हे आणि ते - १: पाहुणचार

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
26 Dec 2013 - 12:50 pm

गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. झीवरचा सौरभ हा राधाच्या होऊ घातलेल्या नवर्‍याच्या माजी लफड्याला घेऊन राधाचं आजी लग्न मोडायला निघालेला असा ज्वलंत विषय सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या बावर्‍या राधा आणि बावळट शिरोमणी सौरभच्या भानगडीत विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच महिन्यात आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. पोट भरल्यावर नवचैतन्य उत्पन्न झाल्याने पोरांनी यथेच्छ वात आणायला सुरवात केली. हा सगळा प्रकार मैत्रिणीच्या नवरोबाने शांsssत राहून सहन केला. ह्या गोष्टीला हात लाव, ते उचल, हे काय्ये ते काय्ये कर, मासा ठेवेलेल्या काचेच्या भांड्यात हात घालण्याचा प्रयत्न कर, सोफ्यावर उड्या मार, इतकंच नव्हे तर चिरंजीव सोफ्याला कुठूनतरी पैदा केलेल्या एका पेन्सिलीने भोसकणारच होते, पण माझ्या वेळीच लक्षात आल्याने अनवस्था प्रसंग टळला. थोडक्यात, जितका जास्तीत जास्त वेडेपणा करता येईल तितका वेडेपणा कार्ट्यांनी केला. या पोरांच्या विचित्रपणाचा मला खूपच राग आला होता, पण दोघांच्याही चेहर्‍यावर राग तर सोडाच थोडीशी नाराजी सुद्धा दिसली नाही. या सगळ्यात नंतर कधीतरी दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्याप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावाभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा आणि मुलांच्या वागण्याबद्द्दल खेद व्यक्त करणारा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त करुन 'मुलंच ती मुलांसारखंच वागणार' असा समजूतदार सूर लाऊन आम्हाला आश्वस्त केलं.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हत. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की मैत्रिणीच्या नवर्‍याला रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही, की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं. खरंच, 'अतिथी देवो भव' या वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता.


संस्कृतीप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

26 Dec 2013 - 1:05 pm | सोत्रि

छान अनुभव!

शक्यतो मी प्राइम टाइम टाळतो कोणाकडे जाण्यासाठी.

- (उत्साही यजमान असलेला) सोकाजी

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 1:23 pm | मुक्त विहारि

मला पण आधी हे पहिल्या घराचे अनुभव आले.

तेंव्हापासून मी एखादे पुस्तक घेवून जातो.त्यांनी वेड्या मुलाचे कौतूक चालू केले की आपण शांतपणे आपले पुस्तक वाचायला सुरुवात करावी.

बर्‍याच ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असते, पण तुमच्या अस्तित्वाची दखल घेतली जाईलच अशी अपेक्षा कशाला?

===============

मध्यंतरी माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो, त्याच्या कडे सं.७ वाजल्या पासूनच ह्या मुलाचे कौतूक चालू झाले.बरे ते मूल पण एके ठिकाणी थांबेल तर शप्पथ.जो येतोय तो , त्या मुलाचे कान पिरगळतोय.माझा त्याच्याकडे शेड्युल्ड मुक्काम २ दिवस होता.तो मी २ तासांत आटोपता घेतला आणि माझ्या मावस साडू कडे गेलो.त्याला स्वतःला ह्या मुलाचे कौतूक नाही.मस्त २ च्या जागी ४ दिवस त्याच्याकडेच राहिलो.आजू-बाजूला जरा भटकंती पण केली.त्याचा व्यवसाय असल्याने, त्याच्याच बरोबर हिंडलो.खूप गप्पा झाल्या.मजा आली.
==============================================

बाय द वे..."श्र्वेतांबरा"चे २ भाग बघितल्या नंतर एक पण मालिका बघीतलेली नाही आणि पुढेही बघेन असे वाटत नाही......

=====================================

सौंदाळा's picture

26 Dec 2013 - 1:42 pm | सौंदाळा

छान अनुभव, खुसखुशीत लिखाण.

जेपी's picture

26 Dec 2013 - 2:01 pm | जेपी

मस्त लिखाण .

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 2:10 pm | प्रसाद१९७१

सुरेख मांडणी. सर्वांना च ह्यातुन शिकण्या सारखे आहे.

दुसर्‍या भागाची वाट बघतो आहे.

घरात बायकोला भेटायला दुसरी स्त्री आली आणि आपण असे अतिथ्य केले तर गैरसमज होऊ शकतो. दुसर्‍या बाईचा झाला तर एकवेळेस परवडेल पण बायकोचा झाला तर?
जरा द्विधेत आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

26 Dec 2013 - 7:01 pm | मंदार दिलीप जोशी

खरंच नै समजलं? :P

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 7:04 pm | मुक्त विहारि

साहेब असे काही नसते हो.

निदान आमची घरवाली तरी अशा शंका-कुशंका घेत नाही.

ग्रेटथिन्कर's picture

26 Dec 2013 - 6:34 pm | ग्रेटथिन्कर

हे काय लिवंलय, समजलेच नाय.

मंदार दिलीप जोशी's picture

26 Dec 2013 - 7:01 pm | मंदार दिलीप जोशी

जाऊ दे, तुम्हाला नाही समजायचं.
तुम्ही निवडणुकांकडे वळा ;)

चित्रगुप्त's picture

26 Dec 2013 - 8:19 pm | चित्रगुप्त

उच्छाद मांडलाय या मालिकांनी. संध्याकाळचे कुणाकडे जाणेच अशक्य झालेय आताशा.

पाहुणचाराचे हे असे अनुभव अधूनमधून येतच असतात.

प्रभाकर पेठकर's picture

26 Dec 2013 - 8:57 pm | प्रभाकर पेठकर

मी सुद्धा घरी कोणी पाहुणे आल्यास किंवा मी कोणाकडे गेल्यावर टिव्ही बंद ठेवणेच पसंद करतो. तरी पण एकदा एक कुटुंब आले होते त्यांनीच अगदी 'अरे! आत्ता ती अमुकतमुक मालिका आहे नं? लाव नं, लाव जरा. पाहायचंय मला आज काय होतं ते' वगैरे वगैरे म्हणून मला टिव्ही लावायला लावला. ते टिव्हीत एवढे गुंग झाले की मी तिथून उठून गेल्याचे, माझ्या बायको व्यतिरिक्त, कोणालाही समजले नाही. तासाभराने भूक लागल्यावर जेवताना पुन्हा त्या एपिसोडवर चर्चा झाली. प्रत्येक वादात माझे मत विचारले गेले. मी तिथे नव्हतो हे त्यांच्या गावीही नव्हते. जेवल्यावर 'व्वा! मजा आली. जेवण चांगलं होतं. तुमचा टिव्ही पण सोनीचा आणि मोठा आहे. मजा आली.' वगैरे शेरेबाजी होऊन ते निघून गेले. त्यांना पुन्हा बोलवायचं नाही आणि आपणही जायचं नाही असं ठरवून टाकलं. त्यांचं निमंत्रण आलंच. पण आपण एखाद्या उपहारगृहात जाऊ असे सुचवून ते त्यांना पटविण्यात मी यशस्वी झालो. (त्या उपहारगृहात टिव्ही नाही हे मला ठाऊक होतं).

मंदार दिलीप जोशी's picture

27 Dec 2013 - 11:27 am | मंदार दिलीप जोशी

छान कल्पना.

आणखी एक उपद्रव म्हणजे स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करणं.

तुषार काळभोर's picture

27 Dec 2013 - 12:24 pm | तुषार काळभोर

मागच्या वर्षी मावशीकडे जेवायला बोलावलं होतं, म्हणून गेलो होतो. माझ्याशिवाय अजून काही पाहुणेही आमंत्रित होते. काकांनी टीव्ही आवर्जून बंद ठेवला होता. मी, मावसभाऊ एका बाजूला गप्पा मारत होतो. काका त्यांच्या समवयस्कांशी गप्पा मारत बसले होते. सगळ्या बायका किचनमध्ये बोलत होत्या. अचानक त्यातल्या दोघी हॉल मध्ये आल्या आणि "अग्गोबाई!! साडेआठ-पाच झाले!!! देवयानी लाव रे!" असं म्हणून टीव्ही लावला पण!
मग काकांचे ज्येष्ठ मित्रही त्यात सहभागी झाले. ताटं वाढल्यावर मावशींनी आवाज दिला, म्हणून सगळे उठले. पण देवयानी बघणारा ग्रुप म्हणाला, तुम्ही घ्या जेऊन. आम्ही ९ला जेऊ.

तेव्हा देवयानी होतं. आता राधा, सासू वैग्रे वैग्रे... काळ पुढे सरकला आहे..

ज्ञानव's picture

30 Dec 2013 - 12:56 pm | ज्ञानव

पण आमच्याकडे आलेल्या एका गृहस्थाने "तुमचे टोंयलेट वापरू का?"
ह्या शिष्टाचारानंतर ...."कमोड कसे जमते हो तुम्हाला आम्हाला तर इंडिअनशिवाय होतच नाही." असा विष्ठाचारी खुलासाही दिला होता.

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2013 - 2:52 pm | नगरीनिरंजन

लेख आवडला!
टीव्हीला इडियट बॉक्स हे समर्पक नाव देणारा माणूस द्रष्टा होता.

यसवायजी's picture

30 Dec 2013 - 3:04 pm | यसवायजी

लेख आवडला.