मागील दुवा: आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966
रश्मीचा अचानक फोन आला आणि मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या......... पुढे.
"ओक्के..... शुअर... बाय..... " अन तेच ते मस्त जीवघेणे स्माईल.....
गोखले मास्तरांच्या क्लासमधे आज वसंत फूललाय. मस्त श्रावण बरसतोय....... शरदाचे चांदणे पसरलय. गोखलेसर " एच एफ ई./ एच आय ई, थॅरिस्टर , झीनर ब्रेकडाऊन करंट , करंट लिमीट " हे शिकवण्या ऐवजी ऐवजी एक बोट नाचवत "देवा कीती सुंदर आकाश सुंदर चांदणे चंद्र देई.सुंदर प्रकाश सूर्य देतो" शिकवताहेत.
क्लास संपला..... अॅप्लाईड इले़क्ट्रॉनिक कविता गुणगुणत आम्ही रूमवर.......
"ए हे रे काय लिहीले आहेस रे वहीत." पम्या केकाटत होता. सालं या पम्याला बेंबीच्या देठापासून ओरडायची सवयच आहे. साधं बोलतो ते सुद्धा शनिवारवाड्यासमोर माईक बिघडल्यावर भाषण देतात त्या स्टाईल मध्ये. त्याच्या मते हा सोलापुरचा गुण आहे.. सोलापुरात म्हणे सगळे असंच बोलतात. काय की म्हणा याला लहानपणी कोणीच कानगोष्टीच्या खेळात घेत नसेल ( प्रत्येकाला कान फुटायची भीती.) नाटकात पम्याला की आम्ही फक्त दवंडी द्यायला म्हणून घेतो.
काय रे काय झालं.
मी आज क्लासला गेलो नव्हतो म्हणुन तुझी वही बघत होतो. तर हे काय आहे तुझ्या वहीत.
काय आहे?
काहीच नाहिय्ये. वहीची सात पाने तु नुसती गिरहटून ठेवली आहेस. सरानी काय शिकवले ते तरी सांग.
सरानी आज काय शिकवलं ते मला काय माहीत..
ऑ... पहिल्यांदाच पम्याच्या चेहेर्यावर आवाजाशिवाय हावभाव दिसत होते.
अर्थात कारणही तसेच होते. वहीची सात पाने "रश्मी रश्मी रश्मी रश्मी रश्मी या शब्दानी व्यापून राहिली होती....
नशीब पम्याला ते गिरगोटे वाटले...... नाही तर काही खरं नव्हतं .
(आता मला हसू येतय...... आई तीच्या वहीत "श्री कृष्णं शरणं मम" असे पाने च्या पाने लिहीत बसायची तेंव्हा
मी आईला हसायचो. हा काय निरुद्योगी उद्योग म्हणून" )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी प्रेमात पडलोय.. नाही. खरंच नाही.! ! ! खरंच नाही.... खरंच नाही खरंच नाही..रश्मी शपथ नाही.
ती कशाला मधे मधे मधे.शपथ घ्यायला सुद्धा आणायची नाही मधे कुठे. बाकी काही नाही. तीची फक्त ओळख आहे. फक्त ओळख. फक्त ओळख फक्त ओळख.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आठवडा झाला. कॉलेज एके कॉलेज..... लाप्लास ट्रान्स्फॉरमेशन ,बुलीयन अल्जेब्रा ... थॅरीस्टर ..... झीनर .... ट्रान्स्फॉर्मर ..... थेवीनाईन , नॉर्टन .... .ही डब्ल्यू डब्ल्यू एफ मधल्या पैलवानांची नावे आमच्या सिलॅबसमधे कशाला मुक्कामाला. त्यानी बुक्काबुक्की करायची सोडून थेरम कशाला मांडायचे? जाउ देत हे वर्ष गेलं की पुढच्या वर्षाला ही मंडळी नाही भेटणार पुन्हा. साडेसाती होती समजायची.
इलेक्ट्रॉनिक्स हा विषयच असला घाण..... बरे रामायणाच्या आणि कृष्णाच्या काळात इलेक्ट्रोनिक्स नव्हते, शिवकालात नव्हते म्हणू तर ती लोकं थोर ठरली. नाहीतर सतराव्या वर्षी मावळ्यानी तोरणा सर करायच्या ऐवजी टोटम पोल , ट्रान्झिस्टर, डायोड, ट्रायोड, अॅनन्शिएटर , ७४९, एल एम ३१० नाही तर मायक्रोप्रोसेसर सर केल्याचा इतिहास वाचावा लागला असता. बाजी प्रभूनी लो पास फिल्टरच्या खिंडीत लढाई केली असती आणि हाय फ्रीक्वेन्स साउंड ऐकून प्राण सोडले असते.
पुढच्या आठवड्यात असाईनमेंट पूर्र्ण करायची आहे.पम्यावर विसंबून चालणार नाही. तो आपल्याच असाइनमेंटची वाट बघत असतो. त्या ढापण्या बॅटरी लीना भागवत ला तू खूप हुशार आहेस / किंवा स्मार्ट आहेस म्हणावे लागेल. तर मिळेल तीची वही. .........
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रिमझीम पाउस येत होता. प्रभात रोड रिमझीम पावसात काय सेक्सी दिसतो. मस्त गुलमोहराची झाडे मोहरत असतात.
सुवर्णरेखा चा चौक सोडला की पुढे लॉ कॉलेजची हिरवीगार टेकडी. नाटकातल्या बॅकड्रॉप चा फील देते, सगळा प्रभात रोड म्हणजे एक मस्त सेट लावल्या सारखा वाटतो. देव आनंद म्हणे या रस्त्याने सायकल हाणत जायचा प्रभात स्टुडीयोत. आपण बाईक हाणत जातो. त्याची हीरॉईन मधुबाला ...... आपल्याला भेटेल मधुबाला.... रश्मी दिसते मधुबालासारखी? तिचे केस मस्त भुरभुरतात..... छे....कायच्या काय...... रिमझीम पावसात मस्त डुलणारा गुलमोहोर रश्मी सारखाच दिसतो ना. एकदम तजेलदार.... उत्साही..........
भुरभुरणारा रिमझिम पाउस चेहेर्यावर घ्यायला काय मजा येते नै. मी बाईक रस्त्याच्या कडेला लावून मी मस्त चेहेर्यावर पाउस झेलत बसलोय......आहाहा.......
व्वा अगदी मन लावून पाउस एन्जॉय करणं चाललय... अरे! आवाज तर अगदी रश्मी सारखा वाटतोय. मला भास व्हायला लागलेत. मी डोळे गच्च मिटून घेतो. ..... हा हा हा हा . काचा फुटल्यासारखे हसणे......ओ जागे व्हा.......
मी डोळे उघडतो. समोर रश्मी उभी. पावसात . केस एरवी भुरभुरणार्या बटा चेहेर्यावर चिकटल्यात. त्यामुळे अजूनच गोड दिसतेय. मी डोळे विस्फारून बघतोय.
हा हा हा .......काय रेन मेडीटेशन चाललय वाटतं?
अरे तुम्ही आहात होय मी पाहिलच नाही......
मी पहात होते तुमच्या मागेच होते.. तुम्ही इथे रस्त्यावर उभे दिसलात . दोनदा हाय केले तुमचे लक्षच नव्हते.
मी मी मी मी पाऊस एन्जॉय करत होतो..
व्वा . मस्तच की. मला सुद्धा पाउस एन्जॉय करायला आवडतं. मी पाउस पडायला लागला की घराच्या गच्चीत जाऊन भिजून येते. वळीवाच्या पावसात भिजणं आषाढाच्या जोरदार पावसात भिजणं आणि श्रावणाच्या पावसात भिजणं प्रत्येक पावसाची मजा वेगळीच असते. आई तर मला रिमझीम रश्मी असेच म्हणते.
रिमझीम रश्मी.... हा हा हा. त्या अर्थाने मला माझी आईने मला " शंकासूर " म्हणायला हवे होते.
शंकासूर....... हा हा हा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रश्मी हसायला लागली की त्या काचा फुटल्या सारखी हसते. ती तशी हसली की इतकी फ्रेश वाटते ना.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रश्मी या आठवड्यात ती तीन वेळा भेटली. एकदा प्रभात रोडवर. आणि दोनदा एस पी कॉलेजच्या समोर. अर्थात मीच तिथे तिची वाट पहात उभा होतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुनियादारी पुस्तक वाचलं. रश्मीने संगितलं होतं वाच म्हणून. उगाचच स्वतःला त्यातला नायक श्रेयस समजत होतो वाचताना. मग रश्मी कोण? शीरीन की मिनू... अन मग साईनाथ कोण? अन दिग्या कोण? एम के श्रोत्री ला कुठे शोधायचा? रश्मीला हे सांगितलं तर ती हसत सुटेल काचा फुटल्यासारखी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा हा हा....... ए कुठे हरवलास. मी रश्मी बोलतेय रिमझीम रश्मी.
अरे हो रश्मीचा बर्याच महिन्यांनन्तर फोन आला आणि मी तिच्याशी फोनवर बोलतोय विसरुनच गेलो की मी.
बोला मॅडम. आपका हुकूम सर आखोपर.
अरे मी हॅलो हॅलो करतेय अन तु बोलायलाच तयार नाहीस.
रश्मी तुझा आवाज ऐकला अन त्या सगळ्या आठवणी धावत आल्या.
कोणत्या. त्या आपण प्रभात रोडवर भिजत उभे होतो ते की सारसबागेत एकदा पहाटे भेटलो होतो ते.
की लॉ कॉलेज रोडवर पहिल्यांदा भेटलो होतो भांडलो होतो ते. की मग तु मला काश्मिरी अतीरेकी म्हणाला होतास ते?
अरेच्चा म्हणजे तुलाही आठवतं ते सगळं.
हो अगदी काल घडल्यासारखं आठवतं.
रश्मी ............रश्मी......... तू आहेस कुठे नक्की.
तुझ्या मोबाईलवर नंबर आलाय ना? त्या नम्बरवर आहे.
अगं पण ठिकाण.......
ए शंकासूर ....घराबाहेर.... सोसायटीच्या ......सकाळनगर च्या मेन गेटवर ये. युनिव्हर्सिटी कडच्या
काय तू इथे आली आहेस?
हो. लवक्कर ये. गेटवर
मी अंगात टीशर्ट चढवतो. अक्षरशः धावत गेटपाशी येतो. इतक्या महिन्यानंतर रश्मी भेटणार असते.
सकाळनगरच्या गेटसमोर लाल रंगाची व्हेन्टो .रश्मी गाडी शेजारी उभी आहे. हेअर स्टाईल बदलेली . खांद्यावर रुळणार्या केसांऐवजी पोनी टेल. सुहास्य वदन तेच मिलीयन डॉलर स्माईल.
ढगाळलेल्या आकाशात सोनेरी सूर्य प्रकाश पडलाय. एकाच वेळेस सोळासतरा इंद्रधनुष्ये दिसायला लागलीत गेटजवळचा गुलमोहोर बहरुन फुललाय . प्राजक्त पांढर्या फुलांचे चांदणे ल्यायलाय. सोनचाफ्याच्या फुलांचा सडा पडला असावा असा उत्फुल्ल सुगंध दरवळतोय. सकाळनगरचे गेट फुलांनी मढवून टाकयला हवे. आनंदाने मला पिसे लागेल असे वाटतय.
मला रश्मीला कडकडुन मिठी माराविशी वाटतेय. मी वेड्यासारखा नुसताच हसत उभा आहे.
साला आपल्याला भावना सुद्धा व्यक्त करता येत नाहीत.
रश्मी.... "रिमझीम" रश्मी माझ्या समोर उभी आहे.... इतक्या महिन्यांनन्तर.........
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Feb 2014 - 3:33 am | पिवळा डांबिस
चला बरं झालं! भेटली एकदाची बया!!!
तो रश्मी-रश्मी मंत्र वहीत गिरटून ठेवला होता ना, म्हणून!!! :)
मग? बिंदास मिठी मारायची की!! चानस घालवलांत!!
;)
काय तुम्ही इजुभौ? आता पुढल्या भागात तरी मारा मिठी!!!
13 Feb 2014 - 9:41 am | इन्दुसुता
मग? बिंदास मिठी मारायची की!! चानस घालवलांत!!
मेडिकलची पोरं ( अॅज इन बॉइज ) कशी असतात माहिताय :) , पण ती इंजिनियरिंगची पोरं साधी सोज्वळ असतात असा आमचा ( गोड गैर ) समज आहे :) तेव्हा डांबिसभौ त्यांना उगाच असलं काही शिकवू नका हो!!! :D
14 Feb 2014 - 1:38 am | पिवळा डांबिस
हो ना! सारखी आपली डॉक्टर-डॉक्टर खेळतात!!! :)
गैरसमजाच्या बाबतीत सहमत आहे!! ;)
भले! आम्ही पामर कोण शिकवणार?
"गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे मिळोनि गळा घालूनीया गळा |
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा ||"
असं खुद्द कुसुमाग्रज शिकवून गेलेत. पण ह्यानी शिंच्यानी शिकायला पाहिजे ना!!!
:)
13 Feb 2014 - 3:45 am | मयुरा गुप्ते
तुमच्या लेखणीतला चाफा,गुलमोहर,सकाळ्नगरचं गेट आणि पावसातली भेट तंतोतंत उभं राहीलं.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
-मयुरा.
13 Feb 2014 - 5:20 am | खटपट्या
चांगलंय
13 Feb 2014 - 10:02 am | इरसाल
आवडले.
अवांतरः "रश्मी हसायला लागली की त्या काचा फुटल्या सारखी हसते". आणी हे "रश्मीला हे सांगितलं तर ती हसत सुटेल काचा फुटल्यासारखी". हे वाचुन असे वाटायला लागले आहे की राज ठाकर्यांची कोणी "रश्मी" हरवलेली दिसतेय तिच्या आठवणीत ते " खळ्ळ खट्याक" करत सुटलेत. ;)
13 Feb 2014 - 2:24 pm | साती
भारी आहे.
13 Feb 2014 - 11:34 am | चिगो
क्या बात है, विजुभाऊ.. मस्तच लिहीलंय. आवडेश.
13 Feb 2014 - 12:05 pm | psajid
पुढे काय ? उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकर येवू दे !
13 Feb 2014 - 12:23 pm | जेनी...
मस्तच लिहिलय .... एकदम फ्रेश
पूढचा भाग १४ फेब ला तुम्हि टाकताय का मी टाकु ??
13 Feb 2014 - 12:58 pm | प्यारे१
तुमचा टाय्यप हाय काय?
विजुभाऊ, तुम्हीच लिहा हो. मस्त लिहीताय.
13 Feb 2014 - 1:11 pm | जेनी...
=))
13 Feb 2014 - 1:32 pm | बाबा पाटील
दिस नकळत जाई,सांज रेंगाळुन राही,क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही....निव्वळ भन्नाट.
13 Feb 2014 - 1:34 pm | गिरकी
गोष्ट त्यातल्या गोड गुलाबी रंगासकट आवडायला लागलीये हो…. पण जास्त घालमेल त्या प्रभात रोड , लॉ कॉलेज रोड च्या आठवणीनी होतीये … कधी बरं परत उंडारता येईल तिथे ??? :( :(
13 Feb 2014 - 3:04 pm | माजगावकर
मस्तच विजुभौ..
नॉस्टेल्जीक केलंत अगदी...
पु.भा.प्र
13 Feb 2014 - 3:46 pm | भाते
अरे बापरे! पुन्हा (क्रमशः)?
मग पुढचा भाग कधी? लौकर टाका.
13 Feb 2014 - 10:30 pm | पैसा
पुढचा भाग उद्या का?
14 Feb 2014 - 3:27 am | प्रभाकर पेठकर
एकतर्फी प्रेमाचे आणि प्रणयोत्सुक प्रियकरच्या भावनांचे आंदोलन भूतकाळातून वर्तमान काळात आले आहे. आता खरा रंग भरेल कथेला.
विजुभाऊ पुण्याच्या रस्त्यावर बर्याच काचांचा खच पडलाय. त्याचं काय करायचं तेव्हढं सांगा.
14 Feb 2014 - 2:38 pm | मराठी कथालेखक
आज असेल ना तिसरा भाग ?
16 Feb 2014 - 10:37 pm | अनय सोलापूरकर
खूप मस्त लिहिलय विजुभाउ...!
सोलापुरी श्टाइलमधे - लै भारी लिहालायस की ब्बे... !! सर काय शिकवला ते बी ल्ह्याय्चा होत की वहीत .... :)