आय लव्ह यू (३)......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Feb 2014 - 3:07 pm

मागील दुवा
आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966
आय लव्ह यू (२).... http://misalpav.com/node/27011

ढगाळलेल्या आकाशात सोनेरी सूर्य प्रकाश पडलाय. एकाच वेळेस सोळासतरा इंद्रधनुष्ये दिसायला लागलीत गेटजवळचा गुलमोहोर बहरुन फुललाय . प्राजक्त पांढर्‍या फुलांचे चांदणे ल्यायलाय. सोनचाफ्याच्या फुलांचा सडा पडला असावा असा उत्फुल्ल सुगंध दरवळतोय. सकाळनगरचे गेट फुलांनी मढवून टाकयला हवे. आनंदाने मला पिसे लागेल असे वाटतय.
मला रश्मीला कडकडुन मिठी माराविशी वाटतेय. मी वेड्यासारखा नुसताच हसत उभा आहे.
साला आपल्याला भावना सुद्धा व्यक्त करता येत नाहीत.
रश्मी.... "रिमझीम" रश्मी माझ्या समोर उभी आहे.... इतक्या महिन्यांनन्तर.........

आम्ही दोघेही येड्यासारखे हसतोय. सकाळनगरच्या गेटवरचा चहावाला आमच्याकडे ""याना बहुतेक येड लागलय" अशा नजरेने बघतोय.
ओह रश्मी व्हॉट अ सरप्राईज..... तू आत्ता इथे कशी..इतक्या दिवस कुठे होतीस ?.....माझा फोन तुला कसा मिळाला? इतक्या महिन्यांनन्तर आत्ता आठवण झाली तुला ? तुझा पत्ता नाही... फोन नाही. कुठे होतीस कुठे तू?
अरे हो हो............ सगळं सांगते तुला.....
मला घरी तर घेवून चल का इथेच बोलणार आहेस सगळे.
रश्मी.......
काय
रश्मी....... घरी म्हणजे.......
काय? घरी म्हणजे काय?
घरात खूप पसारा आहे..तुला चालेल?.
मला नाही फरक पडत...... माहीत आहे मला. कोल्हापुरला तुमच्याकडे आले होते तेंव्हा तुझी रूम पाहिली होती..... सगळीकडे पुस्तकंच पुस्तकं होती. बेडवरसुद्धा तीनचार पुस्तकं होती. अजून तस्साच रहातोस? तुझ्यात काहीच बदल झालेला नाहिय्ये.
हो.आणि तुझ्यात ? ........ मी रश्मीच्या गळ्याकडे पाहिले.गळ्यात मंगळसूत्र बाहिय्ये . ( पण ही काही १००% कन्फर्मेशन्ची खूण नव्हे. )
माझ्यात .तुला काही बदल जाणवतोय काही?
आत्ताच भेटतोय ना. थोड्यावेळाने नीट जाणवेल ....... पण तू सुद्धा तशीच दिसते आहेस तेंव्हा जशी भेटली होतीस तशीच...... (खरं बोलायचं तर थोडिशी जरा अधीक क्यूटच दिसत होती. पण त्यावेळी दिसायची तशी शाळकरी वाटत नव्हती. कदाचित मधे चार वर्षे गेल्याचा परीणाम असेल )
गाडी कुठे पार्क करायची.....
आत घे ना. बिल्डिंगच्या खाली पार्किंग आहे..हे समोरच्या रस्त्यावरुन सरळ आत घे. एकदम शेवटची बिल्डिंग.
...................................................................................................................................................................
रश्मी येणार हे माहीत असते ना तर मेन गेटपर्यन्तचा रस्ता फुलानी मढवून टाकला असता.
पण ही इथे आली कशी? कुठून आली? हिला इथला पत्ता कसा मिळाला? कुणाकडून मिळवला असेल? का मी स्वप्नात आहे?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी फ्लॅटचे दार उघडतो . या मॅडम.... बसा .तुम्ही एकदम आश्चर्यचा धक्का दिलात. चहा चालेल ना?
चालेल ना म्हणजे? तू आता पक्का पुणेकर झालास की ! चालेल ना? चालेल ...पळेल.
मी स्वयंपाक घरात जाऊन चहा टाकतो. सकाळचं चहाचं भांडं तशीच पडली आहे. मी चहा टाकतो. रश्मी आत येते.
हम्म,, आल्याचा चहा....... माझी आवड तुझ्या लक्षात आहे तर. आल्याचा चहा म्हंटलं की मला काय आठवतं माहीत आहे तुला?
काय?
आपण एकदा लॉ कॉलेजच्या टेकडीवर गेलो होतो. भुरभुरणार्‍या पावसात... तु थर्मास मधे आल्याचा चहा घेवून आला होतास..
हो.....
त्या क्षणाच्या आठवणी मुळे मी चार वर्षे मागे जातो.आठवणी कधी एकट्या येत नाहीत. त्या सोबत इतरही काही बरेच घेवुन येतात. असंख्य क्षण .....चांगले आणि वाईट ही .... स्वप्नात रमवणारे अन धप्पकन जमिनीवर आणणारे सुध्दा.
लॉ कॉलेजची टेकडी. भुरभुरणारा पाऊस किंचीत धुके. शिरशिरी आणणारी थंडी......
गृपचा माळशेज ट्रेक......
पावसाळ्यात कात्रज सिंहगड ट्रेक........
सवाईची ती सुरांच्या सहवासात जागू काढलेली रात्र........
पर्वतीवरच्या बागेत पहाटे फुललेलं प्राजक्ताचं झाड..........
नवरात्रात च:श्रुंगीच्या देवीचे लखलखीत डोळे पहायला गेलो होतो ......

नेहमीसारखाच.... आजही आठवणींचा प्रवास माझ्या आणि रश्मीच्या शेवटच्या भेटीपर्यन्त येतो.

रश्मी आपली ओळख होउन वर्ष झाले असेल नाही?
असेल की? का?
नाही असंच
असंच म्हणजे?
काही नाही गं.
काही नाही म्हणजे? तुला टेन्शन आलंय का? आपली ओळख होउन वर्षे झालं याचं
रश्मी......
काय?
रश्मी.....
काय? ऐकतेय. बोल
रश्मी मला तुला काही सांगायचं आहे?
सांग.
माझं हे इंजीनियरिंगचे शेवटचे वर्ष आहे.
हे सांगायचे आहे ? मग हे मला माहीत आहे.
रश्मी तु रागावणार तर नाहीस ना?
कशाला?
नाही मी तुला काही विचारणार आहे. तुला राग आला तर मी एक मैत्रीण दुरावेन.
तसे असेल तर मग नको सांगूस...
अं??
अरे तू मला मित्र म्हणतोस ना मग संकोच कसला करतोस?
नाही पण.....
गो अहेड बिंधास्त सांग.
रश्मी......
अरे सांग ना .......का मी सांगू तुझ्या ऐवजी?
नाही मी सांगतो.... (माझ्या छातीचे ठोके मैलभर ऐकु जातील इतके मोठ्याने पडताहेत..) रश्मी तु मला आवडतेस.
माहीत आहे मला.
काय?
हो माहीत आहे मला. मी तुला आवडते ते. हेच सांगणार होतास?
अं हो म्हणजे नाही म्हणजे हो........ नाही म्हणजे तसं नाही पण हो म्हणजे त्याचं असंय की...... तुला माझा राग आलाय?
नाही
मी जे विचारले ते विसरून जा? तसं माझ्या मनात काही नाहिय्ये. पण म्हणजे की.
झालं तुझं बोलून.
रश्मी.... प्लीज रागावू नकोस.
मी अजिबात रागावले नाहिय्ये.
पण मग तु असं का म्हणालीस? की तुला माहिती आहे की तु मला आवडतेस म्हणून
जर माहीत असेल तर माहीत नाही कस्ं म्हणू?
मला ही प्रतिक्रीया अपेक्षीत नव्हती.
म्हणजे मग कुठली प्रतिक्रीया अपेक्षीत होती? मी लाजेन, माझा चेहेरा एकदम लाल होईल वगैरे वगैरे.. मागे कुठेतरी संतुर नाही तर सतारीचे म्यूझीक वाजेल...
नाही गं. इतकी टोकाची नाही पण तू थोडिशी लाजशील वगैरे. अन म्हणशील मी ही तुला आवडतो म्हणून.
ते ही मला माहीत आहे?
म्हणजे?
म्हणजे वाघाचे पंजे... मी तुला जशी आवडते तसा तूही मला आवडतोस. आपण पहिल्यांदा जेंव्हा त्या स्पर्धेत भेटलो होतो तेंव्हा मला तुझं भाषण तुझे मुद्दे मांडायची स्टाईल खूप आवडली होती. तुझे भरपूर वाचन जाणवले होते.
दुसर्‍याची मते खोडून काढताना मुद्देसूद बोलला होतास ते मला आवडले होते. आठवतंय तुझी मी त्यावेळेस अभिनन्दन केले होतेस.
अन दुसर्‍या स्पर्धेच्या वेळेस तू माझ्याकडे सारखा पहात होतास ते माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्यानंतर तु आमच्या कॉलेजवर आला होतास. रेगे मॅडम ना भेटायचं निमित्त काढून मला भेटायला आला होतास.
म्हणजे ते तुला कळालं होतं?
हो. कारण आमच्या कॉलेजवर कोणी रेगे नावाच्या मॅडम नव्हत्याच मुळी.
नंतर तू पुन्हा तीनचार वेळेस कॉलेजवर आला होतास. कॉलेजच्या गेटबाहेर थांबायचास. ते आमच्या गृपमधे सगळ्याना माहीत होते. मला तुझे बोलणे आवडायचे तुझे वाचन आवडायचे.गृपमधले सगळे चिडवायचे मला. तुझ्यावरून. आपण सारखे भेटायचो , फिरायचो हे सुद्धा त्याना माहीत होतं.
आणि हे तू आत्ता सांगते आहेस ?
सगळ्या गोष्टी बोलुन दाखवायलाच हव्यात का? अरे आपल्या बॉडीलँग्वेजवरुन कोणीही ओळखू शकले असते हे.
नाही म्हणजे हे माझे इंजिनियरिंगचे शेवटचे वर्ष आहे. या नंतर कुठे असेन नोकरी कुठे मिळेल हे माहीत नाही.
मग?
रश्मी ...... मला असं म्हणायचं आहे.....
लग्ना बद्दल विचारणार आहेस?
(अरे बापरे...... एकदम थेट यॉर्कर...)
विचार ना?
नाही म्हणजे........ ( मी यॉर्कर स्ट्रेट बॅटने डिफेन्सिव्ह प्ले करायचा प्रयत्न करतोय)
म्हणजे काय? विचार ना ! का मी विचारु?
नको ! विचारतो. आपण लग्नं करायचं?
पप्पाना विचारशील हे...( या प्रश्नाची तयारीच केली नव्हती. यशराज चोप्रांच्या कुठल्याच फिल्म मधे अशी सिच्यूएशन नाहिय्ये.)
रश्मी मला थोडा वेळ दे.
का?
मी त्याना एकदम कसा विचारु? अन त्यानी मला विचारलं की लग्नानंतर माझ्या मुलीला कुठे ठेवशील म्हणून? तर काय उत्तर देऊ मी. एकतर माझं शिक्षण अजून पूर्ण नाही. स्वत:च्या पायावर उभा नाहिय्ये? पण आपण आत्ता कुठे करतोय लग्नं.
बोलणं सोप्पं आहे. पण निभावणं अवघड असतं रे. त्यातून आमचा समाज लहान. पप्पाना ती काळजी आहे. कालच मी बोलले पप्पांशी.
काय बोललीस?
विनय तुला माहीत आहे मी तुमच्याकडे कोल्हापुरला आले होते तेंव्हा काय झालं ते?
काय?
आईना मी खूप आवडले होते. त्यानीच मला तसं सांगितलं होतं. म्हणाल्या की तू खूप चांगली आहेस. तुझ्या सारखी सून आवडेल म्हणून. येताना त्यानी मला बांगड्या दिल्या.
हे मला नव्हतं माहीत.
ऐक ना. मी इकडे पुण्याला घरी आले तेंव्हा पप्पाना मी हे सांगितले. पप्पाना देखील तू पसंत आहेस.
पण पप्पा म्हणाले की आत्ताच त्याला असं सांगू नकोस. अजून त्याचं करीयर सुरू व्हायचं आहे. आत्ताच करीयरच्या सुरवातीलाच लग्न वगैरे केलंस तर विनयचे करीयर बिघडेल.
मग काय म्हणालीस तू?
अगोदर राग आला पण नंतर पटले त्यांचे. स्वतःच्या पायावर उभा रहा. विनय मला तू पप्पांच्या समोर अभिमानाने उभा राहीलेला हवा आहेस. चांगली नोकरी असलेला . स्वतःच्या पायावर खंबीर उभा असलेला. आपल्या लग्नासाठी परवानगी विचारताना तू त्याना ताठ मानेने विचार . त्याना कळू देत त्यांची मुलगी चांगल्या कर्तृत्वचान मुलाशी लग्न करतेय. समाजात त्यानाही थाठ मानेने जगायचे आहे..............तुला माझा राग आला असेल ना?
.
ए बोल ना..... तुला राग आला ना माझा.?
नाही गं.. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझे तेच विचार आहेत.पण रश्मी मला नोकरी लागू रुळायला निदान तीन चार वर्षे तरी लागतील. तोपर्यन्त तू .........
मी थांबेन तुझासाठी ..
अन मी यशस्वी नाही झालो तर?
असं का म्हणतोस?
या वर्षी कँपस मधून कोणालाच जॉबची ऑफर मिळाली नाही. रीसेशन आहे.
तो प्रश्न तू सोडवायचा आहेस. यशस्वी होणे हे तुझ्याच हातात आहे. त्यावरच पुढचं सगळं अवलंबून आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझी पुढे काही बोलण्याची इच्छा तिथेच संपली.
त्या संध्याकाळी रूमवर गेलो. सम्पूर्ण रात्र झोपु शकलो नाही. कोणीतरी कानशीलात खाडकन मारावी तसे काहीसे वाटत होते.
मी कोण आहे? अमक्याचा तमका? की एक व्यर्थ अनामिक? जगात तुम्ही कोण आहात हे तुम्ही कमावलेल्या पैशावर ठरते.याची जाणीव कधीनव्हे ते इतक्या प्रकर्षाने झाली होती. यू आर नोन बाय व्हॉट यू डू....... अपमान झाला नव्हता पण आत काहीतरी पेटले होते.
रश्मीला आता भेटायचेसुद्धा नाही. पुढच्या महीन्यात परिक्षा आहे. जीव तोडून अभ्यास करेन.चांगले मार्क्स मिळवेन. चांगला जॉब मिळवेन स्वतःच्या पायावर उभा राहीन अन तिला दाखवून देईन. मी इरेला पेटलोय
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जॉब लागला. पहीला पगार....झालाय. रश्मीला फोन करून सांगुयात..... तिचा फोन नॉट अव्हेलेबल येतोय.घरचा फोन आउट ऑफ सव्हीस.......
संध्याकाळी तिच्या घरी गेलो....घराला भले मोठे कुलूप....... वडीलांची बदली झाल्यामुळे त्यांची सगळी फॅमिली कुठेतरी दुसर्‍या शहरात शिफ्ट झालेय..... त्यांच्या बँकेत विचारुन कळू शकेल ते कुठे गेले हे. पण मग रश्मीने हे मला का कळवले नाही? माझ्या समोर घराच्या कुलुपा पेक्षा मोठे प्रश्नचिन्ह . पुढे काय?
रश्मी चॅप्टर क्लोज...................
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापुरच्या पत्यावर एकदा एक पाकीट आले.
पाकिटात एक कोरा कागद. कागदावर फक्त एक वाक्य " आय बीलीव्ह इन यू मोअर दॅन यू बिलीव्ह इन यू"
कोणी पाठवले माहीत नाही. ......... बहुतेक रश्मी असेल....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बर्‍याच प्रतीक्षेनंतर. सात आठ इंटर्व्ह्यूज नंतर जॉब मिळाला .प्रत्येक महिन्यात पगार झाला की सारस बागेत कट्ट्यावर मी एक गुलाबाचे फूल ठेवून येतो. सारसबागच कशाला ज्या ज्याठीकाणी आम्ही भेटलो तिथे तिथे मी एक गुलाबाचे फूल ठेवून येतो. रश्मीच्या आठवणी साठी.लोक वेड्यासारखे बघतात माझ्याकडे. पण आता त्यानाही सवय झाली आहे.
चार वर्षे झाली. रश्मी माझ्या आयूष्यातून गेली. पुस्तकं वाचणंही सोडून दिलंय मी. कशातच मन रमत नाही. प्रोजेक्टचे कामच इतके असते की त्यापुढे कशालाच वेळ मिळत नाही. एका अर्थाने ते बरेच आहे म्हणा. डोकं रीकामं राहीलं की रश्मी शिवाय दुसरे काहीच सुचत नाही..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी विचारात गुंग होतो. चहासाठी ठेवलेलं दूध उकळून उतु गेलं होतं......
ए..... काय झालं...... बहुतेक उतू गेलेल्या दुधाचा वास आला असावा रश्मी किचन मधे धावत आली.
अरे दूध उतू गेलं की.
अरे खरंच की... नादात मी विसरलोच.
कसाला विचार करत होतास?
दुसरा कसला करणार? तुझाच विचार करत होतो.
मी इथे असताना माझा विचार करतोस. ........ अजून तस्साच आहेस. तुझा राग गेलेला दिसत नाही अजून.
कसला राग? अन कुणावर रागावयचं. जे लोक आपले असतात त्यांच्यावर कशाला रागवेन.
ओक्के....म्हणजे राग अजून गेलेला नाहिय्ये. ठेव तो चहा बाजूला. माझ्याकडे बघ.
काय.
बघ मी तुझ्या घरी आलेय. आणि तुझ्याशी बोलतेय.
रश्मी एक सांग तू अचानक गायब झालीस. तुझा पत्ताही न कळवता. त्यानंतर आत्ता भेटते आहेस. तुम्ही शहर सोडलेय हे कळाल्यावर माझी काय अवस्था झाली असेल तुला माहिती आहे?
ओक्के ओक्के. ओक्के.. आत्ता कळालं मला. ऐक सांगते सगळं.
सांग.
हे बघ माझं कॉलेज पूर्ण झालं होतं. मॅनेजमेंट एन्ट्रन्स साठी कोचिंगला मी दोन महिने इंदोर ला गेले होते. त्याचे वेळेस पप्पांची बदली झाली. बंगलोर ला. दरम्यान तुझीही परिक्षा संपली होती. आणि तू इन्टर्व्ह्यू साठी कुठेतरी गेला होतास. मी कोल्हापूरला घरी फोन केला होता. आई भेटल्या. त्याना मी सगळे सांगितले. त्या म्हणाल्या म्हणजे एकूण प्लॅनप्रमाणेच चाललय तर?
म्हणजे?
ते नंतर सांगते. दरम्यान मलाही एम बी ए ला अ‍ॅडमिशन मिळाली. एम बी ए केले. जॉबही मिळाला. मिडीया एजन्सीत.
आणि?
आणि काय. मी जॉब जोईन केला आता मी स्थिर स्थावर आहे.
आणि. ( लग्न झाले आहे का? बहुतेक नसावे....)
आणि काय? आणि काहीही नाही. तुझ्याबद्दलच्या सगळ्या बातम्या मला आईंकडून समजायच्या. मी त्याना नेहमी फोन करायचे. तुझा जॉब , कंपनी , नवे प्रोजेक्टस , असाइनमेंट्स, तुझी अप्रेझलस. सगळं विचारायचे. मला अभिमान वाटायचा तुझा. तू मघाशी विचारलेस ना की मला तुझा पत्ता कसा कळाला ते. हे त्याचं उत्तर.
म्हणजे आईला हे ठाऊक होतं? कसला प्लॅन होता तुमचा?
हो . मी कोल्हापुरला आले होते ना तुमच्याकडे त्यावेळेस आईंसोबत देवीच्या दर्शनाला गेले होते. आईनी माझ्या बद्दल विचारले. मला तू कसा वाटतोस हे सुद्धा विचारले मी सुद्धा त्याना मोकळेपणाने सगळे सांगितले. त्यानी माझ्या तोंडावरुन हात फिरवला म्हणाल्या तू समजूतदार आहेस. विनय चांगला आहे पण थोडा अजून अल्लड आहे. पुस्तके, मित्र , नाटक,गाणे ,ट्रेकिंग यातच तो जास्त रमतोय. हे सगळे म्हणजे आयूष्य नव्हे. करीयरचा विचार त्याने किती गंभीरपणे घेतलाय हे माहीत नाही .त्याला थोडासा धक्का दिला तर तो जागा होईल अन करीअरचा विचार करायला लागेल. तुमचे चांगले व्हावे म्हणून सांगतेय. त्याचे नोकरीचे बस्तान ठीक झाले की विचारते मी त्याला लग्नासाठी.
आईनीच मला तुला स्वतःच्या पायावर उभे रहायचा सल्ला दिला. अन त्यासाठी तुझ्यापासून काही दिवस दूर रहायला सांगितले. अनायसे मला एम बी ए ला अ‍ॅडमिशन मिळालीच होती. मी दूर होते पण तुझ्या प्रत्येक गोष्टीची मला माहिती असायची.
एक विचारु?
विचार.
मला याची कल्पना का नाही दिलीस? माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे तुला? तू इथे नाहीस कळाल्यावर मोडून पडलो होतो मी
तू इतक्या सहजासहजी मोडून पडणार्‍यापैकी नाहीस. आय बीलीव्ह इन यू मोअर दॅन यू बिलीव्ह इन यू. मला तुझ्यावर पूर्ण विष्वास होता.
म्हणजे ते पत्र तू पाठवलं होतस.
हो. माझ्याने रहावलं नाही म्हणून. अन हे बघ मी तुला लिहीलेली पण न पाठवलेली पत्रं. रश्मीने तिच्या हँडबॅग मधून कागदांचा एक गठ्ठा काढला . तिने मला लिहीलेली पत्रे? माझा विश्वास बसत नव्हता.
रश्मी ......रश्मी ही तु मला लिहीली आहेत सगळी पत्रं.
हो दर आठवड्याला लिहायचे... तुला मुद्दामच पाठवली नाहीत.मला तुला डिस्टर्ब करायचे नव्हते. तु माझ्या बाबतीत किती हळवा आहेस हे मला माहीत होते.
रश्मी माझ्याकडे पहात होती. तिच्या चेहेर्‍यावर ते नेहमीचे चिरपरीचीत स्माईल होते.
विनय....
काय?
विनय एक विचारु?
काय?
मी आता माझ्या पायावर उभी आहे.
बैस की सोफा रीकामाच आहे. मी तिच्या त्या पत्रांच्या गठ्ठ्यात गुंग होतो.
ए चेष्टा नको करूस माझी. मी सिरीयसली बोलतेय. तू तुझ्या पायावर उभा आहेस हे मला माहीत आहे. मी सुद्धा आता स्वतन्त्र आहे. उत्तम शिक्षण आहे जॉब आहे. तुला एक विचारू?
विचार ना इतके आढेवेढे कशाला घेतेस.
दोन गोष्टी आहेत. एकाचे उत्तर माहीत आहे दुसर्‍याचे माहीत नाही म्हणून भिती वाटते.
विचार ना.
मला तू आवडतोस. पूर्वीपेक्षाही खूप जास्त. . मीच तुला प्रपोज करतेय आता. माझ्याशी लग्न करशील?
तुझ्या पहिल्या गोष्टीचे जे उत्तर आहे तेच दुसर्‍याचेही आहे.
बाहेर पावसाला सुरवात झाली होती. पाऊस रिमझिमत होता बाहेर आणि आमच्या दोघांच्या मनातही.
यशराज फिल्म च्या पिक्चरमधे गाण्याला या पेक्षा अधीक योग्य सिच्यूएशन कोणती असणार होती.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Feb 2014 - 6:26 pm | यशोधरा

कित्ती मस्त :) हॅपीली एव्हर आफ्टर!

प्यारे१'s picture

16 Feb 2014 - 7:02 pm | प्यारे१

सुंदरच!

दोन भागांमध्ये वाढवलेली उत्सुकता नि तरंगतेपण कायम ठेवत त्याच हळूवारपणं अलगद सार्थ शेवटाकडं नेऊन पोचवलीत.

हॅट्स ऑफ विजुभौ! तुम्हाला एक पार्टी लागू.

(१४ फेब्रुवारी हुकल्याबद्दल चखणा तुमचा तुम्ही घ्यायचा ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2014 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, पुढं काय होतं म्हणून टेंशन येत होतं. शेवट चांगला केला वो विजू भौ. :)
औरंगाबादला आल्यावर आमच्याकडून एवढी एक भेट स्वीकारा... ;)

-दिलीप बिरुटे

बाबा पाटील's picture

16 Feb 2014 - 8:36 pm | बाबा पाटील

एक नंबर....!

भटक्य आणि उनाड's picture

16 Feb 2014 - 11:21 pm | भटक्य आणि उनाड

दिलखेचक लिहीलय... मजा आलि वाचुन...

हमार सोलवा युटेन्सिलवा मे फेल गया एकदाचा.

जबराट आवडलं हेवेसांनल विजुभौ!

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2014 - 11:40 pm | तुमचा अभिषेक

पहिल्या भागातील चांगल्या सुरुवातीनंतर दुसर्‍या भागात फार काही हाती लागले नव्हते, पण हा भाग मात्र छान पैलतीराला लावलात :)

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2014 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! विजुभाऊ तुम्हाला घरी 'विनय' म्हणतात? ही नविन माहिती मिळाली. वहिनिंचं माहेरचं नांव 'रश्मी' आहे तर.

एकूणातच लिखान मस्स्स्स्तं झालं आहे. अभिनंदन.

विजुभाऊ's picture

18 Feb 2014 - 10:42 am | विजुभाऊ

पेठकर काका
नावात काय आहे हो?
हे मी विनयाने लिहीलंय.

खटपट्या's picture

18 Feb 2014 - 11:06 am | खटपट्या

जबरा

माजगावकर's picture

18 Feb 2014 - 11:49 am | माजगावकर

मस्त शेवट... मस्त लिखाण! आवडेश!

इन्दुसुता's picture

19 Feb 2014 - 10:12 am | इन्दुसुता

कथा आवडली.

विजुभाऊ's picture

19 Feb 2014 - 11:47 pm | विजुभाऊ

सर्वांचे धन्यवाद...........
तुम्हा लोकांच्या प्रोत्साहाने मला इथे लिहायची प्रेरणा मिळते :)

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2014 - 2:03 am | पिवळा डांबिस

चांगला उतरलाय शेवट!
कथा आवडली.

पद्मश्री चित्रे's picture

20 Feb 2014 - 9:52 am | पद्मश्री चित्रे

छान कथा

भाते's picture

20 Feb 2014 - 3:53 pm | भाते

तिन्ही भाग एकत्र वाचुन काढल्यावर एकत्रित कथा छान वाटली.

ब़जरबट्टू's picture

21 Apr 2014 - 4:48 pm | ब़जरबट्टू

आवडली.... पण...

वडीलांची बदली झाल्यामुळे त्यांची सगळी फॅमिली कुठेतरी दुसर्‍या शहरात शिफ्ट झालेय..... त्यांच्या बँकेत विचारुन कळू शकेल ते कुठे गेले हे. पण मग रश्मीने हे मला का कळवले नाही? माझ्या समोर घराच्या कुलुपा पेक्षा मोठे प्रश्नचिन्ह . पुढे काय?

रश्मी चॅप्टर क्लोज...................

रश्मीच्या मानाने हिरो बराच अलिप्त होता हो.. म्हणजे भेटली तर भेटली, नाहीतर चलने दो... :(

वेडी रश्मी...

अरेच्चा हे कसे सुटले नजरेतून ???
मस्त

नीलमोहर's picture

12 Dec 2015 - 4:49 pm | नीलमोहर

मस्त मस्त !!

बोका-ए-आझम's picture

12 Dec 2015 - 11:33 pm | बोका-ए-आझम

पण पटली नाही. माझ्या कथेतल्या नायकाने तिचं proposal नाकारलं असतं.

Rahul D's picture

25 May 2016 - 12:16 am | Rahul D

साहेब या कथेवर एक उत्तम एकांकिका होऊ शकते.

बापू नारू's picture

25 May 2016 - 11:54 am | बापू नारू

मस्त आहे कथा ,खूप आवडली. End हि चांगला केलात ,मला वाटल 'तेरे नाम' होतोय काय शेवटी....:)