अमेठीची शेती

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
3 Feb 2014 - 12:26 am

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी

                                         - गंगाधर मुटे
----------------------------------------------------

Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi

अभय-लेखनमराठी गझलवाङ्मयशेतीकवितागझल

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

3 Feb 2014 - 1:03 am | आयुर्हित

व्वा अभयजी, खुप छान कविता आहे.
लेखणीला चांगली धार आहे आपल्या!
खूप चांगले निरीक्षण व सर्वात महत्त्वाचे आहे ती तुमची संवेदनशीलता.

आपल्या अन्नदात्याला मी विनंती करेन की सोडू नको कास्तकारी!

धन्यवाद.

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Feb 2014 - 9:48 am | भ ट क्या खे ड वा ला

कविता एकदम काळजाला भिडणारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2014 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

3 Feb 2014 - 10:00 am | सुहास..

_/\_

मदनबाण's picture

3 Feb 2014 - 10:10 am | मदनबाण

कविता आवडली...

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2014 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll

छान कविता. कास्तकारी म्हणजे काय नेमके? त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे थोडा घोळ झाला. बाकी शेतकरी गोत्यात आहेतच. हाच प्रोब्लेम जिथे जिथे जमिनी विकून विकास झाला आहे तिथे पण दिसून येतो. स्थानिक माणूस मज्रुरीच करत राहीला. असो.

गंगाधर मुटे's picture

3 Feb 2014 - 8:36 pm | गंगाधर मुटे

कास्तकार = शेतकरी
कास्तकारी = शेती कसणे

हा ग्रामीण बोलीभाषेतला शब्द असावा.
पूर्वी विदर्भात हा शब्द एवढा सर्रास वापरात होता की, तुलनेने शेती करणे हा शब्द केवळ काही ठराविक लोकच बोलीभाषेत वापरत असत.
आता मात्र शिक्षणाच्या प्रसारामुळे शेती शब्दाचा वापर बोलीभाषेत वाढला आहे.

अर्धवटराव's picture

4 Feb 2014 - 3:43 am | अर्धवटराव

कष्टकरीच्या अपभ्रंष होऊन हा शब्द तयार झाला असेल काय?

अवांतरः आता शरद साहेबांचे एकेकाळचे शिष्य राजु शेट्टी यंदा युतीच्या मंचावर जाऊन बसलेत. शेतकर्‍यांचे प्रश्न राजकारणाच्या लाल मातीत उतरुन सोडवण्याचे यांचे प्रयत्न शेतकर्‍यांना पसंत आहेत काय? विदर्भ, मराठवाडा या बाबतीत मागे का? तुमचे कॉ. घंगारे काका पण शेवटी साठ्यांचा प्रचार करुन विझले. सध्या परिस्थिती काय आहे?

गंगाधर मुटे's picture

4 Feb 2014 - 9:59 am | गंगाधर मुटे

लोकशाहीप्रधान व्यवस्थेत राजकारण आणि राजकीय भुमिका टाळता येत नाही. म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची भुमिका स्विकारणे अपरिहर्य असते. राजू शेट्टींनी भाजपशी घरोबा केला. आमचा कल जरासा "आप" च्या बाजूने आहे. अंतिम निर्णय व्हायचा आहे.
मात्र सत्तेतून शेतीचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे.

सुनील's picture

4 Feb 2014 - 11:15 am | सुनील

शेतकर्‍यांचा शक्तीशाली दबावगट निर्मान झाला पाहिजे

मान्य. पण अल्पभूधारक जरी कोट्यवधी असले तरी त्यांचा असा दबावगट बनत नाही हा अनुभव आहे. त्यासाठी संख्येने कमी पण प्रचंड जमीन बाळगणारे शेतकरी असायला हवेत. थोडक्यात शेतीवर थेट अवलंबून असणारांची संख्या कमी असायला हवी.

आणि हे तेव्हाच होईल जेव्हा उद्योग-धंदे आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;

हाच लोच्या आहे. शेत तेवढेच. घरातील पाच लोक राबली तर जेवढे उत्पादन येईल जवळपास तितकेच उत्पादन मिळण्यासाठी दहा राबतात. म्हणजेच पाच जणांचे राबणे निरर्थक आहे. ह्यालाच अदृश्य बेरोजगारी म्हणतात. ती कमी झाल्याशिवाय - त्या पाच अतिरीक्त जणांना दुसरा रोजगार मिळाल्याशिवाय - ही समस्या सुटणार नाही.

(कागदोपत्री ७/१२ धारक शहरी) सुनील

गंगाधर मुटे's picture

5 Feb 2014 - 5:02 pm | गंगाधर मुटे

- मुर्खासारखा अनियंत्रीत/नियोजन नसलेला कुठलाच व्यवसाय सफल ठरू शकत नाही. त्याला शेती अपवाद असण्याचे कारण नाही.
- पण सर्वच शेतकरी "तसे"च आहे म्हणून शेती तोट्याची आहे, असे समिकरण तयार करणे फारसे उपयोगाचे नाही व तर्कसंगत ठरून शकत नाही.
- शालेय/विद्यापिठीय अभ्यासक्रमाने व पुरातनीय/धार्मिक शास्त्राने शेतीबद्दल फारच असुसंगत अर्थशास्त्र समाजाला शिकविले आहे; जे की वास्तवाच्या सावलीलाही उभे राहत नाही. त्याचेच दुष्परिणाम शेती व्यवसाय भोगत आहे.
- शेतीमध्ये सध्या असलेले मनुष्यबळ कमी आहे. सध्याच्या मनुष्यबळापेक्षा दुप्पट-तिप्पट मनुष्यबळाला रोजगार पुरविण्याची क्षमता केवळ आणि केवळ भारतिय शेतीत आहे. फक्त अट एकच शेती फायद्याची व्हायला हवी.
- "प्रचंड जमीन बाळगणारे" हे वाक्य आता कालबाह्य झालेले आहे.सिलिंग कायदा वाचा.
- "जेवढी शेती जास्त, तेवढी उलाढाल जास्त,तितका तोटा जास्त" हे समिकरण "पगारी अर्थतज्ज्ञ" स्विकारत नसले म्हणून वास्तव बदलत नाही.

असो.
वेळ मिळाल्यास हे वाचा.
http://www.misalpav.com/node/17878
http://www.baliraja.com/node/389

मराठीच's picture

4 Feb 2014 - 10:08 am | मराठीच

रावडी

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 11:15 am | पिवळा डांबिस

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

मस्त!
जियो!!

चिगो's picture

4 Feb 2014 - 1:19 pm | चिगो

जियो, मुटेकाका.. जबरदस्त कविता/ गझल..

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

खाण्णऽऽकन कानफटीतच मारलीत की.. असो. दर सहा महीन्याला मोबाईल बदलणारा, एका शेतकर्‍याच्या वार्षिक उलाढाली (नफा नव्हे) किंमतीचा आयफोन खाटकन क्रेडीटकार्डने विकत घेणारा तरुण जेव्हा "ओनियन्स आर सो ब्लडी कॉस्टली, ड्युड.. ये गवर्नमेंट साली क्या कर रही है"? हे हजार रुपये प्लेटवाला बुफे खातांना सुस्कारतो, त्या विषमतेवर आणि हिपोक्रसीवर हसायला पण येत नाही आता..

(वावर असुनही कास्तकारी करायची हिंमत नसलेला सरकारी नोकर) चिगो

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2014 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

प्रसाद गोडबोले's picture

5 Feb 2014 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर

मुटेजीं , कविता फार आवडली.!!

अजय जोशी's picture

5 Feb 2014 - 5:11 pm | अजय जोशी

कविता छानच आहे.

पण, हा अभय कोण?

पैसा's picture

8 Feb 2014 - 6:33 pm | पैसा

कविता, सोबतची चित्रे आणि चर्चा आवडली.

अनुप ढेरे's picture

9 Feb 2014 - 11:52 am | अनुप ढेरे

सुंदर कविता !