हे आणि ते - २: सुशिक्षित आणि सुसंस्कृत

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
30 Dec 2013 - 12:11 pm

लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.

पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्‍याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी
कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.

त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.

२८.१२.२०१३
मार्गशीर्ष कृ. ११.सफला स्मार्त एकादशी, शके १९३५

--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार
--------------------------------------------------------------------------------------
लेखातील चित्रे फक्त सादरीकरणाच्या सोयीसाठी आहेत.
---------------------------------------------------------------------------------------

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

30 Dec 2013 - 12:28 pm | ज्ञानव

खरोखर उत्तम कारण मीही पुस्तक वेडा असल्याने माझी नेली आणि परत दिलीच नाही त्या पुस्तकांचीच संख्या जास्त आहे. तसेच पान ३५ पाहा, मग पान ३५ वर पान ४८ पाहा हे खेळ करणारे मी वाचनालयाची पुस्तके आणतो तेव्हा पुस्तकातून डोकावतात. तेव्हाही त्रास होतो.

आदूबाळ's picture

30 Dec 2013 - 12:51 pm | आदूबाळ

लेख मस्तच!

कधीकधी उलटं सुद्धा असतं.

मॅक्बेथची कथा मला प्रचंड आवडते, पण किचकट्ट शेक्सपियरियन भाषा वाचण्याचा वैताग येतो. एकदा विद्यापीठाने विकायला काढलेल्या जुन्या पुस्तकांत मॅक्बेथची एक प्रत पाहिली. सहज उघडून पाहिली, तर पूर्वी कधीतरी मॅक्बेथ झालेल्या नटाने वापरलेली ती प्रत होती. समासात रंगसूचना, इतर पात्रं बोलत असताना चेहेर्‍यावर हावभाव कसे पाहिजेत याची टिपणं, त्रयस्थ भूमिकेतून मॅक्बेथच्या स्वभावावर मारलेले शेरे असं काय काय आहे.

आनन्दा's picture

30 Dec 2013 - 3:14 pm | आनन्दा

महाराज, ती त्या नटाची वैयक्तिक प्रत असेल... भाड्याने आणलेली नव्हे.
बाकी माझी आई सांगायची - एकवेळ स्वत:ची वस्तु तोडलीत तरी चालेल, पण दुसर्‍याच्या वस्तुला ओरखडा पण येता नये.

आदूबाळ's picture

30 Dec 2013 - 3:25 pm | आदूबाळ

नाय हो. युनिवर्सिटीच्या लायब्ररीची होती. रीतसर शिक्केबिक्के उठवलेली.

मुद्दा असा आहे की पानांवर चिताडणं वाईटच, पण ते क्वचितप्रसंगी छानही असू शकतं...

मुक्त विहारि's picture

30 Dec 2013 - 2:00 pm | मुक्त विहारि

आवडला.

जेपी's picture

30 Dec 2013 - 2:41 pm | जेपी

लेख आवडला .

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2013 - 2:45 pm | नगरीनिरंजन

लेख चांगला आहे. वाचून काही पुस्तकप्रिय लोक आठवले. पुस्तक वाचून व्हायच्या आधी मी कोणालाही देत नाही आणि सुदैवाने एकदा वा दो़नदा वाचून झाले की पुस्तक दुसर्‍या कोणालातरी देऊन टाकण्यात मला काही वाटत नसल्याने आणि शक्यतो वाचनालयातून पुस्तके आणून वाचत असल्याने लेखातल्या अनुभवांशी समरस होऊ शकलो नाही.
वाचून झाल्यावरही पुस्तकांवर अतिरेकी मालकीहक्क सांगणार्‍या लोकांचे वागणेही मला कळत नाही. "पुस्तकांवर प्रेम करा" या वाक्याचा काही लोक फिजिकल अर्थ घेतात. पुस्तकांचा आत्यंतिक अनादर आणि त्यांच्याबद्दलच्या आत्यंतिक प्रेमाचे प्रदर्शन असे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात.

आतिवास's picture

30 Dec 2013 - 6:57 pm | आतिवास

"पुस्तकांवर प्रेम करा" या वाक्याचा काही लोक फिजिकल अर्थ घेतात.

मला वाटतं पुस्तकांशी असलेलं आपलं नातं - 'माझी पुस्तकं' वगैरे - बदलतं. मी एके काळी माझ्या संग्रहातल्या पुस्तकांबद्दल जास्त पझेसिव होते. आजकाल 'घेउन जा पाहिजे ते पुस्तक' अशी मी उदार झाले आहे. :-)

लेखकाच्या भावना कालांतराने इतक्या टोकदार राहणार नाहीत;
किंवा अधिक टोकदार होतील हीही एक शक्यता आहेच. :-)

आदूबाळ's picture

30 Dec 2013 - 7:17 pm | आदूबाळ

आजकाल 'घेउन जा पाहिजे ते पुस्तक' अशी मी उदार झाले आहे.

कुठे रहाता हो तुम्ही? घरी कधी असता?

ह. घ्या. :)

आतिवास's picture

30 Dec 2013 - 10:28 pm | आतिवास

आदूबाळ,
:-)

प्रभाकर पेठकर's picture

30 Dec 2013 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर

@ अतिवास,

स्वामित्वभावनेचा (पझेसिव्ह्नेस) संबंध नाहीए इथे. असं होतं की आपण कांही चांगल्या भावनेने आपल्याजवळील अमुल्य वस्तू कोणाला दिलेली असते आणि समोरचा माणूस इतका स्वार्थी निघतो की आपल्या भावना पायदळी तुडवून ती वस्तू परस्पर दुसर्‍याला देऊन हरवून टाकतो. (ज्याचा त्याला अजिबात अधिकार नसतो).

दूसरी गोष्ट, पुन्हा ते पुस्तक वाचायचा विचार आपल्याच मनांत आला तरी, आपण पुस्तक विकत घेतलेले असूनही, आपणास आवश्यकता असेल तेंव्हा मन रिझवण्यासाठी ते उपलब्ध नसते. हा सल त्रासदायक असतो.

तिसरी गोष्ट, एवढी चांगली कलाकृती आणखिन कोणाला वाचावयास द्यायची असेल, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे, समाधानाचे चार क्षण मिळवून द्यायचे असतील तरी त्या पासून आपण आणि ती व्यक्ती वंचित राहते. का? तर दूसर्‍याच कोणाचा हलगर्जीपणा.

स्वामित्वभावनेत (पझेसिव्हनेस) अशी व्यक्ती आपल्याजवळील वस्तू कोणाबरोबर वाटून (शेअर) घेऊ इच्छित नसते. पण इथे आपले आवडते पुस्तक, ज्यांना ज्यांना वाचायची इच्छा आहे त्यांना त्यांना वाचण्यासाठी द्यायला आपण उत्सुक असतो. जास्तीत जास्त लोकांनी ते पुस्तक वाचले तर आपला आनंद द्विगुणित होतो.

आतिवास's picture

30 Dec 2013 - 10:41 pm | आतिवास

पेठकर काका,
तुमचे तिन्ही मुद्दे मान्य आहेत.

कदाचित मी ज्यांना ज्यांना माझ्या संग्रहातली पुस्तकं दिली, त्या सर्वांनी ती मनापासून 'वाचली' - त्याबद्दल आम्ही बोललो, लिहिलं एकमेकांना. कुणाला नेमक्या कोणत्या पुस्तकात खराखुरा रस असेल याचे माझे अंदाज सुदैवाने बरोबर ठरले असतील. मी ज्यांना पुस्तकं देते, ते लोकही त्यांची पुस्तकं मला देत असतात - ती एक अखंड देवाणघेवाण असते. अशा चांगल्या अनुभवांमुळे पुस्तक देणं ही गोष्ट माझ्यासाठी त्रासदायक झाली नसावी. शिवाय पुस्तकं एका ठिकाणी आणि मी राहणार दुस-याच कोणत्यातरी शहरात असं खूप वर्ष आहे. त्यामुळे पुस्तकं माझ्या घरात पडून राहण्यापेक्षा कुणातरी दुस-यांच्या वाचनात असावीत हे माझ्यासाठी जास्त सुखदायक आहे.

पण इतरांना त्रासदायक अनुभव आले असतील, येत राहतील हे मान्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2013 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख आवडला.

तुमची दोन पात्रे "शिक्षित" आणि "सुशिक्षित" या दोन शब्दांतला फरक अधोरेखीत करत आहेत !

कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी
कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी

त्याने तुमचे पुस्तक व्यवस्थीत हातळले नाही म्हणून राग येणे साहजीक आहे. पण 'बोल्ड'लेलं आवडलं नाही.

आम्ही शाळेत असताना आमचे गुरुजी स्वतः आम्हाला असा सल्ला द्यायचे की, कठीण शब्दांचे अर्थ त्याच पानावर लिहीत जा.
आम्ही तसेच करायचो. फायदा व्हायचा. (पण ती स्वतःची पुस्तके असायची)

प्रभाकर पेठकर's picture

30 Dec 2013 - 4:50 pm | प्रभाकर पेठकर

कोणाकडून वाचायला नेलेले पुस्तक वाचून झाल्यावर मूळ मालकाला परत न करता परस्पर तिसर्‍यालाच देऊन 'वाचून झाल्यावर मूळ मालकाला परत कर' अशी मौलिक सुचना देणारेही असतात. असे हस्तेपरहस्ते फिरत राहिलेले पुस्तक शेवटी कोणी कोणाला दिले हेही लक्षात (देणार्‍याला) राहात नाही आणि आपल्या मालकीच्या आवडत्या पुस्तकाचा आपला संपर्क कायमस्वरूपी तुटतो.

ह्यावर उपाय म्हणून प्रत्येक पुस्तकावर माझे नांव आणि भ्रमणध्वनी क्रमांक लिहीला तरी पुस्तके गायब होणे थांबले नाही. कारण एकदा वाचुन झाले की कोण कशाला काळजी करतोय कोणाचे पुस्तक आहे ह्याची?

शेवटी वाचनालयाप्रमाणे पुस्तकाच्या आतून एक कार्ड ठेवण्याचाही प्रयत्न केला. एखाद्याला पुस्तक दिले की त्या कार्डावर नोंद करून ते माझ्या जवळ ठेवायचो आणि मधे मधे पुस्तक नेलेल्याला फोन करून आठवण करून द्यायचो. त्यावरही कडी एका बहाद्दराने केली. फोनवरून चौकशी केल्यावर ' अरे, दिलं मी तुला तुझं पुस्तक. तू पुन्हा कोणाला तरी दिलं असशील आणि नोंद केली नसशील.' असे सांगितले.

आता मी कोणाला पुस्तकं देत नाही.

तिरकीट's picture

30 Dec 2013 - 5:05 pm | तिरकीट

यावरुन १ आठवलं, माझ्या आजोबांना वाचनाची फार आवड होती. जेव्हा जमेल तेव्हा पुस्तक विकत घेउन वाचणे हा त्यांचा छंद. पुस्तक हरवु नये किंवा कुणी लंपास करु नये म्हणून ते पुस्तकावर दर २०-२५ पानांनंतर स्वताचं नाव लिहायचे...
त्यांच्याच एका मित्राने ह्यांच्याकडून एक पुस्तक घेतलं होतं. बरेच दिवस झाले पुस्तक परत केलेलं नाही म्हणल्यावर आजोबांनी मित्राला विचारलं. तेव्हा त्या मित्राने ते पुस्तक दाखवलं. जिथे जिथे आजोबांनी स्वता:च नाव लिहिलेलं होतं त्याच्या पुढे मित्राने 'यांजकडून सप्रेम भेट' असं लिहिलं होतं.
काहीही न करता पुस्तक आपसुक मित्रचं झालं.

काळा पहाड's picture

30 Dec 2013 - 5:44 pm | काळा पहाड

लय भारी

ज्ञानव's picture

30 Dec 2013 - 7:59 pm | ज्ञानव

म्हणजे जे साहित्यिक "संस्कार" तुमच्या आजोबांच्या मित्रावर आहेत ते अ प्र ती म च.

पण प्रदेश कोणता ह्या मित्राचा ?

मुळचे कोकणातले होते (म्हणे)

ग्रेटथिन्कर's picture

30 Dec 2013 - 5:29 pm | ग्रेटथिन्कर

हे काय लिहले आहे? मला तर याचा काहीच संदर्भ लागला नाहि.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2013 - 6:02 pm | टवाळ कार्टा

असुदे असुदे...अपेक्षितच होते :)

हिंदू धर्म अन मोदी व भाजपा व संघ यांच्याशी संबंधित नसलेला धागा असला की अगदी जल बिन मछली होत असेल नै =))

मंदार दिलीप जोशी's picture

30 Dec 2013 - 6:13 pm | मंदार दिलीप जोशी

:P

ग्रेटथिन्कर's picture

30 Dec 2013 - 7:39 pm | ग्रेटथिन्कर

उपरोक्त गोष्टींना मी एका वक्रकुंतलाचीही किंमत देत नाही.

अर्थातच तुम्ही किंमत देता. मोदी वगैरेंमुळेच तुमच्यासारख्यांचे अस्तित्व आहे. मोदी वगैरेंची विरोधभक्ती केल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही.

अन तसेही, इतक्या आवर्जून प्रतिसाद देणे म्हणजे परत वरील सर्व घटकांना महत्त्व देणेच होय =))

आनंदी गोपाळ's picture

30 Dec 2013 - 9:49 pm | आनंदी गोपाळ

वाल्गुदेया,

मंदार जोशी vs ग्रेट थिंकर हे मायबोलीवरून इकडे आलेले 'फ्युड' की काय ते आहे. हितं थोडा काणा डोळा करा अशी विनंती.

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 10:05 pm | बॅटमॅन

ते असेल हो, पण हे ग्रेटथिंकर महाशय बिनबुडाचे मुद्दे उगाळत बसतात. त्यांच्या विरोधभक्तीचे देवपंचायतन म्हणजे मोदी, संघ, भाजपा व त्यांतील सर्व नेते हिंदू धर्म अन हिंदू म्हणवून घेणारे कोणीही विचारवंत, संत हे होत. त्यांच्या ट्रोलिंगला यथार्थ असे म्हणण्याचे धाडस मी तरी करू शकत नाही.

अर्थातच, असे मत मांडले म्हणून मी बुरसटलेला ठरणार नाही अशी आशा करतो.

आनंदी गोपाळ's picture

30 Dec 2013 - 10:21 pm | आनंदी गोपाळ

अर्थातच, असे मत मांडले म्हणून मी बुरसटलेला ठरणार नाही अशी आशा करतो.

संबंधच नाही.
फक्त,
तुमच्या सत्य व न्याय्य आक्षेपांचे बोट धरून क्याब्रे डान्स करणार्‍या हितल्या आयड्यांचं काय? ;)
असो. तुम्ही तुमची लाईन ऑफ थिंकींग ठरवा. मधे बोलल्याबद्दल क्षमस्व.

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 10:30 pm | बॅटमॅन

तुमच्या सत्य व न्याय्य आक्षेपांचे बोट धरून क्याब्रे डान्स करणार्‍या हितल्या आयड्यांचं काय?

अर्थातच. दोन्ही बाजूंचे आयडी इथे आहेत. तुमचा आक्षेपही मान्यच.

असो. तुम्ही तुमची लाईन ऑफ थिंकींग ठरवा. मधे बोलल्याबद्दल क्षमस्व.

आयला, तुमच्यासारख्यांनी क्षमस्व वगैरे लिहिल्यावर आम्ही काय करायचं :(

तिरकीट's picture

30 Dec 2013 - 6:35 pm | तिरकीट

जाउ दे.....चालायचंच

यसवायजी's picture

30 Dec 2013 - 6:41 pm | यसवायजी

जाउद्याहो. प्रत्येकाचा एक कंफर्ट झोन असतो. त्यापेक्षा वेगळं काही दिसलं की असंच होतं.

विनायक प्रभू's picture

30 Dec 2013 - 7:14 pm | विनायक प्रभू

कमाल आहे बॉ?
नाव सोनू बाई हाती ..च्या माळा.

आनंदी गोपाळ's picture

30 Dec 2013 - 10:24 pm | आनंदी गोपाळ

नांव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा.
अशी आहे.
:)

विनायक प्रभू's picture

30 Dec 2013 - 11:15 pm | विनायक प्रभू

..= व.कुं
भरपूर आहेत. म्ह्णूनच ़किंमत नाही?

अनुप ढेरे's picture

1 Jan 2014 - 9:45 am | अनुप ढेरे

वक्रकुंतलाच्या माळा
=))

बॅटमॅन's picture

1 Jan 2014 - 3:16 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

खटपट्या's picture

31 Dec 2013 - 12:30 am | खटपट्या

आयला *dash1*

पुस्तकांबद्दल असे अनेक वाईट अण्भव गाठीशी असल्यानेच आता घरी कुणालाही पुस्तके देत नाही.

चित्रगुप्त's picture

30 Dec 2013 - 6:03 pm | चित्रगुप्त

लेखात मांडलेला अनुभव आणि विचार आवडला.
अवांतरः स्वतः वाचलेली उत्तम पुस्तके इतरांनीही वाचावीत, म्हणून ('शहाणे करून सोडावे, सकळ जन' ची खाज) कुणी मागितलेली नसतानाही मुद्दाम आग्रहाने देत गेलो. नंतर त्या त्या पुस्तकांची गरज वाटली तेंव्हा विचारता, त्यांच्या लक्षातही नव्हते त्या पुस्तकांबद्दल, आणि वाचलेली तर नव्हतीच. असे बरेचदा घडल्यावर आपणहून पुस्तके देणे बंद केले, तरी हल्ली ओळखीपैकी इतके कमी लोक मराठी पुस्तके वाचतात, की कुणी मागितले, तर नाही म्हणवत नाही. कालच दोन अगदी नवीन घेतलेली पुस्तके स्वतः वाचण्या अगोदर दिली.
मी इन्दौरला गेलो, की एक बालमित्र दर वेळी त्याने वाचलेल्या चांगल्या पुस्तकाची झेरॉक्स करून देतो.
स्वतःच्या पुस्तकांमधे बाजूला टीपा लिहिणे, अंडरलाईन करणे वगैरे प्रकार करणे आवडते, आणि फार उपयोगी ठरते.

लेख आवडला. :)

अत्रन्गि पाउस's picture

30 Dec 2013 - 7:05 pm | अत्रन्गि पाउस

मला सुरुवातीला पुस्तकांना कव्हर घालायला आवडायचं..पण मग लक्षात आले कि कव्हर घातल्यावर मेहेनतीने सजवलेल्या मुखपृष्ठाला न्याय दिला जात नाहीये ..
तेव्हा पासून कव्हर्स बंद ...
जवळच्या नातेवाईकांनी पुस्तक ढापल्याच्या अनुभवानंतर कुणालाही घरी पुस्तक देत नही..

यसवायजी's picture

30 Dec 2013 - 7:23 pm | यसवायजी

यावरुन आठवलं... कॉलेजात असताना जे सब्जेक्ट अज्जेबात आवडत नाहीत त्यांना मी सुंदर हिरविणी/मॉडेल्सचे फटू असणारे कव्हर घालायचो.. मग निदान ते पुस्तक हातात घ्यावंसं तरी वाटायचं. ;)

पास झालो नशीब..

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2013 - 8:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

शंभर टक्के सहमती पोस्ट च्या आशयास :)

ग्रेटथिन्कर's picture

30 Dec 2013 - 8:49 pm | ग्रेटथिन्कर

जोशीबुवा आपण चांगले लेखन करु शकता, शैली आणि विषयाचे आकलन चांगले आहे.

काळा पहाड's picture

30 Dec 2013 - 9:57 pm | काळा पहाड

हे काय लिहले आहे? मला तर याचा काहीच संदर्भ लागला नाहि.

जोशीबुवा आपण चांगले लेखन करु शकता, शैली आणि विषयाचे आकलन चांगले आहे.

तुम्ही लहानपणी डोक्यावर पडला होता का हो?

विनायक प्रभू's picture

30 Dec 2013 - 10:10 pm | विनायक प्रभू

संपूर्ण सत्याबद्दल शंका का बरे?

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2013 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी

लेखात मांडलेल्या मुद्द्यांशी पूर्णपणे सहमत.

मनापासून लिहिले आहे असे जाणवते.

पुस्तकांवर लिहायला, खुणा करायला मलाही आवडत नाही. शाळेत असताना वार्षिक परिक्षा संपल्यावर शेजार्‍यांचा मुलगा माझी पुस्तकं अर्ध्या किमतीत विकत न्यायला येत असे (अभ्यास कमी केल्याने एकदम नव्यासारखी असायची... ;-) ).

जिथे प्रत्येक पुस्तकाची पीडीएफ फाईल माझी पर्सनल कॉपी असते, अन त्यात हवी तितकी अ‍ॅनोटेशन्स मला हवी तिथे टाकता येतात, अशा जमान्यात हा लेख जरा नॉस्टाल्जिक म्हणून सोडून द्यावा असे माझे मत आहे.

एकुणीसशे अमुक साली पुस्तक भूर्जपत्रावरचे आहे, जतन करण्यासारखा ठेवा आहे, त्यानंतर छापील असले तरी महाग आहे इत्यादि कन्सेप्ट्स होत्या.

प्रत्येक माणूस पुस्तक वेगळ्या प्रकारे वाचतो.

मी माझे वाचून झाल्या नंतर, अत्यंत महत्वाचा, व गूगलवर उपलब्ध नसलेला संदर्भग्रंथ असेल, तरच जपून ठेवतो, अन्यथा गावातील सार्वनजनिक वाचनालयास दान करतो. मग त्याचे जे काय होते, त्याचेशी मला कर्तव्य नाही. खिशातल्या मोबाईल फोन मध्ये दीड दोन हजार पुस्तके एकाच वेळी उपलब्ध असतात.

इंग्रजी शिकणार्‍या मुलाने शब्दाचा अर्थ तिथे शेजारीच लिहून ठेवण्यास माझा विरोध आहेच. असे केल्याने पुढच्या वेळी मला अर्थ दिसणार आहे, सबब, मेंदूत साठवायची गरज नाही, असा संदेश वाचतानाच मेंदूस जातो व मेंदू तो शब्द लक्षात ठेवण्याची शक्यता कमी होते. या कारणास्तव विरोध ओके. पण 'पुस्तकाची डिसफिगरमेंट' या अर्थाने पटत नाही. ठिकेय दादा, लिवलं त्यांनी. त्यान्ना वाटलं की ही मेथड भारी आहे. ही त्यांची चूक आहे हे मान्य. पण ते दुर्मिळ पुस्तक, स्क्याण करून ठिवा की. त्यानी केलेली घाण डिलीट करून टाका. असाही कागद हजार वर्षे टिकत नाही... क्लाऊडवर टाकलेले कदाचित टिकेल? ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

30 Dec 2013 - 11:34 pm | हतोळकरांचा प्रसाद

हल्ली पुस्तक कोणी ढापला तर तेवढं वाईट वाटत नाही म्हणा (कदाचित पुस्तकाच्या किंमती आणि पुस्तक ढापणाऱ्याबरोबरचे संबंध कारणीभूत असतील) पण अभियांत्रिकी संपेपर्यंत पुस्तक नेणाऱ्याच्या पाठीमागे पुस्तक मिळेपर्यंत हात धुवून लागत असे. पुस्तकवेडे होण्याची आणि पुस्तकवेडे लोक आजूबाजूला भेटण्याची मजाच काही और!