा वाढायला लागला. साधनेच्या काळात आधार वाटला की यातून मार्ग निघेल. पण उद्या इथून जायची वेळ आली तरी ही पाय मागे घेण्याचा निश्चय होत नाही’.
मी आपली काय मदत करू शकतो? असे हलक्या आवाजात विचारून मनाचा थांग लागतोय का ते पहात मी म्हटले. तेवढ्यात कोणी जवळ आल्यासारखे झाले व त्या ग्रहस्थांनी माझा हात हातात घेऊन पुन्हा जरा बाजूला नेले. ‘काय आहे की मी एक कल्पक उद्योजक आहे. मी असे एक यंत्र निर्माण केले आहे कि ज्यामुळे काही क्रांतिकारी लाभ संपुर्ण भारताला नव्हे जगाला होतील. त्यासाठी मी अत्यंत खबरदारीपुर्वक आयोजन करून अत्यंत गुप्त रीतीने त्याच्या चाचण्याघेऊन त्या यशस्वी केल्या’.
आपण त्याचे पेटंट मिळवायची सोय केली आहेत ना? असे मी विचारता ते म्हणाले, ‘हो ती मला सर्व माहिती आहे. पेटंट मिळवायला लागणारी खटपटी करून तयारी झाली. पण त्याला लागणारा लाखोंचा खर्च मला सध्या आवाक्या बाहेरचा आहे.
त्यांनी मला थोडक्यात त्या यंत्राबाबत सांगायला सुरवात केली. जरा कल्पना आली तशी त्यावर मी त्यांना अडवून म्हटले, ‘आपण मला त्याबाबत काहीही सांगू नये. कारण ते ज्ञान आपले आहे. ते आपल्यापाशीच सुरक्षित राहावे’.
‘खरे आहे’ असे म्हणून त्यांनी सांगणे आवरते घेतले.
‘जर तुम्ही आत्मघाताचा निर्णय घेतलेला असेल तर कोणीही आपल्याला परावृत्त करू शकणार नाही’. मी माझे मन मोकळे केले. मात्र एकदम सांगावेसे वाटले ते सांगतो. आपण त्या यंत्राच्या कार्यप्रणालीबाबत एक फाईल तयार करा. त्यात ते यंत्र कसे चालते, त्याच्या तांत्रिक बाजू काय आहेत, त्यातील महत्वाची कामे करणारी केंद्रे कोणती यांचा सर्वच्या सर्व बारीकसारीक तपशील लिहून काढा. फोटो काढा. शक्य असेल तर व्हीडिओ शूटिंग करा. तेही अगदी सीक्रेट पद्धतीने’.
‘असे काही मी अजून केलेले नाही. पण आपली कल्पना अमलात आणायसारखी आहे’. ते म्हणाले.
‘धन्यवाद असे सांगितल्याबद्दल’. माझा हात हातात घेत मग ते म्हणाले, ‘का कोणास ठाऊक मला शिबिरात आल्यावर असे सारखे वाटत होते की कोणी एकजण मला असे भेटतील का की त्यामुळे मला इथे आल्याचे समाधान राहील’.
मी मनात म्हटले की याला त्याच्या भीषण अडचणीत अर्थिक मदत करणे माझ्याकरिता शक्य नाही. मग काय बरे करता येईल कि त्यामुळे त्याचे मन वळेल?
तोंडातून आपसुक शब्द निघाले, ‘मित्रा, तू आत्मनाश करावास याचे वाईट वाटते. घरचे तुझ्या पश्चात मरणार नाहीत. जिकिरीचे जीवन जगून आपापले मार्ग शोधतील. काही काळाने तुला विसरतील. पण एक गोष्ट तुला कधीच माफ करणार नाही. ती म्हणजे तू बनवलेले यंत्र. ती तुझी निर्मिती आहे. त्याला टाकून तू असा गेलास तर त्याला पोरके केल्याचे पाप तुला लागेल. तू जर हे यंत्र स्वतःसाठी पैसे मिळवायचे साधन म्हणून न मानता मानवतेच्या कल्याणासाठी तयार केले आहे असे म्हणतोस तर मग त्या यंत्रासाठी तुला आपला बळी द्यायचा अधिकार नाही....
त्याची हातावरील पकड अधिक घट्ट झाली. ‘खर आहे, खर आहे’. असे तो पुटपुटला. मी त्याच्या खांद्याला हळुवार स्पर्ष करून थोपटले... चलतो म्हणून बाजूला झालो....
.....पहाटे निरव शांततेत घंटेच्या टोल्यांनी आपले मौन सोडले. आणि दहा दिवसांच्या या मौनयात्रेतील आठवणींचे गाठोडे उराशी धरून धम्मशालेच्या परिसरातून निघायला सामानाची बांधाबांध सुरू झाली. नव्या उत्साहाने, जोमाने. शरीर व मनाच्या निष्चयाने. आता मला जनसेवा अधिक जोमाने करायची आहे......

अंतिम भाग 5 पुढे चालू

शिक्षणविरंगुळा

प्रतिक्रिया

त्या साधकास मौनव्रत सोडून तुमच्याशी मोकळेपणाने समस्या मांडल्यावर बरे वाटू लागले याचा आनंद झाला .शिवाय दहा दिवसांत थोडेफार मानसिक बळही मिळाले .कोणाला कुठे गुरु मिळेल ते सांगता येत नाही .

मला वाटतं सतत बोलत राहाण्याने चर्चा फार होते आणि आत्मशक्तीची बारूद एकदम धडाका न होता फक्त सूरसूर जळत राहाते .किल्याला भगदाड पाडू शकत नाही .

शशिकांत ओक's picture

26 Mar 2014 - 5:06 pm | शशिकांत ओक

मीच कारण मीच कर्ता या परिस्थितिची जाणीव होणे हे अशा शिबिराचे बलस्थान वाटते.
कोण काय काय ओझी घेऊन येतात हे कळताच अध्यात्मिक प्रगती होण्यापूर्वीची ही मानगुटीवरील जोखडं उतरायला हे मौन, ध्यान, उपयोगी पडले तर?

विलासराव's picture

27 Mar 2014 - 12:09 am | विलासराव

मी सप्टेबर १३ ला सेवा दिलीय धम्मालय मधे.
मला विपश्यनेचा खुप लाभ झालाय.
३ वर्षापुर्वी पहीला कोर्स केला.
तेव्हापासुन नियमीत साधना करतोय.
घरी नियमीत साधना करावी लागते.अन्यथा फारसा लाभ होत नाही.

शशिकांत ओक's picture

27 Mar 2014 - 2:29 am | शशिकांत ओक

विलास राव.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या लिखाणात त्रुटी असल्याचे वाटल्यास दर्शवाव्यात . आपल्या आलेले अनुभव. वरील घटनेवर आपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

2 Apr 2014 - 12:12 pm | शशिकांत ओक

सन 2010 मधे लिमाउजेट यांनी विपस्यनेच्या त्यांच्या अनुभवांचे सुंदर सादरीकरण केले होते. असे त्यांनी मला नुकतेच माझ्या भाग एक धाग्यातील प्रतिसादातून कळवले. त्या लिंक्स भाग 1 ते 4 वाचनार्थ या धाग्याच्या वाचकांसाठी देत आहे.

कवितानागेश's picture

3 Apr 2014 - 8:30 pm | कवितानागेश

धन्यवाद. :)

शिलेदार's picture

3 Apr 2014 - 2:49 pm | शिलेदार

धन्यवाद!! पुढिल भागाची वाट पाहत आहोत

शशिकांत ओक's picture

17 Apr 2014 - 9:58 am | शशिकांत ओक

‘मित्रा, तू आत्मनाश करावास याचे वाईट वाटते. घरचे तुझ्या पश्चात मरणार नाहीत. जिकिरीचे जीवन जगून आपापले मार्ग शोधतील. काही काळाने तुला विसरतील. पण एक गोष्ट तुला कधीच माफ करणार नाही. ती म्हणजे तू बनवलेले यंत्र. ती तुझी निर्मिती आहे. त्याला टाकून तू असा गेलास तर त्याला पोरके केल्याचे पाप तुला लागेल. तू जर हे यंत्र स्वतःसाठी पैसे मिळवायचे साधन म्हणून न मानता मानवतेच्या कल्याणासाठी तयार केले आहे असे म्हणतोस तर मग त्या यंत्रासाठी तुला आपला बळी द्यायचा अधिकार नाही....

या वक्तव्यायावर आपले विचार समजून घ्यायला आवडेल.