पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती.काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल. वर्तमानपत्रांमधून या प्रयोगाची थोडी कुचेष्टा झाली आणि त्याला थोडा विरोधसुद्धा केला गेला. सगळ्याच नव्या कल्पना या चक्रातून जात असतात, हे अपरिहार्य आहे. पण या वेळी टीका करणा-यांपेक्षा अधिक लोकांनी कौतुकसुद्धा केले हे महत्वाचे आहे. काही लोकांना मात्र या बातमीचे विशेष महत्वच वाटले नाही. एकदा तुमच्याकडे मोटरगाडी आली आणि ती चालवता यायला लागली की त्यानंतर त्यात बसून मुंबईहून ठाण्याला जा, पुण्याला जा किंवा सोलापूरला जा, त्यात विशेष असे काय आहे? लागेल तेवढे पेट्रोल भरायचे आणि हवी तेवढी गाडी पळवायची! त्याच प्रमाणे एकदा आपले यान चंद्रावर गेले असल्यानंतर दुस-या यानाला मंगळावर पाठवायचे असेल तर त्यासाठी मोठे रॉकेट घ्यायचे, त्यात भरपूर इंधन भरायचे आणि त्याला मंगळापर्यंत पाठवून द्यायचे अशी अनेक लोकांची कल्पना असणे शक्य आहे. त्यासाठी तब्बल पाच वर्षे कशाला लागली? असेही त्यांना वाटले असेल
माझ्या काही मित्रांनी तर हे यान इतके किलोमीटर जाणार आहे आणि त्यासाठी इतका खर्च होणार आहे वगैरेंचे त्रैराशिक मांडून दर किलोमीटरमागे फक्त बारा रुपये एवढा खर्च येणार आहे हे उत्तर काढले आणि हे मुंबईमधल्या टॅक्सीभाड्यापेक्षाही स्वस्त असल्याचे दाखवून दिले. अवकाशामधल्या (स्पेसमधील) निर्वात पोकळी(व्हॅक्यूम)मधून पुढे जात राहणा-या वाहनाला कसलाच विरोध नसतो, त्यामुळे तिथे भ्रमण करतांना ऊर्जा खर्च होत नाही आणि ती पुरवावीही लागत नाही. हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. जवळचे उदाहरण घ्यायचे झाल्यास उतारावरून सायकल चालवतांना पायाने पॅडल मारावे लागत नाही. पण सायकल रस्त्यावरच रहावी यासाठी हातांनी हँडल धरून गरज पडल्यास मनगटाच्या जोराने ते थोडेसे वळवावे लागते. जोराने पॅडल मारतांना अंगाला घाम येतो, दम लागतो तसले काही सायकलचे हॅडल वळवतांना होत नाही, कारण त्यासाठी अगदी नगण्य असे परिश्रम करावे लागतात. त्याचप्रमाणे अवकाशात पाठवलेल्या चंद्रयान किंवा मंगळयान यांनाही वेळोवेळी आपली दिशा बदलण्यासाठी जोर लावावा लागतो, त्यात थोडे इंधन ख्रर्च होते. पण रॉकेटमध्ये भरलेले बहुतांश मुख्य इंधन त्याला सुरुवातीला जमीनीवरून प्रचंड वेगाने उड्डाण करण्यातच भस्म (किंवा वाफ) होऊन जाते. त्या वेळी निघालेला त्याच्या आगीचा भयानक भडका पाहूनच याची कल्पना येईल. आणखी काही दिवसांनी पृथ्वीला टा टा, बाय बाय करून हे मंगळयान मंगळ ग्रहाला भेटायला जायला निघेल त्यानंतरचा काही कोटी किलोमीटरचा त्या यानाचा प्रवास चकटफूच होईल. मंगळाजवळ गेल्यानंतर त्याला आपला मार्ग बदलून त्याच्या कक्षेत शिरण्यासाठी पुन्हा थोडे इंधन जाळावे लागेल.
हे असे असेल, तर मग चंद्राहून शेकडोपट दूर अंतरावर असलेल्या मंगळापर्यंत पोचण्यासाठी तितक्या पटीने इंधनाचीही गरज पडत नाही. यामुळे हे काम जास्तच सोपे व्हायला पाहिजे आणि एका दृष्टीने पाहता तसे आहे. पण हा मार्गच फार वेगळा असल्यामुळे त्यातली आव्हानेही अनेकपटीने कठीण आहेत. यामुळेच जगातल्या मोजक्या प्रगत देशांनी ती आतापर्यंत पेलली आहेत. दुस-या महायुद्धानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (थोडक्यात यूएसए किंवा फक्त अमेरिका) आणि सोव्हिएट युनियन (यूएसएसआर किंवा रशिया) या दोन महाशक्ती उदयाला आल्या आणि जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपणच जास्त प्रगत आहोत असे जगाला दाखवणे हा त्या स्पर्धेचा एक भाग होता. अवकाशविज्ञानाच्या (स्पेस सायन्स) बाबतीत रशियाने सुरुवातीला थोडी आघाडी मिळवली होती. स्पुटनिक हा पहिला उपग्रह, लायका ही कुत्री आणि युरी गागारिन हा पहिला कॉस्मोनॉट यांना अवकाशात पाठवण्यात त्या देशाने पहिला मान मिळवला. १९६१ साली युरी गागारिनने अंतराळात जाऊन यायच्याही आधी १९६० सालापसून रशियाने मंगळावर यान (स्पेसक्राफ्ट) पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण पहिल्या दहा वर्षांमध्ये ते ओळीने नऊ वेळा अपयशी ठरल्यानंतर १९७१ साली त्यांचा दहावा प्रयत्न यशस्वी झाला. अमेरिकेने त्या मानाने उशीरा सुरुवात केली असली तरी दुस-याच प्रयत्नात म्हणजे १९६५ साली त्यांचे यान मंगळापर्यंत जाऊन व्यवस्थितपणे पोचले. त्यानंतर काही प्रयोगांमध्ये अमेरिकासुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आतापर्यंत मंगळावर यान पाठवण्याचे ५१ प्रयत्न केले गेले आहेत, पण त्यातल्या फक्त २१ वेळा त्यांना यश आले आहे. त्यातले युरोपियन स्पेस एजन्सीचे दोन आहेत आणि बाकीचे प्रयत्न अमेरिका किंवा रशियाचे आहेत. युनायटेड किंग्डम (थोडक्यात इंग्लंड), जपान आणि चीन या देशांना अजूनपर्यंत यश आलेले नाही. भारताचा प्रयत्न आता नुकताच सुरू झाला आहे.
हिमालयातल्या अमरनाथ गुहेमधल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन वर्षामध्ये फक्त काही दिवसच घेता येते असे म्हणतात. तो कालखंड सोडून इतर वेळी कोणीही यात्रेकरू तिथे जाऊ शकत नाही. पृथ्वीवरून मंगळावर जायचे असल्यास आपल्या मनाला वाटेल तेंव्हा कधीही तिकडे जाता येत नाही. आकृती क्र.१ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात, तशा परिस्थितीत ते सहज शक्य वाटते. पण या दोन ग्रहांमधले अंतर इतके जास्त आहे की ते पार करेपर्यंत काही महिने निघून जातील. तोपर्यंत ते दोघेही कुठल्या कुठे गेलेले असतील. आकृती क्र.२ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्यापासून खूप दूर गेलेले दिसतात, इतकेच नव्हे तर ते सूर्याच्या दोन विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे त्या यानाने मंगळाकडे जाण्यासाठी सूर्याच्या जवळून जायला पाहिजे आणि तसे गेले तर सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने ते त्याच्याकडे खेचले जाईल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचायच्या आधीच सूर्यप्रकाशामधील ऊष्णतेनेच त्याची वाफ होऊन जाईल. या सगळ्यांचा विचार करता मंगळावर जाण्याची मोहीम काही विशिष्ट कालखंडातच हाती घेणे शक्य असते. क्र.१ मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे एका रेषेत येण्याचा योग दर दोन वर्षांनंतर येतो. प्रत्येक वेळी ते ग्रह आकृती क्र.१ मध्येच दाखवलेल्या जागीच नसतील, आपापल्या कक्षांमधल्या इतर ठिकाणी (पण एकमेकांच्या जवळ) असू शकतील. ते कुठेही असले तरी त्या सुमारासच ही मोहीम हाती घेता येते.
यापूर्वी मार्च २०१२ मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, पण मंगळाच्या दिशेने पाठवलेली याने त्याच्या चार महिने आधी म्हणजे नोव्हेंबर २०११ मध्ये पृथ्वीवरून निघाली होती. यानंतर २०१४ च्या एप्रिल मे च्या सुमाराला पुन्हा एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्याला भेटायला पृथ्वीवरून या वर्षीच्या नोव्हेंबरपासून जानेवारी २०१४ पर्यंतच प्रस्थान करणे आवश्यक आणि शक्य आहे. या कारणामुळे या काळात भारताचे मंगळयान निघालेले आहे आणि मॅव्हेन किंवा मेव्हन हे अमेरिकेच्या नासाचे यान सुद्धा जमीनीवरून उड्डाण करून मंगळाच्या प्रवासाला निघाले आहे. ही दोन्ही याने पहिले काही दिवस पृथ्वीप्रदक्षिणा करत राहतील आणि त्यानंतर योग्य वेळी मंगळाच्या दिशेने कूच करतील. मंगळाच्या कक्षेत फिरून दुरूनच त्याचे निरीक्षण करण्यासाठी ही याने पाठवण्यात येत आहेत. मंगळावर उतरण्याची त्यांची योजना नाही. यानंतरच्या मोहिमा सन २०१६ किंवा २०१८ मध्ये घेण्यात येतील, त्यांची तयारी मात्र आतापासून सुरू झाली आहे.
या दोन्ही यानांची ही अंतराळातली सफर कोणत्या मार्गाने आणि कशी होणार आहे हे पाहण्यापूर्वी काही मूलभूत शास्त्रीय मुद्द्यांची उजळणी करायला हवी. आपण जेंव्हा जमीनीवरून चालत असतो तेंव्हा प्रत्येक पाऊल पुढे टाकतांना आपण हलकेच जमीनीला मागे ढकलत असतो आणि त्याच्या प्रतिक्रियेमुळे जमीन आपल्याला पुढे ढकलते यामुळे आपण पुढे जातो. बुळबुळीत शेवाळे किंवा अतीशय गुळगुळीत अशा बर्फाच्या थराला आपण पायाने मागे ढकलल्यास आपला पायच त्यावर घसरतो त्यामुळे आपण त्या वेळी जमीनीला मागे ढकलू शकत नाही आणि त्यामुळे आपण पुढेही जात नाही. एकादी उडी मारतांना आपण जमीनीला पायाने एक जोराचा झटका देतो आणि त्याची जमीनीकडून जी प्रतिक्रिया होते तिच्या जोरामुळे (फोर्समुळे) आपण वर फेकले जातो. पण गुरुत्वाकर्षणाने जमीन आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असतेच, त्यामुळे थोडे वर गेल्यानंतर आपण पुन्हा खाली येतो. दलदलीत किंवा रेतीच्या ढिगावर उभे राहून उडी मारायचा प्रयत्न केला तर पायाखालचा चिखल किंवा रेती बाजूला सरकल्याने जमीनीकडून प्रतिक्रिया मिळत नाही. यामुळे आपण वर उचलले न जाता जास्तच खोल रुतत जातो. पाण्यातून जाणारे जहाजसुद्धा पाण्याला मागे सारूनच पुढे जात असते आणि सगळे पक्षी त्यांच्या पंखांनी हवेला खाली किंवा मागे ढकलून हवेत उडत असतात. स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारणारे किंवा बंगी जंपिंग करणारे खेळाडू उडी मारून झाल्यावर काही क्षण हवेत असतात, त्या काळात ते कोलांट्या मारतात, गिरक्या घेतात, अनेक प्रकारे हातपाय हलवतात, पण खाली पडत असतांना ते मध्येच थांबू शकत नाहीत, किंवा हवेत असतांनाच उसळी मारून पुन्हा उडी मारून वरच्या दिशेने जाऊ शकत नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खाली येण्याची त्यांची ट्रॅजेक्टरी जशीच्या तशीच राहते. थोडक्यात सांगायचे झाल्यास पुढे जाण्यासाठी दुस-या कशाला तरी मागे ढकलणे (किंवा ओढणे) आवश्यक असते तसेच वरची पातळी गाठण्यासाठी कशाला तरी खाली ढकलणे (किंवा खेचणे) आवश्यक असते. याच्या उलट असेही दिसेल की बुळबुळीत शेवाळे किंवा अतीशय गुळगुळीत बर्फाच्या थरावर आपण घसरत असलो तर ती घसरणूक थांबवण्यासाठी देखील आपल्याला कशाचा तरी भक्कम आधार घ्यावा लागतो. फक्त आपल्या शरीराच्या हालचालींमधून त्याचे घसरणे थांबवता येत नाही. त्यासाठी बाह्य कारणाची गरज असते.
अवकाशाच्या निर्वात पोकळीत (स्पेसमध्ये) जमीन, पाणी, हवा वगैरे काहीही नसते. कशालाही ढकलून त्याच्यापासून दूर (किंवा ओढून त्याच्या जवळ) जाण्याची सोय तिथे नसते. अंतराळातल्या प्रयोगशाळेतला (स्पेसलॅबमधला) एकादा अॅस्ट्रोनॉट त्यामधून स्पेसवॉक करण्यासाठी बाहेर निघाला तर त्या लॅबला ढकलून तो तिच्यापासून दूर जाऊ शकतो, पण त्याने तसे केले तर त्या रिकाम्या जागेत त्याला अडवणारा कसलाच अडथळा नसल्यामुळे तो दूर दूरच जात राहील. त्याने कितीही हातपाय हलवले किंवा झटकले तरी तो दूर जाण्याची दिशा बदलून मागे परत येऊ शकणार नाही. पण असे होऊ नये यासाठी एका मजबूत साखळीद्वारे त्याला त्या लॅबशी जोडून ठेवलेले असते, तो फक्त एक सेफ्टी बेल्ट नसतो, त्या अॅस्ट्रोनॉटला सुखरूप परत येऊ शकण्यासाठी ही सोय करावीच लागते. त्या साखळीमुळे एक तर तो यानापासून जास्त दूरवर भटकत जाणार नाही आणि दुसरे म्हणजे तिला धरूनच तो हळूहळू परत येऊ शकतो.
. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 11:16 pm | आनंद घारे
मंगलयानाच्या मोहिमेचा फायदा आणि तोटा यावर बराच विचार झालेला आहे. अनेक लोकांना याबद्दल उत्सुकता वाटत असावी असे मला वाटले. या लेखाचा उद्देश सोप्या भाषेत तांत्रिक माहिती करून देणे एवढाच आहे.
21 Nov 2013 - 11:17 pm | मुक्त विहारि
पु भा प्र
21 Nov 2013 - 11:41 pm | चेतनकुलकर्णी_85
छान लेखमाला सुरु होणार असे दिसत आहे :)
अवकाशामधल्या (स्पेसमधील) निर्वात पोकळी(व्हॅक्यूम)मधून पुढे जात राहणा-या वाहनाला कसलाच विरोध नसतो, त्यामुळे तिथे भ्रमण करतांना ऊर्जा खर्च होत नाही आणि ती पुरवावीही लागत नाही.
एक शंका
निर्वातात घर्षण शून्य असते पण उपग्रह जेव्हा जेव्हा स्पेस मध्ये असतो तेव्हा कायम त्यावर बाकीच्या ग्रहांच्या वा सूर्याच्या गुरुत्व शक्तीचा परिणाम टाळण्या साठी यानाला कायम काही उर्जा खर्च करावीच लागत असणार ना ?
सायकलच्याच उदाहरणात जर सायकल उतारावर जात असेल पण मागून जर एखादा शक्तिशाली चुंबक तिला खेचत असेल तर सायकलस्वाराला नक्कीच जास्त जोरात पॅडल मारावे लागेल तसेच यानाचे पण कायम पूर्ण प्रवासात होते का?
22 Nov 2013 - 9:03 am | आनंद घारे
सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कसा असतो आणि त्याचे काय परिणाम होतात याची चर्चा उत्तरार्धात देणार आहे.
24 Nov 2013 - 8:52 am | आनंद घारे
बाकीच्या ग्रहांच्या वा सूर्याच्या गुरुत्व शक्तीचा परिणाम अवकाशातल्या सर्वच गोष्टींवर (आपल्यावरसुद्धा) होतच असतो. ज्योतिष सांगणारे ज्या प्रकारचा परिणाम सांगतात ते मला इथे अभिप्रेत नाही. या गुरुत्वाकर्षणामुळे मंगलयानाच्या प्रवासावर होणारे परिणाम असे आहेत. मंगळयानाचा बहुतेक सगळा प्रवास सूर्याच्या भोवती फिरण्याने होणार असल्याचे मी दुसर्या भागात सविस्तर लिहिले आहे. जेंव्हा हे यान मंगळाच्या जवळ जाऊन पोचेल तेंव्हा ते त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने त्याला घिरट्या घालू लागेल. गुरु, शनी वगैरे इतर महत्वाचे ग्रह फार दूर असल्यामुळे त्यांच्या आकर्षणाची शक्ती अत्यंत क्षीण झालेली असते. प्रुथ्वीच्या परिभ्रमणावर इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम सुद्धा अत्यंत नगण्य असा असतो, पण खूप बारकाईने निरीक्षण केल्यास तो मोजता येतो. बहुतेक वेळा हे ग्रह निर्निराळ्या दिशांना असल्यामुळे त्यांचे आकर्षण वेगवेगळ्या दिशांना खेचत असते. त्यामुळे त्यांचा एकंदर परिणाम कमी होतो
22 Nov 2013 - 12:59 am | विकास
लेख मस्त आहे आणि लेखमाला पण छानच होणार आहे! इंधन कधी लागते आणि लागत नाही याची माहिती एकदम रोचक.
आपली मंगळस्वारी मंगळापासून बरीच योजने लांबच असणार आहे आणि ती देखील अंडाकृती आकारातील घिरट्यांमधे असणार आहे, असे ऐकलेले आहे. त्याची काही लॉजिकल कारणे असतील असे वाटते. त्या संदर्भात पण वाचायला आवडेल...
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
22 Nov 2013 - 8:02 pm | आनंद घारे
सूर्यमालिकेतील पृथ्वासकट सर्वच ग्रहांच्या तसेच आपल्या चंद्राची कक्षा या सगळ्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत. जवळ जवळ सारे कृत्रिम उपग्रहसुद्धा पृथ्वीभोवती अशाच कक्षांमध्ये फिरत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे एकमेकांभोवती फिरणे नेहमी अशाच प्रकारचे असते. याचे शास्त्रीय कारण सविस्तरपणे समजावून सांगण्यासाठी भूमितीतल्या आकृती आणि काही सूत्रे (फॉर्म्यूले), समीकरणे (इक्वेशन्स) वगैरे मांडावी लागतील. कदाचित एक वेगळा लेखच लिहावा लागेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास कोणतीही वस्तू न्यूटनच्या नियमानुसार विशिष्ट गतीने सरळ रेषेत पुढे जात असते. यामुळे ती जर सरळ रेषेत वर जात नसेल तर आडव्या किंवा तिरक्या अशा एका वेगळ्याच दिशेने पण पृथ्वीपासून दूर जात असते. गुरुत्वाकर्षणाचा जोर (फोर्स) मात्र फक्त पृथ्वीच्या मध्यबिंदूच्या दिशेने तिला ओढत असतो. यामुळे ती वळते आणि पृथ्वीच्या जवळ येते. प्रत्येक क्षणी हे दूर जाणे आणि जवळ येणे अगदी नेमके तितकेच असले तर ती वस्तू पृथ्वीच्या मध्यबिंदूपासून तितक्याच अंतरावर राहील आणि ती वर्तुळाकार कक्षा असेल. पण तसे सहसा नसते. त्यामुळे ती वस्तू काही काळ दूर दूर जाते आणि काही काळ जवळ जवळ येते, त्या वेळी तिची गतीही बदलत असते. असे भ्रमण लंबवर्तुळाकाराच्या आकारात होते.
लंबगोलाला दोन मध्यबिंदू असतात. वर्तुळात ते एकवटलेले असतात किंवा त्यांच्यामधले अंतर शून्य असते. यामुळे वर्तुळ हा लंबगोलाचा (की लंबवर्तुळाचा) म्हणजे इलिप्सचा एक विशिष्ट प्रकार आहे असे म्हणता येईल.
22 Nov 2013 - 8:39 pm | विकास
ह्या माहितीबद्दल धन्यवाद. जालावर जेंव्हा मी मंगलयानाच्या संदर्भात प्रथम वाचले तेंव्हा माझा गैरसमज झाला होता की तसे मुद्दाम केले होते पण खात्री नव्हती.
22 Nov 2013 - 1:37 am | प्यारे१
घारेकाका पुन्हा लिहीते झाले हे वाचून आनंद झाला.
पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे.
22 Nov 2013 - 8:07 pm | आनंद घारे
माझे काही बाही लिहिणे चाललेलेच असते. मिसळपाववर ते वाचले जाईल असे जेंव्हा मला वाटते, तेंव्हा ते इथे चिकटवून देतो.
22 Nov 2013 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त माहितीपूर्ण लेखमाला वाचायला मिळणार असेच दिसत आहे. सुंदर सुरूवात ! पुभाप्र.
22 Nov 2013 - 3:48 am | रेवती
माहिती एकदम आवडली घारेकाका! पुढील लेखनाची वाट पाहते.
22 Nov 2013 - 5:45 am | स्पंदना
थोड कळतय, थोड नाही. पण आपल्या कृपेने कुणी बोलायला, चर्चा करायला लागल तर निदान काय बोलताहेत ते समजेल तरी.
धन्यवाद घारेकाका.
22 Nov 2013 - 10:08 am | चौकटराजा
लेख माहिती पूर्ण . घारे काकांच्या ब्लोंगचा मी फ्यान आहेच्चे !
यावरून काही वर्षापूर्वीची एक गंमत आठवली. पुण्यातील एक चार्टर्ड अकौंटट यानी बोस्टन येथे एक चोवीस फुटी विमान विकत घेतले. एक्ट्याने त्यानी ते बोस्टन वरून पुण्यास आणले. फक्त अटलांटिक सागरात एका रिफुएलिंग आयलंड पर्यंत एका निग्रोने त्यान सोबत केली.त्यांचे व्याख्यान झाल्यावर त्याना भेटलो व हे विमान चालवणे परवडते कसे असे विचारले
" एव्हिएशन चा लोड सोडल्यास आकाशातून कार न्यावी इतकाच खर्र्च येतो " असे त्यांचे उत्तर होते.
22 Nov 2013 - 10:20 am | अग्निकोल्हा
एकदम विस्तृत येउदे.
22 Nov 2013 - 10:35 am | प्रमोद देर्देकर
नमस्कार घारे काका,
मी तुमच्या सगळ्या अनुदिनींचा चाहता आहे. हा लेख व इतरही लेख मी तुम्च्या अनुदिनी वर आधीच वाचलेले आहेत. विज्ञानातील इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हे काम तर खुपच कठिण. (पण साध्या शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द या वर मी. पा. वर मी एक धागा काढणार आहे.) अत्याधुनिक तन्त्रज्ञानाच्या क्षेत्रात कामाचे ढीग उपसताना तुम्हि समान्यांसाठी केलेले हे ज्ञान संवर्धन स्तुत्य आहे. एवढी माहिती वाचायला आम्हाला वेळ काढावा लागतो; तेथे तुम्ही़ टंकन कसे करता म्हणजे कंटाळा कसा येत नाही. खुप खुप धन्स आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
Book Antiqua
22 Nov 2013 - 3:48 pm | अनिरुद्ध प
पु भा प्र
23 Nov 2013 - 8:45 am | मदनबाण
लेखन आणि माहिती आवडली. :) पुढच्या भागाची वाट पाहतो.
जाता जाता :- या मंगळ यानाचे लाईव्ह टेलिकास्ट पाहत होतो तेव्हा एक गोष्ट पाहिली होती की ज्या अपेक्षित मार्गावरुन हे यान जायला हवे होते त्यापेक्षा थोड्या वरुन ते चालले होते. {हे दाखवल्या जाणार्या ग्राफ मधे स्पस्ट दिसत होते.}
23 Nov 2013 - 9:34 am | आनंद घारे
अग्निबाणाच्या कप्प्यांमध्ये किती इंधन आणि प्राणवायू ठेवायचा हे ठरवले जाते. त्यावरून एकंदर किती ऊर्जा द्यायची याचे गणित केले जाते. त्याचा जेंव्हा स्फोट होतो त्या क्षणी किती मिलिसेकंद किंवा मायक्रोसेकंदांमध्ये ती ऊर्जा किती प्रमाणात बाहेर पडेल यावर नियंत्रण नसते. हवेचा विरोध हा रॉकेटच्या वेगावर अवलंबून असतो तसेच त्या क्षणी हवेचा दाब, आर्द्रता, ढग, धुळीचे कण, वा-याचे प्रवाह वगैरे कित्येक बाबींवर अवलंबून असतो. त्यावरही कोणाचे नियंत्रण नसते. एका मर्यादेच्या पलीकडे वाईट हवामान असले तर उड्डाणाचा बेत लांबणीवर टाकणे एवढेच करता येते. याच कारणांमुळे अपेक्षित ट्रॅजेक्टरी आणि प्रत्यक्षातला मार्ग यांची तुलना करून त्यानुसार उपाययोजना केली जाते. कोणतेही चांगले यंत्र डिझाइन करतांनाच ते कसे चालणार आहे याचा एक अंदाज केला जातो, ते कसे चालते आहे याचे निरीक्षण करून प्रत्येक महत्वाच्या पॅरामीटरची मोजणी, तुलना आणि त्यात बदल करण्याची क्षमता किंवा सोय त्यात केली जाते. मंगलयान अपेक्षेपेक्षा थोड्या वेगळ्या वाटेने चालले असले तरी हा फरक अपेक्षित होता आणि मर्यादेच्या आत होता म्हणून त्याला यशस्वी उड्डाण असे ठरवून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि एकमेकांचे अभिनंदन केले
23 Nov 2013 - 9:07 am | तिमा
वाचत आहे, लेखमाला चांगलीच होणार.
23 Nov 2013 - 6:15 pm | आनंद घारे
या लेखाचा उत्तरार्ध प्रकाशित केला आहे. या भागात विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आणि खुलासा या भागात केला आहे.
उत्तरार्धाचा दुवा
23 Nov 2013 - 6:58 pm | पैसा
प्रतिसादातूनही उत्तम माहिती मिळाली आणि तीही सोप्या भाषेत. धन्यवाद!